पुण्यात 'शत प्रतिशत' भाजप ही गेल्या वेळची सक्सेसफूल स्वप्नवत खेळी पुन्हा प्रत्यक्षात आणण्यासाठी आठपैकी किमान चार मतदारसंघातील आमदारांच्या जागी नवे चेहरे मैदानात उतरविणार असल्याची चर्चा पक्ष कार्यकर्त्यांत हमरीतुमरीने सुरू आहे. शिवसेना व आरपीआय या मित्रपक्षांची मागणीचे काय करायचे, यांवरही पक्षश्रेष्ठी गांभीर्याने विचार करीत आहेत. अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असल्यामुळे, काही नवे चेहरे रिंगणात येणार असल्याची चर्चा जोर धरत आहे.
पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये नवा चेहरा
पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार दिलीप कांबळे यांना दुसऱ्यांदा मिळालेले राज्यमंत्रीपदही कालावधी पूर्ण होण्याआधीच गमवावे लागले. त्यांच्या कार्यपद्धतीवर पक्षात, तसेच मतदारसंघातही नाराजी असल्यामुळे, त्यांना यावेळी विश्रांती दिली जाईल, याबाबत भाजप कार्यकर्त्यांत बऱ्यापैकी एकमत आहे. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांचेही या मतदारसंघात तगडे आव्हान आहे. परराज्यातील अनेक नेत्यांनी गेल्यावेळी प्रचार केल्याने कांबळेनी विजयश्री मिळविली होती. त्यांच्याजागी त्यांचे बंधू व स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांच्यासह अन्य काही नावांची चर्चा सुरू आहे. रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) यांनीही या जागेची आग्रही मागणी केली आहे.
शिवसेनेचे हडपसरला प्राधान्य
पुणे कॅन्टोन्मेंटलगतच्या हडपसर मतदारसंघातही भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांना पुन्हा पक्षाचे तिकीट मिळण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. विरोधकांनी त्यांच्याविरुद्ध गेल्या काही दिवसांत केलेल्या कथित आरोपांमुळे टिळेकर यांच्याविषयी पक्षाच्या प्रदेशातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. माळी विरुद्ध मराठा समाजातील मतदार यांमुळे हा मतदारसंघ प्रत्येक निवडणुकीत चर्चेत राहतो. टिळेकर यांच्यामागे पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची ताकद आहे. मात्र, नवीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याच मतदारसंघातील विकास रासकर यांच्याकडे पक्षाच्या ओबीसी विभागाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे सोपविली. त्यामुळे टिळेकर यांना पक्षांतर्गत आव्हान उभारले आहे. शिवसेनाही या मतदारसंघाची आग्रही मागणी करण्याची शक्यता आहे. शहरात एखादी जागा द्यायची ठरल्यास, शिवसेनेचे हडपसरलाच प्राधान्य राहील. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी मतदारसंघ बांधणीला सुरवात केली आहे, तर राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा प्रचारही येथे महत्त्वाचा ठरेल.
शिवाजीनगरलाही बदल?
कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी आणि शिवाजीनगरचे आमदार विजय काळे यांच्यापैकी किमान एका जागी नवीन चेहरा येण्याची शक्यता कार्यकर्त्यांत चर्चिली जात आहे. शिवाजीनगरला खासदार अनिल शिरोळे यांचा मुलगा नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. गेल्याच वेळी त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला होता. मात्र, त्यावेळी विनायक निम्हण यांना भाजपमध्ये घेण्यास विरोध करणाऱ्या गटाने जोरदार प्रदर्शन केल्यामुळे, पक्षाला शेवटच्या टप्प्यात उमेदवार शोधावा लागला होता. त्यातच एकाच घरात दोघांना पदे नको, अशी भूमिका माजी खासदार प्रदीप रावत यांनी घेतली. त्यामुळे, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भाजयुमोचे माजी प्रदेशाध्यक्ष विजय काळे यांना पक्षाची उमेदवारी मिळाली. जनसंघापासून गेली चाळीस वर्षे ते पक्षाच्या कार्यात आहेत. यावेळी अनिल शिरोळे यांना लोकसभेची उमेदवारी पुन्हा मिळाली नाही. त्यामुळे, सिद्धार्थ शिरोळेना शिवाजीनगरला उभे करण्यात येईल, अशी त्यांच्या पाठिराख्यांची अपेक्षा आहे. काळे यांचेही पक्षांत श्रेष्ठींशी चांगले संबंध असून, पुन्हा उमेदवारीसाठी तेही प्रयत्नशील आहेत.
कोथरूडमध्ये बदलाची शक्यता
कोथरूडला स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या नावाचा बोलबाला आहे. गेल्या निवडणुकीतही ते उमेदवारीच्या स्पर्धेत शेवटपर्यंत होते. मात्र, पक्षाचे नेते विनोद तावडे यांच्या पाठिंब्यामुळे आक्रमक व अभ्यासू नगरसेविका मेधा कुलकर्णी यांच्या उमेदवारीवर शेवटच्या क्षणी शिक्कामोर्तब झाले होते. यंदा पक्षांतर्गत राजकारणात त्या मागे पडल्यास, त्यांच्याजागी नवा चेहरा येण्याची शक्यता आहे. मात्र, महिला आमदारांना उमेदवारी नाकारता, भाजपला अन्य मतदारसंघात महिला उमेदवारीचा विचार करावा लागणार आहे.
कसबा पेठेत महापौर आघाडीवर
त्या दृष्टीकोनातून कसबा पेठ मतदारसंघाकडे पाहिले जाते. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व सलग पाचवेळा कसबा पेठ मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेल्या गिरीश बापट हे खासदार झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर इच्छुकांची गर्दी झाली आहे. त्या जागी महापौर मुक्ता टिळक यांचे नाव आघाडीवर आहे, तर गणेश बिडकर, धीरज घाटे यांच्यासह अनेक इच्छुक आहेत. बापट यांच्या सुनेचे नावही चर्चेत आहे. त्यांच्या उमेदवारीसाठी बापट प्रयत्न करतील. निर्णय शेवटी पक्षश्रेष्ठी घेणार असले, तरी बापटांचे म्हणणे डावलून कसब्यातील उमेदवाराचे नाव ठरण्याची शक्यता कमी आहे. कसबा पेठेत टिळक यांचे नाव ठरल्यास, कोथरूडमध्ये मेधा कुलकर्णी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
पर्वती, खडकवासला, वडगावशेरीत बदल नाही
भाजपच्या नूतन शहराध्यक्षा माधुरी मिसाळ या दोनदा आमदार असून, त्यांना पर्वतीमधून तिसऱ्यांना उमेदवारी मिळण्यात फारशी अडचण नाही. वडगाव शेरीचे आमदार जगदीश मुळीक यांच्यावर मुख्यमंत्र्यांची असलेली मर्जी आणि तेथे पक्षांतर्गत फारसे स्पर्धक नसल्याने त्या मतदारसंघात बदलाची शक्यता नाही. तीच परिस्थिती खडकवासल्यात आहे. आमदार भीमराव तापकीर हेही दोनदा आमदार असले, तरी पक्षांत त्यांना स्पर्धक नसल्यामुळे, तेथेही तापकीर यांना पुन्हा संधी मिळेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुण्यावर असलेले लक्ष, तसेच जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शहरात वाढलेला वावर यांमुळे पुण्यातील सर्व जागांचा थेट रिपोर्ट त्यांच्याकडे आहे. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनेच महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका होत आहेत. विधानसभेचे उमेदवारही त्यांच्याच म्हणण्यानुसार ठरणार असल्यामुळे, पुण्यातील काही मतदारसंघांत बदल घडणार असल्याची कार्यकर्त्यांत चर्चा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.