कोकणातला माणूस मुंबईत नोकरीसाठी गेला. कोकणात शेतीकडं दुर्लक्ष झालं. मात्र कोरोनाच्या जागतिक संकटानं माणसं दुरावली त्याच वेळी अनेकांना कोकणातल्या आपल्या घराची आणि गावाची वाटणी झाली. त्यांनी गावाकडं धाव घेतली पण तिथं निसर्ग वादळानं त्यांची पाठ सोडली नाही. बाहेरचं हे वादळं आणि वाटणींचं वादळही अनेक घरात घुमलं. कोरोनाच्या संकटात माणसं जवळ आली तशी काही दुरावलीही. कोकणातल्या गावगाड्यातील हा बदल टिपलाय राजा दांडेकर यांनी दुसऱ्या भागात...
कोरोनाच्या वैश्विक संकटामुळं अनिवासी ग्रामवासी (NRV) परतून कोकणातल्या गावाकडं आले. येताना आपल्या बायको, मुलांनाही घेऊन आले. येताना मनात भीती होती, की गावात स्वागत कसे होईल. अनेक गावांमध्ये लॉकडाउनमुळं गावकऱ्यांनी गावबंदी केली होती. आपल्या कुटुंबामध्येही आपलं स्वागत कसं होईल याचीही चिंता अनेकांना होती. गावात आल्यानंतर पंधरा दिवस विलगीकरणात राहणं सक्तीचंच होतं. अशाच एका छोट्या गावात मुंबईहून परतलेला एक चाकरमानी आला. येताना त्याच्याही मनात भीती होतीच, अनेक शंका होत्या. घरातला मोठा भाऊ पण नोकरीसाठी घराबाहेर पडला ते पडलाच. आजच्या या संकटानं त्यानं गावाचा रस्ता धरला. घरात मोठा भाऊ म्हणून तो मानानं घरातल्या सगळ्यांचा दादा होता. पण आता परिस्थितीनं हवालदिल होता. बायकोमुलांसह तो गावी परतला होता. गावात शिरताशिरताच वेशीवरच्या गावकऱ्यांनी थांबवलं आणि कल्पना दिली. खरंतर आता गावी कसं राहायचं आणि कसं जगायचं या कल्पनेनंच ब्रह्मांड आठवलं.
त्याच्या बायकोच्या मनात विचार चक्र सुरू होतं. शी! मुलं कुठं खेळणार? कुठं राहणार? कोणाशी खेळणार? कल्पना करणंही कठीण होत. पण पर्याय नव्हता. दादांच्या मनात अपराधीपणाची भावना होती. एकीकडं मन खात होतं. आईचा साधा फोनही घेणं टाळत होतो. वडील गेले तेव्हा रजा मिळत नाही सांगून गावाकडं येणंही टाळलं होतं. सुट्ट्यांमध्येही मुलांच्या क्लासेसच्या नावाखाली त्यांना गावाकडं आणणं टाळत होतो. लॉकडाउनमुळं आणि व्यवसाय उद्योग बंद झाल्यामुळे पुन्हा गावाकडं येणं भाग पडलं होतं. घराशी पोहोचलो तेव्हा घराशेजारच्याच गोठ्याच्या दारात आई वाट बघत उभी होती. तिनं पुढं येऊन तोंडावर पदर धरून स्वागत केलं. दादा, या रे सगळ्यांनी! आणि तिकडं घरात जावा.
तुमच्यासाठी घर झाडून, पुसून स्वछ करून ठेवलंय. घरात पाणी भरून ठेवलंय आणि आजचा स्वयंपाकही करून ठेवलाय. तसंच मागं जाऊन अंघोळी करून घ्या आणि धाकट्या सूनबाईंनी केलेला गरम गरम स्वयंपाक जेवून घ्या. आम्ही सगळी शेजारच्या गोठ्यात गुराढोरांसोबत राहिलोय. आम्हाला काय कुठेही राहायची सवय आहे. तुम्हाला ते नाही जमायचं. दादाचा ऊर भरून आला होता. वहिनीचा चेहराही बघण्यासारखा झाला होता. तिला हे सगळं अगदीच अनपेक्षित होतं. भाऊ, वहिनी आणि त्यांच्या मुलांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवूनच दारातून दादाच्या कुटुंबाचं स्वागत केलं. आज कोणीच कोणाची गळाभेट घेऊ शकत नव्हतं. किंवा मुलं मुलांना भेटू शकत नव्हती. दादाच्या बायकोचा जीव भांड्यात पडला होता. चला, स्वागत तर झालं, पुढचं नंतर पाहू....आईनं सांगितलं घरात गॅस आहे, भाजीपाला, दूध, शिधा, इतर साहित्य सगळं घरात आणून ठेवलेलं आहे. सूनबाई! फकस्त पंधरा दिवस तुमचं करून घे बरं का घरातल्याघरात. आम्ही इकडं गोठ्यात आमची चूल लावली आहे. धाकलीनं लाकूडफाटा, दाणागोटा गोठ्यात सगळा आणून ठेवलाय. आम्ही आमचं इथं भागवू.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
ही महामारी आली म्हणून गं बाई, नाहीतर मी नसतं करू दिल तुला काही. कधी नव्हं ते तुम्ही सगळे गावाकडं आलाय. आता फक्त काही करून जिवंत कसं राहायचं एवढा ईचार करायला हवा.
दादाच्या कुटुंबाचे ते पंधरा दिवस पंधरा वर्षांसारखे जीवघेणे वाटत होते. विलगीकरणाचा काळ संपला. सोळाव्या दिवशी अंघोळी करून आई, भाऊ आणि त्याचे कुटुंब गोठ्यातून घरात आले. सर्व जण एकमेकांना उराउरी भेटली. मुलं मुलांच्यात खेळायला गेली. घरात कोंडून घेतलेले श्वास आज मोकळे झाले होते. ती पंधरा दिवसांची घुसमट जीवघेणी होती. मुलं आनंदानं गावातल्या ओढ्यावरती आरडाओरडा, दंगा करत खेळायला गेली. आईनं सणासुदीचा दिवस असल्यासारखं गोडाधोडाचं जेवणं केलं. दादाला मच्छी आवडते म्हणून भाऊ ताजी मच्छी पण घेऊन आला होता. गौरी गणपतीला घरी आल्यासारखे दिवस आनंदाचे झाले.
गावात दूरदर्शनवरच्या बातम्यांतून निसर्ग वादळ येणार याची ब्रेकिंग न्यूज सारखी दाखवत होते. त्या निसर्ग वादळाचं हवामान खात्यानं वर्तविलेलं भविष्य उरात धडकी भरवणारंच होतं. आणि ती काळरात्र प्रत्यक्षात आली. रात्रीपासूनच मुसळधार पाऊस आणि वादळी वारे सुरू झाले. जीव मुठीत धरून सगळे जणं घरात बसले होते. पहाटेच्या सुमारास घोंघावणारं प्रचंड वादळ आलं आणि बऱ्याच घरांवरचे छप्पर उडून गेले. वादळानं घराच्या भिंतीसुद्धा पडत होत्या. त्यातच ढगफुटीसारखा कोसळणारा मुसळधार पाऊस. अंगावरच काय घरात सुद्धा एकपण सुकं कापड राहिलं नाही. काल रात्रीपासूनच वीजही गेली होती. सगळीकडंच काळ्याकुट्ट अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं. बघता बघता काही क्षणांत दादा राहत असलेल्या घराच्या छपरावरची कौलं उडून जाऊन चक्काचूर झाली. गोठ्याचं छप्परही मोडलं. कौलही इतस्ततः फेकली गेली. पावसाळ्यासाठी भरून ठेवलेले गुरांचे चारापाणीही भिजून ओलाचिंब झाले. गुरंढोरंही भीतीन ओरडू लागली. डोक्यावरुन प्लॅस्टिकचे कागद घेऊन घराच्या कोपऱ्यात एका खोलीत सर्वजण निपचित बसून होती निःशब्द...!
सकाळी वादळ शमलं. आता उजाडलं होत. तरी वातावरणात काळोखी होतीच. गावात घराघरातली माणसं आपापल्या वाडीत फिरून नुकसानीचा अंदाज घेत होती. कोणाकोणाचं सांत्वन करणार. काहींच्या घरावरती, गोठ्यावरती झाडं पडली होती, रस्त्यांवरती झाडं पडली होती. आंबा, काजू, नारळ, सुपारीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या होत्या. भातशेती, नाचणी वाहून गेली होती. वर्णन करणंही केवळ अशक्य होतं. पुढे कित्येक दिवस
वीज खंडित राहणार होती.
कोकणातला माणूस कधीही संकटांपुढे शरण जात नाही. त्याची ती मनोवृत्तीच नाही. कोकणातला शेतकरी कधीही आत्महत्या करीत नाही. कोणापुढे हात पसरत नाही. सरकारकडं कोणतंही पॅकेज मागत नाही. कधी धरणे, आंदोलने, मोर्चे करत नाही. नुकसानभरपाईसाठी पुढाऱ्यांपुढं लाचारपणं तगादा लावत नाही. लग्नामध्ये हुंडा देत नाही आणि घेतही नाही. ऋण काढून सण करत नाही. तो स्वयंभू असतो. नव्या दमानं, नव्या जोमानं, नव्या ताकदीनं, नव्या ऊर्मीनं पुन्हा पुनर्निर्माणासाठी उभा राहतो. आता लॉकडाउनचा कालावधी असूनही गावातील आबालवृद्ध सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवून एकत्र झाले. ग्रामदेवतेच्या देवळासमोर सर्व जण हात जोडून उभे राहिले. माते जगदंबे या संकटातून सावरण्यासाठी आम्हाला बळ दे. तुझ्या आशीर्वादानं पुन्हा सर्व उभं राहिलं यासाठी. गावातील तरुण मंडळींनी गट पाडले. हत्यारं, अवजारं जमा केली. संपूर्ण गावानं पुनर्निर्माणाचे नियोजन केलं. परिसरातील स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्तेही लगोलग मदतीला धावून आले. परिसरातील गावांमधून फिरून झालेल्या नुकसानीची पाहणी केली. धान्य, शिधा, अंथरूण, पांघरूण, कपडेलत्ते, मेणबत्ती, काडेपेटी, डासांची उदबत्ती, औषधे, प्रथमोपचार सर्व काही संस्थेत जमा होऊ लागलं. गरजेनुसार गाववार वाटणी सुरू झाली. सर्व गावांनी एकजुटीनं एकत्र येऊन हेवेदावे बाजूला ठेवून एकमेकांची घरं सावरायला सुरुवात केली. आणि पुन्हा गावं उभी राहू लागली.
एक दोन दिवसांतच बाहेरचं वादळ संपलं. आणि बाहेरचं वादळ कौटुंबिक व्यवहारात आलं. लॉकडाउनचा कालावधी आता हळूहळू संपत आला होता. दादाची बायको म्हणाली, ‘माझ्या मालकणीनं मला फोन करून लवकरात लवकर कामावर बोलावलं आहे, ती म्हणते आपला बंगला आहे, इथंच विलगीकरणात तू राहा, पण आता गावाकडे राहू नको’’ त्यावर दादा म्हणाला, ‘‘माझ्या मालकानं मला काय अजून कामावर बोलावलं नाही, मी मुलांना घेऊन घरातच राहीन.’’ दादाची बायको, दादाला म्हणाली, ‘‘माझी मालकीण मला म्हणाली, की हवं तर तू तुझ्या कुटुंबाला घेऊन इथंच राहा, मग तर झालं.’’ सुखवस्तूपणाची हाव असलेली दादाची बायको त्याच्यामागं तगादा लावून म्हणाली, की काहीही झालं तरी आपण आता मुंबईला जायचं. गावातील इतर बायकांना पण मुंबईत जाण्याचे वेध लागले होते. सुखवस्तूपणाच्या हव्यासानं दादाच्या बायकोला मालकणीच्या बंगल्यात राहण्याची स्वप्नं पाहू लागली. तिचं एकच नवऱ्याच्या कानी भूणभूण होती ‘‘किती दिवस झाले मला पार्लरला जायलाही मिळालं नाही, आणि इथं तशी सोयसुद्धा नाही. शेणाच्या जमिनीवर राहणं, नदीवर धुणी-भांडी करणं, शेणगोठा करणं हे काही आता माझ्याच्यानं होणार नाही. तेव्हा लवकरात लवकर मुंबईला कधी जायचं ते ठरवा आणि तसं तुमच्या आईशी आणि कुटुंबात बोला.’’ रात्री उशिरापर्यंत हळू आवाजात दोघं कुजबुजत होती. पुढचंही तिनं लगेच सांगतलं ‘‘ हो, मगंच मी तुम्हाला बोलले होते, की गावी जाल तेव्हा एकदा वकिलांना भेटून रीतसर घरसंसाराची वाटणी करून घ्या. आता ते देखील मार्गी लावा.’’ दादा म्हणाला, ‘‘अगं ते जाऊ दे, गावी आलो तर आता आईनं आणि भावानं काय कमी केलं आपल्याला? आणि घर तर त्यानंच बांधलं आहे, आणि शेतीही तोच करतो. त्यांच्यामुळंच तर आता आपण इथं राहू शकलो आहे. तसंही तू आणि मी थोडंच इथं शेती करायला येणार आहोत?’’ वहिनी म्हणाली, ‘‘तरीही मी सांगते ते ऐका, आपल्या गावात आपल्या हक्काचं घरसंसार असलंच पाहिजे. मुलांचा काहीतरी विचार नको का करायला? पुन्हा गावाकडे
यायला लागलंच तर?’’
सकाळी मुलं खेळायला गेल्यावर दादानं कुटुंबातील सर्वांना एकत्र करून आई आणि भाऊच्या कुटुंबासमोर हा वाटणीचा विषय मांडला. दादाच्या तोंडून हे सर्व ऐकून आई सुन्न झाली. तरी स्वत:ला सावरून म्हणाली, ‘दादा, एक मात्र तुला सांगते, की एका घरात दोन चुली होणार नाहीत. कारण हे घर भाऊनं बांधलं आहे, तो इथंच राहणार आणि मीही इथंच राहणार.’ आई कठोरपणे म्हणाली, ‘तुझ्यासाठी तू वेगळं घर बांधून घे आणि तू तिथं राहा. आणि हो, वकिलाकडे जाऊन रीतसर वाटणी करून घ्या. माझं काही म्हणणं नाही.’ पुढच्या दोन चार दिवसांत रीतसर वाटणी झाली. परिसरातील गावसमाजात अशीच कौटुंबिक वादळं झाली. महामारीमुळं गावाकडं आलेल्या चाकरमानी आणि कुटुंबांचं कायमचंच समाजात विलगीकरण झालं. आणि त्याचबरोबर समाजाचं मानसिक विलगीकरण झालं.
लॉकडाउनच्या काळात गावाकडं आलेले चाकरमानी हे विलगीकरणाचं वादळ गावाकडंच ठेवून कुटुंबासह जशी आली तशी शहरात निघून गेली. गावाकडची माणसं स्वत:ला आणि कुटुंबाला उभं करण्याच्या कामाला पुन्हा नेटानं उभी राहिली. त्यांना स्वत:च, कुटुंबाचं आणि गावाचं ‘आत्मनिर्भर पुनर्निर्माण’ करायचं होतं...
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.