Doctor
Doctor esakal
सप्तरंग

सामान्य-असामान्य : भपकाऱ्यामागचं सत्य

सकाळ वृत्तसेवा

आपल्या जीवनात येणारे विविध प्रसंग हाताळण्याची ज्याची त्याची एक पद्धत असते. नवनवीन प्रसंगाना वेगवेगळ्या युक्त्या, क्लृप्त्या वापरल्या जातात.

- डॉ. संजय वाटवे

आपल्या जीवनात येणारे विविध प्रसंग हाताळण्याची ज्याची त्याची एक पद्धत असते. नवनवीन प्रसंगाना वेगवेगळ्या युक्त्या, क्लृप्त्या वापरल्या जातात. एखादी विशिष्ट सिच्युएशन हाताळण्यासाठी कोण काय मार्ग काढेल हे सांगता येत नाही. हे सगळे डिफेन्स मेकॅनिझम्स आमच्याकडे तपासले जातात, शोधले जातात. पुष्कळ लोक दुतोंडे असतात. आत एक बाहेर एक. विविध रूपं धारण करतात, लबाड्या करतात. हल्लीच्या ढासळलेल्या समाजजीवनात दुतोंडेच काय, लोक दशाननही असतात. आमच्यासमोर पितळं उघडं पडतं. काही वेळेला घरच्यांपेक्षा आम्हाला पेशंटची जास्त माहिती असते. त्यामुळे माझे काही पेशंटस् मला ‘सीआयडी’ म्हणतात.

विशाल गायतोंडे दारूच्या ट्रीटमेंटसाठी माझ्याकडे येत होता. सुदैवाने ट्रीटमेंटला यश येत गेले. त्याची दारू कमी कमी होत बंद झाली. विशालची बायको कुंदा नेहमी त्याच्याबरोबर यायची. मोठा चेहरा, चेहऱ्यावर तुसडा भाव, कपाळाला भरपूर आठ्या. सगळ्यांकडे रागानं, संशयानं बघायची. बोलणंही कुत्सितपणाचं. नवऱ्याला नको नको होईल एवढी बोलणी, टोमणे, टीका टिप्पणी. टीकासुद्धा बोचरी नाही, तर जिव्हारी लागेल अशी. माझ्याशी बोलतानासुद्धा अविश्वास, तिरस्कार ठासून भरलेला असायचा. विशालची दारू पूर्ण सुटली, ट्रीटमेंट बंद व्हायची वेळ आली, तेव्हाही चेहऱ्यावर कुत्सित भाव. म्हणाली, ‘आत्ता पीत नाहीत; पण पुढचं कोणी सांगितलंय? यांचं म्हणजे कुत्र्यांचं शेपूट.’

काही महिन्यांनी कुंदा एकटीच दवाखान्यात आली. तक्रारींचा पाढा घेऊन. ‘‘विशाल परत प्यायला लागला आहे. घरात चिडचिड करतो, माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. घरात नीट वागत नाही. ट्रीटमेंटवर खर्च तरी किती करायचा?’ वगैरे वगैरे. ‘नालायक नवरा मिळाल्यामुळे आमची गाडी ठप्प झाली. ट्रीटमेंट फेल गेली. उगीचच वेळ, पैसा वाया गेला. सुटलेली दारू पुन्हा सुरू होते म्हणजे काय? विशाल ट्रीटमेंटला यायला तयार नाही. काहीतरी करा. आम्ही तुमच्यावर बराच पैसा ओतला आहे,’ इत्यादी इत्यादी.

विशालला एक दिवस फरपटतच घेऊन आली. त्यानं मात्र ‘दारू कधीतरीच पितो. प्यायली तरी थोडीशीच पितो. ट्रीटमेंटची काहीच गरज नाही,’ असा बचाव केला. कुंदा भडकली, ओरडली. ‘हा माणूस मुळातच खोटारडा आहे. तुमच्यासमोर अजूनच खोटं बोलतो आहे. रात्री घरी येतो, तेव्हा रोज घाणेरडा भपकारा येतो. मला म्हणतो, ‘आज मी थोडीशी घेतली आहे. माझ्या नादाला लागू नकोस’ आणि आत जाऊन झोपतो. हे रोज घेणार आणि आमचं तोंड बंद करणार. माझी अगदी घुसमट झाली आहे,’ त्यांनी कमरेवर हात ठेवून विशालकडे तिरस्काराने आणि खाऊ की गिळू अशा नजरेनं पाहिलं.

मी विशालला म्हणालो, ‘मागच्या वेळी काहीतरी कमतरता राहिली असेल. काही कंगोरे तपासायचे राहिले असतील, म्हणून परत पिणं वाढलं. आता आपण तुमची नार्को ॲनॅलिसिसची सिटिंग्ज करू.’ विशाल आजिबात तयार होत नव्हता. एकूणच समाज सायकिॲट्रीविषयी अज्ञान, भीती, आणि गैरसमज याने पछाडलेला आहे. त्यातून ‘नार्को’ हा शब्द गुन्हेगारांच्या संदर्भात ऐकला होता. मी ‘नार्को ही आमच्या शास्त्रातली एक महत्त्वाची ट्रीटमेंट आहे,’ हे पटवून दिले. कुंदांनं विजयी मुद्दा काढला, ‘नार्को गुन्हेगारांचंच करतात ना? मग आपण काय आहोत?’

विशाल नाईलाजानं नार्कोला आला. कुंदानी मला विचारलं, ‘आम्ही पुन्हा खर्च करतो आहोत. आता तरी गुण येईल ना? नाहीतर नुसताच खर्च आणि दारू चालूच असं व्हायचं.’ मी आवंढा गिळून नार्को सुरू केलं. विशाल रिलॅक्स व्हायला लागला. मनमोकळं बोलायला लागला. माझा हात घट्ट पकडला आणि म्हणाला, ‘यू आर ए ग्रेट डॉक्टर. माझी दारू केव्हाच सुटली आहे. मी खरंच पीत नाही.’ मी म्हणालो, ‘त्या तर म्हणतात, की रोज घरी आल्यावर भयंकर घाणेरडा भपकारा येतो.’ विशालने डोळे मोठे करून माझ्याकडे पाहिलं. तो म्हणाला, ‘ते खरं आहे. आणि मी दारू पीत नाही हेही खरं आहे. प्लीज, माझं सिक्रेट तिला सांगू नका.’

तो बोलत राहिला, ‘तुम्ही कुंदाला ओळखताच. भयंकर माणूसघाणी, तुसडी, एकांगी, हटवादी आहे. बोलण्यानी तर नको जीव करते. मी तिला कोणत्याही प्रकारे हॅण्डल करू शकत नाही. माझी दारू सुटल्यावर तर तिनं जुलूमशाही सुरू केली. घरी जायला नको वाटायला लागलं. जगात लोक रामाला भीत नाहीत. रावणाला भितात. म्हणून मी एक ट्रिक सुरू केली, बॅगेत एक चपटी ठेवली आहे. ऑफिसमधून घरी आलो, की कोपऱ्यावर थांबतो. चपटी काढतो आणि खुळखुळून चुळा भरतो आणि थुंकून टाकतो. लोक घरी जाताना दारूचा वास लपविण्याचा प्रयत्न करतात आणि मी आणण्याचा प्रयत्न करतो. हाच तो भपकारा! मग मी डेअरिंगनं घरात घुसतो. उसना शेर बनून! तिला सांगतो, ‘आज मी थोडीशी घेतली आहे. माझ्या नादाला लागू नकोस. मग कुंदीचं थोबाड बंद!’

माझी पण बोलती बंद झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT