कुठल्याही गोष्टीवर बंदी घालून मुलांना शहाणं करणे कठीण आहे. मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी, सोशल मीडिया बॅन करणे हा पर्याय नाही. थोडे निर्बंध घालून ते कमी नक्कीच कमी करू शकतो. मुलांशी बोलून, त्यांना समजावून, त्यांच्याबरोबर वेळ घालवून, बाहेरील खेळ खेळायला प्रवृत्त करून सोशल स्क्रीन टाईम नक्कीच कमी करू शकतो.
एकदा सुप्रसिद्ध आणि विख्यात मनोविकारतज्ज्ञ सिग्मंड फ्राईड आपल्या पत्नी आणि मुलीसह एका बागेत गेले. बागेत फार गर्दी होती. तिथे फ्राईड यांचे काही मित्र भेटले. गप्पा रंगल्या. पत्नी आणि मुलगी पुढे निघून गेली. थोड्या वेळात पत्नी पळत आली आणि म्हणाली, ‘‘आपली मुलगी सापडत नाही, दिसत नाही, कुठे असेल?’’ असे विचारत घाबरून गेली होती. फ्राईडने पत्नीला शांत करत काही प्रश्न विचारले. ‘‘तू मुलीला काही सूचना केल्या होत्यास का?’’ ती म्हणाली, ‘‘हो, मी तिला सांगितलं की, तू हवी तशी मजा कर; पण फक्त जिथे विहीर आहे तिथे मात्र जाऊ नकोस.’’ फ्राईडने आपल्या पत्नीचा हात धरला आणि विहिरीच्या दिशेने ते दोघेही चालत गेले. नेमकी तिथेच मुलगी खेळत होती.
गेल्या आठवड्यात चीनने मुलांना सोमवार ते शुक्रवार म्हणजे किमान पाच दिवस इंटरनेट गेम्स बॅन केले. गेली जवळपास १२ वर्षे मुलांना मोबाईल, टीव्ही दाखवू नका यावर मी काम करत आहे. माझ्या क्लिनिकमध्ये आलेल्या रुग्णांच्या प्रिस्क्रिप्शन पेपरवर जशी औषधं लिहून दिली जातात, तशी मोबाईल आणि टीव्ही दाखवू नका, असे मी लिहून दिले आहे. सध्या सुरू असलेल्या संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की, टीव्ही, मोबाईल दाखवल्यामुळे मुलांची वाढ, विकास आणि वर्तनात मोठ्या प्रमाणात हानी होते. इंटरनेट गेमिंग हे तर सर्वात घातक आहे. सायबर बुलिंग, सायबर क्राईम अशा काळ्या बाजूही समोर आल्या असून तिथून अडचणीही निर्माण झाल्या आहेत. इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्सने त्यावर पालकांसाठी सल्लामसलत करणाऱ्या काही मार्गदर्शक सूचना काढल्या आहेत. तरीसुद्धा अशा गोष्टी बंद करून त्याचा परिणाम फारसा होत नाही. याउलट या गोष्टींची जनजागृती करूनही स्वभावात किंवा वागणुकीत फरक पडतोच, असे नाही.
जी गोष्ट आपण थांबवण्याचा प्रयत्न करतो ते वर्तन वाढत जाते. त्यामुळे अशा लोकांना प्रेमाने समजावून त्यांची साथ देऊन, त्यांचा हात धरून, खूप गरज असेल तर वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असते. हे सर्व केल्यानेच या गोष्टी नियंत्रणात आणू शकतो. विशेषत: कोरोना महामारीसारख्या प्रसंगी जेव्हा शाळा बंद आहेत, कोण-कोणाला भेटू शकत नाही. मुलेदेखील घरीच आहेत. अशा वेळेस बंदी आणून काहीच उपयोग होणार नाही.
एक वर्षापर्यंतच्या किंवा त्याखालील वयोगटातील मुलांना जेवत नाही म्हणूनो बाईल दाखवतो. मुलांच्या हातात मोबाईल किंवा रिमोट देऊ नये. दोन ते पाच वयोगटाच्या मुलांना जास्तीत जास्त एक तास स्क्रीन टाईम द्यावा, तोही कुणाच्या तरी निरीक्षणाखाली. पाच ते सहा किंवा किशोरवयीन अवस्थेत असलेल्या मुलांना स्क्रीन टाईम इतर गोष्टींशी समतोल कसा करावा, याच्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. त्यांना पूर्णत: बंदी घालता कामा नये. आता ऑनलाईन शाळा सुरू झाल्याने अभ्यासाचा स्क्रीन टाईम अनिवार्य आहे. त्यामुळे पालकांनी मनोरंजनात्मक स्क्रीन टाईम कमी केला पाहिजे. त्यासाठी पूर्ण दिवसाचे शेड्यूल आखले पाहिजे. हे करत असताना रोजच्या दिवसात मुलाच्या आवडत्या गोष्टींचा समावेश करावा. नुसतं नाही न म्हणता हेही कर; हे सांगून त्याची वेळमर्यादा घालून दिली पाहिजे.
मोबाईल नाही, टीव्ही नाही तर ही पद्धत वापरू नये. लुडो, गाणी, खेळ या सर्व गोष्टी मर्यादेनुसार करण्याची परवानगी द्यावी. अभ्यास नि अभ्यास याच्यावर अवलंबून शेड्यूल बनवू नये. दिवसभरात काय केले, काय अडचणी आल्या, त्याचबरोबर जर त्याने शेड्यूल फॉलो केले असेल तर त्याला बक्षीसही दिले गेले पाहिजे. फॉलो झाले नसेल तर जाणीव करून द्यावी, म्हणजेच मुलाला बंदुकीच्या धारेवर धरत नाही, याची जाणीव पालकांसह मुलांनाही होणे गरजेचे आहे. त्यातून स्वयंशिस्त लागणे गरजेचे आहे, हा मुद्दा स्पष्ट असावा.
पालकांनी स्वतः रोल मॉडेलिंग करून स्वतःचा सोशल मीडिया वापर मर्यादित करून आपल्या मुलांसमोर आदर्श ठेवला पाहिजे. फक्त मुलांना ओरडून आणि आमच्या काळी असं होतं, तसं होतं असं बोलू नये. अशाने मुलं चिडतात. घरात बेडरूममध्ये वैगरे स्क्रीन फ्री झोन बनवला पाहिजे. जिथे मोबाईलची स्क्रीन वापरली जाणार नाही. रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी एकमेकांना आवडेल किंवा एकमेकांबरोबर वेळ घालवताना स्क्रीन फ्री टाईम व्यतित करता येईल.
मुलांना तुम्ही एवढाच अभ्यास केला किंवा तुमच्याबद्दल आज ही तक्रार आली, यावर न बोलता सकारात्मक चर्चा करा. त्यांना काय चांगलं करता येईल किंवा त्यांनी काय चांगलं केलं यावर बोला. सोशल मीडियाचे काय फायदे आहेत किंवा तोटे आहेत, यावरही चर्चा झाली पाहिजे. घरात आजी-आजोबांना सोबत घेऊन सोशल मीडिया पॉलिसी बनवली गेली पाहिजे. बऱ्याचदा अशी तक्रार असते की आजोबा आजी जास्त वेळ टीव्ही बघतात, म्हणून मुलं बघतात. यावर सर्वांनी मिळून घराची सोशल मीडिया पॉलिसी बनवली पाहिजे.
मुलं पालकांना ब्लॅकमेल करतात, ओरडतात, मारतात. मला मोबाईल दिला नाही तर आम्ही जेवणार नाही, घरातून पळून जाऊ, अभ्यास करणार नाही, अशा धमक्या द्यायला लागतात तेव्हा त्यांना व्यसन लागलं आहे आणि वैद्यकीय मदतीची गरज आहे, हे ओळखा. पालकांनी ती मदत घेतलीच पाहिजे, नाहीतर गंभीर परिणाम होऊ शकतात.
दोन वर्षांपूर्वी म्हणजेच कोरोना येण्याच्या सात-आठ महिन्यांपूर्वी चेतना इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट आणि न्यू होरायझन सेल डेव्हलपमेंट सेंटरने एक मोहीम राबवली होती. नाव होतं लिमिट माय स्क्रीन टाईम. यात आम्ही घरोघरी जाऊन पालकांनी मुलांचं स्क्रीन टाईम बंद करून बागेतील खेळ आहेत किंवा मातीतले खेळ आहेत याची सवय पुन्हा कशी मुलांना लावता येईल, याची माहिती दिली होती. पण, कोविडमुळे हे सर्व बंद झालं. आता कोविड संपत आल्यावर हे सर्व पुन्हा जोमाने आपल्याला करावं लागेल. यासाठी आपण स्वतः यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. समाजाने पुढे आलं पाहिजे.
स्टीव्ह जॉब्स या आयटी क्षेत्रातील माणसानेसुद्धा लिमिट स्क्रीन टाईम याला पाठिंबा दिलेला आहे. ते स्वतः म्हणतात की, मी माझ्या मुलांना लहानपणी जास्त मोबाईल वापरू दिला नाही. सोशल मीडिया बॅन करणं हा यावर पर्याय नाही. पण, यावर थोडे निर्बंध घालून ते कमी नक्कीच आपण करू शकतो. आपण मुलांशी बोलून, त्यांना समजावून, त्यांच्याबरोबर वेळ घालवून कोविड संपल्यावर त्यांना बाहेर फिरायला नेऊन, बाहेरील खेळ खेळायला प्रवृत्त करून, सोशल मीडियाचे प्रमाण नक्कीच कमी करू शकतो.
डॉ. समीर दलवाई
samyrdalwai@gmail.com
(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, मुलांच्या विकास आणि वर्तनाचे अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.