Marathi Poet Shrinivas Arvind Bobade esakal
सप्तरंग

कुंठीत कविमनाची सरस्वतीला साद : माझें मी जाणें!

- डॉ. नीरज देव

श्रीनिवास अरविंद बोबडे (१८८९-१९३४) हे विदर्भातील तत्कालीन चांदा नि आताच्या चंद्रपूर येथे जन्मलेले एक प्रतिभासंपन्न पण तितकेच प्रसिद्धिपराङ्‍मुख कवी होत. कवी व कवीचे पूर्ण घराणेच विधिज्ञाचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कवीचे वडील चंद्रपुरात वकिली व्यवसाय करीत, स्वतः कवी नागपुरात वकिली करत. कवीचे पुत्र नि नातूदेखील वकिली व्यवसायात आहेत. कवीचा एक नातू तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश आहे.

न्या. शरद बोबडे यांचे नाव तर वाचकांना ठाऊकच असेल, तेच कवीचे नातू आहेत. वकिली व्यवसाय करतानाही कवीची तरल वृत्ती बोथटली नाही तर १९१५ ते १९२५ अशी सुमारे दहा वर्षे अव्याहत काव्यरूपातून बरसत राहिली. वागीश्वरी मासिकाचे ते संपादक सदस्यही होते. वयाच्या ४५ व्या वर्षी कवीचे देहावसान झाले. कवीच्या निधनानंतर तीन वर्षांनी कवीचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. कवीवर भ. श्री. पंडितांचा साक्षेपी लेख सत्यकथेच्या जुलै १९४८ च्या अंकात प्रकाशित झाला होता. तो वगळता बहुतांशी कवी प्रसिद्धीपासून वंचितच राहिला. (Dr Neeraj Deo Saptarang Marathi article on Marathi poet shriniwas arvind bobade poetry nashik news)

कवीच्या कविता अत्यंत रसाळ, सरळ नि प्रासादिक आहेत. त्यातील ‘माझें मी जाणें’ ही कविता सुंदरच नाही तर भाबड्या नि व्याकूळ कविमनाची प्रामाणिक साक्ष देणारी म्हणावी लागेल. सामान्यतः कवी आपल्या काव्यशक्तीचे बखान करत असतो, तिला सरस्वतीची कृपा समजत असतो, असे आपल्या पाहण्यात येते. पण या कवितेत आपली काव्यशक्ती अपुरीच नव्हे तर भेसूर असल्याची कबुली देत कवी सांगतो,

प्रसाद नाहीं सरस्वतीचा माझें मी जाणें।
फुटकया वीणेवरचें बेसुर भेसुर हें गाणें।।

माझे गाणे हे सरस्वतीचा प्रसाद नाही याची मला जाणीव असून, ते फुटक्या वीणेवरचे बेसूर नि भेसूर गाणे आहे. स्वतःचे गाणे बेसूर म्हणजे सूरतालहीन नि भेसूर म्हणजे कर्णकर्कश असे सांगताना कवी किती धाडस दाखवितोय हे वेगळे सांगण्याची गरज नसावी. प्रसिद्धी नि किती नसताना त्यावर राग व्यक्त करण्यापेक्षा, कवी आपल्या काव्यातच काही कमी असावे असा आत्मशोधक भाव बाळगताना दिसतो. याचे मुख्य कारण कवीची कविता प्रजारंजनासाठी नसून स्वांतः सुखाय आहे. आपला हा भाव व्यक्तविताना कवी आत्मनिवेदन कवितेत पुसतो-

कशास ‘कवि’ हे अभिधान। कशास ‘कविचा’ सन्मान।।
नलिनीवनीचा मी भृंग। स्वतःच गाऊनिया दंग।
स्वानंदानें। गावें गाणें
कशास निंदा स्तुति चिंता। माझे गाणे मजकरिता।

ज्या अर्थी माझे गाणे मजकरिता असते, त्या अर्थी त्याची उंची आपोआपच वाढत जाते. ही उंची गाठताना कळत न कळत कवीला स्वतःच समीक्षक होऊन स्वतःच्या काव्याची समीक्षा करावी लागते. ती करत असतानाच त्यातील त्याला स्वतःला सलणारे न्यून पाहून ‘माझे मी जाणें’ची स्वीकारोक्ती तो देऊ लागतो.

तो सांगतो, ‘मी कवित्व नसताना काव्य करत बसलो, काव्य घडवावे नाही निपजावे लागते. त्यासाठी देवी सरस्वतीने अलंकार पाठवावे लागतात. तिने ते धाडून दिलेले नसताना मी मात्र गणमात्रांचा मेळ बसवीत बसलो अन् कोऱ्यावर काळे करत बसलो.’ मजेदार बाब म्हणजे माझ्यात काव्यप्रतिभा नाही म्हणता म्हणता, कवी नकळत येथे स्वतःची काव्यप्रतिभा स्वीकारतो.

कारण तो पांढऱ्यावर काळे म्हणत नाही तर कोऱ्यावर काळे म्हणतो. कोऱ्यावर कोणताही रंग भरणे ही प्रतिभाच असते. बरे हा रंग भरताना तो ज्या पंक्ती वापरतो त्याही सरस नि रसदार असून, त्याच्या प्रतिभासंपन्नतेची साक्ष देणाऱ्या आहेत.

सरस मधुर जर हृदयच नाही कोठुनि मग गाणें।
मोत्यांच्या शिंपल्यात होती मोत्यांचे दाणे।।

रसिका! यातील ‘मोत्यांच्या शिंपल्यात होती मोत्यांचे दाणे’ या ओळी प्रतिभासंपन्नतेशिवाय आणखी काय दाखवितात? पण मुळात कवीच स्वतःच्या प्रतिभेवर संतुष्ट नाही. त्यामुळेच त्याच्या निर्मळ मनाला वाटते, की श्रीशारदेने या जन्मी प्रसाद दिला नाही. मात्र पुढील जन्मी तरी प्रसन्न होऊन तिने प्रसाद द्यायला हवा.

इतकेच नाही तर जन्मोजन्मी तिने त्याजवर प्रसन्न व्हायला हवे म्हणून हे गीत तो गातो आहे. गाता गाता पुन्हा पूर्वपदावर येत तो म्हणतो,

हृदयाच्या गीतावर झुलतो स्फूर्तीचा पाळणा । -रिकामा (स्फूर्तीचा पाळणा।)
प्रसाद घेउनि ये ये देवी। माझ्या संकीर्तना।।

खरोखर जेव्हा एखादा काव्यवेडा तल्लीन होऊन स्वानंदात रममाण होतो, तेव्हा कितीही गायिले तरी त्याचे मन तृप्त होत नाही. श्रीशारदेची; काव्यदेवीची आळवणी करताना स्फूर्तीने ओतप्रोत भरलेला त्याचा पाळणा; त्याला रिकामाच भासतो. हा त्याचा भाव नकारात्मक दृष्टी दाखवीत नाही, अतृप्ती प्रकट करत नाही तर पूर्णत्वाची आंसच प्रकटवीत असतो.

ही कविता रसिकासाठी नसून आत्मप्रतिती व्यक्तविताना अडचणीत सापडलेल्या प्रतिभासंपन्न पण कुंठीत अवस्था होणाऱ्या कवींसाठी मार्गदर्शक आहे. ही अनुभूती केवळ कवी बोबडेच व्यक्तवितात असे नव्हे तर केशवसुतसुद्धा व्यक्तविताना सापडतात. केशवसुत ज्या वेळी अशा स्वानंद मनःस्थितीत जातात, सरस्वतीचे ते उर्जस्वल रूप पाहतात नि ते हातात गवसत नाही हे ध्यानात येते त्या वेळी हळहळून म्हणतात,

हा हा हे जर सर्व भास धरता येतील मातें तर
पृथ्वीचा सुरलोक की बनवुनि टाकीन मी सत्वर


केशवसुतांच्या या पंक्तीतील भाव बघता, त्यातील क्लिष्टता अलगद वगळत, अलंकारादी आवरणं झुगारत, कवी सहजतेने तोच भाव प्रस्तुत काव्यात प्रकटत जातो, हे चटकन ध्यानी येते. त्यामुळेच कवीची ही कविता त्याच्या काव्यप्रतिभेची साक्ष द्यायला पुरेशी आहे, असे निश्चितीने म्हणता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : दक्षिण मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची बैठक सुरु, अडचणींवर व नियोजनाबाबत होणार चर्चा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

८ चेंडूंत ६ विकेट्स.. पाच त्रिफळाचीत ! Kishor Kumar Sadhak ने इंग्लंडमध्ये सलग दोन षटकांत घेतल्या दोन Hat-Tricks

Parenting tips: पेराल ते उगवेल, आई वडिलांकडून अशा प्रकारे सवयी शिकतात मुलं

SCROLL FOR NEXT