Congress Party Symbols
Congress Party Symbols Sakal
सप्तरंग

घनगरज भाषन हो गये...

उदय कुलकर्णी

राजकारण हे विधिमंडळातून मैदानावर, मैदानावरून न्यायालयापर्यंत गेलं. सार्वजनिक पटलावर एक महानाट्य सजलं. पक्षात फूट पडणं हे नवीन निश्चितच नाही.

राजकारण हे विधिमंडळातून मैदानावर, मैदानावरून न्यायालयापर्यंत गेलं. सार्वजनिक पटलावर एक महानाट्य सजलं. पक्षात फूट पडणं हे नवीन निश्चितच नाही. आधुनिक युगात १९०७ मध्ये गोपाळ कृष्ण गोखले आणि लोकमान्य टिळक हे एकमेकांविरोधात मवाळ आणि जहाल असे विचार घेऊन देशासमोर आले. जो पक्षाध्यक्ष होईल त्याची सद्दी चालणार. मध्य भारताची राजधानी नागपूरमध्ये अधिवेशन ठरलं होतं. तिथं टिळक निवडणुकीला उभं राहू शकत होते. मात्र, मुंबई प्रांत त्यांचाच प्रदेश असल्याने तिथे उभं राहता येणार नव्हतं. त्यामुळे, गोखलेंनी अधिवेशन नागपूरहून सुरत इथे स्थलांतरित केलं, कारण सुरत मुंबई प्रांतात होतं. अर्थात, टिळक अध्यक्षीय निवडणूक लढवू शकले नाहीत. काँग्रेसची ही पहिली फूट ! 

पुढंही काँग्रेसमध्ये फूट पडत गेली. समाजवादी काँग्रेस हाही त्यातील एक प्रयोग. १९४७ पासून १९६६ पर्यंत पक्षातील एकी टिकली, मात्र १९६९ च्या राष्ट्रपती निवडणुकीत पक्षाच्या नीलम संजीव रेड्डींविरोधात इंदिरा गांधींनी वराहगिरी वेंकटगिरी यांना उमेदवारी देण्याचं ठरवलं. आपल्या सदसद्विवेक बुद्धीप्रमाणे मतदान करावं असा इंदिराबाईंनी आग्रह धरला आणि पक्षात फूट पडली.

काँग्रेस इंडिकेट (जी पुढं इंदिरा नावानंच ओळखू जाऊ लागली) आणि काँग्रेस सिंडिकेट असे पक्ष तयार झाले. तोपर्यंत बैलजोडी या चिन्हावर काँग्रेसने अनेक निवडणुका जिंकल्या होत्या. भारतासारख्या कृषिप्रधान देशात या चिन्हाला अर्थात महत्त्व होतं! हे चिन्ह गोठवण्यात आलं आणि इंदिरा गांधींना त्यांचं पुढील यश ‘गाय-वासरू’ या चिन्हावर मिळालं. 

या सर्व इतिहासातून तात्पर्य एवढंच निघतं की, अखेर जो नेता लोकमान्य ठरतो, त्याचा पक्ष व चिन्ह निवडणूक जिंकतं. पण ही सर्व आधुनिक युगातील कहाणी. मनुष्या-मनुष्यात आणि पक्षा-पक्षात फूट ही रीत अर्वाचिन काळापासून चालत आली आहे. म्हणूनच पंडू आणि धृतराष्ट्राचे पुत्र भांडले आणि महाभारत घडलं. त्याकाळी तर नीती किंवा लोकमान्यतेपेक्षा युद्धभूमीवरच निर्णय घ्यावा लागला होता. न्यायालयात प्रकरण जाणं, हा हल्लीचा मार्ग आहे; पण न्यायदेवतेवरदेखील शंका पूर्वापार घेतली जात असे. भारतीय इतिहासात रामशास्त्री प्रभुणे यांचे निर्णय निर्भीड आणि निःपक्षपाती असत, अशी त्यांची ख्याती होती. तरीही त्यांच्या विरोधात माधवराव पेशवे यांच्याकडे तक्रार गेली. ते झालं असं - 

कोकणातील एका खोती हक्काचं भांडण रामशास्त्रींच्या न्यायालयात चाललं होतं. ज्या पक्षाची बाजू लंगडी होती, त्यांनी ‘शास्त्रीबोवा एकाचा पक्ष धरतात’, अशी तक्रार पेशव्यांकडे केली. माधवरावांनी रामशास्त्रींकडून दावा काढून घेण्याची आज्ञा दिली आणि दुसऱ्याकडे सोपवला. रामशास्त्रींना यावर राग आला आणि त्यांनी रघुनाथराव दादा यांना पत्र लिहिलं (जे इतिहासकार य. न. केळकर यांनी प्रथम प्रसिद्ध केलं) - ‘संदेह स्वामीस असिला, तरी पुण्यास कारभारी व मुछदी आहेत, त्यास आज्ञा जाहलियाने फडशा करतील. परंतु हुजूर न्याय पडिला त्याचे कागदपत्र महाली रवाना करावयाची चाल आजतागायत नाही.’ न्यायव्यवस्था ही राज्यकर्त्यांपासून वेगळी व स्वतंत्र आहे, हा या मजकुराचा अर्थ होतो. मग नाना फडणीसांनी माधवरावांना पत्र लिहिलं आणि, ‘शास्त्रीबोवा पक्ष धरून मनसुबा करणार नाहीत, यास्तव त्यांजकडेच करावयाची आज्ञा करावी,’ अशी शिफारस केली. पुढे याच रामशास्त्र्यांनी नारायणरावांच्या खुनानंतर रघुनाथरावांना देहान्त शिक्षा सुनावली.  

मराठेशाहीच्या दीडशे-पाऊणे दोनशे वर्षांत काही कमी प्रमाणात फूट पडली नाही. छत्रपती शाहू महाराजांची मोगलांकडून सुटका झाल्यावर ताराराणींशी युद्ध झालं व दोन राजधान्या स्थापन झाल्या. सरदारांमध्येही भांडणं अनेकदा झाल्याचं दिसतं. सरखेल कान्होजी आंग्रेंविरुद्ध पेशवा बहिरोपंत पिंगळे, बाजीराव पेशवेंविरुद्ध त्रिंबकराव दाभाडे, नानासाहेबांविरुद्ध तर अनेक लढाया झाल्या. पुढे शिंदे, होळकर यांची आपसांतली चुरस १७९१ मध्ये रणांगणापर्यंत जुंपली. 

राजकारणात व्यक्तींचा प्रवेश सत्तेसाठी आणि त्यातून मिळणाऱ्या फायद्यासाठी होतो. क्वचित काळी काही आदर्शवादीही या क्षेत्राकडे वळतात. पण, अलीकडे अधिकतर राजकारणाचं स्वरूप सत्तासंपादनेतून अर्थार्जन करण्याकडे आहे. खऱ्याचं खोटं सर्वोत्कृष्टरीत्या करणारे जरी काही काळ यशस्वी झाले, तरी शेवटी, ‘ये पब्लिक है, ये सब जानती है’, हेच खरं ठरतं. पण दोन निवडणुकांमध्ये जर येनकेन प्रकारेन सत्तापालट होत असेल, तर ती लोकशाही कशी? स्वतःवर कडक अशी आचारसंहिता व कायदा कोणताही राजकीय पक्ष पुरस्कृत करेल का?

१९६९ ची काँग्रेस फूट ही त्याकाळी खळबळ माजवून देणारीच होती. एकीकडे कामराज, स. का. पाटील, निजलिंगप्पांसारखे दिग्गज, तर दुसरीकडे इंदिराबाई. या काळात भाषणबाजी बेसुमार झाली. त्याकाळची एक उक्ती माझ्या अजून लक्षात आहे,

‘काँग्रेस के दो सेशन हो गये,

घनगरज भाषन हो गये,

घर का अंधेरा ज्यो का त्यो,

नेताओंके नाम मगर रोशन हो गये.’

(सदराचे लेखक शल्यचिकित्सक असून अठराव्या शतकातल्या इतिहासावर त्यांनी काही पुस्तकं लिहिलेली आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

SCROLL FOR NEXT