cyber crime fraud parcel e commerce digital payment  Sakal
सप्तरंग

लाट पार्सल घोटाळ्यांची...

जगभरात जसा ई-कॉमर्सचा व्यवसाय वाढू लागला, तसं घोटाळ्यांचं स्वरूप बदलत गेलं. ई-कॉमर्सची सवय लागत गेली तशी डिजिटल पेमेन्टचे नवीन प्रकार उदयाला आले

सकाळ वृत्तसेवा

- अपूर्वा जोशी|मयूर जोशी

जगभरात जसा ई-कॉमर्सचा व्यवसाय वाढू लागला, तसं घोटाळ्यांचं स्वरूप बदलत गेलं. ई-कॉमर्सची सवय लागत गेली तशी डिजिटल पेमेन्टचे नवीन प्रकार उदयाला आले, पहिल्यांदा केवळ क्रेडिट कार्ड्सद्वारे पैसे भरता येत असत मग डेबिट कार्ड आलं, नेट बँकिंग आलं, यूपीआय आलं आणि आता तर किराणा सामान पण हप्त्यानं विकत घेता येतं.

त्यामुळंच असेल कदाचित सर्वांत पहिले घोटाळेबाजांनी पैसे भरण्याच्या साधनांवर हल्लाबोल केला, भारतात क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि नेट बँकिंग घोटाळ्यांची जणू लाटच आली. आता हे काय कमी होतं की काय म्हणून आता पार्सल घोटाळे तोंड वर काढू लागले आहेत.

विजयला परवाच एक फोन आला, तुम्ही अमेझॉनवरून मागवलेलं पार्सल कस्टम्सनं अडवून ठेवलंय. साडेसात हजार रुपयांचा दंड भरला तरच पार्सल सोडू म्हणत आहेत, काय करू बोला ? विजयनं जर पार्सल मागवलंच नसतं, तर त्यानं या कॉल करणाऱ्याला धुडकावून लावलं असतं,

पण विजयनं त्याच्या मुलींसाठी एल्सा नावाची बाहुली परदेशातून मागवलेली, वाढदिवसाला ही बाहुली मुलीला देऊन सरप्राइझ करायचा प्लॅन होता त्याचा, आता साडेसात हजारांची मागणी झाल्याने गणित फिसकटेल की काय अशी चिन्ह दिसायला लागलेली.

पण मुलीच्या आनंदासमोर सगळं काही गौण असतं त्यामुळे त्यानं कस्टम्स ड्युटी भरायची ठरवली आणि भरणा करण्यासाठी बँकेचा खातेक्रमांक, आयएफसी, खातेदाराचं नाव आदी माहिती मागवून घेतली. समोरून बँकेचे डिटेल्स आले ते कोणा आनंदकुमार नावाच्या माणसाचे, आयएफएससी तपासला तर ते खाते होते छपरा नावाच्या गावातले.

आता मात्र विजय चपापला, माल मुंबई कस्टम्समध्ये अडकला असेल तर पैसे आनंदकुमार कसे काय मागत आहे? ते तर कस्टम्सने किंवा भारत सरकारने मागवायला पाहिजेत आणि समजा आनंदकुमार कस्टम्स अधिकारी असेल तरी पण छपरा नावाच्या गावातल्या बँकेत तो पैसे का मागवेल ?

विजयने त्वरित अमेझॉनच्या कस्टमर केयरला फोन केला तेव्हा त्याला सगळं प्रकरण स्वच्छ कळले. अमेझॉनचे पार्सल त्याच्या ठरलेल्या वेळेला पोचणार होतं आणि कस्टम्स ड्युटी भरायची जबाबदारी अमेझॉनची होती. विजय पार्सल घोटाळ्याची शिकार होता होता वाचला होता.

पार्सल घोटाळ्याच्या प्रकारांमध्ये जेव्हा व्यक्ती कॉलवरती विचारलेले तपशील सांगते त्याच्या पुढची पायरी म्हणून, पोलिस किंवा कस्टम अधिकाऱ्यांची तोतयागिरी करणाऱ्या व्यक्तींकडून कॉल येऊ लागतात. काही वेळा, फोन करणारी ही माणसं पोलिस ठाण्यासारख्या दिसणाऱ्या पार्श्वभूमीवर पोलिस अधिकाऱ्यांच्या पोशाखात व्हिडिओ कॉल करतात; हे पटवून देण्यासाठी की आता हे प्रकरण पोलिसांना कळलंय आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी आता पैसे द्यावे लागतील.

सीमाशुल्काद्वारे देशाबाहेरचे शिपमेंट ताब्यात घेतल्याची तुम्हाला माहिती मिळाल्यास, अधिकृत समन्सची विनंती करा आणि पैसं भरणं टाळा. डिलिव्हरी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा नुकत्याच झालेल्या मेल/मेसेज वरून मिळालेली संपर्क माहिती वापरून थेट डिलिव्हरी कंपनीशी संपर्क साधा.

ई-कॉमर्स जितक्या झपाट्यानं वाढत आहे, तितक्याच झपाट्यानं वाढत आहेत त्याच्याशी संबंधित घोटाळे. तंत्रज्ञानाला कोणत्याही भौगोलिक सीमा नाहीत त्यामुळे उत्तर कोरिया, इराण किंवा चीनसारख्या देशातील चोरटे सर्रासपणे खोट्या वेबसाइट स्थापन करून भारतातल्या ग्राहकांना फसवतात.

ब्रिटननं केलेल्या अभ्यासात त्यांना असे आढळून आले, की चिनी भामट्यांनी २०१५ पासून ७६ हजार संकेतस्थळांचे जाळे विणले आहे, ज्यावर पैसे तर व्यवस्थित स्वीकारले जातात पण वस्तू ग्राहकापर्यंत पोचत नाहीत किंवा पोचल्या तर त्या निकृष्ट असतात आणि त्यातच आता तरुणाईला इंस्टाग्रामचा विळखा पडल्याने अनेक भुरटे या तरुणाईला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी आपले दुकान इंस्टाग्रामवरच थाटतात.

अनेक दुकानांवर तर कस्टमर केयर नंबर नसतात, ई-मेल नसतात, मालकांची नावं नसतात आणि अशा परिस्थितीत पैसे हातात आले की ही दुकानं गायब होतात आणि दुसऱ्या नावाने मार्गक्रमण चालू करतात.

ई-कॉमर्स घोटाळ्यांची अप्रत्यक्ष झळ बँकिंग क्षेत्राला बसत आहे. रिझर्व्ह बँकेच्या या वर्षीच्या वार्षिक अहवालात त्याचे पडसाद दिसून आले, या अहवालानुसार गेल्या दोन वर्षांत घोटाळ्यांची रक्कम कमी झाली असली,

तरी एकूण प्रकरणात चिंताजनक वाढ झालेली दिसते, या अहवालानुसार डिजिटल घोटाळ्यांच्या एकूण प्रकरणात दोन वर्षांत तब्बल ७०० टक्के वाढ दिसून आली, पण बँकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आयबीएच्या मते ही बँकिंग क्षेत्रासाठी त्रासदायक गोष्ट नाही कारण हे घोटाळे बँकिंग व्यवस्थेच्या बाहेर घडले आहेत आणि बहुतांशी ते खरे देखील आहे.

बोगस ई-कॉमर्स कंपनीला क्रेडिट कार्डची माहिती दिल्यावर त्याचा दुरुपयोग होऊन घोटाळे घडतात, ते बँकेच्या कार्यक्षेत्रात येत नाहीत पण अशा घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी गरज आहे ती प्रशिक्षण आणि व्यापक स्वरुपाच्या जनजागृतीची. आज बँकांत आर्थिक घोटाळ्यात शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेला कर्मचारी वर्ग आहे जो केवळ घोटाळे घडू नयेत म्हणून काय करता येईल यावर खल करत असतो.

अशाच मनुष्यबळाची गरज ई-कॉमर्स क्षेत्राला पण भासायला लागली आहे. भारतात ‘सर्टिफाइड ई-कॉमर्स फ्रॉड स्पेशालिस्ट’ हा मान्यताप्राप्त आणि प्रचलित कोर्स आहे. कोणत्या प्रकारचे घोटाळे या क्षेत्रात घडतात, ते कसे थांबवायचे,

घोटाळे झाल्यावर काय उपाययोजना करायच्या यावर प्रशिक्षण दिले जाते आणि प्रशिक्षणाच्या शेवटी परीक्षा घेतली जाते. ७५ टक्के मार्क मिळाले तरच प्रमाणपत्र बहाल केले जाते. सध्या बँकेच्या तुलनेत या प्रशिक्षित लोकांची संख्या अगदीच नगण्य आहे पण ई-कॉमर्स क्षेत्राचा होणारा विस्तार पाहता अशा प्रशिक्षित मंडळींना सुगीचे दिवस येतील, हे नक्की.

(लेखिका ह्या सर्टिफाइड अँटीमनी लॉंडरिंगविषयक तज्ज्ञ आणि सर्टिफाइड बॅंक फॉरेन्सिक अकाउन्टंन्ट आहेत, तर लेखक हे चार्टर्ड अकाउन्टंट आणि सर्टिफाइड फॉरेन्सिक अकाउंटिंग तज्ज्ञ आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siddhanath Temple : आटपाडीत सिद्धनाथ मंदिराच्या गाभाऱ्यातील २४ किलो चांदी गायब, दुरुस्तीच्या नावाखाली धक्कादायक प्रकार

Bribery Action: साेलापुरात महावितरणचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात; ऑनलाइन मंजुरीसाठी मागितले तीन हजार, जिल्ह्यात खळबळ!

कोर्टाच्या दणक्यानंतर धाबे दणाणले, शिंदेंसह अजितदादांचे पदाधिकारीही पोलिसांसमोर शरण; १३ जणांना अटक

Pune News: ४५ मिनिटांचा प्रवास आता ७ मिनिटांत! खंबाटकीच्या बोगद्याने प्रवासाला गती; जूनपासून वाहतूक सुरू होणार..

Nalasopara Crime : डोकं वरवंट्यानं ठेचलं, आईनेच १५ वर्षांच्या लेकीला संपवलं; काय घडलं?

SCROLL FOR NEXT