Love
Love 
सप्तरंग

प्रेमाचं 'रसायन' वेगळंच...

अभिषेक ढवाण

व्हॅलेंटाइन जगभरात प्रेमिकांच्या हक्काचा ‘व्हॅलेंटाइन डे’ उत्साहात साजरा होतो. प्रेम या भावनेला जीवशास्त्रीय, रासायनिक बाजूही असते. मेंदूतील अनेक संप्रेरके आणि रसायने प्रेमात आपापली भूमिका बजावत असतात.

फेब्रुवारी हा ‘प्रेमाचा महिना’ म्हणून ओळखला जातो. ‘व्हॅलेंटाइन डे’मुळे फेब्रुवारीला ही ओळख मिळाली आहे. तुम्हाला प्रेमात पडण्यासाठी ‘केमिस्ट्री’ची गरज असते, असे म्हटले जाते. प्रेमाला कुठेतरी रासायनिक आधार आहे, असाच याचा अर्थ होतो. खरेतर, प्रेम हा वसतिस्थान, पुनरुत्पादन आणि संस्कृतीचा पायाभूत आधार आहे. त्यामुळे हे एकच रसायन असते की रासायनिक अभिक्रियेची मालिका? हे जीवशास्त्र सर्वांसाठी सारखेच असते की वेगवेगळे? प्रेमाबद्दल असे खूप प्रश्‍न आहेत. त्याची ‘प्रेम’ळ उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करूया.

प्रेमाचे गरज, आकर्षण आणि ओढ या तीन प्रकारांत वर्गीकरण करता येते. यापैकी प्रत्येक प्रकारात वेगवेगळी रसायने सहभागी होतात. गरज किंवा इच्छेमध्ये पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन, तर महिलांमध्ये इस्ट्रोजेन संप्रेरकाचा सहभाग असतो. आकर्षणामध्ये डोपामाईन, सिरोटोनिन आणि नॉरएपिनेफ्रिन ही रसायने मोलाची कामगिरी बजावतात. ओढ यासाठी ऑक्‍सिटोसिन काम करते. आपण या रसायनांची भूमिका क्रमाने पाहूया. 

गरज/इच्छा - प्रत्येक मनुष्यासाठी पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेला उत्क्रांतीचा आधार आहे. तारुण्याच्या उंबरठ्यावर येताच पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन आणि स्त्रीमध्ये इस्ट्रोजेन पुनरुत्पादनविषयक बदल घडवून आणते. या रसायनांना रूढीनुसार सामान्यत: पुरुषी किंवा स्त्री रसायन संबोधले जाते, पण हे दोन्ही हार्मोन्स दोघांमध्ये काम करतात. वयात येताना टेस्टोस्टेरॉन/इस्ट्रोजेन जवळपास प्रत्येकामध्ये लैंगिक इच्छा तीव्र करते. पुनरुत्पादनासाठी ही दोन्ही संप्रेरके जोडीदाराची गरज तीव्र करतात. त्यातूनच प्रेमाची आकर्षण ही पहिली पायरी निर्माण होते. 

आकर्षण - या प्रेमाच्या पायरीत मुख्यतः डोपामाईन या न्यूरो ट्रान्समीटरचे काम आहे. मेंदूतील डोपामाईन या न्यूरो ट्रान्समीटरमुळे एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटू लागते. हे संप्रेरक ‘हॅप्पी हार्मोन’ म्हणूनही ओळखले जाते. आपल्या शरीरात डोपामाईनची अनेक कार्ये आहेत. पण प्रामुख्याने ते ‘रिवार्ड हार्मोन’ म्हणून प्रसिद्ध आहे. तुम्हाला आकर्षण वाटत असते, मनात ‘फील गुड’ची भावना असते, तेव्हा डोपामाईन त्याला कारणीभूत असते. डोपामाईनची दुसरी बाजू म्हणजे मेंदूमध्ये एकदा त्याचे प्रमाण वाढले, की ती गोष्ट पुन:पुन्हा करण्याची इच्छा निर्माण करते. प्रेमामध्ये किंवा आकर्षणात आवडत्या व्यक्तीला पुन:पुन्हा भेटण्याची किंवा बोलण्याची भावना का निर्माण होते, हे आता तुम्हाला समजले असेल. या टप्प्यादरम्यान डोपामाईन व त्याच्याशी संबंधित नॉरएपिनेफ्रिन संप्रेरक मोठ्या प्रमाणावर स्रवते. नॉरएपिनेफ्रिन ‘लढा किंवा पळा’ (Fight or Flight) प्रतिक्रियेशी संबंधित आहे. ही रसायने प्रेमात पडलेल्या व्यक्तीला चंचल, उत्साही आणि आनंदी बनवतात. अंतिमत: आकर्षणामुळे मेंदूतील सिरोटोनिन या संप्रेरकाचे प्रमाण कमी होते. ते भूक आणि मूड यामध्ये भूमिका बजावते. प्रेमात असल्यावर भूक का लागत नाही, हे आता तुमच्या लक्षात आले असेल! सेरोटोनिनची पातळी कमी असणे हे कम्पल्सिव्ह डिसऑर्डर(Obsessive compulsive disorder)चे एक कारण आहे. त्याचप्रमाणे डोपामाईनच्या उच्च आणि सिरोटोनिनच्या कमी पातळीमुळे नात्यातील दुसऱ्या व्यक्तीबद्दल एखाद्या व्यसनासारखी सक्तीची भावना निर्माण होते. 

ओढ - पुरुषांमध्ये आवडत्या व्यक्तीबद्दल ओढ निर्माण करणारे महत्त्वाचे संप्रेरक म्हणजे ऑक्‍सिटोसिन. त्यासारखेच असणारे व्हॅसोप्रेसिन हे संप्रेरकही यासाठी जबाबदार असते. या संप्रेरकांच्या शरीरात इतरही मुख्य भूमिका आहेत. मात्र, प्रेमाच्या संदर्भात ती विश्‍वासाची (Trust) किंवा जोडणारी (Bonding) संप्रेरके म्हणूनही ओळखली जातात. याच कारणामुळे ऑक्‍सिटोसिनचे कुशीत घेण्याचे संप्रेरक (Cuddle Hormone) असेही टोपण नाव पडले आहे. त्याचे शारीरिक आणि मानसिक परिणामही होतात. सामाजिक वर्तन आणि भावनाही यामुळे प्रभावित होतात. 

ब्रेकअप के बाद... 
प्रेमातील गुलाबी दिवस संपल्यावर काही कारणांमुळे अनेकांना प्रेमभंगाचा (Break Up) सामना करावा लागतो; पण प्रेमाप्रमाणेच प्रेमभंगातही मेंदूतील रसायने आपली भूमिका चोख बजावतात. खरेतर आपल्या शरीरासाठी कशाचाही अतिरेक विषारी ठरतो. प्रेमरसायनांनाही हीच गोष्ट लागू पडते. तुम्हाला आवडत्या व्यक्तीविषयी आसक्त करणारे, तिची चटक लावणारे डोपामाईनच यालाही जबाबदार असते. चांगल्या किंवा वाईट अशा दोन्हींचे नियंत्रण डोपामाईनकडेच असते, असा याचा अर्थ. त्याचे प्रमाण खूप अधिक वाढते, पातळी नियंत्रणाबाहेर (Dopamine Crash) जाते, तुम्हाला नैराश्‍य येते. निराशेबरोबरच ईर्षा, द्वेषाची भावनाही मनामध्ये येते. इतरही काही परिणाम होतात. 

चॉकलेट आणि व्हॅलेंटाइन 
चॉकलेट आणि प्रेमाचे खूप जवळचे नाते आहे, हे सर्वांनाच माहिती आहेच. चॉकलेटची चव चाखल्याशिवाय प्रेमाची तरी कशी चाखता येईल? चॉकलेट प्रेमाचे स्मृतिचिन्ह बनलेय. पण त्याचे कारण काय? या दोन्हींचा सहसंबंध उलगडण्याचा प्रयत्न करूया. चॉकलेटमध्ये आनंदाची भावना निर्माण करणारे अनेक घटक असतात. यामध्ये प्रामुख्याने फेनिलेथिलेमाइन हा संप्रेरकासारखा पदार्थ असतो. चॉकलेटमध्ये छोट्या प्रमाणात असणाऱ्या या पदार्थामुळे मज्जासंस्था उत्तेजित होते. एन्डार्फिनने आनंदी संप्रेरकाला चालना मिळते. त्याचप्रमाणे चॉकलेटमधील इतर घटक डोपामाईनलाही उत्तेजित करून आनंदी करतात.
(अनुवाद - मयूर जितकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT