The Deep Connection Between Indian Culture and Nature Sakal
संपादकीय

अप्पलपोटेपणाची आग

आगी आटोक्यात आणण्यासाठी प्रशासकीय उपाययोजना हव्यातच; पण जंगलांबाबत आत्मीयता निर्माण होणे जास्त महत्त्वाचे.

सकाळ वृत्तसेवा

भारतीय संस्कृती निसर्गाशी नाते सांगते, आपले सण-उत्सव-परंपरा या निसर्गातील घडामोडींशी निगडित आहेत. आजही आदिवासी समाज परंपरेनुसार निसर्गाशी असलेली नाळ शाबूत ठेवत सण-उत्सव साजरे करतो.

तथापि, माणूस आणि निसर्ग यांच्यातील ऋणानुबंध, सामाजिक आणि व्यावहारिक नाते तुटत गेले, तशी त्याबाबतची बेफिकिरी वाढत गेली. त्याचा परिपाक म्हणजे वाढणाऱ्या आगीच्या घटना. अर्थात, विकासाच्या नावाखाली जंगलांचा घास घेणे, हे जागतिक वास्तव आहे.

ब्राझीलमधील ॲमेझॉनचे जंगल असो, वा हिमालयातील पर्वतराजी किंवा पश्‍चिम घाट; सगळीकडे आगीच्या घटना वर्षांनुवर्षांपासून वाढत आहेत. नैसर्गिक स्थिती, हवामानबदलामुळे निर्माण होणारे वातावरण त्याला जितके कारणीभूत आहे त्याहीपेक्षा बेमुर्वतखोरपणे, स्वार्थी हेतूने जंगलांना आगी लावण्याचे प्रकार धोकादायक आहेत.

आठवडाभरापेक्षा अधिक काळ उत्तराखंडाची राजधानी नैनिताल, चंपावत, हल्दवानी, रामनगर हा परिसर आगीच्या घटना आणि त्याच्या परिणामांनी पुरता त्रस्त आहे. या आगींने आतापर्यंत दोन महिलांसह पाच जणांचा बळी घेतला आहे.

ती आटोक्यात आणण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ), स्थानिक पोलिस यांच्या जोडीला लष्कर व हवाई दल प्रयत्नशील आहेत. हवाई दलाने ऑपरेशन बाम्बी बाल्टी राबवून सातत्याने हेलिकॉप्टरद्वारे आगी आटोक्यात आणण्याचे प्रयत्न जारी ठेवले आहेत, तथापि कुमाऊ, गढवाल भागात नव्याने लागणाऱ्या आगींमुळे डोकेदुखी अधिक गंभीर रूप धारण करत आहे.

अगदी दरतासाला एक आग, असे त्याचे प्रमाण आहे. उत्तराखंडामध्ये गेल्या नोव्हेंबरपासून आगीच्या जवळजवळ सातशे घटना घडल्या आहेत. त्यामुळे एक हजारपेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रावरील जंगल बेचिराख झाले किंवा त्याचे अतोनात नुकसान झाले आहे.

भारतीय वन सर्वेक्षणाकडील माहितीनुसार, २८ एप्रिलनंतरच्या आठवडाभरात आगीच्या घटनांची सर्वाधिक नोंद हिमालयाच्या भागात झाली असून, त्या खालोखाल ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड यांचा क्रम लागतो.

तसेच आगीबाबत इशारा देण्याच्या संख्यात्मक वाढीतही हाच क्रम जवळजवळ कायम दिसतो. गेल्या वर्षी याच कालावधीत लागलेल्या आगीच्या तिप्पट आगी यावर्षी लागल्या आहेत. दुर्दैवाने आगींमागे नैसर्गिक घटनांपेक्षा मानवी हातच अधिक असल्याचे निदर्शनाला आले आहे.

देवभूमी असलेल्या उत्तराखंडामध्ये एकूण भूभागाच्या पन्नास टक्क्यांवर जंगल होते; त्याचे प्रमाण आता ४५ टक्क्यांपर्यंत घसरले आहे. पाईनची उंचचउंच गगनाला गवसणी घेणारी झाडे हे त्याचे वैशिष्ट्य. त्यांची पानगळ होते, त्याची टोकदार सुयांसारखी पाने वाळून साऱ्या जमिनीवर अच्छादन घालतात.

आगी लागतात तेव्हा झाडाझुडपांसह असलेली ही वाळलेली पाने आग वेगाने पसरण्यास कारणीभूत ठरतात. त्यातच शुष्क हवामान, जमिनीतील घटलेली आर्द्रता अशा कारणांनी त्यात भरच पडते. आगीमुळे वनसंपदा नष्ट होतेच; शिवाय हवेचे वाढणारे प्रदूषण, त्यामुळे हवेत वाढणारा कार्बन, प्रदूषणकारी धुलीकण, जैवविविधतेची भरून न येणारी हानी आहेच.

नैनिताल असो वा हरिद्वार, ऋषीकेश; उत्तराखंडची अर्थव्यवस्था पर्यटनाधारित अधिक आहे. पर्यटनाच्या व्यवसायालाही आगीमुळे ग्रहण लागत आहे. विकास प्रकल्पांच्या नावाखाली मुळातच उत्तराखंड उजाड आणि भकास होत आहे.

निवडणुकीत आगीच्या घटना, पर्यावरणाचा ऱ्हास या मुद्यांवरही चर्चा झाली.यावरून नागरिकांमध्ये वाढणारी जागरूकता दिसत असली तरी आगी लावण्यामागील हातांना कडक शिक्षा होत नाही तोपर्यंत त्यांचे सत्र थांबेल, असे वाटत नाही.

पर्यावरण, वने आणि हवामानबदल मंत्रालयानेही वणवे रोखण्यासाठी विविध उपाययोजना जारी केल्या आहेत. आगींची पूर्वकल्पना यावी म्हणून ठिकठिकाणी टेहळणी मनोरे उभारणे, त्याबाबत दक्षतेचा इशारा देणाऱ्यांची फळी उभी करणे आणि या कामात मदतीसाठी स्थानिकांचा सहभाग वाढवणे, त्यांचे प्रबोधन करून आगी लावण्यापासून रोखणे, तरी त्या लागल्या तर त्या आटोक्यात आणण्यासाठी पुढाकार घेणे यावर भर दिला आहे.

चांगल्या, परिणामकारक जाळरेषा निर्माण करणे हीदेखील तितकीच आवश्‍यक बाब आहे. त्यामुळे आगींचे पसरणे रोखता येते, त्यामुळे होणारी हानीही टाळता येते. उपग्रहांद्वारे टेहळणी करून आगी लागताच उपाययोजना करण्यावरही भर आहे.

तथापि, प्रशासकीय तयारी कितीही चांगली असली, त्यांच्या मार्गदर्शक सूचना योग्य असल्या तरी जंगल, जमिनीबाबत माणसाचे नाते घट्ट असणे महत्त्वाचे आहे. जोवर जंगलाविषयी आत्मीयता वाटत नाही, वनसंपदेचे महत्त्व कळत नाही, तोपर्यंत आगींवर पूर्णपणे नियंत्रण अशक्य आहे.

असाध्य ते साध्य। करिता सायास।

कारण अभ्यास। तुका म्हणे।।

— संत तुकाराम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar On Narendra Modi : मोदींनी ७५ व्या वर्षी राजकारणातून निवृत्त व्हावं का? शरद पवारांनी एका वाक्यात सांगितलं, देवाभाऊंवरी टीका

Gadchiroli News: दोन महिला माओवाद्यांना कंठस्नान; गडचिरोली जिल्ह्यातील मोडस्के जंगल परिसरात चकमक

Gold Rate Today : सोन्यात घसरण सुरुच,चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

बाबो! सुरज चव्हाणचं खरंच लग्न ठरलं? सोशल मीडियावर शेयर केलेली पोस्ट चर्चेत, चाहत्यांचा म्हणाले..."हीच का आपली वहिनी?"

SCROLL FOR NEXT