Cyber Crime sakal
सप्तरंग

‘डिजिटल अरेस्ट’चे चक्रव्यूह

अलीकडच्या काही दिवसांमध्ये ‘डिजिटल अरेस्ट’ हा शब्द बऱ्याचदा कानावर पडत आहे. सायबर गुन्हेगारीचा हा नवा प्रकार मागील वर्षभरात फोफावत चालला आहे.

ऋषिराज तायडे

अलीकडच्या काही दिवसांमध्ये ‘डिजिटल अरेस्ट’ हा शब्द बऱ्याचदा कानावर पडत आहे. सायबर गुन्हेगारीचा हा नवा प्रकार मागील वर्षभरात फोफावत चालला आहे. विशेष म्हणजे, या गैरप्रकारात बळी पडणारे बहुतांश पीडित हे उच्चशिक्षित असल्याचेही समोर आले आहे. नेमका हा प्रकार काय आहे, त्यामागे मोडस ऑपरेंडी कशी चालते, याचा आढावा...

एखाद्या व्यक्तीने गुन्हा केल्यास, पोलिसांकडून त्याच्यावर कारवाई केली जाते, प्रसंगी अटकही केली जाते. कित्येक दिवस कोठडीत डांबूनही ठेवले जाते, परंतु कोणताही गुन्हा न करता किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी नसतानाही आता तुम्हाला अटक होऊ शकते. तेही तुम्हाला पोलिस ठाण्यात न नेता अगदी तुमच्या घरातच.

आता तुम्ही म्हणाल, ही काय भानगड आहे? आणि त्यापलीकडील धक्कादायक बाब म्हणजे तुम्हाला गुन्हेगार ठरवून तुम्हालाच तुमच्याच घरात अटक करणारे पोलिस वा सीबीआय अधिकारी असल्याचे सांगतात; मात्र प्रत्यक्षात ती टेक्नोसॅव्ही गुन्हेगारांची टोळी असते. सायबर गुन्हेगारी विश्वात फोफावणाऱ्या वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अलीकडच्या काळात आता आणखी एका गुन्हेगारीच्या प्रकाराची भर पडली आहे. ती म्हणजे ‘डिजिटल अरेस्ट’.

नुकतेच विलेपार्ले येथील महिलेला एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. आम्ही पोलिस ठाण्यातून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावर सुमारे १७ गुन्हे दाखल असून त्याबाबत तुमची व्हिडिओ कॉलद्वारे चौकशी करायची असल्याचे सांगण्यात आले. पाच मिनिटांनी सदर महिलेला दुसऱ्या एका क्रमांकावरून व्हिडिओ कॉल आला. अगदी पोलिस ठाण्याचा सेटअप तयार करून हुबेहूब पोलिसांच्या वेशात महिलेशी संवाद साधायला सुरुवात केली. घाबरण्याची काहीही गरज नाही, फक्त आमच्या प्रश्नांची उत्तरे द्या, आम्ही सांगतो तसे करा, म्हणत महिलेची व्हिडिओ कॉलवर चौकशी सुरू झाली.

थोड्यावेळाने चौकशीदरम्यान, कुणालाही कॉल न करण्याचा वा सोशल मीडियाचा वापर न करण्याचा सज्जड दमही भरला, तसेच जागेवरून उठल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे सांगत २४ तास एकाच जागेवर बसून ठेवले. व्हिडिओ कॉल बंद केल्यास वा अन्यत्र कॉल केल्यास संपूर्ण कुटुंबाला अटक करण्याचाही इशारा दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी समोरील व्यक्तींनी उर्वरित तपास पूर्ण करण्यासाठी काही रक्कम डिपॉझिट म्हणून भरा. नंतर ते परत करण्यात येईल, असे सांगितले.

त्यानुसार महिलेने एक लाख रुपये दिले; परंतु समोरील व्यक्तींनी आणखी पैशांची मागणी केली. माझ्याकडे आता पैसे नसल्याचे सांगत महिलेने असमर्थता दर्शविली. त्यावर समोरील व्यक्तींनी तुमच्या मुलीचा मोबाईल नंबर मागत तिला कॉल केला आणि तिला उर्वरित रक्कम भरण्यास सांगितले, परंतु सदर प्रकार हा फसवणुकीचा आहे, असे लक्षात आल्यावर ती तातडीने घरी आली. आपल्या आईची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने सायबर पोलिसांचा हेल्पलाइन क्रमांक १९३० वर, तसेच नजीकच्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

काही दिवसांपूर्वी नोएड्यातही अशीच एक घटना घडली. एका आयटी इंजिनिअर महिलेला एक कॉल आला आणि कस्टम अधिकारी असल्याची बतावणी करण्यात आली. विमानतळावर तुमच्या नावाचे पार्सल आले आहे आणि त्यात ड्रग्ज आणि अन्य आक्षेपार्ह साहित्य असल्याचे सांगण्यात आले. महिलेचा विश्वास बसावा, म्हणून तिला तिचा पत्ता व अन्य माहिती सांगण्यात आली. ड्रग्ज सापडल्याने तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत असून त्यात तुम्हाला अटकही होऊ शकते, अशी भीती दाखविण्यात आली.

ही बाब ऐकल्यावर घाबरलेल्या महिलेने त्या पार्सलशी माझा काहीही संबंध नाही, मला यातून सोडवा, अशी गयावया केली. काही वेळाने पुढील व्यक्तीने चौकशीसाठी झूमवर व्हिडिओ कॉल अटेंड करण्यास सांगितले. खरोखरीच कस्टम अधिकारी असल्याचे भासविण्यासाठी समोरील व्यक्तींनी कस्टम विभागाचा सेटअप, अधिकाऱ्यांची उपस्थिती आदी सर्व तयारी केली होती. अगदी त्यांच्याप्रमाणे चौकशीही सुरू केली.

सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास ही चौकशी सुरू झाली. अनेक प्रश्नांची उत्तरे विचारत तिला जवळपास ७ तास एकाच जागी बसवून ठेवण्यात आले. जागेवरून उठल्यास नको ते परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही देण्यात आली. चौकशीच्या नावाखाली, तिच्याकडून बँक खात्याची माहिती काढली आणि त्यातून जवळपास ३.७० लाख रुपये उकळण्यात आले. पैशासाठी तिला सकाळी साडेदहा ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकाच जागेवर बसवून ठेवत, धमकावण्यात आले. पैसै मिळाल्यावर कुठे तिची सुटका करण्यात आली, परंतु आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तिने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली.

दिल्लीत घडलेली डिजिटल अरेस्टची घटना तर अंगावर शहारे आणणारी होती. एका श्रीमंत घराण्यातील मुलीलाही क्राइम ब्रान्चमधून बोलत असल्याचे सांगत कॉल आला आणि तुमच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाल्याचे सांगण्यात आले. चौकशीच्या नावाखाली अनेक दिवस कित्येक तास तिला व्हिडिओ कॉलसमोर बसवून ठेवले जात होते. या प्रकाराची वाच्यता केल्यास कुटुंबाचे बरेवाईट केले जाईल, अशी धमकी देण्यात आली. या प्रकरणातून सुटका करून घेण्यासाठी तिच्याकडून अनेकदा पैसेही उकळण्यात आले, परंतु चौकशीचा ससेमिरा आणि पैशांची मागणी थांबत नसल्याने आणि कुटुंबीयांच्या भीतीने सदर मुलीने आत्महत्या केली.

मागील वर्षभरात ‘डिजिटल अरेस्ट’च्या घटनांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. त्यातून कुणाचे दोन लाख, कुणाचे ६० लाख, कुणाची दोन कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. अशाच प्रकारच्या घटनांबाबत सायबर सेलच्या हेल्पलाइनवर आलेल्या तक्रारीनुसार, ‘डिजिटल अरेस्ट’च्या एका प्रकरणात मुंबई पोलिसांनी अवघ्या २४ तासांमध्ये एक कोटींहून अधिक रक्कम हस्तगत केली, तसेच २०२४ मध्ये वेगवेगळ्या सायबर गुन्ह्यांमध्ये पोलिसांना नागरिकांचे ११४ कोटी रुपये वाचविण्यात यश आले.

...हा तर फसवणुकीचा प्रकार

दरम्यान, ‘डिजिटल अरेस्ट’च्या वाढत्या घटना लक्षात घेता, भारतीय सायबर गुन्हे समन्वयन केंद्राने (आयसीसीसीसी) नुकतेच याबाबत सूचनावली जारी केली. पोलिस, कस्टम, सीबीआय, ईडी, एनआयएकडून कधीही व्हिडिओ कॉलद्वारे अटक केली जात नाही. अशाप्रकारे कुणीही ''डिजिटल अरेस्ट'' करण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो एक प्रकारे सायबर गुन्हेगारी वा आर्थिक गैरप्रकार घोटाळा आहे. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आलेल्या अशा धमक्यांना न घाबरता, सतर्क राहण्याचे आवाहन ‘आयसीसीसीसी’ने केले आहे.

‘डिजिटल अरेस्ट’मध्ये काय होते?

सायबर गुन्हेगारांकडून पोलिस, कस्टम, ईडी, सीबीआय आदी वेगवेगळ्या सरकारी कार्यालयातून बोलत असल्याचे सांगितले जाते. तुमच्याकडून सीम कार्डचा गैरवापर, पार्सलमध्ये ड्रग्ज सापडणे, आर्थिक गैरव्यवहार, देशविघातक कृत्य सांगत चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे सांगतात. त्यासाठी प्रत्यक्ष पोलिस ठाण्यात किंवा आमच्या कार्यालयात येण्याची आवश्यकता नसून, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तुमची विचारपूस केली जाईल, असे सांगतात.

त्यानुसार एका खोलीत व्हिडिओ कॉलसमोर कित्येक तास बसवून चौकशीच्या नावाखाली पीडितांना वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या देत मानसिक त्रास दिला जातो. एवढेच नव्हे, तर सोशल मीडिया, वैयक्तिक माहितीसह बँक खात्याची माहिती घेतली जाते. प्रसंगी तुमचे सर्व सोशल मीडिया अकाऊंट ब्लॉक केले जातात किंवा त्यावर बदनामी करणाऱ्या पोस्ट केल्या जातात, तसेच तुमच्या बँकेतून परस्पर रक्कम हस्तांतरित केली जाते किंवा ती एखाद्या खात्यावर वळती करण्यास भाग पाडले जाते.

कसे वाचणार या चक्रव्यूहातून?

‘आयसीसीसीसी’ने जारी केलेल्या सूचनावलीनुसार, कोणतीही तपास यंत्रणा सोशल मीडिया वा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संपर्क साधत नाही किंवा त्यासाठी पैसे व माहिती विचारत नाही. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला फोनवरून वा व्हिडिओ कॉलवरून बँक डिटेल्स, पासवर्ड सांगू नका.अनेकदा तुमच्या प्रियजनांसोबत इमर्जन्सी घटना घडल्याची बतावणी करतात.

अशावेळी न घाबरता, शांत राहून खात्री केल्याशिवाय कोणतेही पाऊल उचलू नका, तसेच कोणत्याही प्रकारे तुम्हाला धमकावण्याचा प्रयत्न केल्यास लगेच कॉल बंद करा आणि तातडीने नजीकच्या पोलिस ठाण्यात तक्रार करा किंवा सायबर सेलच्या हेल्पलाइन नंबर १९३० वर किंवा www.cybercrime.gov.in या वेबसाइटवर संपर्क साधावा. जाता जाता महत्त्वाचे म्हणजे, सायबर गुन्हेगारीबाबत नेहमी सतर्क राहा, सोशल मीडियाचा वापर करताना योग्य ती काळजी घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT