Being stressed about not having a baby
Being stressed about not having a baby 
सप्तरंग

मूल होत नसल्याने तणावात आहात? मग 'हा' आहे पर्याय

सकाळ वृत्तसेवा

बहिणींचा त्रास पाहवत नाही

 मी २९ वर्षांची अविवाहित तरुणी आहे. घरी आई-वडील व विवाहित भाऊ असा परिवार आहे. दोन बहिणी विवाहित आहेत. आई-वडील शेती करायचे. अत्यंत गरिबीमुळे आम्हा बहिणींनादेखील शेतीत काम करायला लावायचे. मात्र, भावाला कधीही काम सांगितले नाही. त्याची सर्व हौसमौज पुरविली. २०१० मध्ये शेती विकल्यानंतर दोन्ही बहिणींचं लग्न करून दिलं. परंतु, गरीब घरातल्या मुलांशी. कोणतीही चौकशी न करता. मोठी बहीण दहावी शिकलेली आहे. परंतु, तिचा नवरा ड्रायव्हर असून, व्यसनी आहे. तिला कोठेही बाहेर जाऊ देत नाही. तिने ३-४ वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. दुसरी बहीण एम.कॉम. शिकली आहे. परंतु, तिही गरिब आहे. आई-वडिलांना काही बोलल्यास ते म्हणतात, त्यांची मर्जी विचारूनच लग्न ठरविलं. आई म्हणते मी माझं कर्तव्य केलं. त्या दोघींकडे वडील आणि भाऊ जात नाही. नातेवाईकही काही मदत करीत नाहीत. जसं बहिणींचं झालं, तसं माझ्याबाबत घडू नये, असं मला वाटतं. खूप मानसिक त्रास होत आहे. बहिणींसाठी कायद्याची काही मदत मिळू शकते का? सकाळ ‘मोकळे व्हा’ बहिणी व माझ्यासाठी एक शेवटचा आशेचा किरण आहे

तुझ्या बहिणींच्या शिक्षणाबाबत तू सांगितले आहेस. मात्र, तुझ्या भावाच्या शिक्षणाचा व तो काय काम करतो, याचा उल्लेख नाही. वडिलांनी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसल्याने शेती विकून लग्ने करून दिली आहेत. श्रीमंत स्थळे पाहूनच लग्न लाऊन दिली म्हणजे आयुष्य चांगले झाले असते, हा तुझा गैरसमज आहे. तुला गरिबी हा जो प्रश्‍न वाटत आहे, तो भारतातील एक प्रातिनिधिक मनोवृत्तीचे उदाहरण आहे. ही वृत्ती म्हणजे बौद्धिक व शारीरिकदृष्ट्या धडधाकट असणाऱ्या लोकांमधील मानसिक अपंगत्व. मानसिक अपंगत्व म्हणजे सहानुभूतीच्या आधारे जगण्याची वृत्ती. गरिबीचे स्तोम माजविणे, स्वतःबद्दल दयनीय भाव निर्माण करून इतरांकडून सतत मदतीची अपेक्षा, अन्यथा मदत आपला हक्कच आहे, असा समज करून घेणे. या विचारांमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न कर. तरंच परिस्थितीकडे वेगळ्या मनोवृत्तीतून पाहू शकशील. माझे बोलणे तुला कटू वाटेल. परंतु, सत्य स्वीकारलं तर समृद्ध आयुष्य जगण्याच्या वाटा दिसतील. आई-वडिलांची गरिबी होती तुम्हाला शेतीत काम करावे लागले. परंतु, त्यांनी तुम्हा सर्वांना शिक्षणाची संधी ही दिली आहेच. शेतीत काम केल्यामुळे तुमच्यात शारीरिक मेहनतीचे काम करण्याची ताकद निर्माण झाली असण्याची शक्‍यता आहेच. मोठ्या बहिणीचा नवरा व्यसनी असल्याने तिला शारीरिक/ मानसिक त्रास होत आहे. यासाठी कायद्याची निश्‍चित मदत घेऊ शकतेस. परंतु, गरिबी आहे म्हणून नवऱ्याला सोडून देण्यासाठी कायदा मदत करीत नाही. बहिणीला मानसोपचार तज्ज्ञ व्यक्तीच्या मदतीने स्वतःचे प्रश्‍न सोडवून चांगले आयुष्य जगण्यासाठी तिने काय करायला हवे आहे, याचे मार्गदर्शन अधिक उपयुक्त ठरू शकते. आई-वडिलांविषयी तुझ्या मनात अविश्‍वास, राग दिसतो आहे. त्यांची मते योग्य वाटत नसतील तर आता तू २९ वर्षांची सज्ञान तरुणी आहे. स्वतःच्या आयुष्यातील नोकरी, व्यवसाय अथवा लग्न याबाबतचे निर्णय स्वतः विचार करून पारखून घेऊ शकतेस. भ्रामक विचारांमधून बाहेर पडलीस तर वास्तव परिस्थितीचा स्वीकार करून त्यावर मात करण्यासाठी नेमके नियोजन करता येऊ शकते. अजिबात शिक्षण न घेतलेल्या स्त्रियादेखील थोड्याशा व्यावहारिक गोष्टी शिकून एखादे कौशल्य आत्मसात करून त्याआधारे स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असल्याची उदाहरणे तुला आपल्या समाजात दिसतील. मग, शिक्षण घेतलेल्या मुलींनी इतरांपुढे मदतीची याचना करीत आयुष्य जगण्याचा मार्ग का स्वीकारावा? स्वाभिमानाने जगणे, स्वतःच्या कर्तृत्वावर गरिबीवर मात करण्याचे प्रयत्न यातूनच या मानसिकदृष्ट्या दुबळे बनविणाऱ्या विचारांवर मात करू शकशील.

मूल होत नसल्याने तणावात आहे

माझ्या लग्नाला दहा वर्षे झाली असून, अद्याप मूलबाळ झाले नाही. घरात आम्ही दोघेच राहतो. नवऱ्याला आईवडील नाहीत. त्याचा व्यवसाय असल्याने तो वारंवार बाहेरगावी जातो. व्यवसायाचे काम, मित्र यामध्ये तो मजेत असतो. मी नोकरी करते. परंतु, आपल्याला मूल नाही याची खंत जाणवत राहते. अनेकवेळा खूप उदासही वाटते. मूल होण्यासाठी अनेक डॉक्‍टर, देवधर्म सर्व करून झाले. परंतु सगळे प्रयत्न निष्फळ गेले. नोकरीवर असते त्या वेळी कामामध्ये मन लागते. परंतु, घरी आल्यानंतर वेगवेगळे विचार मनात येतात. आपल्याला आयुष्यात मूल झालेच नाही तर आपण कसे जगायचे? आसपासच्या कोणालाही झालेले मूल पाहिले तर हे दुःख अधिक तीव्रतेने जाणवते. आपले आयुष्य निरर्थक आहे, असे वाटते. या विचारांमुळे माझ्या तब्येतीवरही परिणाम होत आहे. नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या कोणत्याही समारंभात जाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे नवरा माझ्यावर चिडतो. आयुष्यभर रडत जगणार आहेस का, असे म्हणतो त्याला माझे दुःख कळत नाही, असे वाटते. मी काय करावे?

मातृत्वाची आस ही स्त्रीमधील सहजप्रवृत्ती आहे. त्यामुळे तुम्हाला वाटणाऱ्या भावना चुकीच्या आहेत, असे म्हणता येणार नाही. मूल व्हावे यासाठी तुम्ही सर्व प्रयत्न केलेले आहेत. परंतु, त्यात यश आले नाही. तुमच्या नवऱ्याने आपल्याला मूल होणार नाही, याचा स्वीकार केलेला आहे. त्यामुळे ते इतरत्र रमू शकतात. त्याप्रमाणे तुम्हाला अद्याप आपणास मूल होणार नाही याचा स्वीकार करता आलेला नाही. यातून दुःखाची तीव्रता वाढत राहते. स्वतःचे मूल न होणारे अनेक जोडपी दत्तक मुलांचा विचार करतात. या पर्यायांबाबत तुम्ही नवराबायको चर्चा करून एखादे मूल दत्तक घेण्याचा विचार करू शकता. पुण्यातील ससून हॉस्पिटलच्या आवारात सोफोश ही संस्था मूल दत्तक देण्याबाबतचे सर्व कायदेशीर सोपस्कार तसेच प्रत्यक्ष मूल दत्तक देण्याबाबत कार्य करते. प्रत्यक्ष भेट देऊन त्याबाबत सविस्तर माहिती घ्या.


पती घरात लक्ष देत नाही

मी ३८ वर्षांची विवाहिता असून, नवरा व ८ वर्षांचा मुलगा यांच्यासमवेत राहते. आम्ही दोघे नोकरी करतो. घरच्यांच्या मर्जीविरुद्ध प्रेमविवाह होता. माझ्या सासू-सासऱ्यांनी एकुलता एक मुलगा म्हणून इच्छा नसतानाही लग्न करून घेतले. नोकरीनिमित्त लग्नानंतर आम्ही पुण्यात येऊन राहिलो. सासू-सासरे गावीच राहतात. परंतु, सुटीत पुण्यात राहायला आल्यानंतर सतत माझ्या तक्रारी नवऱ्याकडे करतात. यातून माझ्या नवऱ्याचे माझ्याविषयी वाईट मत झाले आहे. तुला त्यांच्या मर्जीप्रमाणे वागावेच लागेल, असे नवरा म्हणतो. मी आयटी कंपनीत कामाला असून ८०,००० पगार मिळविते. कंपनीतील कामाचा ताण खूप असूनही, नोकरी सोडू शकत नाही. कारण नवऱ्याने गावी शेतजमीन खरेदी करण्यासाठी कर्ज काढले आहे. त्यांचा सर्व पगार हप्त्यामध्ये तसेच आई-वडिलांना पैसे पाठविण्यात संपतो. पुण्यातील घरात काहीही खर्च करावा लागला, तर तो लगेच खूप आरडाओरडा करून भांडणे करतो. माझ्या व माझ्या मुलाच्या भविष्याबाबत नवरा काही विचार करतो का, याबाबत शंका यावी असे त्याचे वर्तन आहे. मला होणाऱ्या मानसिक त्रासाबाबत त्याला काहीही समजत नाही. रोज आई-वडिलांसमवेत व्हिडिओ कॉल करून गप्पा मारणे किंवा मैत्रिणीशी गप्पा मारणे, यासाठी त्याच्याकडे वेळ असतो. परंतु, घरात लक्ष नसते. अशा माणसाबरोबर आपण का राहतो आहोत, हेच कळत नाही?

नोकरीतील ताण, नवऱ्याची बेपर्वाई, सासूसासऱ्यांची तुला समजून घेण्याविषयी मर्यादा यातून तुझ्यावरील तणाव खूपच वाढल्याचे दिसते. भविष्याविषयीचे सुरक्षिततेच्या विचारातून तुझी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे, याचा विचार कर. तुम्हा दोघांमधील नातेसंबंध बिघडल्यामुळे तो तुझ्याकडे दुर्लक्ष करीत असल्यास, त्यावर तज्ज्ञ व्यक्तीच्या सहाय्याने नातेसंबंध सुधारण्यासाठी मदत घेऊन ऐकमेकांबद्दल दुरावा कमी होऊ शकतो. परंतु, बेजबाबदार वर्तनासोबत स्वार्थीपणा हा स्वभावदोष असल्यास अशा व्यक्तींना बदलण्यासाठी थोडे कडक धोरणही स्वीकारावे लागते. कायदेतज्ज्ञाची मदत घेऊन लग्नानंतरचे विवाहीत स्त्रीचे हक्क तिच्या व मुलाच्या पालनपोषण संगोपनासाठी असणाऱ्या नवऱ्याच्या जबाबदाऱ्या याविषयी नवऱ्याला समज द्यावी लागेल. यासाठी कौटुंबिक न्यायालयात सल्लागार मदत करू शकतात. जिल्हा न्यायालयात दावा दाखल करण्यापूर्वीच्या केसेसमध्ये समझोत्याचे प्रयत्न केले जातात. जेथे एकमेकांमध्ये कोणते बदल केल्यास कौटुंबिक प्रश्‍न वाढणार नाही, याचे मार्गदर्शन मिळू शकते. त्याचबरोबर वैवाहीक नात्यात अन्याय करणाऱ्या व्यक्तींना कायद्याने कशाप्रकारे शासन होऊ शकते, याची जाणीवही करून दिली जाते
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT