सप्तरंग

बलसागर भारत होवो...

राष्ट्रकुल स्पर्धा सध्या इंग्लंडमध्ये होत आहेत. मुष्टियुद्ध, नेमबाजी, वजन उचलणे यांसारख्या खेळांमध्ये भारतानं उल्लेखनीय प्रगती केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

राष्ट्रकुल स्पर्धा सध्या इंग्लंडमध्ये होत आहेत. मुष्टियुद्ध, नेमबाजी, वजन उचलणे यांसारख्या खेळांमध्ये भारतानं उल्लेखनीय प्रगती केली आहे.

- डॉ. उदय कुलकर्णी udayskulkarni2@gmail.com

राष्ट्रकुल स्पर्धा सध्या इंग्लंडमध्ये होत आहेत. मुष्टियुद्ध, नेमबाजी, वजन उचलणे यांसारख्या खेळांमध्ये भारतानं उल्लेखनीय प्रगती केली आहे. सेनादलाच्या सहभागातून, राज्य व राष्ट्रीय पातळीवर अलीकडे या खेळांच्या तयारीकडं विशेष लक्ष पुरवलं जातं. जागतिक स्तरावर बॅडमिंटनमध्ये (जो खेळ पुण्यात जन्माला आला आणि ज्याचं नावच एकेकाळी ‘पूना’ होतं) तर भारतीय खेळाडू अव्वल क्रमांकावर आहेत. कुस्तीचे नियम जरी पाश्‍चिमात्य असले, तरी भारतीय कुस्तीगिरांनी कित्येकवेळा मैदानं गाजवलीत आणि हे सर्व खेळ हॉकी व क्रिकेट सोडून आहेत हे विशेष. बुद्धिबळातही आपण बाजी मारताना दिसतोय. खेळांमुळं राष्ट्रीय भावना उत्तेजित होऊन राष्ट्राचा सन्मानही वधारतो.

राष्ट्राची अस्मिता असो वा वैयक्तिक व्यक्तिमत्त्व असो; खेळांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. खेळाडूंना राजाश्रय आणि बहुमान मिळणं अर्थातच महत्त्वाचं आहे. पूर्वापार ही प्रथा आपल्याकडे चालत आली आहे. रामायण-महाभारतातील लोककथांतून विटी-दांडूपासून नेमबाजी व मल्लविद्येची उदाहरणं आपल्याला दिसतात. कर्णासारखा ‘सारथीपुत्र’ यातूनच अंगदेशाचं राज्य मिळवतो. या सैनिकी खेळांबरोबरच चपळाई, शारीरिक क्षमता, बुद्धिचातुर्य सुधारण्याकरिता इतरही अनेक खेळ होते.

अठराव्या शतकाच्या अखेरीस जेम्स वेल्स हा स्कॉट चित्रकार, तसंच गंगाराम तांबट नवगिरे, रॉबर्ट मेबॉन अशा भारतीय व विदेशी चित्रकारांनी तत्कालीन खेळांचं वर्णन लिहून तर ठेवलंच; पण त्यांची चित्रंही काढली. १७९२ मध्ये जेव्हा महादजी शिंदे पुण्यात आले, तेव्हा पुण्याजवळील एका तलावात होड्यांमध्ये जाऊन नेमबाजी व बहिरी ससाण्यांच्या करामतींचं वर्णन सोबत असलेल्या इंग्रजांनी लिहून ठेवलंय. ४ डिसेंबर १७९२ रोजी अनेक होड्यांतून हे सर्व तलावात जलक्रीडा करण्यास गेले. तलावावरचे पक्षी आकाशात उडवून शिक्षित बहिरी ससाणे त्यांच्यावर सोडून देण्यात येत, असं वर्णन वेल्सच्या दैनंदिनीत आढळतं.

‘अनेक बहिरी ससाणे या खेळासाठी तयार केले जात. या ससाण्यांना आकाशात उडणाऱ्या इतर पक्ष्यांना पकडून जमिनीवर आणण्याची कला शिकवलेली होती. जमिनीवर त्यांचं सावज त्यांच्याकडून काढून त्यांना पुन्हा नवीन शिकार करायला आकाशात पाठवलं जाई. ससाण्याने पक्षी धरून आणला की तळ्यावर ‘व्वा व्वा व्वा’चा घोष होत असे. शिवाय, बंदुकीने नेम धरूनही पक्षी मारले जात. शिंदेंनीदेखील नेम धरून एक पक्षी मारला.’

मराठा फौजेत भाला चालवणं ही एक प्रमुख कारवाई असे. लांब भाल्याचा इतका उत्कृष्ट उपयोग केवळ मराठा घोडेस्वारच करू शके. याचा सराव होत असे. सवाई माधवराव पेशवे यांनी भाला उत्तम प्रकारे हाताळला असा अभिप्राय वेल्सच्या दैनंदिनीत आहे. याच सरावाविषयी एका पत्रात, ‘श्रीमंतांची स्वारी घोडे फेरावयास गेली होती, तेथे मुसवर (वेल्स) आला होता. कारण की, श्रीमंत, बरायखुद्द वगैरे सरकार मंडळी भाले कसे खेळतात हे पाहून तसबीर खाशांची काढण्याविशी’’ असे उल्लेख आणि रॉबर्ट मेबॉनने हे चित्र काढलेलं आजही आपल्याला पहायला मिळतं

गंगाराम तांबट नवगिरे यांनी सैनिकी क्रीडाप्रकारांची अनेक चित्रं काढली. यात वज्रमुष्टी, मल्लखांब, कुस्ती यांची चित्रं आजही पहायला मिळतात. त्यावेळचे खेळाडू देशभर राजे व राजकुमार यांच्यासमोर या खेळांची प्रात्यक्षिकं करून आपलं कौशल्य दाखवीत, असं एका चित्राखाली लिहिलेलं आहे.

मराठेशाहीत या सैनिकी खेळांतून उमद्या खेळाडूंना सन्मान तर मिळत असेच; पण त्यांना सैन्यात पगारी नोकरीवरही ठेवलं जाई. ही प्रथा अगदी मराठेशाहीच्या अस्तापर्यंत होती. १८१५ नंतर बाजीराव रघुनाथ पेशवा इंग्रज आधिपत्यातून सुटण्याची धडपड करू लागला.

आपण पेंढाऱ्यांविरुद्ध लढण्यास सैन्य उभं करतोय असा दिखावा करीत गावोगावी जोमाने सैन्यभरती केली जाऊ लागली. साताराजवळील माहुली येथे कुस्तीचा जंगी फड उभारून सैन्यभरतीसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जात असे. अशा सैनिकी खेळांतून पेशव्यांनी २५हजाराचं घोडदळ आणि १० हजाराचं पायदळ उभं केल्याची इंग्रज अधिकाऱ्यांची नोंद आहे.

१८५७ सालच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान गोडसे नामक भटजी कोकणातून झाशीपर्यंत पोचले. राणी लक्ष्मीबाईंची दिनचर्या आणि राज्यकारभाराविषयी त्यांनी आपल्या दैनंदिनीत लिहिलंय.

‘पहाटे उठोन मल्लखांबासी जाऊन दोन घटका कसरत करून नंतर घोडा मंडळावर धरून लागलीच हत्तीवर बसून फेरफटका’ हा लक्ष्मीबाईंचा नित्य सराव असे. अशी व्यायामाची शिस्त राजदरबारापासून सामान्य प्रजेपर्यंत त्याकाळी दिसत असे.

भारतीय खेळाडूंना लोकमान्यता व प्रसिद्धी अधिकाधिक प्रमाणात मिळत आहे. पूर्वी हॉकीचं एखादं पदक सोडल्यास जागतिक स्तरावर काही जिंकणं दुरापास्त होतं. नव्या आत्मविश्‍वासाने, ‘चक दे इंडिया’ म्हणत खेळणारे हे वीर, वाढत्या राष्ट्राभिमानाचं प्रतीकच आहेत. या यशातून एकविसावं शतक भारताचंच होईल याविषयी विश्‍वास वाटतो. तसं झालं तरच ‘बलसागर भारत होवो, विश्‍वात शोभुनि राहो’ ही कवितेतील उक्ती वास्तवात उतरेल.

(सदराचे लेखक शल्यचिकित्सक असून अठराव्या शतकातल्या मराठेशाहीच्या इतिहासावर त्यांनी काही पुस्तकं लिहिली आहेत. )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT