Waghnakh sakal
सप्तरंग

वाघनख : एक अभ्यास!

शिवचरित्रातील अनेक वादांपैकीच एक म्हणजे, शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला त्या वेळी त्यांनी वाघनखे वापरली की नाही, हा आहे.

अवतरण टीम

- इंद्रजित सावंत

राज्य सरकार इंग्लंडच्या वस्तुसंग्रहालयातून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लवकरच आणणार आहे. प्रसिद्ध इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी आपल्या ‘शोध भवानी तलवारीचा’ या शोधग्रंथात वाघनखांवर आधारित एक प्रकरण लिहिले आहे. त्यात या शस्त्रावर प्रकाश टाकण्यात आला आहे. आपले काही निष्कर्षही नोंदवले आहेत. शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला तेव्हा वाघनखे वापरली की नाहीत, याचा उलगडा त्यातून होत जातो...

शिवचरित्रामध्ये अनेक वाद-विवाद विनाकारण घर करून बसलेले आहेत. अपुऱ्या अभ्यासाआधारे शिवचरित्रातील एखाद्या गोष्टीविषयी आपले ठाम मत मांडणे किंवा ऐतिहासिक साधने स्पष्ट माहिती देत असताना विनाकारण एखाद्या घटनेविषयी संभ्रम निर्माण होईल, असे निष्कर्ष काढणे, अशा गोष्टी त्यास कारणीभूत आहेत.

शिवचरित्रातील अनेक वादांपैकीच एक म्हणजे, शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला त्या वेळी त्यांनी वाघनखे वापरली की नाही, हा आहे. भारतीय शस्त्रांचे आद्य अभ्यासक प्रा. माणिकराव हे शिवरायांनी वाघनखे वापरली की नाहीत, याविषयी अधिक अभ्यास व्हायला हवा, या मताचे होते. त्यांनी १९२७ मध्ये ऐतिहासिक हत्यारांवर लिहिलेल्या एका लेखातही ती शंका नोंदविली होती.

ते याविषयी लिहितात, ‘‘इतिहास संशोधकांच्या मते अफजलखानाच्या वधाच्या वेळी शिवरायांजवळ तलवार होती ती जमदाड नावाची. ती बरीच मोठी होती; परंतु शिवरायांनी अफजलखानाचा डूब घेऊन वार रोखल्याचे वर्णन आहे, त्यावरून आम्हास तरी असे वाटते की, हे हत्यार मोठी जमदाड नसून लहान जमघरच असावे व वाघनख्याऐवजी अफजलखानावर याचाच प्रयोग झाला असावा.

वार व सरक या बिनोटमधील दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी असून त्या श्री शिवबा पूर्ण जाणत होते, असे त्या युद्धप्रसंगाच्या रेखाटलेल्या शब्दचित्रावरून दिसते. तज्ज्ञांनी या गोष्टींकडे अधिक लक्ष दिल्यास तिचा अधिक निश्चयात्मक निकाल लागण्याचा संभव आहे. हे भयंकर हत्यार राजा जयसिंगांनी तयार केले.’’ पुढे त्यांनी वाघनखाचे वर्णन केलेले आहे. त्यांना वाघनख कसे मिळाले हे लिहिलेले आहे.

ते लिहितात, ‘श्री शिवबांनी अफजलखानापासून आत्मरक्षणार्थ वाघनखाचा उपयोग केला, असे सार्वत्रिक मत आहे. वाघनख म्हणजे पोलादी पट्टीवर पाव इंच अंतराने बसविलेली चार तीक्ष्ण नखे. प्रत्येक नख सव्वा इंच लांबीचे असून त्यास तिन्ही बाजूंनी शिरा व खालच्या बाजूला धार असते. नखे ज्या पट्टीत बसविली आहेत, तिच्या दोन्ही बाजूंस अंगठ्या आहेत. हे हत्यार हातात धरून मुठीत सहज लपविता येते.

आम्हास हे हत्यार टिपू सुलतान यांच्या घराण्यात नोकरीस असलेल्या सुबाप्पा नावाच्या पहिलवानाच्या वंशातील एका म्हाताऱ्या बाईकडून मिळाले. त्याचे ऐतिहासिक महत्त्व जाणूनच त्यास आम्ही दीडशे रुपये किंमत दिली.’

वाघनखाविषयी चर्चा-शंका आजपर्यंत अनेक संशोधकांनी व्यक्त केल्या आहेत. शिवचरित्राचा, त्यातील घटनांचा आणि त्याविषयीच्या साधनांचा कसून अभ्यास करणारे पुण्याचे ज्येष्ठ संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांनी आपल्या शिवचरित्रात ‘या वेळी शिवरायांनी वाघनखं वापरली नाहीत’ असे ठामपणे प्रतिपादन केले आहे.

ते आपल्या शिवचरित्रात लिहितात, ‘अफजलखानाला शिवाजीराजांनी मारले. ते नेमके कसे मारले याविषयी विविध साधनांमधील हकिकतींमध्ये थोडाबहुत फरक आहे. त्याप्रसंगी हजर असणाऱ्या कोणाही व्यक्तीने त्या प्रसंगाची हकिकत लिहून ठेवलेली नाही किंवा लिहून ठेवली असलीच तर ती आपल्याला मिळालेली नाही. त्यामुळे त्याबाबत निश्चितपणे काहीच सांगता येणार नाही; पण त्यातल्या त्यात शिवाजीराजांनी अफजलखानाला मारण्याकरिता वाघनखे वापरली असण्याची शक्यता फार कमी वाटते.

असे शस्त्र शत्रूच्या नजरेतून लपून राहणे कठीण होते. ते उघडकीला आले असते, तर शिवाजीराजांचा सर्वच बेत फसला असता. शिवाय त्या शस्त्राचा परिणाम प्राणघातक झाला असता, असेही वाटत नाही. तलवार आणि बिचवा (किंवा कट्यार, खंजीर) यापैकी बिचव्याच्या बाजूला पुराव्यांचे बहुमत आहे.

राजांनी अफजलखानाच्या पोटात तलवार खुपसली, असे फक्त शिवभारतात सांगितले आहे. पण अशा बाबतीत साधनांच्या संख्येपेक्षा गुणवत्तेला अधिक महत्त्व आहे आणि गुणवत्तेच्या बाबतीत शिवभारत या प्रसंगावरील इतर सर्व साधनांपेक्षा सरस आहे. म्हणून, प्रत्यक्ष साक्षीदाराच्या अभावी, मी शिवभारतातील हकिकत प्रमाण मानतो.’

खरे तर आजपर्यंत संशोधकांनी याविषयी सखोल अभ्यास करून आपली मते मांडली आहेत, असे दिसून येत नाही. प्रा. माणिकरावांनी याविषयी लिहिताना आपले मत हे मोघम मांडले असल्यामुळे व पुरावे दिले नसल्यामुळे त्यांच्या लिखाणावर मात्र चर्चा करणार नाही; पण मेहेंदळे यांच्या मांडणीवर मात्र चर्चा करणे गरजेचे आहे.

मेहेंदळे यांच्या मतानुसार असे शस्त्र (वाघनख) शत्रूच्या नजरेतून लपून राहणे कठीण होते. ते उघडकीला आले असते तर शिवाजीराजांचा सर्वच बेत फसला असता. शिवाय त्या शस्त्राचा परिणाम प्राणघातक झाला असता, असेही वाटत नाही. हे मत मांडताना मेहेंदळेंनी वाघनख हे शस्त्र स्वतः हाताळून पाहिले नसावे, असे वाटते. नाही तर असे शस्त्र शत्रूच्या नजरेतून लपून राहणे कठीण होते, अशी वाक्ये त्यांनी लिहिली नसती.

वाघनख हे शस्त्रच मुळात शत्रूला न दिसता वापरता यावे, यासाठी तयार करण्यात आले आहे आणि त्याचा उपयोग प्राणघातक नसला, तरी तो एखाद्याला जायबंदी करण्यासाठी तर निश्चितच होऊ शकतो. असे हे शस्त्र हाताळून पाहिल्यानंतर हे स्फटिकासारखे स्पष्ट होते. शिवाय शिवभारतकाराने म्हटल्याप्रमाणे शिवरायांनी खानाची आतडी तलवारीने बाहेर काढली.

पण तोच शिवभारतकार यावेळी खानाने व शिवरायांनी आपल्या तलवारी आपल्या सेवकांकडे दिल्याचे लिहितो. ज्या वेळी खानाने शिवरायांना आलिंगन दिले त्यावेळी शिवरायांकडे तलवार नव्हती, हे सभासद व अज्ञानदासाचा पोवाडा, जेधे शकावली, शिवभारत अशी अनेक साधने सांगतात. मग खानासारख्या ताकदीने जोरावर असणाऱ्या योद्ध्याच्या मगरमिठीतून शिवराय आपल्या बाहुबळाच्या आधारे सुटले, असे ग्राह्य धरावे लागेल; पण हे साधनांच्या आणि तर्काच्या कसोटीवर सुसंगत ठरणार नाही.

तीव्र धार असणाऱ्या नख्या खानाच्या शरीरात घुसल्यावर त्याची पकड निश्चितच ढिली पडणे साहजिकच आहे. या संधीचा फायदा घेऊन शिवरायांनी खानाच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली आणि नंतर बिचव्या, कट्यार, पट्ट्यासारख्या शस्त्रांच्या सहाय्याने त्याचा वध केला. या वेळी खानाला ठार मारण्यासाठी नाही तर त्याच्या नकळत त्याला चकित करण्यासाठी शिवरायांनी वाघनखाचा उपयोग करून घेतला होता.

अफजलखानाने आपल्या अंगात फक्त अंगरखा (झगा) घातला होता. त्याने शिवरायांनी जशी चिलखत घालून आपल्या संरक्षणाची व्यवस्था केली होती तशी केलेली नव्हती. अफजलखानाची म्हणून प्रसिद्ध असलेली चित्रे पाहिल्यानंतर तो शरीराने लठ्ठ होता हे आपणास समजून येते. त्यामुळे वाघनखासारख्या धारदार शस्त्राने खानाची चरबी सहज बाहेर येऊ शकत होती आणि तशी ती आलीही.

अफजलखानाला वाघनखे व कट्यारीने आतडी काढून जायबंदी केल्यानंतर लगेचच शिवरायांनी आपल्या हातात पट्टा चढविला होता. कारण अफजलखानाला गळाभेट देताना पट्टा किंवा तलवार हातात घेऊन ती देणे शक्य नव्हते. ते संकेताला सोडून होते. मेहेंदळेंच्या तर्कासाठी अशी तलवार व पट्टा ही शस्त्रे घेऊन महाराज खानाला भेटले, असे मानले तर खानाने महाराजांची मान कवटाळून धरल्यावर महाराज तशाही स्थितीत खानाच्या मिठीतून सुटले व त्यांनी खानाला तलवारीने भोसकून त्याची आतडी बाहेर काढली, असे मानावे लागेल.

दुसरा तर्क म्हणजे, शिवराय खानाला भेटले त्या वेळी त्यांनी आपल्या हातात नंगी तलवार घेतली होती. नंगी तलवार घेऊन ते खानाला भेटले व खानानेही अशी भेट घेतली हे मान्य करावे लागेल; पण ते हास्यास्पद ठरेल. या भेटीत वाघनखासारखे गुप्त शस्त्र वापरले की नाही, असे अनेक प्रश्न निर्माण होतात व त्यांची उत्तरे ही अतार्किक व हास्यास्पद अशी मिळतात. त्यामुळे त्या वेळी शिवरायांनी वाघनखे तर वापरलीच; पण कट्यार, पट्टा, तलवार अशा शस्त्रांचाही उपयोग केला हे मान्य करावे लागते.

शिवभारत सोडून या द्वंद्वयुद्धाची माहिती देणाऱ्या मराठ्यांकडील आणि इतर समकालीन साधनांतही शिवरायांनी यावेळी वाघनखे किंवा एक गुप्त शस्त्र वापरल्याचे लिहिले आहे. अफजलखानाच्या वधाच्या प्रसंगी महत्त्वाची भूमिका बजावलेले कान्होजी जेधे घराण्यातील एका करिन्यात लिहिले आहे, ‘अफजलखानाने राजश्री स्वामींची (शिवाजी महाराजांची) मान बगलेस धरीली तेंव्हा राजश्रींनी पंजास पोलादी वाघनखे घातली होती. त्याचा मारा करून आतडी बाहेर काढली तेंव्हा मान सोडवून पट्टा राजश्रींनी हाती घेतला.’ या करिन्यातील पोलादी वाघनखे हा शब्द महत्त्वाचा आहे. कारण आज उपलब्ध असणारी शिवकालीन वाघनखेही पोलादाचीच आहेत.

ज्याने शिवरायांची कारकीर्द पाहिली आणि आपल्याला मराठीतील ज्ञात असलेले पहिले शिवचरित्र लिहिले तो सभासद आपल्या शिवचरित्रात लिहितो, ‘राजियाने भेटी देता खानाने राजियाची मुंडी कवटाळून खाली धरीली आणि हाताची जमदाड होती, तिचे मेन टाकून ती कुशीस राजियाचे चालविली. ती अंगात जरीची कुडती होती त्यावरी खरखरली. अंगास लागली नाही हे देखोन राजियांनी डावे हाताचे वाघनख होते तो हात पोटात (खानाच्या) चालविला. खानाने अंगात झगाच घातला होता. वाघनखाचा मारा करीताच खानाची चरबी बाहेर आली.’’

अज्ञानदास नावाच्या एका शाहिराने या युद्धावर पोवाडा रचला होता. त्यातही शिवरायांनी यावेळी वाघनखे वापरल्याचे म्हटले आहे. अफजलखान वधानंतर अवघ्या सातव्या वर्षी शिवरायांना भेटलेल्या त्यांच्यासंगे स्वतः बोललेल्या निकोलाय मनुची आणि शिवरायांची भेट इ. स. १६६६ मध्ये झाली होती. त्याचा वृत्तांत त्याने लिहून ठेवला आहे. आपल्या ‘स्टोरी द मोगल’ या ग्रंथात याविषयी लिहिले आहे. त्याने केलेल्या वर्णनावरून यावेळी शिवरायांनी वाघनखे वापरल्याचे स्पष्ट होते.

मनुची लिहितो, ‘शिवाजीने एक अणकुचीदार अग्र तयार करून घेतले. त्याच्या टोकाला अंगठीचा आकार देऊन वर खडा बसविलेला होता. ही अंगठी बोटात घातली की ते अग्र हातात लपून जात होते. अफजलखान उंच व बराच लठ्ठ असल्यामुळे शिवाजीचे हात त्यांच्या हातांच्या खाली होते. त्याने वेगाने व जोराने अफजलखानाचे पोट डावीकडून उजवीकडे फाडले. त्यामुळे अफजलखानाची आतडी बाहेर आली.’

तारीके दिल्कुशा या ग्रंथातही वाघनखांचा उल्लेख आलेला आहे. या ग्रंथाचा कर्ता व औरंगजेबाचा सेवक असणाऱ्या भीमसेन सक्सेना याने आपल्या वरील ग्रंथात लिहिले आहे, ‘कराराप्रमाणे तंबूत दाखल झाल्यानंतर ऐन आलिंगनाच्या वेळी शिवाजीने आपल्या हातातील शस्त्राने (याला वाघनख अथवा बिचवा असे दक्षिणी लोक म्हणतात) अफजलखानाच्या पोटावर इतके आघात केले, की त्याची आतडी बाहेर आली.’

अफजलखानाला मारल्यानंतर त्याची बातमी मुंबई-वेंगुर्ला इथे व्यापार करणाऱ्या इंग्रज आणि डचांनाही लागली. त्यांची त्यावेळची लिहिलेली पत्रे उपलब्ध आहेत. त्यात ‘एका लपविलेल्या शस्त्राच्या साह्याने अफजलखानाचे पोट असे फाडले की त्याची आतडी बाहेर आली’ असा उल्लेख आहे.

केवळ शिवभारताचा आधार घेऊन यावेळी शिवरायांनी वाघनखे वापरली नाहीत हे ठामपणे मांडले जाते, हे इतिहास लेखनशास्त्राच्या कसोटीत उतरत नाही. उलट सुसंगत तर्क व त्याला सभासद, जेधे करिना, मनुची, डचपत्र, भीमसेन सक्सेना, अज्ञानदास अशा अनेक समकालिनांच्या साक्षीने यावेळी शिवरायांनी वाघनखे वापरल्याचे स्पष्ट होते.

विश्वातील अनेक वस्तुसंग्रहालयात वाघनखे ठेवलेली आढळतात आणि त्या सर्व वाघनखांच्या वर्णनांत वाघनखे शिवाजी महाराजांनी अफजलखान वधावेळी वापरल्याचे लिहिलेले आहे. शिवरायांच्या सैन्यात वाघनखांचा सर्रास उपयोग होत असे. जयराम पिण्डेकृत ‘पर्णालपर्वतग्रहणआख्याण’ या ग्रंथातही वाघनखांचा उल्लेख आहे. स्वराज्य रक्षणासाठी झटलेल्या रामचंद्रपंत अमात्यांनीही अशी वाघनखे स्वतःजवळ ठेवल्याचे त्यांच्या मृत्यूनंतर वाटणीच्या वेळी केलेल्या यादीवरून समजते.

शिवरायांनी अफजलखान वधावेळी वापरलेली वाघनखे आज कुठे आहेत, याचा नेमका ठावठिकाणा सांगता येत नाही; पण इंग्लंडस्थित व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये शिवरायांची म्हणून एक वाघनखे ठेवलेली असून ती या म्युझियमपर्यंत कशी पोहोचली याचा सुगावाही आपणास लागतो. ती वाघनखे या म्युझियमला मराठ्यांचा आद्य इतिहासकार ग्रँट डफ यांचा वंशज अँड्रियन ग्रँट डफ यांच्याकडून भेट म्हणून मिळालेली होती.

जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ हा मराठ्यांचा इतिहास लिहिणारा इंग्रज अधिकारी सातारा संस्थानचा रेसिडेंट म्हणून काम करत होता. त्यावेळी त्याची आणि छत्रपती प्रतापसिंह महाराजांची दोस्ती झाली होती. त्यातूनच प्रतापसिंह महाराजांनी ग्रँट डफला आपल्याकडील एक वाघनख भेट दिले होते.

तेच वाघनख अँड्रियन ग्रँट डफने व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्युझियमला भेट दिले... प्रतापसिंह महाराजांनी ग्रँट डफला जसे वाघनख भेट दिले तसे त्यांनी ज्याच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचे राज्य इंग्रजांनी जिंकून घेतले त्या माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनलाही एक वाघनख भेट म्हणून दिलेले होते. याची नोंद स्वतः एल्फिन्स्टनने एका पत्रात केली आहे.

ग्रँट डफ आणि एल्फिन्स्टनना भेट दिलेली वाघनखं सोडून शिवाजी महाराजांची म्हणून ओळखली जाणारी आणखी दोन वाघनखं इ. स. १९१९ पर्यंत तरी सातारकर छत्रपतींच्या राजवाड्यात पाहावयास मिळत होती. डफने त्याचा मार्गदर्शक माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनचेच नाव आपल्या मुलाला ठेवले होते.

ग्रँट डफने आपले मराठ्यांचा इतिहास हे पुस्तकही एल्फिन्स्टनलाच अर्पण केले आहे. इ. स. १८७४ मध्ये हा डफचा मुलगा भारत भेटीवर आला होता. त्यावेळी त्याने सातारा येथील राजवाड्याला भेट दिली होती. त्या वेळी या ठिकाणी दोन वाघनखंही पाहिली होती. त्याचे वर्णन त्याने आपल्या ‘नोट्स ऑफ इंडियन जर्नी’ या पुस्तकात लिहून ठेवले आहे.

आज व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये असणारी वाघनखेही शिवरायांची आहेत याला अजूनपर्यंत तरी सबळ पुरावा नाही. कारण अशा पद्धतीची वाघनखे प्रतापसिंह महाराजांनी ग्रँट डफ व एल्फिन्स्टनला दिली होती. इ. स. १८२६ च्या अगोदर आणि त्यानंतर इ. स. १८४४ पर्यंत शिवरायांची म्हणून ओळखली जाणारी दोन वाघनखे सातारा छत्रपतींकडे होती, हे निश्चित.

त्यामुळे शिवरायांच्या हाताच्या वाघनखांचा शोध सातारकर छत्रपतींच्या शिलेखान्यातूनच घेतला पाहिजे. पण इंग्लंडच्या म्युझियममध्ये असणारी वाघनखेही छत्रपती घराण्यातीलच आहेत, हे लक्षात ठेवून ती परत मिळविण्याचा प्रयत्नही केला पाहिजे. वाघनखांच्या बाबतीत मी खालील निष्कर्षापर्यंत आलो आहे...

१) वाघनख हे पोलादाचे बनलेले असते. प्राचीनकाळात त्याचा उल्लेख मिळत असला, तरी अशा पद्धतीचे शस्त्र तयार करण्याचे आणि त्याचा प्रभावीपणे उपयोग करण्याचे श्रेय शिवरायांकडेच जाते.

२) शिवरायांनी अफजलखानाचा वध केला त्यावेळी वाघनखाचा उपयोग केला होता.

३) शिवकाळात वाघनखांचा उपयोग होत होता. त्यामुळेच रामचंद्रपंत अमात्यांसारख्या मुत्सद्दी व्यक्तीकडेही वाघनखे होती.

४) आज जगभरातील अनेक वस्तुसंग्रहालयात वाघनखे ठेवलेली आहेत. ती सर्वच शिवकाळातील नसली, तरी त्यांचा आणि शिवरायांचा संबंध जोडला गेला आहे.

५) अजूनपर्यंत शिवरायांचे म्हणून असणारे वाघनख उजेडात आलेले नाही. त्याचा शोध सातारकर छत्रपतींच्या शिलेखान्यात घेतला पाहिजे.

६) वाघनखाचे दोन नख्या असणारे, तीन नख्या असणारे, चार नख्या असणारे, पाच नख्या असणारे असे अनेक प्रकार पाहावयास मिळतात.

७) वाघनख तयार करताना केलेला अभ्यास हा आपल्या पूर्वजांची महानता दृढ करणारा आहे.

indraswords@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

Asia Cup 2025 Super 4 Schedule: भारतीय संघ कोणत्या तारखांना कोणाला भिडणार? जाणून घ्या सुपर ४ चं संपूर्ण वेळापत्रक

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

SCROLL FOR NEXT