- विशाखा विश्वनाथ
मराठी साहित्य संमेलनात दोन मुलींच्या हाती माझा कवितासंग्रह पाहून झालेला आनंद कणभर जास्तच होता. असं का झालं, याचा मागोवा घेतल्यावर अनेक गोष्टी हाती लागल्या. आपण कितीही शहरी असल्याचा आव आणला तरी आपल्या अस्तिवाभोवती अनेक गावखुणा विखुरलेल्या सापडतात आणि त्यातून आपुलकीच्या अन् आपलेपणाच्या भावनेचं नेटवर्क स्ट्राँग होत जातं.
अंमळनेरमध्ये झालेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दोन मुली माझा कवितासंग्रह विकत घेत असतानाचा फोटो परिचितांमार्फत माझ्यापर्यंत पोहोचला. आजवर ज्येष्ठ लेखक, अभिनेते, रंगकर्मी, कलाकार इत्यादी अनेकांच्या हाती माझा ‘स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना’ कवितासंग्रह पाहिला आहे.
त्यांच्याकडे माझा संग्रह पाहून होणारा आनंद निश्चितच मोठा आहे. मात्र, आताचा त्या दोन मुलींच्या हाती स्वतःचा संग्रह पाहताना झालेला आनंद कणभर जास्तच होता. असं का झालं, याचा बराच मागोवा घेतल्यावर अनेक गोष्टी हाती आल्या.
विशेष म्हणजे या सगळ्या गोष्टी एकावर एक लेयर्ड केल्यासारख्या भासल्या. अनेक पदर आणि असंख्य सहसंबंध असणाऱ्या भावना त्यात होत्या. मग आपण जसं आवडत्या फ्लेवरच्या केकचा तुकडा उचलून घेताना क्रीम इकडे-तिकडे पसरणार नाही याची काळजी घेतो त्याच पद्धतीने ते सारं नजरेसमोर तोलून धरलं.
वेगवेगळ्या बाजूने त्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा लक्षात आलं की, माझं गावं, माझ्या गावातल्या मुली आणि त्यांच्या हातात माझं पुस्तक या आणि अशा अनेक गोष्टी अभिमानाने आपसूकच त्या आनंदाच्या भावनेसोबत चिकटून आल्या होत्या.
किंबहुना त्याचमुळे मी अधिक आनंदी झाले होते. आपण कितीही नाकारलं तरी, कितीही शहरी असल्याचा आव आणला तरी, आपल्या अस्तिवाभोवती अनेक गावखुणा विखुरलेल्या सापडतात आणि त्यांच्याशी साधर्म्य साधणारं काही आपल्या नजरेस पडलं, हाती लागलं की मग आपण मोहरतो. गावखुणा हाती लागल्यावर मोहरण्याचे हे क्षण दिसामासाने आलटून-पालटून भेटत राहतात. तसा हा माझ्या गावच्या मुलींनी, माझा कवितासंग्रह हाती घेतलेला क्षण मला भेटला.
माणसं सर्वदूर सारखीच असतात. दोन डोळे, दोन हात, दोन पाय, एक नाक, दोन कान, रंग कमी-अधिक उजळ या सगळ्यासह असलेली, बोलणारी, पाहणारी, चालणारी... हे कितीही खरं असलं तरी भौगोलिक सीमांमुळे कधी आपण सारखे असतो; तर त्याच कारणामुळे वेगळेसुद्धा. खान-पान, राहणीमान, भाषा या सगळ्या गोष्टी आपल्याला समूह पातळीवर एकमेकांशी घट्ट बांधून ठेवतात. त्यात मातीचा रंग, गंध हे सगळं ही आपसूक येतंच.
कोलकात्याहून परत येतानाचा किस्सा आहे. सकाळी अकरा वाजता नागपूरला पोहोचणारी ट्रेन, धुक्यामुळे उशीर होत होत पार संध्याकाळी सहाच्या आसपास तिथे पोहोचली. तेव्हा संध्याकाळच्या प्रकाशखेळात जवळ-दूर जिथे म्हणून शेती दिसली, माती दिसली ती ओळखीची वाटली. त्या शेतांमध्ये दिसलेला हिरवेपणा अगदी अनोखा होता.
संपूर्ण प्रवासभर दिसलेल्या हिरव्यापेक्षा तो अधिक जवळचा वाटला. नजरेला माती अधिक आपली भासली आणि वाटून गेलं, आपली मुळं या इथली. हा आपला प्रदेश. जिथे दृश्य रूपातला शेतांचा हिरवा आणि मातीचा काळा-तांबडा रंगही आपण आपल्या घरी परत घेऊन येतोय ही सुरक्षिततेची भावना आपसूक मनात जन्माला घालत होता.
मला आठवतं, आम्ही उल्हासनगरहून जेव्हा पाचोऱ्याला किंवा मामाच्या गावी मेहुणबाऱ्याला जायचो तेव्हा इथून सुट्टीत तिकडे गेलेल्या माणसांविषयी विशेष आपुलकी वाटायची किंवा गावचं कुणी इकडे मुंबईत भेटलं की आनंदाला पार उधाण यायचं.
सुट्टी संपल्यावर गावाहून इकडे येताना कायम मनात एक उपरेपणाची भावना भरून असायची... आपली माणसं पुढचे सहा महिने आपल्याला दिसणार नाहीत याची रूखरूख लागून राहायची. अशात जर कुणी लग्नपत्रिका द्यायला वगैरे मध्येच गावाहून इकडे आलं की, फार फार बरं वाटायचं.
वरचेवर फोन नसणाऱ्या, अगदी व्हिडीओ कॉल तर अस्तित्वातच नसणाऱ्या काळातली ही गोष्ट. जेव्हा उठसूट मुंबईला कुणी येत नसे त्या काळाची ही कहाणी. त्यात तेव्हाची मुंबईतील अस्थिर परिस्थिती... बॉम्बस्फोट, महापूर या सगळ्यांनी हादरून गेलेले मुंबईकर या सगळ्या घटनाक्रमाच्या मागे डोक्यात ‘ओढ लावती अशी जीवाला...’सारखी गाणी. अशा अनेक गोष्टी घडत राहायच्या, ज्यातून गावचं कुणी दिसल्यावर, भेटल्यावर ‘सेन्स आॅफ बिलाँगिंग’ अर्थात आपुलकीची भावना फार प्रखरपणे जाणवत राहायची.
२६ जुलैच्या महापुराच्या वेळची गोष्ट... बारवी धरण फुटल्याची अफवा भरभर पसरत होती. पाणी राहिलं बाजूला, माणसं धावत सुटली होती. जणू काही त्यांच्यामागून पाणी येतंय... पुढे समुद्रावर येतात तशा माणसांच्या लाटा आल्या होत्या.
आमच्या चाळीपर्यंत पूर पोहोचलेला नव्हता, म्हणून आम्ही जरा निवांत... पण थोड्याच अंतरावर मोठं नुकसान झालेलं म्हणून बरचंसं विकल होतो. त्यात ही अफवा... ती कानावर आल्यावर काही वेळाने पांगापांग झाली. दरम्यान, त्या एकूण गोंधळाचा फायदा उचलत चोऱ्याही झाल्या.
अशा सगळ्या सनसनाटी बातम्या कानावर येत होत्या तोच आमच्या दारात एक सायकल येऊन उभी राहिली. माझे मोठे चुलत काका बारवी धरण फुटल्याचं ऐकून तातडीने विठ्ठलवाडीहून सायकलने आमच्या घरी आम्हाला न्यायला आले होते.
दारात उभं राहून अत्यंत लगबगीने, काळजीने आम्हाला सुरक्षितपणे आपल्या घरी नेण्याचा आग्रह त्यांनी धरला होता. आजही या आठवणीने गलबलून येतं. अख्खं एक महानगर ढवळून निघालेल्या त्या काळात आधार, काळजी, आपुलकीची सगळ्यांनाच गरज होती.
त्या बेभरवशाच्या काळात काकांच्या येण्याने एक आपुलकीची भावना फारच बळकट झाली, हे आताही लख्ख जाणवतंय. या आणि अशा अनेक घटनांनी मला गावखुणा वेचण्याची, त्यांच्याकडे चाणाक्षरीत्या पाहण्याची सवय लागली. कित्येकदा ‘सेल्फ व्हॅलिडेशन’साठी या गावखुणा किती म्हणून कामी येतात हाही शोध अधूनमधून लागत राहिला.
म्हणूनच मला वाटतं की, जशा माणसाला जन्मखुणा असतात तशाच त्याच्या अस्तित्वाच्या परिघावर गावखुणा विखुरलेल्या असतात. व्यक्ती व्यक्तींमधल्या या गावखुणांदरम्यान स्वतःचं स्वतंत्र चुंबकीय क्षेत्र कार्यरत असतं. ज्यामुळे सारखी सारखी आपली आपुलकीची भावना बळकट होत जाते आणि आपल्या माणसांपासून दूर, लांबच्या प्रदेशात,
अनोळखी शहर, गावं, देशातही आपल्यात तग धरून राहण्याची क्षमता निर्माण होते. आपुलकीच्या आणि आपलेपणाच्या भावनेचं नेटवर्क स्ट्राँग होत जातं. कदाचित म्हणूनच आपलं पुस्तक आपल्या गावच्या मुलींच्या हाती पाहणं, ते पाहून आनंदून जाणं ही गोष्टही या सगळ्याला अपवाद नाही.
vishakhavishwanath११@gmail.com (लेखिका ‘युवा साहित्य अकादमी पुरस्कार’विजेत्या साहित्यिक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.