artist lata mangeshkar asha bhosale music Best Of Shamshad Begum Songs
artist lata mangeshkar asha bhosale music Best Of Shamshad Begum Songs sakal
सप्तरंग

साधी सरळ शमशाद...

द्वारकानाथ संझगिरी dsanzgiri@hotmail.com

लतादीदी आणि आशा भोसले यांच्या गाण्यांवर माझी पिढी लहानाची मोठी झाली. लतादीदींच्या अंगाईगीताने मला माझी आई झोपवत असे. लता-आशाच्या गाण्यांवर माझं तारुण्य फुललं. आजही तारुण्यात राहायची किमया त्यांच्याच गाण्यांनी केली आहे. जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत, तोपर्यंत लता-आशाचा आवाज आसमंतात राहणार.

पण, संगीताच्या क्षेत्रात इतरांचंही काहीकाळ राज्य होतं. लता-आशाएवढा मोठा नसेल; पण त्यांनीही एक काळ गाजवला. त्यांची गाणीही आज आपल्याला आनंद देतात. ते वेगळे सूर असले तरी कानसेनांसाठी ते प्रिय आहेत.

त्यातलाच एक सूर म्हणजे शमशाद बेगमचा स्वर. तिचा आवाज खुला आणि दाणेदार होता, तो थोडा अनुनासिक होता; पण त्यात एक वेगळी मस्ती होती. तिचा आवाज एवढा ताकदवान होता की, रेकॉर्डिंगच्या वेळी मायक्रोफोन तिच्यापासून लांब ठेवत. ‘तिचा आवाज म्हणजे खणखणीत चांदीचा बंदा रुपया आहे’ असं ओ. पी. नय्यर म्हणायचे.

गुलाम हैदर म्हणजे बाप माणूस, नूरजहाँला त्यांनी शोधलं. लता मंगेशकरला शशिधर मुखर्जींनी पातळ आवाजाची म्हणून नाकारलं, तेव्हा त्यांनी तिला न्याय मिळवून दिला. त्या वेळी ते पाकिस्तानात राहायला गेले होते. त्यांनी मुखर्जींना ठणकावून सांगितलं, ‘‘हिला तुम्ही नाकारलं, उद्या निर्माते तिच्या घरापुढे रांग लावतील.’’ लतादीदी त्यांचं ऋण नेहमीच मान्य करत.

त्यांनी शमशादला विचारलं, ‘‘तुझ्याबरोबर वाद्य वाजवणारे कुणी नाहीत?’’ ती म्हणाली, ‘‘नाही. मी एकटीच आली आहे. माझ्याबरोबर वादक नाहीत.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘चल, मला एक अस्थाई ऐकव.’’ तिने विचारलं, ‘‘अस्थाई म्हणजे काय?’’ त्यांनी सांगितलं की गाण्याची पहिली ओळ.

मग त्यांनी तिथल्या एका वादकाला सांगितलं, ‘‘काळी पाच वाजव.’’ अस्थाई संपवून ती अंतऱ्यावर जाणार तेवढ्यात ते म्हणाले, ‘‘बस कर.’’ तिला वाटलं ती नापास. गुलाम हैदर ह्यांनी मॅनेजरला सांगितलं, ‘‘हिच्याबरोबर १२ गाण्यांचं कॉन्ट्रॅक्ट करा.’’ आणि तिला सांगितलं, ‘‘प्रत्येक गाण्याचे १२ रुपये मिळतील.’’ तिला आकाश ठेंगणं झालं.

तिने यमलाजट या पंजाबी सिनेमात पहिल्यांदा पार्श्वगायन केलं. त्यात नूरजहाँ होती. संगीत अर्थातच गुलाम हैदर यांचं. मग खजांची आला आणि शमशादचा आवाज गाजायला लागला. प्रेमपूर्व अवस्थेतलं अवखळ फेसाळ प्रेमगीत हा तिचा हातखंडा होता. उदाहरणार्थ बर्मन दांचं ‘सय्या दिल में आना रे, आके फिर ना जाना रे’.

शमशादला मुंबईत आणलं मेहबूब खान ह्यांनी; पण मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीने तिला बिघडवलं नाही, किंबहुना ती स्वतःच बिघडली नाही. फिल्म इंडस्ट्रीमधल्या पुरुषी लांडग्यांपासून स्वतःला सांभाळणं ही सोपी गोष्ट नव्हती.

अनेक प्रलोभनं हे लांडगे सुंदर मुलींच्या समोर फेकत आणि त्या मुली त्या मोहात अडकून फसत किंवा आपला फायदा करून घेत. पण तिने तसं कधीही केलं नाही. सिनेमा हीट झाल्यानंतरही पैसे वाढवून मागणं कठीण जायचं. एक किस्सा सांगतो. पहिल्या काही सिनेमांनंतर तिच्या लक्षात आलं की, मास्टर गुलाम हैदरनी एक नवी गाडी घेतली, त्यांनी नवे सूट घालायला सुरुवात केली.

तिला कळलं की खजांची, जमीनदारसारख्या चित्रपटांच्या यशानंतर गुलाम हैदर यांचे पैसे वाढले. तिने त्यांना म्हटलं, ‘‘तुमचे पैसे वाढले; पण मला अजून गाण्याचे दीडशे रुपयेच मिळतात. मला वाढवून द्या ना.’’ मास्टरजी तिला म्हणाले, ‘‘तुला तोंड नाही का? प्रत्येक ठिकाणी तुझ्या पैशांची बोलणी करायला मी येणार आहे का? तूच माग.’’

तिने अत्यंत बावळटपणे त्यांना विचारलं की, ‘‘पण किती मागू?’’ इतकी ती साधी होती. मास्टरजी म्हणाले, ‘‘तेपण मीच सांगायचं का? नाही, तू ठरव.’’ शेवटी तिने मनाचा हिय्या करून पांचोलीकडे सातशे रुपये प्रत्येक गाण्यासाठी मागितले.

पांचोली तिला काय म्हणाले असतील? ते म्हणाले, ‘‘मी तुला दोन हजार रुपयेसुद्धा दिले असते.’’ ती म्हणाली, ‘‘मग द्या ना.’’ पांचोली म्हणाले, ‘‘मी व्यापारी माणूस आहे. आधी का नाही मागितले? मी आता सातशे रुपये देणार; पण पुढचा सिनेमा जर गोल्डन ज्युबिली झाला तर २००० देईन.’’

तरीही दुसऱ्या कंपनीचा एक मालक जेव्हा तिच्याकडे गाणं मागायला आला, त्या वेळी तिने त्याच्याकडे कसेबसे पंधराशे रुपये मागितले. एकेकाळी ती इतकी मोठी होती की, राज कपूर तिच्याकडे गेला आणि तिला म्हणाला, ‘‘मी पृथ्वीराज कपूरचा मुलगा. मी सिनेमा काढतो; पण मला तुमचा मोबदला परवडणार नाही.’’

तेव्हा शमशाद त्यांना म्हणाली, ‘‘पृथ्वीराजबद्दल मला प्रचंड आदर आहे. तुम्ही द्याल तो मोबदला मी घेईन.’’ त्यानंतर राज कपूर संगीतकार राम गांगुली यांना घेऊन शमशादच्या घरी गेला रिहर्सलसाठी. त्यांच्याबरोबर दोन तरुण वाद्य घेऊन आले होते. एकाच्या हातात पेटी होती, दुसऱ्याच्या तबला आणि डग्गा. ते शंकर, जयकिशन होते. त्यांनी तिला बरसात, आवारापर्यंत गाणी दिली, नंतर ते तिला विसरून गेले, कारण त्यांना लता सापडली होती.

ज्या काळात शमशाद बेगम पंधराशे रुपये प्रत्येक गाण्यासाठी घ्यायची, त्यावेळेला लता मंगेशकरला फक्त दीडशे रुपये मिळायचे. नंतर मात्र हे सगळं बदललं. राज कपूरच्या सिनेमांमध्ये ॲकॉर्डियन हमखास असायचा. तुम्ही जर नीट ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल की, ॲकॉर्डियन, पिकेलोसारखी वाद्यं वाजली, तरी त्यात शमशादचा आवाज लपून जायचा नाही, तो कधीच कमी पडला नाही.

एकेकाळी शमशाद बेगम नौशाद, सी. रामचंद्र आणि ओ. पी. नय्यरची लाडकी गायिका होती. त्यांची अनेक गाणी गाजली. आना मेरी जान संडे के संडे गाण्याने सी. रामचंद्र ह्यांची करिअर बहरली; पण लता मंगेशकर आणि नंतर आशा भोसले आल्यानंतर ही मंडळी शमशादला विसरली. जेव्हा शमशाद लाहोर रेडिओवर स्टार गायिका होती, तेव्हा ओ.पी. लहान मुलांचे कार्यक्रम करायचा.

शमशाद वगैरे ज्येष्ठ मंडळी त्याला सायकलवरून आइस्क्रीम आणायला पाठवायचे. ओ.पीं.च्या ‘बाज’साठी शमशाद गायली होती. गुरुदत्त हा शमशादचा फॅन. ‘आरपार’साठी त्याने ओ.पी.ला घेतल्यावर ओ.पी. शमशादकडे गेला आणि गुडघ्यावर बसून तिला म्हणाला, ‘‘बाई एक गाना मेरे लिये गाना, आप गाती है तो गाना हीट हो जाता है.’’

पण पुढे त्याच्या लाडक्या गायिकेच्या गळ्याच्या प्रेमात पडला. ‘कही आर कही पार’ या गाण्याचं रेकॉर्डिंग मद्रासला होतं. ओ.पी. गुरुदत्तला म्हणाला, ‘‘ती नाही जाणार मद्रासला, तर ते गाणं आपण आशाकडून गाऊन घेऊ.’’ गुरुदत्तने सांगितलं, ‘‘नाही, तिला वेळ मिळून गाणं रेकॉर्ड होईपर्यंत मी शूटिंग पुढे ढकलतो.’’

शमशादच्या काही गोष्टींचं मला कौतुक वाटतं. ती लाहोरची ऑर्थोडॉक्स मुसलमान; पण तिने लग्न केलं, मराठी हिंदू गणपतलाल बत्तूशी. मुलीचं नाव उषा ठेवलं. तिच्या मुलीने लग्न हिंदू व्यक्तीशी केलं. तिचं अर्धं कुटुंब पाकिस्तानात असूनही, फाळणीनंतर ती नूरजहाँप्रमाणे पाकिस्तानात गेली नाही. इथल्या राजकारणाला बळी पडली.

वयाच्या ३४ व्या वर्षी वैधव्य येऊनही कोणीही तिच्याबद्दल कधी रोमँटिक गॉसिप ऐकलेलं नाही. अत्यंत साधेपणाने ती राहिली. तिचा नवरा गेल्यानंतर जवळजवळ तिने गाणं सोडलं होत. मेहबूबने तिला पुन्हा मदर इंडियात गाणं गायला लावलं; पण ती प्रमुख गायिका झाली नाही. ती फक्त एक हजार ६५० गाणी गायली.

पुढे तिची ‘कभी आर कभी पार’, ‘सय्या दिल में आना रे’ वगैरे गाणी रिमिक्स झाली. आजच्या युगात तिचा आवाज, तिची गाण्याची शैली गाजली असती. प्रदीर्घ आयुष्य जगून सर्व सुख-दुःखं, तृप्तता-अतृप्तता, यश -अपयश, प्रेम, मान-अपमान ह्यांचा अनुभव घेऊन; पण आपल्यासाठी अनमोल गाण्यांचा ठेवा ठेवून ती जगातून निघून गेली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: AIच्या माध्यमातून भाजपाविरोधी अजेंडा राबवण्याचा झाला प्रयत्न! Open AI चा खळबळजनक दावा

ब्रेकिंग! ‘आरटीई’ प्रवेशाला मंगळवारपर्यंत मुदतवाढ; शिक्षण संचालकांचे आदेश; आता मुदतवाढ नसल्याचेही स्पष्टीकरण

Nagpur Temp : नागपूरमध्ये नोंद झालेलं 56 डिग्री तापमान होतं चुकीचं! हवामान विभागाला का द्यावं लागलं स्पष्टीकरण?

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

SCROLL FOR NEXT