जगणं अर्थवाही करणारी मिथकं  sakal
संपादकीय

जगणं अर्थवाही करणारी मिथकं

गाव सोडल्या सोडल्या शेताकडे जाताना मोठी टेकडी दिसते आणि त्या टेकडीवर सुळक्यासारखं बांधलेलं मंदिर. मंदिराच्या कळसावरचा पांढरा दिवा सायंकाळी दुरून लुकलुकताना दिसू लागतो. सूर्य मावळल्यानंतर दिशादर्शक दीपस्तंभासारखा.

सकाळ वृत्तसेवा

ओंजळ

दत्ता पाटील

गाव सोडल्या सोडल्या शेताकडे जाताना मोठी टेकडी दिसते आणि त्या टेकडीवर सुळक्यासारखं बांधलेलं मंदिर. मंदिराच्या कळसावरचा पांढरा दिवा सायंकाळी दुरून लुकलुकताना दिसू लागतो. सूर्य मावळल्यानंतर दिशादर्शक दीपस्तंभासारखा. टेकडीजवळ शेत असलेल्या मित्राकडे अनेकदा गेल्यावर अंगणात खाटेवर बसल्यावर ही टेकडीसारखी खुणावत असते. तिच्यावर अलीकडेच झालेलं शेलाट्या अंगाचं चिंचोळं मंदिर टेकडीच्या डोक्यावर उगवलेल्या शुळासारखं वाटतं. मित्राच्या वारकरी आजीला विचारलं एकदा, ‘कसलं मंदिर बांधलंय हे?’ म्हणाली, ‘बुवांचं.’ मी म्हणालो, ‘‘तुकोबाचं मंदिर? कुठं देहू, कुठं आपलं गाव... इतक्या दूर कशाला येतील बुवा?’’ म्हणाली, ‘‘व्हयं. बुवांच्या बारा टाळकऱ्यांचं मंदिर.’’ ‘बारा टाळकऱ्यांचं?’ ती म्हणाली, ‘व्हयं रे बाबा. जा, जाऊन ये दर्शनाला.’

म्हणालो, ‘जातो, पण बारा टाळकरी म्हणजे?’ ती काहीच बोलली नाही. जगण्याला शोधाची भुणभुण देणारं एक विलक्षण मिथक सांगून हात टेकत जमिनीच्या आधारानं उभी राहिली आणि मंदिराकडे पाहात आत निघून गेली. शिवारातले लोक म्हणाले, ‘‘तुकाराम महाराज दुष्काळानंतर रानोमाळ भटकताना इकडे आले. या टेकडीवर.’’ इतक्या दूर? शिवारातलाच एक जण म्हणाला, ‘आता इतिहास हाय त्यो. खोटा थोडी असायचा?’ बाकीच्यांनी री ओढली. जगण्याला मिथकाचा आधार की, मिथकाला जगण्याचा सन्मान? सत्य-असत्याच्या पलीकडे नेणारी एक धूसर पायवाट दाखवून जराशानं सगळे पांगले. अंधार पडला.

काँक्रिटच्या बसक्या छोट्या बंगल्याच्या छतावरचं लाईट लागले. पावसाळी किडे धावत येऊन दिव्याला राखू लागले. जवळ असली तरी टेकडी आता अंधाराचाच एक भाग वाटत होती, त्यावरचं मंदिर अधांतरी तरंगत होतं. प्रश्न विचारला नि आजी उठून गेली. प्रश्न विचारला नि शिवारातली म्हातारी माणसं डोंगराकडे पाहात गप्प झाली. सकाळी बारा टाळकऱ्यांच्या डोंगराकडे निघालो तेव्हा काळेशार ढग ओणवे होऊन आलेले. दिंड्या निघाव्यात तशा सरी येऊन जात होत्या... गढूळलेल्या पाण्यावर सतत एक उदासी व्यापून राहिलेली. तिकडे पांडुरंगाच्या भोवती लाखोंच्या गर्दीच्या महापुरानं वेढा घातलेला असेल नि इकडच्या या व्याकूळ शांततेनं बारा टाळकऱ्यांच्या डोंगराला...

तुकोबांना हाका मारत रानावनात फिरणाऱ्या कान्होबाची निःशब्द अगतिकता शिवारातल्या म्हाताऱ्या माणसांच्या डोळ्यात सतत जाणवत राहतेय. शोधातील अपूर्णता हेच जगण्याचं संचित असावं. शोध संपत नाही. तो आत्मशोधाला प्रवृत्त करत राहतो. जिथं जे हरवतं, ते तिथं सापडत नाही. गावं बदलली, तरी माणसांच्या नेणिवेत शोधाची तीव्र जाणीव कायम आहे. म्हणून ते शोधत राहतात... नांगरतांना. पेरताना. पाणी भरताना. घाम गाळताना. त्यांच्या खाणाखुणा शोधत राहतात... कान्होबाच्या आवाजात आपला आवाज मिसळत हाका मारून थकतात नि मग गप्प राहतात... टाळांची किणकिण ऐकू येत असल्यागत... टेकडीवरून विराट आकाशाखालचं दूरवर वसलेलं गाव दिसतंय. रस्ता दिसतोय... गावात नीटनेटकं जाता यावं, यासाठी जुन्या काळी केलेला रस्ता. कालांतरानं तो गाव सोडण्याचा रस्ता म्हणून ओळखला जाऊ लागला. गावाच्या मध्यभागी भव्य मंदिर दिसतं.

गाव राखणाऱ्या या देवाभोवतालचं त्याला पुरेल एवढं छोटसं मंदिर कालांतरानं हळूहळू मोठं होत गेलं नि मग गावालाच त्याची राखण करावी लागते आता... सभोवताली दूरपर्यंत पडीक शेतांमध्येही हिरवंगार गवत नि वर पिवळ्या फुलांचे घोस दिसताहेत. बहराला पडीक जागेचं वावडं नाही. तळाशी जरा काळाशार अंधार नि वर टोकाला मात्र हिरवीगार कोवळी पाती. पावसाळी आकाशाखाली गहिऱ्या सावळ्या प्रकाशात फुलपाखरं त्यांच्या पंखांचे मूळ रंग विसर्जित करत चाललेले... टेकडीवर पोहोचलो तेव्हा गावशिवारानं शोधासाठी, शोधाच्या प्रेरणेसाठी उभ्या केलेल्या मिथकाचं मूर्त रूप समोर दिसू लागलं... वाटलं, या जगण्याच्या गदारोळात सगळीच मिथकं टाकून कशी देता येतील? राहू द्यावीत काही.

सोबत. कुठलाही विशेष दर्जा न देता. कुठल्याही साच्यात न बसवता. कारण मिथकं असतातच जगण्याच्या अवकाशात नक्षत्रांच्या पुंजक्यांसारखी. म्हटलं तर चांदण्यांचा पुंजका. म्हटलं तर एखादा आकार. आपण आभासी रेषांनी जोडून तयार केलेला. मिथकं तशीच तरळत राहतात. जगणं अर्थवाही करत जातात. शोधाची तीव्रता न संपवता जगताना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊ पाहतात, तर कधी जगण्यातील प्रश्नांची अपरिहार्यता अधोरेखित करत जातात... बुवांची राखण करत या डोंगरावर बसलेल्या बारा टाळकऱ्यांसारखी...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

Accident News: देव तारी त्याला...! पाच मजली इमारत कोसळूनही तीन महिन्यांची चिमकुली सुखरुप बचावली, 27 जणांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : लोकांच्या घरी होळ्या पेटवून पोळ्या भाजण्याचा भाजपाचा धंदा - उद्धव ठाकरे

Mutual Fund: 3,000 रुपयांची SIP की 3 लाख रुपयांची Lumpsum: 30 वर्षांनंतर कोण देणार जास्त परतावा?

Nagpur Crime: नागपूर हादरलं! प्रियकराच्‍या मदतीने पतीचा खून; उत्तरीय चाचणीच्या अहवालातून खुलासा

SCROLL FOR NEXT