प्रेमनाथवर लिहिलेल्या लेखानंतर आता राजकुमारवर लिहावं, असं अनेकांनी आग्रहाने मला सांगितलं. राजकुमार हा माझ्या कॉलेजच्या दिवसांतला एक आवडता नट.
प्रेमनाथवर लिहिलेल्या लेखानंतर आता राजकुमारवर लिहावं, असं अनेकांनी आग्रहाने मला सांगितलं. राजकुमार हा माझ्या कॉलेजच्या दिवसांतला एक आवडता नट. कॉलेजच्या पहिल्या दोन वर्षांत कधीतरी मी ‘वक्त’ पाहिला आणि राजकुमारने भारावून गेलो. त्याची ती रुबाबदार पर्सनॅलिटी, त्याचा तो धीरगंभीर आवाज, त्याची डौलदार चाल आणि संवाद फेकण्याची हातोटी या सगळ्यांचा प्रभाव पडला.
‘वक्त’मधल्या दोन संवादांनी त्याला एकदम लोकप्रिय करून टाकलं. त्यातला एक म्हणजे ‘जिनके घर शीशे के होते है, वो दुसरों पे पत्थर नही फेका करते’ आणि दुसरा सुरा मदनपुरीकडून खेचून घेऊन, ‘ये बच्चों की खेलने की चीज नही, हात मे लग जाये तो खून निकल आता है...’ तोपर्यंत मी त्याचा एकही सिनेमा आधी पाहिलेला नव्हता. मग मी दिलीप कुमारबरोबरचा त्याचा ‘पैगाम’ पाहिला. दिलीप कुमारच्या समोर तो खूप चांगला उभा राहिला होता. ‘उजाला’ पाहिला, त्यात ‘वक्त’प्रमाणेच त्याच्या भूमिकेला थोडा काळा रांगडा रंग होता. ते आपलं असं वय असतं, जेव्हा आपल्याला आक्रमक रांगडी भूमिका जास्त भावते; पण मला ‘दिल एक मंदिर’मधली त्याची गंभीर भूमिकासुद्धा आवडली होती.
त्या काळामध्ये ‘मेरे हुजूर’ हा मला आवडलेला आणखी एक सिनेमा. तोपर्यंत तो ‘जानी’ झाला नव्हता, ‘वक्त’ची नशा त्याच्या डोक्यात शिरली नव्हती. ती पुढे शिरली आणि त्याच्यातला चांगला नट मागे पडला व डायलॉगबाजी करणारा राजकुमार पुढे आला. त्याच्या आवाजात ताकद होती; पण नुसती डायलॉगबाजी म्हणजे अभिनय नव्हे. संवादातला चढ-उतार, चेहऱ्यावरचे हावभाव, भूमिकेला साजेशा ॲक्शन महत्त्वाच्या, याचा विसर पडून तो केवळ संवाद फेकण्यात मश्गूल झाला. ‘बुलंदीपर्यंत’ मी त्याचे सिनेमे पाहिले. नंतर थेट मी ‘तिरंगा’ पाहिला; पण तोही जास्त नानासाठी. त्यानंतर तो गाजायला लागला त्याच्या विक्षिप्त स्वभावामुळे आणि जखमी करणाऱ्या अत्यंत हिंस्र विनोदामुळे. तो कोणाचाही अपमान करायला लागला.
प्रकाश मेहरा त्याच्याकडे ‘ जंजीर’ ची भूमिका घेऊन गेला. राजकुमारने त्याला सांगितलं, ‘भूमिका चांगली आहे; पण मला तुझा चेहरा आवडला नाही...’ आणि त्याने चित्रपट नाकारला. झीनत अमान सत्तरीच्या दशकात टॉपला होती. एका पार्टीत त्याने झीनतला सांगितलं, ‘तुझा चेहरा चांगला आहे, तू अभिनयाचा प्रयत्न का करत नाहीस?’ झीनतचा चेहरा पडला. त्यापलीकडेही एकदा तो गेला. तो झीनतला म्हणाला, ‘सत्यम शिवम सुंदरम्’नंतर तुला कपड्यात ओळखता येत नाही.’
एकदा तो राजेंद्र कुमारच्या स्टुडिओत गेला. तिथे राजेंद्र कुमारचा मोठा फोटो लावला होता. त्याने तिथल्या माणसाला कुत्सितपणे विचारलं, ‘जानी, वो चले गये और तुमने हमे बताया तक नही?’’ एकदा अमिताभ त्याला एका पार्टीत भेटला. त्याच्या सूटचं कौतुक राजकुमारने केलं. अमिताभ त्याला टेलरचा पत्ता लिहून देत होता. राजकुमार म्हणाला, ‘माझ्या घरचे पडदे जुने झाले आहेत. तुझा सूट पाहिल्यावर ते बदलायला पाहिजेत असं वाटलं.’ राजकुमारला एकदा गोविंदाचा शर्ट आवडला. त्याने स्तुती केली. गोविंदा बिचारा खूष झाला. त्याने शर्ट काढून राजकुमार ह्याला दिला. दुसऱ्या दिवशी राजकुमारने त्या शर्टचे रुमाल करून आणले... आणखी किती असे किस्से सांगू?
बरं, हा माणूस चक्क काश्मिरी ब्राह्मण होता. कुलभूषण पंडित हे त्याचं नाव. त्याने आपल्या कारकीर्दीची सुरुवात कुलाबा पोलिस स्टेशनला सब इन्स्पेक्टर म्हणून केली. एकदा मुंबईत मेट्रो थिएटरला त्याला सोहराब मोदी भेटले, ते त्याच्या व्यक्तिमत्त्वावर खूष झाले आणि त्यांनी त्याला चक्क त्यांच्या सिनेमामध्ये भूमिका ऑफर केली. त्या काळात सोहराब मोदी यांची वट पुढच्या काळातल्या यश चोप्रांसारखी होती; पण राजकुमारने त्यांना थेट नाही असं सांगितलं. पुढे १९५२मध्ये त्याने ‘रंगीली’ नावाच्या सिनेमात काम केलं; पण त्याचा जम बसला सोहराब मोदी यांच्या ‘नऊशेरवाने आदिल’ या सिनेमात. मग पैगाम, उजाला, दिल अपना और प्रीत परायी.. करत ‘वक्त’ने त्याला अत्यंत लोकप्रिय केलं. वक्त बी. आर चोप्रा यांचा; त्यांचं म्हणणं असं आहे की, ‘‘माझ्याशी तो नेहमीच चांगलं वागला, किंबहुना त्याला डायरेक्ट करणं मला खूप आवडायचं. तो इतरांशी असं वागतो यावर माझा विश्वास बसत नाही.’
मीनाकुमारीबरोबर त्याने अनेक सिनेमांत काम केलं. ‘पाकीजा’च्या वेळेला तो मीनाकुमारीच्या प्रेमात पडला. तो मीनाकुमारीला ‘पाकीजा’त म्हणाला, ‘आपके पाव बहुत हसीन है, इन्हे जमींपर मत उतारीये.’ पण तिचे पाय कधी राजकुमारच्या घराचं माप ओलांडून गेले नाहीत. पुढे तो हेमामालिनीवरही लट्टू झाला. ‘लाल पत्थर’मध्ये हेमामालिनीला घेण्यात त्याचाच आग्रह होता. त्याचं ते प्रेम यशस्वी झालं नाही. एका अँग्लो इंडियन एअर होस्टेसच्या प्रेमात पडून त्याने लग्न केलं आणि सुखात राहिला.
त्याच्या अनेक चांगल्या बाजू आहेत. त्याला कपड्यांची आवड होती, मग तो भारतीय पद्धतीचा पेहराव असो किंवा पाश्चात्त्य सूट; दोन्ही प्रकारचे वेष त्याला शोभत. त्याचे सूट अत्यंत देखणे असत आणि त्यांत तो दिसेही देखणा. याचं कारण असं होतं की, सूट शिवताना तो भरपूर काळजी घेत असे. त्याचा फर्न नावाचा एक शिंपी होता. सूट कसा कापावा हे शिकण्यासाठी त्याने या शिंप्याला चक्क इंग्लंडला स्वतःच्या पैशांनी पाठवलं होतं. त्याच्याकडे दीड-दोनशे पाइप होते. जगभरातून त्याने ते पाइप जमा केले होते आणि तो स्टाइलमध्ये पाइप ओढायचा. त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या बुटांचं वेड होतं आणि त्याचा छंद ठाऊक आहे... चक्क बुटांना पॉलिश करणं. तो घोडेस्वारी करायचा, गोल्फ खेळायचा. त्याच्या फॅशनचं कुणी कौतुक केलं की तो फणा काढत म्हणायचा, ‘मी फॅशन करत नाही, मीच फॅशन आहे.’ हा माज मात्र त्याला होता.
मला बऱ्याचदा असं वाटतं की, त्याचं हे उद्धट वागणं वगैरे, हे सर्व जाणीवपूर्वक होतं, तो काही त्याचा स्वभाव नव्हता. फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या मस्तीत राहायचं असेल तर अशा प्रकारचं वागणं याची गरज आहे, हे त्याच्या मनात पक्कं कुठेतरी रुजलं होतं, त्यामुळे फिल्मी पार्टीला जाताना, शूटिंगला जाताना तो ही वृत्ती कोटाप्रमाणे अंगातल्या कपड्यांवर चढवायचा आणि घराबाहेर पडायचा. घरी आल्यावर आपल्या कुटुंबासोबत राहताना मात्र हा कोट काढून ठेवायचा.
विचार करा, सुभाष घईसारख्या माणसाने त्याला आणि दिलीप कुमारला घेऊन ‘सौदागर’ नावाचा सिनेमा कसा काढला असेल! दोघे हिमालयासारखा इगो घेऊन वावरणारे नट. सुभाष घई त्याचा किस्सा सांगतो, पहिल्यांदा दिलीप कुमारकडे गेलो. दिलीप कुमारना पटकथा वाचून दाखवली आणि कुठली भूमिका त्यांच्याकडून अपेक्षित आहे हे त्यांना सांगितलं. मग दिलीप कुमारने साहजिकच त्यांना विचारलं, ‘ही भूमिका मला पसंत आहे; पण माझ्याबरोबर काम कोण करणार?’ त्या वेळेला सुभाष घाईने उत्तर दिलं, राजकुमार... आणि ते तिथून पळून गेले. त्यानंतर ते राजकुमारकडे गेले. राजकुमारला त्यांनी पटकथा वाचून दाखवली आणि त्याला सांगितलं की, ‘ही भूमिका तुम्हाला करायची आहे.’
राजकुमार तयार झाला. साहजिकच त्याने प्रश्न विचारला, ‘दुसरी भूमिका कोण करणार?’ त्या वेळेला सुभाष घईने राजकुमारचा इगो सांभाळत अत्यंत चाणाक्षपणे सांगितलं, ‘दुसरा कोणी नट मला परवडत नाही, त्यामुळे मी दिलीप कुमारला घेतोय.’ आणि मग राजकुमार तयार झाला आणि म्हणाला, ‘‘माझ्या खालोखाल जर कोणी चांगला अभिनय करत असेल, तर तो दिलीपकुमार आहे.’’ अशा रीतीने दोघांना साइन करण्यात आलं. अर्थात, डोकेदुखी इथेच संपली नाही. शूटिंग संपेपर्यंत या ना त्या कारणाने भांडणं सुरूच राहिली. अगदी हॉटेलच्या कुठल्या मजल्यावर कोणी राहायचं, वरच्या मजल्यावर कोणी राहायचं या क्षुल्लक कारणावरूनसुद्धा वाद झाले. मोठी माणसं किती लहान होऊ शकतात, याचं हे मूर्तिमंत उदाहरण होतं.
या सर्व गोष्टींचं मूळ ‘पैगाम’ सिनेमापर्यंत जातं. या सिनेमात राजकुमार, दिलीप कुमारला थोबाडीत मारतो. ती राजकुमारने इतक्या जोरात मारली की, दिलीप कुमार कळवला आणि चिडला. त्यानंतर ते ‘संघर्ष’ नावाच्या सिनेमामध्ये एकत्र येणार होते. दिलीप कुमारने राजकुमारला सांगितलं की, ‘तू आणि मी आता एकत्र काम करतोय.’ राजकुमारने लगेच त्याची विषारी नांगी बाहेर काढली आणि दिलीप कुमारच्या इगोला टोचत तो म्हणाला, ‘‘राजकुमार कोणाबरोबर काम करत नाही. इतर सर्व राजकुमारबरोबर काम करतात. मी हा सिनेमा सोडला.’’ कळली, ही परंपरा कुठून सुरू झाली !
मेहुल कुमारला ‘तिरंगा’च्या वेळेला पेपर सोपा गेला नाही, कारण त्यात राजकुमार आणि नाना दोघेही भडक माथ्याचे नट होते. नानाने तर स्पष्टच सांगितलं होतं, ‘माझ्या भूमिकेत किंचित जरी फेरबदल झाला, तरी मी सिनेमा तिथल्या तिथे सोडून जाईन.’ बऱ्याचदा राजकुमार उगाच चिमटा काढायचा. मणी कौलसारख्या आर्ट सिनेमा काढणाऱ्या दिग्दर्शकाला चिमटा काढायची काही गरज होती का; पण राजकुमार त्यालाही नडला. त्याने ‘उसकी रोटी’ नावाचा सिनेमा काढला. राजकुमारने त्याला म्हटलं, ‘‘जानी, आर्ट फिल्म क्यू बनाते हो ? उसकी रोटी वगैरे.
मेरे पास आओ, हम कमर्शियल फिल्म बनायेंगे ‘अपना हलवा’. त्याचा एक ‘मरते दम तक’ नावाचा सिनेमा होता. राजकुमार शेवटी त्यात मरतो. त्याच्या मृत्यूच्या शॉटमध्ये जेव्हा त्याला हार घातला गेला, त्यावेळेला राजकुमार मेहुल कुमारला म्हणाला, ‘इथे हार घातलास ते बरं केलं. मी मेल्यावर तुला हार घालता येणार नाही. कारण माझ्या शेवटच्या यात्रेत मला एकही फिल्मी माणूस नकोय. ते पांढरे कपडे घालून तमाशा करतात.’ राजकुमारच्या शेवटच्या यात्रेत एकही फिल्मवाला नव्हता, त्याने कायम पाण्यात राहून माशाशी वैर केलं.
(लेखक चित्रपट व क्रीडाक्षेत्राचे अभ्यासक आहेत. या दोन्ही विषयांवर त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.