Marriage
Marriage 
सप्तरंग

ऑन एअर : लग्नसोहळा ऑनलाईन नकोच!

आर. जे. संग्राम ९५ बिग एफ.एम.

लग्नाच्या सीझनमध्ये आलेल्या लॉकडाउनमुळे पंचाईत झाली आहे. ऑनलाईन व्हिडिओ कॉलद्वारे स्वस्तात मस्त लग्न मांडायची सोय आहे. पण माझ्या मते आपण तसं करणं टाळावं. लग्न दोन व्यक्तींमध्ये होतं, लग्न समारंभ दोन कुटुंबात होतो. विवाहसोहळा करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे दिखाऊपणा. मुलीच्या बापाकडं किती पैसा आहे, हे मुलाच्या आईला सगळ्यांना दाखवता यावं यासाठी हे सगळं चाललेलं असतं! ज्यांच्यासाठी हा ‘सर्कस कम नाटकाचा’ प्रयोग आपण सादर करतो, ते प्रेक्षक नसून स्वतःच एक से एक पात्र असतात.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मुलाच्या बापाचा ऑफिसचा मित्र मुलीच्या बापाला, ‘हॉलचं भाडं किती आहे?’ हा प्रश्‍न विचारतो तेव्हा त्यांच उत्तर ‘शून्य पैसे’ असं दिलं तरी प्रतिउत्तर ठरलेलं असतं - ‘अहो, महागात पडला! मला सांगितलं असतं तर २५ टक्के डिस्काउंट मिळवून दिला असता.’ ‘अरे, मला आधी सांगितलं असतं तर मी.... खरेदीपासून नोकरीपर्यंत सगळी कामं २५ टक्के कमी पैशात करून दिली असती,’ असं सांगणारे एक काका प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. ही मंडळी १०० टक्केवेळा काम झाल्यावरच मदतीसाठी पुढं येतात. सगळ्या कॉउंटरवर खाऊन झाल्यावर, ‘चायनीज काउंटर नाही का ठेवला?’ असं विचारणाऱ्या काकू असतातच. खरंतर व्हरायटीच्या नावाखाली एवढे कॉउंटर्स असतात की, बँक आणि पोस्टल खात्यांनी अशीच चार-पाच ज्यादा काउंटर उघडल्यास अर्थव्यवस्था व्यवस्थित होईल. ‘जेवण कमी पडणार असं दिसतंय. मागच्या लग्नात असंच झालं होतं,’ असं म्हणत लाईनमध्ये घुसणाऱ्या दुसऱ्या काकू. 

ताटाचा थाट वेगळाच. माझ्या ६ फूट शरीराला गोरिलासारखे लांब बाहू आणि वाघासारखे (पण मॅनिक्युअर केलेले) पंजे असूनही लग्नाच्या बुफेमधली प्लेट काही मला वश होत नाही. कृष्णाला सुदर्शनचक्र चालवायची विद्या शिकायला जितका वेळ लागला नसेल तितका वेळ मला ही प्लेट नीट कशी वापरायची - अंगावर (स्वतःच्या किंवा समोर उभ्या काकूंच्या) न सांडता, वेगवेगळ्या भाज्या एकमेकात मिसळून एक मिक्स भाजीचा प्रकार न होऊ देता - हे शिकायला खूप वेळ लागला. सगळी कामं सिस्टिमॅटिक करण्याचा स्वभाव असल्यामुळं मी मागच्या वर्षी बाजारात जाऊन लग्नाची प्लेट विकत घ्यायचं ठरवलं. म्हणजे निवांत घरी सराव करता येईल. पण ती प्लेट सध्या ग्राहकाला देऊ नये असा वितरकांचा एकमेकांत करार झाला असावा. लग्न सोडून दुसरीकडं अगदी तशी प्लेट मिळतच नाही! 

वधू-वर, नातेवाईक, जेवण, स्वतःचे नवीन कपडे मिरवण्याची संधी या सगळ्यापेक्षा आलेल्या डॉक्टर पाहुण्यांकडून फुकट सल्ला मिळेल, यासाठी आवर्जून सगळ्या लग्नांना हजेरी लावणार मध्यम वयातील जोडपं - ‘त्यांचा डावा खुबा बघून झाला की माझा उजवा बघा बरं का. अहो तो डावा नाही, तुमच्याकडं तोंड करून उभे राहिले की तुमच्या डाव्या बाजूचा...’ 
आदल्या रात्री आपल्या अपरोक्ष संगीत पार्टी होती का, हे जाणून घेण्यासाठी नाजुक चौकशा करणारी तरुण मंडळी.

उत्तर भारतीय विवाहपद्धती खूप प्रिय असलेले काका. यांचा एक डोळा पनीरच्या भाजीमध्ये पनीरचे तुकडे किती मोठे आहेत, यावर असतो. आणि पनीर भागिले रस्सा याचे उत्तर कमीत कमी तीन असावं बरंका. आणि दुसरा डोळा पार्किंगमध्ये एखाद्या गाडीच्या उघड्या डिकी भवती तरुणांची गर्दी होती आहे का, यावर!

ही सगळी पात्र आणि या सगळ्या गमती नसतील. तर त्या लग्नाला काय अर्थ आहे!?

कीटनाशकयुक्त फुलं, तोंडापेक्षा मोठ्या डोळ्यांमुळं होणारी अन्नाची नासधूस, आयुष्यात पुन्हा कधीच न घालू शकता येणारा शेरवानी आणि लेहंगा, कानठळ्यांच्या कानाखाली कानठळ्या बसवणारे डीजे बँडबाजा, काही कामाचे नसलेले आहेर,आतले शोपीस, १९६२पासून वेगवेगळ्या लग्नात नवीन गिफ्ट रॅपिंग केलेली तीच भेटवस्तू, आणि या सगळ्यासाठी भारतात दरवर्षी लग्नांवर केलेला दोन लाख करोड रुपयांचा खर्च... त्याच्याऐवजी आपण व्हिडिओ कॉलवर लग्न उरकायला लागलो, तर लग्न व्यवस्था मोडून पडेल. 

भव्य लग्नाचा एक फायदा नक्कीच आहे. अनेक वर्षांनंतर भेटलेले दूरचे नातेवाईक जेव्हा तुम्हाला, ‘ओळखलं का सांग बघू मी कोण आहे,’ असं मंडपात विचारतात तेव्हा आपल्याला लाजून, आपली काहीही चूक नसताना थोडीशी मान खाली घालून खोटं हसणं या पलीकडं दुसरं काही करता येत नाही. माझ्या पिढीनं  याव सरळ ‘नाही’ असा बिनधास्त आणि आधुनिक पवित्रा घ्यायचं ठरवलं. पण ते आमच्याच अंगलट आलं. समोरचा गप्प व्हायच्या ऐवजी, ‘अरे, असं काय करतोस? मी तुझ्या मावशीच्या, मिनीच्या, साडूंची आजी. म्हणजे तुझी अमकी-तमकी!’ 

ऑनलाइन लग्न सोहळ्यात मात्र ओळखलं का, याच उत्तर देता येईल. ‘‘अहो तुमचा आवाज येत नाहीये....‍ कनेक्शन वीक आहे. इंटरनेटचं आणि आपलंसुद्धा!’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT