१९६२ मध्ये आपल्या देशावर आक्रमण करण्याची चाल रचून ज्या मार्गानं चीननं आपल्या देशात घुसखोरी केली, त्याच भागात अर्थात अरुणाचलचा प्रवास केला.
१९६२ मध्ये आपल्या देशावर आक्रमण करण्याची चाल रचून ज्या मार्गानं चीननं आपल्या देशात घुसखोरी केली, त्याच भागात अर्थात अरुणाचलचा प्रवास केला. या रस्त्यावर पाऊल ठेवताच भारत-चीन मधल्या लढाईचा रोमांचकारी इतिहास डोळ्यांपुढे उभा राहतो; आणि ६० वर्षांपूर्वीचा इतिहास, जो केवळ पुस्तकात वाचण्यात आला, तो पुन्हा ताजा झाला. पण, तो इतिहास नाही, ते एक वर्तमान आहे, असा अनुभव तेजपूर ते तवांगपर्यंतच्या मार्गावर झालेल्या प्रवासादरम्यान मला आला. या परिसराचा इतिहास इतकाच मर्यादित नाही, तर तो नवीन उभारी देणारा ठरतो आहे. या इतिहासातून लष्करानं घेतलेला धडा आणि भविष्यात अशा प्रसंगांसाठी पायाभूत सुविधांची उपलब्धता, हे प्रत्यक्ष पाहण्यासाठी केलेला अरुणाचल प्रदेशचा दौरा खऱ्या अर्थाने सार्थकी ठरला.
माझा जन्म झाला तेव्हा बाबा तवांगला होते. लष्करात असल्यामुळे बाबांसोबत वेगवेगळ्या राज्यांमध्ये आम्ही राहिलो; पण अरुणाचल प्रदेश हे राज्य आमच्या यादीमध्ये कधीच आलं नाही. मात्र, मला ही संधी मिळाली, तेही थेट अरुणाचल प्रदेशमध्ये जाऊन तेथील लष्करी परिस्थितीचा आढावा घेण्याच्या माध्यमातून.
खरंतर गेल्या अडीच वर्षांपासून मला सीमावर्ती भागात जाऊन तेथील प्रत्यक्ष परिस्थिती नेमकी काय आहे, हे समजून घ्यायचं होतं. सैनिकांचं जीवन, त्यांच्या अडचणी, सुरक्षितता याबाबत सतत प्रश्न पडायचे. मग आपण प्रत्यक्ष तिथं जाऊन हे का नाही पाहत? यासाठी आपण असा दौरा नक्कीच करू, हा विचार मनात होता. पण नेमकं जायचं कोणत्या भागात, हाही मोठा प्रश्नच की!
मग लष्करात कार्यरत एका अधिकारी मित्राशी सहज बोलताना हा विषय निघाला. प्रत्यक्ष सीमावर्ती भागात जाऊन तेथील परिस्थिती पाहण्याचा उद्देश त्याला सांगितला. त्याने मला आवर्जून जम्मू-काश्मीरला न जाता अरुणाचलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. यामागचं कारण असं की, आजवर माध्यमं, सोशल मीडियामुळे जम्मू-काश्मीर हा सर्वांपर्यंत सातत्याने पोहचत असलेला विषय होता. प्रत्येक घडामोड सहजपणे समजत असल्याने या भागाकडं विशेष लक्ष दिलं जात होतं. मात्र, ईशान्येकडील भागाकडे आतापर्यंत दुर्लक्ष होत होतं. त्यामुळे खऱ्याअर्थाने ईशान्येकडील सीमेची परिस्थिती जाणून घेण्यासारखी आहे, ही बाब स्पष्ट झाली.
भारत-चीन सीमावर्ती भागात लष्कराच्या कामाचा आढावा घेण्याच्या उद्देशानं ईशान्येकडील दौऱ्याचं नियोजन ठरलं. लष्कराला उपलब्ध होणाऱ्या पायाभूत सुविधा, त्यांच्या अडचणी, गरजा, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) परिस्थिती, अशा अनेक बाबींविषयीची स्थिती मला प्रत्यक्षात तिथं जाऊन समजली. एकीकडे दोन गावांना जोडणारे रस्ते खराब, तर दुसरीकडे नेटवर्क आणि इंटरनेटची असुविधा. अशाही स्थितीत इथले स्थानिक लोक, पर्यटन आणि सीमा रस्ते संघटनांच्या (बीआरओ) लष्करी प्रकल्पांमध्ये हातभार लावत, दुकाने चालवत आपलं दैनंदिन उत्पन्न मिळवत आहेत. शाळा, महाविद्यालयांची संख्या अत्यंत कमी, त्यामुळे लष्कराकडून शैक्षणिक व आरोग्य सुविधा येथील स्थानिकांना नेहमी पुरवली जातात.
स्थानिक लोक आणि लष्करात एक वेगळंच नातं इथं पाहायला मिळालं. भारत-चीनच्या युद्धाला आता ६० वर्षं होत असताना पायाभूत सुविधांचा विचार केल्यास, भविष्यात चीनला रोखण्यासाठी लष्कराच्या आधुनिकीकरणावर भर दिला जात आहे.
अलीकडच्या तीन ते चार वर्षांमध्ये या राज्याकडे सरकारचं लक्ष केंद्रित होताना दिसत आहे. पूर्वी संरक्षण क्षेत्राला मिळणाऱ्या निधीचा मोठा वाटा हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध पाहता केवळ उत्तर, उत्तर-पश्चिम भागात वापरला जात होता. अलीकडच्या काळात चीनच्या हालचाली, घुसखोरीचे प्रकार सर्वांनाच माहिती आहेत, त्यामुळे आता केंद्र सरकारनेदेखील याकडे विशेष लक्ष केंद्रित केल्याचं दिसून येतं. रस्ते, इमारती, लष्करी आस्थापनांमधील सोयी-सुविधा, दुर्गम भागाचं विकासकाम अशा एक ना अनेक गोष्टींना प्राधान्य दिलं जात आहे. मागील चार वर्षांमध्ये संरक्षण क्षेत्राच्या बजेटमधील ४० टक्के वाटा ईशान्येकडील विकासकामांसाठी दिला जात आहे.
दौऱ्याच्या नियोजनाची सुरुवात झाली ती म्हणजे फेब्रुवारीच्या अखेरीस. यासाठी लष्कराची परवानगी महत्त्वाची होती. जवळपास अडीच महिने लागले संपूर्ण परवानग्या मिळविण्यासाठी. एप्रिलमध्ये मला आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळाल्या, त्याही कागदोपत्री. मेच्या शेवटच्या आठवड्यात जाण्याचं ठरलं; पण अचानक झालेला पाऊस आणि दरड कोसळण्याच्या घटना यामुळे मला अरुणाचल प्रदेशच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी (लष्कराचे) ताबडतोब हा दौरा रद्द करण्यास सांगितलं. हवामानाचा अंदाज घेत शेवटी ७ जून ते १५ जून दरम्यान जाण्याचा योग आला. ठरवलं. दररोज १५० ते २०० किलोमीटरचा प्रवास, तोही घाट वळणाचा रस्ता, काही ठिकाणी कच्चे रस्ते, खोल दरी आणि दररोज वेगवेगळ्या टप्प्यांवर (हाई अल्टिट्यूड) राहणं. मग ते १५ हजार फूट असो किंवा १७ हजार फूट उंच. साधारणपणे अशा उंच शिखरापर्यंत जाण्यासाठी एका विशिष्ट कालावधीसाठी प्रत्येकाला ‘ॲक्लमेटायझेशन पिरियड’मध्ये राहावं लागतं. पण हा दौरा सात ते आठ दिवसांचा असल्यामुळे, दररोज वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचं नियोजन असल्यामुळे, मला हा मात्र ॲक्लमेटायझेशन पिरियडमध्ये न राहण्याची सवलत मिळाली. अरुणाचलमध्ये लष्कराच्या प्रत्येक अधिकाऱ्याने या दौऱ्यासाठी माझं कौतुक केलं.
बीआरओची कामगिरी मोलाची
एकीकडे रस्त्यांची दुरवस्था, तर दुसरीकडे खोल दरीत नद्या. प्रत्यक्षात हे दृश्य पाहून येथील परिस्थितीचा अंदाज येतो. अरुणाचलमध्ये प्रत्येक गावाशी कनेक्टिव्हिटी कायम ठेवण्यासाठी बीआरओ मोलाची भूमिका बजावत आहे. सध्या तर माथ्यावरील धुक्याची समस्या टाळण्यासाठी निचिपू, तर तवांगपर्यंतचं अंतर कमी करण्यासाठी सेला बोगदा अशा या दोन बोगद्यांचं काम या वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी बीआरओने कंबर कसली आहे. अरुणाचलमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी अनेक प्रकारे रस्त्यांचं काम, नद्यांवर पूल बांधणे अशा प्रकल्पांची सुरुवात करण्यात आली आहे. इतकंच नाही, तर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या नजीकच्या दुर्गम भागातील रस्त्यांच्या कामालादेखील वेग आला आहे. यामुळे येत्या तीन ते चार वर्षांत लष्कराच्या हालचाली अत्यंत सुरळीत होणार आहेत. जर भविष्यात युद्धजन्य परिस्थिती उद्भवली, तर कमी वेळेत लष्करी तुकड्या सीमेवर पोचू शकणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे, ६० वर्षांपूर्वीच्या इतिहासाचं गांभीर्य आता समजून येत आहे, त्यामुळे विकासकामांसाठी निधीत वाढविण्यात आलेली तरतूद, हा त्याचाच परिणाम म्हणावा लागेल.
पर्यटनासाठी आज देशाच्या विविध राज्यांना भेट दिली जाते. ईशान्येकडील सिक्कीम, आसाम, मेघालयसारख्या राज्यांत पर्यटन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. परंतु त्या तुलनेने अरुणाचल काहीसं दुर्लक्षित राहिलं आहे. पण, पर्यटनासाठी इथंदेखील अनेक आकर्षक स्थळं आहेत. इथं असलेल्या धबधब्यांची कथा प्रसिद्ध आहे. तेथील धबधबे पवित्र स्थळ म्हणून संबोधले गेले, तर काही ठिकाणी चित्रपटांचं चित्रीकरण झालं आहे, त्यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. होली वॉटर फॉल, जंग वॉटर फॉल, माधुरी लेक हे त्यातील काही धबधबे. येथील मॉनेस्ट्री (मठ)मध्येही येथील संस्कृतीची झलक दिसते. खाद्यपदार्थ, वेगवेगळे समुदाय, त्यांच्या प्रथा लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत.
आठवडाभराच्या या अरुणाचल भेटीत लष्कराची तारेवरची कसरत, सोयी-सुविधांची गरज याबाबत समजलं. सोयी-सुविधांची कमतरता आल्यावरही आपण त्यावर पर्यायी मार्ग काय शोधू शकतो, किंवा अशा सोयींशिवाय जीवन कसं जगावं याचा अनुभव आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.