azim premji 
संपादकीय

अग्रलेख : घेता घेता एक दिवस...

सकाळ वृत्तसेवा

सारी शक्ती-बुद्धी पणाला लावून संपत्ती मिळविणे, हाही कर्तृत्व गाजवण्याचा एक महत्त्वाचा प्रांत आहे, हा विचारच मुळात पचनी पडलेला नसतानाच्या काळात अझीम प्रेमजी यांनी आपल्या व्यवसायाचा अफाट विस्तार केला आणि ‘विप्रो’ला माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अव्वल दर्जाची कंपनी ही ओळख जगात मिळवून दिली. निर्मितीचे डोहाळे लागलेल्या हातांचे देखणेपण सांगणाऱ्या कविता आपल्याकडे लिहिल्या गेल्या खऱ्या; परंतु या निर्मितीत संपत्तीची निर्मितीही येते, हे स्वीकारणे अनेकांना अंमळ जडच जाते. कोणत्या धारणा, पूर्वग्रह याच्या आड येतात, हा वेगळ्या मीमांसेचाच विषय होईल; परंतु अझीम प्रेमजीसारख्यांच्या वाटचालीकडे पाहिले, की या बाबतीतील नजर स्वच्छ व्हायला तर मदत होतेच; पण प्रेरणाही मिळते. याचे कारण जी उद्योजकता, कल्पकता धन संपादनाच्या कामी त्यांनी उपयोगात आणली, तीच ते संपत्तीच्या वितरणासाठीही वापरत आले आहेत. त्यातून अनेक वंचितांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले गेले. आपले आयुष्य सुंदर घडविण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला. हे घडू शकले, याचे कारण त्यामागे समर्थाचे दातृत्व होते आणि आहे. मोठी रक्कम दान केली, एवढ्याच कारणासाठी नव्हे, तर विनियोगाची पद्धतशीर रचना तयार करण्याच्या दृष्टीमुळेदेखील ते समर्थाचे दातृत्व आहे. ५३ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर अझीम प्रेमजी निवृत्त होत असून, पुढचा काळ याच कामात घालविण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला आहे.

अंमळनेरसारख्या एका तालुक्‍याच्या गावात खाद्यतेल विक्रीचा वडिलोपार्जित व्यवसाय पुढे चालविताना अझीम प्रेमजी यांनी तो वाढवला. दूरदृष्टी दाखवत माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पदार्पण केले. त्यांची विप्रो कंपनी केवळ नामांकितच झाली असे नाही, तर भारतातील पहिल्या तीन कंपन्यांच्या पंक्तीत जाऊन बसली. तब्बल पावणेदोन लाख कोटी रुपयांच्या उलाढालीच्या टप्प्यापर्यंत पोचलेली ही कंपनी ज्या प्रकारे विस्तारली, त्यात अझीम प्रेमजी यांच्या नेतृत्वाचा वाटा निःसंशय मोठा आहे. या उद्योजकीय कर्तृत्वात दूरदृष्टी, मनुष्यबळाचे उत्तम व्यवस्थापन, सुशासनप्रणाली या गोष्टी तर आहेतच; परंतु अझीम प्रेमजी ही नाममुद्रा भारतीयांच्या मनावर कोरली गेली ती केवळ एवढ्यामुळे नाही, तर त्यांनी स्वाभाविकपणे दाखविलेल्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेमुळे. आज ‘उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्व’ (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी-सीएसआर) ही संकल्पना जगभरात प्रचलित आहे. नफ्या-तोट्याच्या ताळेबंदापलीकडे जाऊन उद्योजकांनी समाजकल्याणाचा विचार केला पाहिजे, आपल्या निर्णयामागे, धोरणांमागे ती दृष्टी असली पाहिजे, हे त्यामागचे तत्त्व. ‘सीएसआर’चा निव्वळ उपचार पाळणाऱ्या कंपन्या मोप आढळतील. पण समाजकल्याणाची अंतःप्रेरणा असेल, तर कसे उत्तम काम उभे रहाते, याचे उदाहरण म्हणजे अझीम प्रेमजी फाउंडेशन. ‘मायक्रोसॉफ्ट’सारखी बलाढ्य कंपनी उभारून जोडलेले अफाट धन बिल गेट्‌स यांनीही फार मोठ्या प्रमाणावर सामाजिक कामांसाठी वापरले. एड्‌स, हिवतापासारख्या रोगांच्या विरोधात त्यांनी मोहीम सुरू केली. दारिद्य्र निर्मूलनासाठीही प्रयत्न केले. पण त्यासाठी नुसताच निधी उपलब्ध केला असे नव्हे, तर त्यासाठीच्या पूरक यंत्रणा नि व्यवस्था निर्माण केल्या. पैसे वाटून दारिद्य्र दूर होत नसते, तर त्या गर्तेत सापडलेल्या लोकांना उभे राहण्याची संधी मिळवून देण्यातून ते हटते, हा दृष्टिकोन स्वीकारल्याने होणारे परिवर्तन हे टिकाऊ असते. देणारा श्रेष्ठ आणि घेणारा दुय्यम या प्रकारच्या धारणेपासून मुक्त असे हे दान असते. अझीम प्रेमजी यांचे कार्यही अशाच भक्कम पायावर उभे आहे. ‘आपल्या संपत्तीचा अर्धा भाग समाजाला देऊन टाकायचा’, अशी प्रतिज्ञा घेण्याच्या बिल गेट्‌स, वॉरन बफे आदींच्या आवाहनाला प्रतिसाद देणारे पहिले भारतीय म्हणजे अझीम प्रेमजी.

जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत आर्थिक विकासाचा पुढचा टप्पा गाठला गेला हे खरेच; परंतु वाढलेल्या संपत्तीचे पाझर अनेकांपर्यंत पोचले नाहीत, हे कटू वास्तव आहे. या विषमतेने वाढणारे ताणतणाव आणि अस्वस्थतेची दाहकता तीव्र झाली आहे. त्यामुळेच अशा प्रकारच्या सामाजिक उत्तरदायित्वाची गरज कधी नव्हे एवढी प्रकर्षाने आज जाणवते आहे. आपल्या उद्योगाची सूत्रे मुलाच्या हाती सोपवून अगदी सहजपणे बाजूला होत असलेले अझीम प्रेमजी यांनी याच कामाला वाहून घेण्याचा संकल्प करण्याचे मोल मोठे आहे. भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती अशी बिरुदावली ‘फोर्बस्‌’ नियतकालिकाने जाहीर केली, तेव्हा त्याविषयी तिळमात्रही आनंद न झालेले अझीम प्रेमजी यांनी त्याबद्दलच्या अभिनंदनाचा स्वीकार करण्यास साफ नकार दिला. २१ अब्ज डॉलरच्या त्यांच्या संपत्तीवरून श्रीमंतीचे रॅंकिंग त्यांना रुचणारे नव्हतेच. घेता, घेता सहजपणे ‘देणारे हात’ स्वीकारलेल्या या व्यक्तिमत्त्वाची श्रीमंती मोजण्यासाठी ही मोजपट्टी कुचकामी आहे, हे वेगळे सांगायला नको.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

London Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान दुर्घटनेची आता लंडनमध्ये पुनरावृत्ती

Wimbledon 2025 Final: यानिक सिनरने वचपा काढला,अल्काराजला हरवत जिंकलं विम्बल्डनचं विजेतेपद

ENG vs IND: भारतासमोर सोप्पं लक्ष्य, पण इंग्लंडनेही कसली कंबर; 3rd Test जिंकण्यासाठी शेवटच्या दिवसाचं कसं समीकरण?

शाळा ५ किमी अंतरावर असेल तर विद्यार्थ्याला ६००० रुपये मिळणार, सरकारची मोठी घोषणा, योजनेचा लाभ कसा मिळवायचा?

Mumbai News: रेल्वेतच महिलेला प्रसुतीकळा, खाकी वर्दीतल्या देवदूताची धाव; माय लेकाचा वाचवला जीव

SCROLL FOR NEXT