nature
nature 
सप्तरंग

जुळवितसे सहज दुवा... ऋतु हिरवा

हेमंत जुवेकर

कविता श्रेष्ठ की गीत या सनातन वादात आपण नकोच पडायला. अर्थात ​हे नक्कीच की ​कवी नेहमीच स्वतःला गीतकारापेक्षा श्रेष्ठ समजतात. पण जास्त लोकप्रिय असतात ते गीतकारच. 

जगदिश खेबुडकर हे एक अतिशय लोकप्रिय आणि समर्थ गीतकार. पण ते एका मुलाखतीत म्हणाले होते, की बाई असल्याशिवाय आई, आणि कवी असल्याशिवाय गीतकार होता येत नाही... 

हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे एक श्रावणगाण्यावरून मित्राशी झालेला वाद. खरंतर ​त्या गाण्यावर फिदा असलेली मंडळी मोप आहेत, पण याला म्हणे ते नाही आवडत. 

ऋतु हिरवा, ऋतु बर​वा, पाचुचा बनी रुजवा
युग विरही ह्रदयावर सरसरतो मधु शिरवा

हे गाणं ज्याने एेकलंय त्याच्या मनात हा मधु शिरवा सरसरणारच​...​ कायम. अगदी सुरवातीच्या आलापा पासूनच गाणं थेट शिरतच काळजात. आशाबाई काय कमाल गायल्यात आणि शांता शेळ​केंचे​​ शब्दही किती नजाकतीने आलेत. या सगळ्याचा आनंद घ्यायचं सोडून हा भला माणूस म्हणतो, चालीवर पाडलेली गाणी मला आवडत नाहीत... 

आता चालीवर लिहिलेलं गाणं कमअस्सलचं ठरतं असं त्याला का वाटावं. कदाचित चालीत ठोकून ठोकून शब्द बसवलेली गाणी त्याने जास्त एेकली असावीत. पण म्हणून ऋतु हिरवा नावडीचं ठरवावं?

भिजूनी उन्हे चमचमती
क्षण दिपती, क्षण लपती
नितळ निळ्या अवकाशी 
मघुगंधी तरल हवा... ऋतु हिरवा

असं म्हणतात की सूर आणि शब्द जेव्हा एकजीव होऊन जेव्हा समोर येतात ना, तेव्हाच ते गाणं भावतं रसिकांना. या गाण्यात नेमकं तेच झालंय. श्रावणाचं चित्रदर्शी वर्णन आहे यात, नी यातली प्रत्येक ओळ जिवंत केलीय आशाताईंनी. कोरसचा किती सुंदर वापर केलाय श्रीधरनी यात. आणखी एक सुंदर बाब म्हणजे यातली संतुर आणि बासरीची जुगलबंदी.  

मनभावन हा श्रावण, 
प्रियसाजण हा श्रावण
​भिजवी तन, भिजवी मन हा श्रावण
​थरथरत्या अधरावर प्रणयी संकेत नवा...ऋतु हिरवा   

पहिल्या कडव्यापेक्षा हे शब्द वेगळीच नजाकत नी चाल घेऊन येतात. यातला  मनभावन हा शब्द आशाताईंनी काय म्हटलाय, आह. खरंतर या ​तीन ओळीतून त्यांनी जे उभं केलंय ते एका ​संपूर्ण मैफिलीपेक्षा बिलकूल कमी नाही. 

असं सांगतात, की श्रीधर फडके यांनी चारुकेशी रागातली रचना जेव्हा बांधली तेव्हा त्यावर शब्द कोण लिहिणार हे नक्की नव्हतं. समर्थ गीतकार शोधताना, त्यांच्या वडीलांच्या (सुधीर फडके यांच्या) अनेक गाण्यांना शब्द देणाऱ्या शांताबाईंच (शांता शेळके) नाव जेव्हा पुढे आलं, तेव्हा आपल्या चालीला समर्थ शब्द लाभणार याचा विश्वासच आला श्रीधरांना. आणि झालंही तसंच

नभी उमटे इंद्रधनू
मदनाचे चाप चणू
गगनाशी धरणीचा जुळवितसे सहज दुवा... ऋतु हिरवा

शब्दांना मागुती या म्हणण्याची हुकुमत असणाऱ्या शांताबाईंनी या गाण्यातल्या सुरांचा शब्दांशी किती सहज दुवा जुळवलाय. त्यांनी कविता उत्तम लिहिल्याच आणि त्यांची गाणीही सर्वव्यापी आहेत. ये रे घना हे आरती प्रभूंचं अर्धवट गीत पूर्ण करण्याची जबाबदारीही त्यांनी सहज पेलली होती. नभ उतरु आलं, चिंब थरथर वलं, अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात हे भन्नाट शब्दही त्यांचेच. 

या गाण्यातही त्यांची प्रतिभा श्रावणातल्या निसर्गासारखीच बहरलीय. खऱंतर श्रीधरजी-आशाताई-शांताबाई यांनी हे श्रावणगाणं खूप आवडावं असंच करून ठेवलंय. ज्याची लज्जत प्रत्येक श्रावणात अधिकच वाढते... मग, ज्यांना ते आवडत नाही त्यांचं काय?
तर त्यांना तेवढी शिक्षा पुरेशी आहे... !!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT