house wife responsibility skillfull sucide report health women
house wife responsibility skillfull sucide report health women  sakal
सप्तरंग

मी गृहिणी...

अवतरण टीम

तिचं सगळं बोलून झाल्यावर मी तिला दुसरा प्रश्न विचारला, ‘‘तुम्ही काय करता?’’ त्यावर ती इतक्या निराशेने उद्गारली की ‘‘काही नाही!! हाऊसवाईफ आहे मी!’’

- सोनाली लोहार

‘गृहिणीपण’ हा अत्यंत जबाबदारीचा, कौशल्याचा आणि अत्यंत कठीण असा पेशाच म्हणायला हवा. एक घर सांभाळणं हे एखादा उद्योग सांभाळण्याइतकंच क्लिष्ट काम आहे, त्याला कधीच कमी लेखू नये. ती अत्यंत अभिमानाने सांगण्यासारखीच गोष्ट आहे, मात्र ते करताना गृहिणीने आपलं ‘स्वत्व’ मात्र कधीही हरवू नये.

प रवा क्लिनिकमध्ये एक तिशीतली तरुणी आली. अगदी कंटाळलेली, त्रासलेली. बऱ्याच दिवसांपासून तिचा आवाज बसला होता. ‘काय होतंय’ विचारल्यावर त्या बसलेल्या आवाजातच ती बोलत राहिली, ‘‘चिडचिड होते, अचानक तोल जातो, घरातले ऐकत नाहीत,

जोरजोरात बोलणं होतं, डोक्यात सतत कसली तरी चिंता असते, उदास वाटतं.’’ तिचं सगळं बोलून झाल्यावर मी तिला दुसरा प्रश्न विचारला, ‘‘तुम्ही काय करता?’’ त्यावर ती इतक्या निराशेने उद्गारली की ‘‘काही नाही!! हाऊसवाईफ आहे मी!’’

२०१८ च्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या रिपोर्टनुसार देशातील एकूण आत्महत्येच्या प्रकरणांमधील १७.१% बळी या ‘गृहिणी’ होत्या. हे प्रमाण पुढे वाढलं. २०२१ मध्ये फक्त स्त्रियांपुरतंच बघितलं तर आत्महत्या केलेल्या एकूण स्त्रियांपैकी ५१.५% (२३ हजार १७८) या ‘गृहिणी’ होत्या. या विषयाकडे अतिशय गांभीर्याने आणि संवेदनशीलतेने बघण्याची नितांत आवश्यकता आहे.

या दुर्दैवी घटनांसाठी कौटुंबिक, वैवाहिक आणि हुंडाविषयक समस्यांसोबतच नैराश्य-चिंता यांसारख्या मानसिक समस्याही प्रामुख्याने कारणीभूत ठरताना दिसत आहेत. आपल्याकडे जवळपास ५० टक्क्यांहून अधिक विवाह हे ‘ठरवून’ केलेले असतात. अगदी मुलगी बघण्याचा कांद्या-पोह्याचा कार्यक्रम ते देणं-घेणं, मानपान इत्यादी. यात पहिला प्रश्न असतो ‘‘मुलगी काय करते?’’

वाढत्या महागाईच्या काळात कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा म्हणून आजकाल बहुतांशी वरपक्ष नोकरी करणारी अथवा ‘कमावती’ मुलगी हवी, अशी अट टाकूनच येतात; पण यालाही काही अपवाद असतात. म्हणजे, ‘‘आमच्याकडे बाईमाणसाने बाहेर जाऊन पैसे कमवायची पद्धत नाही, त्यासाठी पुरुष मंडळी आहेत’’

किंवा ‘‘येणाऱ्या मुलीने सासू-सासरे, मूलबाळ, पैपाहुणे सांभाळावेत, करिअरिस्टिक मुलगी नको’’ किंवा याहीपेक्षा पुढे जाऊन, ‘‘मुलगा फिरतीवर इ. असतो, घरी आई-वडिलांकडे देखभाल करायला बाईमाणूस हवंय’’ इथवर. अशा मंडळींच्या ‘वधू पाहिजे’ या जाहिरातींमध्ये सुशील, मनमिळावू आणि ‘घरेलू’ ही अट प्रामुख्याने असते.

अर्थात काही मुलींनाही गृहिणी म्हणूनच राहण्याची मनापासून इच्छा असते; पण हल्ली ते प्रमाण कमी होत चाललंय. जसजसं शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रात मुलींचं पाऊल पुढे पडतंय तसतसं त्यांच्या इच्छा या महत्त्वाकांक्षेचे रंग लेऊ पाहताहेत आणि ही खरंतर अत्यंत सुखदायी बाब आहे; परंतु दुर्दैवाने ज्या वेगाने प्रगतीचा हा प्रवास घडतोय, त्या वेगाने सामाजिक मानसिकता मात्र अजूनही बदलताना दिसत नाही.

अगदी कमी वयात केले जाणारे विवाह, अपरिपक्व वयात येणार मातृत्व, त्यासोबत होणारे शारीरिक-मानसिक बदल, वैवाहिक जीवनासोबत येणाऱ्या असंख्य भूमिकांबाबतच्या सामाजिक चौकटी व अपेक्षा आणि कठोर सामाजिक मानसिकता हे सगळं आजही कमी-अधिक प्रमाणात सर्वत्र आहेच. सध्या आसाममध्ये सुरू झालेली ‘बालविवाहविरोधी मोहीम’ हे त्याचं जिवंत उदाहरण.

दुर्दैवाने या सर्वच बाबीत पीडित महिला / गृहिणी ही बाहेर येऊन बोलायला आजही घाबरतेय. तिच्यासमोर ‘लोक काय म्हणतील’ हा मोठा प्रश्न असतोच; परंतु त्याहूनही मोठा प्रश्न असतो तो ‘आर्थिक दुर्बलतेचा’. बहुतांशी गृहिणी या संपूर्णतः आर्थिकदृष्ट्या परावलंबी असतात आणि याच शस्त्राचा वापर हा बरेचदा त्या गृहिणीचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठीही केला जातो. अशा घरांमध्ये मग शारीरिक हिंसाचाराच्या घटनाही घडत असतात; पण त्याची कधीही वाच्यता होत नाही.

संस्कृतमध्ये एक फार सुंदर श्लोक आहे :

न गृहं गृहमित्याहु: गृहणी गृहमुच्यते।

गृहं हि गृहिणीहीनं अरण्यं सदृशं मतम्।

चार भिंतींना जी ‘घर’ बनवते ती गृहिणी. तिच्याविना त्या चार भिंती या जंगलासमान असतात. खरोखरच ‘गृहिणीपण’ हा अत्यंत जबाबदारीचा, कौशल्याचा आणि अत्यंत कठीण असा पेशाच म्हणायला हवा. एक घर सांभाळणं हे एखादा उद्योग सांभाळण्याइतकंच क्लिष्ट काम आहे, त्याला कधीच कमी लेखू नये. ती अत्यंत अभिमानाने सांगण्यासारखीच गोष्ट आहे, मात्र ते करताना गृहिणीने आपलं ‘स्वत्व’ मात्र कधीही हरवू नये. छोट्या-मोठ्या स्वरूपात का होईना, पण आर्थिक स्वावलंबनही शिकावे आणि कुठलीही घुसमट होत असेल, तर त्याला त्वरित वाचाही फोडावी.

आमच्या क्षेत्रात व्यावसायिक कारणांसाठी आवाज वापरणाऱ्या वर्गाला ‘प्रोफेशनल व्हॉइस युजर्स’ म्हणतात. येत्या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘एक उच्च दर्जाचे प्रोफेशन’ म्हणून गृहिणीपदालाही या वर्गात मी समाविष्ट करू इच्छिते!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT