सप्तरंग

सीमेवरून परत जा

सर्वोच्च न्यायालयात तब्बल बावीस वर्षं चाललेला खटला गेल्याच आठवड्यात उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारने सामंजस्याने सोडवला.

सकाळ वृत्तसेवा

सर्वोच्च न्यायालयात तब्बल बावीस वर्षं चाललेला खटला गेल्याच आठवड्यात उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारने सामंजस्याने सोडवला.

- डॉ. उदय कुलकर्णी udayskulkarni2@gmail.com

सर्वोच्च न्यायालयात तब्बल बावीस वर्षं चाललेला खटला गेल्याच आठवड्यात उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारने सामंजस्याने सोडवला. हरिद्वारमधील एका पर्यटक बंगल्याची मालकी उत्तराखंडकडे देण्यात आली. मानवी इतिहासात असे वाद पूर्वापार चालत आलेले आहेत, शेताच्या हद्दीपासून राष्ट्राच्या सीमेपर्यंत. हे अनेक मोठ्या युद्धांचं कारण बनलं आहे, बनत आहे.

युरोपात १७ व्या शतकात वेस्टफिलिया नामक गावी झालेल्या तहानंतर अनेक राष्ट्रं आणि राष्ट्रसीमा निर्माण झाल्या. भारतवर्ष तर पूर्वापार खंडप्राय प्रदेश, अनेक राज्यं असली तरी देश एक, अशीच इथं धारणा होती. हिमालय, मोठाल्या हिमनद्या आणि सागर यामुळे भारतवर्षाच्या सीमा जणू निसर्गानेच ठरवल्या होत्या. तरी सुजलाम्, सुफलाम् अशा या भूमीवर वेळोवेळी आक्रमणं झाली आणि अगदी सिकंदरापासून त्याची चोख उत्तरंही देण्यात आली.

मग, मध्ययुगात आपल्याकडे काही नादान राज्यकर्ते आले असावेत आणि आक्रमकांनी त्यांच्या दुहीचा फायदा घेत थेट गंगा-यमुनेच्या दुआबापर्यंत मजल मारली. या आक्रमकांनी अनेक शतकं इथं राज्य केलं. येथील संस्कृतीवर आपला ठसा उमटवण्याचा शर्थीने प्रयत्न केला. मात्र, १७ व्या शतकात महाराष्ट्राने या गुलामगिरीतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य उभं केलं.

यानंतर १८ व्या शतकात नादिरशहापाठोपाठ कमकुवत मोगलांवर अहमदशहा अब्दालीने वारंवार हल्ले केले. शाहजहानच्या काळापर्यंत हिंदुस्थानचा भाग असलेलं कंदाहार हे या हल्ल्यांचं उगमस्थान होतं. या वेळी भारताचं आणि दुबळ्या मोगलांचं या आक्रमणांपासून संरक्षण करण्याचा विडा मराठ्यांनी उचलला. १७५७ मध्ये दिल्ली लुटून जेव्हा अब्दाली माघारी गेला, तेव्हा रघुनाथराव आणि मल्हारराव होळकरांनी पंजाब पुन्हा जिंकून घेतला. सिंधू नदी ओलांडून मराठा फौजा अटकेपार गेल्या आणि त्यांनी पेशावर गाठलं.

या सुमारास इराणच्या पातशहाने अब्दालीवर हल्ला केला होता आणि त्याने रघुनाथरावाला लाहोर इथं पैगाम पाठविला की, तुम्ही आणि आम्ही अब्दालीवर तुटून पडून, आम्ही काबूल-कंदाहार घेतो, आपली सीमा आपण अटक इथं निश्चित करू. त्या वेळी विजयी मराठा सेनानींचा आत्मविश्वास गगनाला गवसणी घालत होता. रघुनाथरावाने नानासाहेब पेशव्यांना पत्र पाठवून इराणच्या पातशहाचा प्रस्ताव कळवला आणि पुढे लिहिलं, काबूल आणि कंदाहार हे अटकपारचे सुभे हिंदुस्थानकडे अकबरापासून आलमगीरपावेतो होते, ते आम्ही विलायतेत का द्यावे? आम्ही कंदाहारपावेतो अंमल बसवून तूर्त त्यास गोडच जबाब पाठविणार आहो.’’

पुढील दीड वर्षं पंजाब मराठ्यांच्या ताब्यात होता. यानंतर अब्दाली आपल्या संकटांतून मोकळा झाला आणि मोठ्या सैन्यानिशी पुन्हा हिंदुस्थानच्या सीमेवर येऊन धडकला. या प्रचंड आक्रमणाला उत्तरेत शिंदे- होळकर तोंड देऊ शकले नाहीत आणि दक्षिणेतून सदाशिवराव भाऊ यांच्या नेतृत्वाखाली तोफखान्यासहित एक जंगी सेना उत्तरेत गेली. दिल्ली मराठ्यांनी जिंकून घेतली. मात्र, यमुनेच्या पुरामुळे मराठा - अब्दाली युद्ध लांबणीवर पडलं आणि दोघांचे वकील तहाची बोलणी करू लागले.

अब्दालीने आपल्या निरोपात सदाशिवरावांना बजावलं, ‘‘तुम्ही तो बावन्न पातशाई जेर केल्या. बाकी उरल्या, त्याही करणार. हा हिय्या तुमचा. तमाम जो पातशाई मुलूख काबीज केला आहे, तो सहा सुभे दक्षिणदेखील, बरे गोष्टी सोडोन देणे. नर्मदेपासून मुलखास तसदी द्यावयास गरज नाही. ज्याजती उपद्रव न करणे. तुमचे फौजेस तीत क्रोड रुपये सालीना कराराप्रमाणे पातशाई सनदा करून देतो. त्या बरहुकूम घेऊन पातशाई चाकरी करीत जाणे. हा प्रकार असलियास सुलास (तहास) पाहिले जाईल. हे खातरेस न ये, तर लढाई करणे लागेल.’’

सीमेचं आणि राष्ट्राचं संरक्षण हेच आपलं आद्यकर्तव्य हे जाणून सदाशिवरावांनी अब्दालीला समर्पक उत्तर पाठविलं. ‘हे हिंदूंची पातशाई, येथील बंदोबस्त करणे तो आम्हीच करावा. मागे आला तेव्हा आम्ही असतो तर पातशाईची चलबिचल होऊ न पावती. तुम्ही नेम करून देणार कोण? आमचे चित्तास येईल ते आम्ही आपले मते करणार, खबर घ्यावी, तेथे पावेतो मुलूख काबीज करावा, हा आमचा हिय्या. तेथे दुरानी ईरान तो काय? तुम्ही आपल्या वाटे अटक पार होऊन, भाईचारा माघारा जाणे. आज आम्ही भिवोन राहो की काय? आज सर्व गोष्टीने सामानपूर आहोत. हिंदू पातशाईचे मातबर वजीर, सर्व राज्याचा भार आम्हावर आहे. तीन चार लक्ष फौजेचा आमचा पातशहा छत्रपती महाराज, त्याचा जय व प्रताप आमचे मस्तकी असता, सर्व पृथ्वीचे जय संपादितो व आजवर संपादित आलो आहोत. तुमचा तमा धरितो, यैसे नाही. लढाई करावी हाच आमचा नेम.

पुढे लढाई झाली. यात यश-अपयश असतेच. परंतु पानिपतनंतर वायव्येची आक्रमणं दिल्लीपर्यंत पुन्हा आली नाहीत.

१९६२ मध्ये चीनच्या आक्रमणाच्या सुमारे बाळ कोल्हटकरांनी ‘सीमेवरून परत जा’ नामक नाटक लिहिले, त्याचे बरेच प्रयोगही झाले. नाटक जरी सिकंदर आणि पौरसच्या इतिहासावर आधारलेलं होतं, तरी रघुनाथराव किंवा सदाशिवराव भाऊ किंवा अलीकडे बाळाकोट, पॅनगोंग आणि गलवान येथे भारताने दिलेलं उत्तर यात वेगळं ते काय?

(सदराचे लेखक शल्यचिकित्सक असून, अठराव्या शतकातील मराठेशाहीच्या इतिहासावर त्यांनी पुस्तकं लिहिली आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

SCROLL FOR NEXT