keshavsut esakal
सप्तरंग

अमृता ते ही पैजा जिंके!

सकाळ डिजिटल टीम

लेखक : डॉ. नीरज देव

कवी तो होता कसा आननी?

आधुनिक मराठी काव्यवाटिकेतील अग्रदूत म्हणून कृष्णाजी केशव दामले अर्थात केशवसुतांचे (१८६६-१९०५) नाव आदराने घेतले जाते. आपल्याकडे कवीच्या, लेखकाच्या इतकेच कशाला कोणाही वीरपुरुषाविषयीच्या चरित्राविषयी जी उदासीनता आढळते त्याला केशवसुत अपवाद नाहीत. त्यांच्या जन्मतिथीविषयीचा घोळ अद्याप मिटलेला नाही.

केशवसुतांना लहानपणापासून एकटे बसण्याची, एकटेच फिरण्याची आवड होती. ते एककल्ली, मुग्ध, एकलकोंडे आणि वरवर पाहणाऱ्यास तरी मुखदुर्बळ भासत. वयाच्या २० व्या वर्षी ते न्यू इंग्लिश स्कूल, पुणे येथे शिकत असताना, बहुधा त्यांच्या संस्कृत शिक्षक आपटेंनी त्यांस वर्गात सर्वांसमोर ‘तुम्ही दुर्मुखलेले का असता?’ असे विचारले. त्या काळी शिक्षकांनी असे विशेषण वापरणे फारसे नवलाईचे नव्हते. उलट शिक्षकांना वाटेल तसे बोलण्याचा, झालेच तर चौदावे रत्न दाखविण्याचाही अधिकार होता. पण मानी केशवसुतांना ते बोल मनाला लागले. कदाचित असेच बोल त्यांना वारंवार ऐकावे लागत असतील व तेच शिक्षकानेही काढले म्हणूनही असेल ते खूप खोलवर रुतले असावे. मूलतः अंतर्मुखी असलेल्या केशवसुतांनी त्याचे प्रत्त्युत्तर गुरुजींना दिले नाही. मात्र मनात सलणारी ही व्यथा १८८६ मध्ये काव्यबद्ध केली व ‘दुर्मुखलेला’ याच शीर्षकाखाली ती ३ जानेवारी १८९१ च्या मनोरंजनातून प्रसिद्धवली. कवितेच्या प्रारंभीच ते पुसतात,

माझे शुष्क खरेच हे मुख गुरो! आहे, तया पाहुनी

जाती प्रेक्षक सर्वही विरस ते चित्तामधी होउनी;

हे सर्वा उघडे असूनि वदुनी का ते तुम्ही दाविले?

तेणे भूषण कोणते मग तुम्हा संप्राप्त ते जाहले?

‘माझा शुष्क चेहरा पाहून पाहणाऱ्याचा विरस होतो ही गोष्ट खरीच आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. मग मला सांगा, गुरुजी तीच सर्वांसमोर बोलून तुम्हाला काय मोठेपण मिळाले?’ हे गात असतानाच त्यांच्या गुरूला उद्देशून ते म्हणतात,

याचे तोंड कुरुप हे विधिवशात गाईल काव्ये नवी

तेणे सर्वहि डोलतील जन हे हर्षे कदाचित् भुवि!

उलट ‘याचे कुरुप तोंड दैवयोगाने नवी काव्ये गाईल व ती ऐकताना लोक हर्षभरित होऊन कौतुकाने माना डोलवितील’ असा विचार तुम्हाला यायला हवा होता हे सांगताना रागाने ते ‘विद्यासंस्कृत मस्तिष्कतंतूवरी’ असा शब्दप्रयोग करीत गुरूला एकेरी विशेषण वापरतात. इतकेच नाही तर ‘आज मुंग्यांच्या रूपात दिसणारे प्राणी, पक्षी बनून आकाशी उडतील वा राखेची ढेपळे पेट घेऊन जगाला भस्मसात करतील. याच्या दुर्मुखातून सरसवाङ्निष्यंद चालणार आहे. असे तूं म्हणायला हवे होते,’ असेही सुचवितात. केशवसुत त्या वेळी शालेय विद्यार्थी होते त्या वेळी त्यांच्या मनात या आघाताने काय विचार चालले असतील याची स्पष्ट कल्पना प्रस्तुत कवितेतून येते. एका मानी तरुणाच्या विदग्ध मनावर अपमानाने उठणारे हे तरंग होते. याच अपमानाने क्षुब्ध होऊन ते गातात,

तुम्ही नाहि तरी सुतादि तुमचे धातील तो प्राशुनी!

कोणीही पुसणार नाहि, कवि तो होता कसा आननी?

कदाचित माझ्या काव्याची महती तुम्हाला कळणार नाही, ती तुमच्या पुत्रपौत्रांना कळेल. माझी काव्ये ते आळवून आळवून गातील. पण त्यांपैकी कोणीही पुसणार नाही की हा कवी दिसायला कसा होता. मला वाटते केवळ शिक्षकच नव्हे तर साऱ्याकडून मिळणारे दुर्मुखलेला हे विशेषण त्यांनाही कोठेतरी खरे वाटत असावे. म्हणूनच संपूर्ण आयुष्यात त्यांनी केवळ एकदाच फोटो काढू दिला व तोही शाळेच्या एका कार्यक्रमांत एकत्रित स्वरूपात. आता तोही हरविल्याने हा कविराज ‘होता कसा आननी’ अर्थात दिसायला कसा होता हे कळण्यासाठी त्याचा फोटो उपलब्ध नाही. मात्र द. वें. केतकर व सुंदरराव वैद्य यांच्या स्मृतीतून रेखाटलेली दोन चित्रे उपलब्ध

आहेत. तीही केशवसुतांच्या निधनानंतर सुमारे पन्नास वर्षांनी रेखाटलेली व परस्परांत ताळमेळ नसलेली. आज केशवसुतांचे उपलब्ध असलेले छायाचित्र अरविंद मासिकाच्या पाचव्या अंकात रेखाटलेले सापडते.

रसिका, ‘आपण दिसायला चांगले नाही आहोत’ हा भाव मनात ठसल्यावर आपल्या मुखाचे वेगळेपण जगात राहावे, असे मानसशास्त्रीयदृष्ट्या वाटत राहते. त्याला मनाचे संरक्षण तंत्र (Defense Mechanisms) म्हणतात. बुटकेपणाची बोच मनात असल्याने नेपोलियनला व लेनिनला आपण खूप उंच व्हावे असे वाटे. त्यामुळे ते खूप उंचीवर पोचले, असे मानसशास्त्रज्ञ सांगतात. याबाबत एक गमतीदार कथा सांगितली जाते. एकदा नेपोलियनला उंचावरून काही सामान काढावयाचे होते. त्याचा हात तेथे पोचत नव्हता. हे पाहून जवळ असलेला एक सैनिक त्याला म्हणाला, ‘मी तुमच्यापेक्षा उंच आहे, मी काढून देतो.’ तेव्हा त्याला नेपोलियन चटकन म्हणाला, ‘उंच (Highted) नाही लांब (टॉल) म्हण, उंची फक्त नेपोलियनला आहे.’ मला वाटते नेपोलियनच्या ठायी काम करणाऱ्या संरक्षण यंत्रणेसारखीच एखादी संरक्षण यंत्रणा केशवसुतांबाबत या प्रसंगी काम करीत असावी. त्यामुळेच त्यांनी स्वतःच्या दुर्मुखलेल्या मुखाला मधुरतम करून ठेवले. आज त्यांचे पार्थिव चित्र जरी उपलब्ध नसले तरी त्याच्या काव्यप्रतिभेची झेप दाखविणाऱ्या कविता मात्र अद्यापही डौलात उभ्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Halwai Ganpati : पुण्यात 'दगडूशेठ गणपती'च्या दर्शनासाठी अभूतपूर्व गर्दी, रात्री २ वाजताचे दृश्य पाहून उडेल झोप, पाहा VIDEO

Team India Fitness Test: गिल, सिराजसह रोहित शर्माचीही फिटनेस टेस्ट; विराटची चाचणी कधी?

Gokul Dudh Sangh Inquiry : गोकुळ दूध संघाच्या चौकशीवर कार्यकारी संचालकांची प्रतिक्रिया म्हणाले...

Nagpur News:'राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरातच नवे परीक्षा भवन'; राज्य सरकारला प्रस्ताव सादर

OBC Federation Aggressive:'ओबीसी महासंघ आक्रमक, साखळी उपोषण सुरू'; अन्यथा मुंबईत धडकणार, मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध

SCROLL FOR NEXT