Writer Sadanand More Publication of Maharashtrachi Lokyatra in Pune today sakal
संपादकीय

इंद्रायणी काठी...

प्रसिद्ध लेखक, विचारवंत प्रा. सदानंद मोरे आज (ता.२६) एकाहत्तरीत प्रवेश करत आहेत. त्याचे औचित्य साधून त्यांच्या ‘महाराष्ट्राची लोकयात्रा’ या ग्रंथाचे आज पुण्यात प्रकाशन होत आहे. त्यानिमित्ताने...

सकाळ वृत्तसेवा

प्रसिद्ध लेखक, विचारवंत प्रा. सदानंद मोरे आज (ता.२६) एकाहत्तरीत प्रवेश करत आहेत. त्याचे औचित्य साधून त्यांच्या ‘महाराष्ट्राची लोकयात्रा’ या ग्रंथाचे आज पुण्यात प्रकाशन होत आहे. त्यानिमित्ताने...

मी देहूतील राहत असलेले घर आणि डॉ. सदानंद मोरे यांचे इंद्रायणी काठी असलेले घर हाकेच्या अंतरावर होते. त्यांच्या घराला वळसा घालून जाणारी पवित्र इंद्रायणी नदी, श्रीसंतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे जन्मस्थान, वारकरी संप्रदायाचा समृद्ध वारसा व संत तुकाराम महाराजांचे वंशज अशी भव्यदिव्य परंपरा लाभलेल्या घराण्याशी माझा संबंध शालेय जीवनातच आला. सुरुवातीला मला वाटे आपणच खूप हुशार; पण जशी मैत्री वाढत गेली तसे कळून चुकले, की हा मित्र हरहुन्नरी आहे.

दीर्घोद्योग, सतत वाचन, प्रत्येक क्षेत्रात लिलया वावर असणारा, भल्याभल्यांची विकेट घेणारा हा माझा मित्र आहे. सततच्या सहवासाने त्यांच्या घरातील अविभाज्य घटक मी झालो. त्याच्या वडिलांना आम्ही आण्णा म्हणत असू. खादीचे धोतर, शर्ट व गांधी टोपी असा त्यांचा पोशाख. सतत वाचन, मनन, संशोधन आणि संतसाहित्याचा दांडगा व्यासंग. कमी, पण मोजके बोलणे. एक प्रकारचा त्यांचा आदरयुक्त दरारा व सात्विक धाक वाटे. भौतिक व ऐहिक श्रीमंती असूनही त्याबद्दलची एक ठराविक मर्यादा होती.

त्याची धुंदी कधीच त्यांच्या वागण्यात दिसली नाही. वाचन, नामस्मरण, लेखन व नोकरी असा त्यांचा दररोजचा क्रम असे. सधनता व संपन्नता असूनही श्रीसंत तुकारामांच्या उक्तीप्रमाणे ‘मोगावरी आम्ही ठेवला पाषाण’ अशीच शेवटपर्यंत स्वभाव प्रवृत्ती. अशा वृत्तीचे बीजारोपण सदानंदमध्ये आजही दिसून येते. आपण भले व आपले काम भले असाच सदानंदाचा दिनक्रम चाले. उच्चपदस्थ अधिकारी, राजकीय नेतेमंडळी, सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित व्यक्ती देहूस आल्यास एक तर मंदिरात श्रीसंत तुकाराम महाराजांचे दर्शन आणि सदानंद यांच्या घरी त्यांच्या वडिलांबरोबर तात्त्विक तसेच ऐतिहासिक बाबींवर चर्चा होत असे. याचा लाभ मित्र म्हणून मलादेखील मिळाला. ते भाग्याचे क्षण माझ्या वाट्याला आले. थोडे अंतर राखूनच आम्ही या चर्चा ऐकत असू. अर्थात त्यावेळी सर्वच काही समजत नसे.

वाचनाचे अपरिमीत वेड

सदानंद शालेय जीवनात अभ्यासाव्यतिरिक्त अनेक विषयांची पुस्तके वाचून फस्त करीत असे. त्याकाळात बाबूराव अर्नाळकरांची डिटेक्‍टिव्ह पुस्तके दिवसाला दोन-दोन, तीन-तीन वाचून होत. पुस्तकांची आम्हा दोघात देवाणघेवाण होत असे. वाचनाची जणू काही स्पर्धाच होती. त्यांच्या घरी मी वाचनात दंग होत असे. शेवटी त्याचे वडील मला म्हणत आता सदानंदबरोबर येथेच जेवण करा. सदानंद जेवतानादेखील प्रत्येक घासाबरोबर पुस्तकाचे एक-एक पान वाचून संपवत असे. डिटेक्‍टिव्ह पुस्तकांनी इतके वेड लावले होते, की सदानंद कधी-कधी मित्रांना छोटू, धनंजय, कालापहाड, चंद्रवदन या नावाने गमतीने संबोधित असे. त्यांच्या घरातील माडीवर मी, इतर मित्र, बुद्धिबळ, कॅरम, पत्ते, वाचन, जेवण या साऱ्या बाबी सदानंद एकाच वेळी करीत असे. ‘अष्टावधानी’ हे एकच विशेषण त्याला पुरेसे होई. चौफेर लक्ष असे. कॅरमचा छंद इतका विकोपाला गेला, की दुसरे काहीच सुचत नव्हते.

आमचे छंद म्हणजे गप्पांचा फड. विनोद, शिक्षकांच्या नकला, चित्रपट, संगीत, राजकारण, समाजकारण यांवर चर्चा चाले. सदानंदाच्या मैत्रीला वयाची मर्यादा नव्हती. पोक्त माणसेदेखील त्याला जवळ करीत. त्यांचे बोलणे मिश्‍किल व मुद्दा पटवून देण्याची कला त्याला जणू उपजतच होती. महाद्वारातदेखील उभ्या-उभ्या चांगल्या चर्चा रंगत. सदानंद सर्वांची फिरकी घेत असे; सर्वांनाच निरुत्तर करे. एकदा एकजण त्याला म्हणाला, ‘तू अतिशहाणा आहेस.’ ते ऐकून सदानंद म्हणाला, पण यामुळे मूळ प्रश्‍न सुटत नाही. समोरच्याला गप्प राहण्यावाचून पर्याय नव्हता.

साधारणतः १९६७-६८चा काळ असेल, सदानंदने एक चांगलेच नाटक बसविले. त्यावेळी कृषी क्षेत्रात सहकारी साखर कारखाने आणि ऊस उत्पादनासंबंधी बरीच चर्चा वर्तमानपत्रात येत असे. ऊस उत्पादन हमखास उत्पन्नाचे साधन आहे, शेतकऱ्यांसाठी लाभदायक आहे, असे नेतेमंडळी आपले मत मांडत असत. हा धागा पकडून सदानंदने नाटकाचा प्रयोग केला. त्यात ऊस उत्पादनावर अतिभर दिल्यास इतर पिके व त्यांचे उत्पादन यावर परिणाम होऊन त्याची वानवा जाणवेल, हा विचार वयाच्या सतराव्या वर्षी नाटकाद्वारे सादर करणे हे तसे धाडसाचे होते. अशी प्रतिभा त्याला शालेय जीवनातच लाभली.

समतोल, समन्वयवादी भूमिका

गावगाड्याच्या राजकीय क्षेत्रातदेखील सदानंदची तितकीच मुशाफिरी होती. प्रत्येक ग्रामसभेत त्याची उपस्थिती असे. त्यातील उणिवा सांगण्याचे त्याचे धाडस दिसून येई. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ग्रामसभा आयोजित केली होती, उमेदवारांची नावे चर्चेत येत होती. अचानक सदानंद उठला व म्हणाला, ‘‘प्रथम एक गोष्ट करा उमेदवारांनी घरपट्टी भरली किंवा नाही हे विचारा व मगच उमेदवारी द्या.’’ सर्वच प्रतिष्ठित अचंबित झाले. कोणाला उत्तर देता येईना. मुद्दा अतिशय बरोबर होता. कोणाला कसे निवडून आणावयाचे याचे गणित तो करायचा. जवळच्या मित्रांना सांगे. आचार्य अत्रे यांची प्रचार सभा आयोजित करून त्याने पक्षाचा प्रचार केला. त्यात त्याचा मोठा सहभाग होता. या सर्व बाबी त्याने कौशल्यपूर्णतेने हाताळल्या. घरी आल्यावर आण्णांनी त्याची चांगलीच कानउघाडणी केली. असल्या उचापती करू नका; अभ्यास व आपण असे धोरण ठेवा. त्याच वेळी त्याच्या मनात आले असावे, की राजकारणात सहभाग असला तरी त्यापलीकडे व्यापक विश्‍व आहे. तोच विचार घेऊन पुढील वाटचाल झाली असावी. त्याची बीजे शालेय जीवनातच रुजली असावीत. त्याच वेळी त्याचे मित्र प्रा. गाडे सर आणि प्रतिभासंपन्न कवी अरुण शेवते यांची ओळख झाली. अरुण शेवतेचे बोलके डोळे व खडीसाखरेसारखे काळजाला भिडणारे बोलणे हृदयाचा ठाव घेऊन गेले. असा मित्र आयुष्यभर जपून ठेवावा, अशी मोलाची मैत्री प्राप्त झाली.

हा मित्र साहित्य, राजकारण, समाजकारण, शिक्षण, आंदोलने, प्रचार सभा अशा विविध ठिकाणी लिलया वावरत असला तरी आपला सध्याचा दर्जा आणि वारसा याचे आत्मभान त्याने कधीच ढळू दिले नाही. कोणावरही टीका करताना आपल्या पायाखाली काय जळते याचे भान ठेवून समतोल व समन्वयवादी भूमिका याचे बाळकडू त्याला उपजत लाभले आहे, असे वाटते. साहित्यविश्‍वात मग ते इतिहास संशोधन असो, नाटक असो, कविता असो, तत्त्वज्ञान, अध्यात्म, संतसाहित्य, सामाजिक लोकजीवनाचा अभ्यास, शिक्षण क्षेत्र, संगीत, उर्दू शेर-शायरी, राजकीय विश्‍लेषण, वैचारिक परिसंवाद, व्याख्याने या क्षेत्रांत सर्वसमावेशक परामर्श घेणारी उत्तुंग भरारी घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Candidate Expenditure Limit : राज्य निवडणूक आयोगाने नगपरिषद, नगरपंचात निवडणुकीसाठी उमेदवारांची खर्च मर्यादा वाढवली!

Talegaon Dabhade : गिरीश दापकेकर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नवे मुख्याधिकारी

Horoscope Prediction: कठोर परिश्रमाचे फळ मिळणार अन्...; 2026 मध्ये पाच राशींचे भाग्य बदलणार,वाचा सविस्तर

Pune News: शंकर महाराज अंगात येतात अन् १४ कोटी रुपयांचां गंडा... पुण्यात काय घडलं? धक्कादायक प्रकार समोर

Latest Marathi News Live Update : जुन्नर मधील बिबट्या शिफ्ट करणार वनमंत्र्यांनी दिले परवानगी

SCROLL FOR NEXT