Jayant Sonone writes Achalpur village Stone throwing in two groups  Now there is  riot
Jayant Sonone writes Achalpur village Stone throwing in two groups Now there is riot sakal
सप्तरंग

गाव देवांचे होते; आता दंगलीचे झाले!

अवतरण टीम

प्राचीन काळी ईल नावाच्या एका हिंदू राजाची अचलपूर राजधानी होती. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या या शहराला समृद्ध इतिहास आहे तो लेखक, कवी, साहित्यिक आणि संतांचा. अचलपूर ही महाकवी भारवी या संस्कृत पंडिताची कर्मभूमी आणि उत्तर रामचरित नाटकाचा कर्ता भवभूतिची संचारभूमी व प्रचारभूमी. अनेक प्राचीन हेमाडपंथी मंदिरे, देवस्थाने येथे आहेत. ऐतिहासिक पार्श्वभूमी, सुसंपन्न जमीन, प्रसिद्ध हातमाग, समृद्ध ऐतिहासिक वास्तू अशा अनेक अर्थाने समृद्ध असलेलं हे गाव गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे ते दंगलीमुळे...

निसर्गसौंदर्याची पार्श्वभूमी लाभलेली पर्वतराजी हे अचलपूर-परतवाडा या दोन जुळ्या शहराचे भूषण. सापन आणि बिच्छन या दोन नद्यांनी वेढलेले अमरावती जिल्ह्यातील अ वर्गीय नगरपालिका असलेले हे शहर अनेक अर्थाने सातत्याने चर्चेत असते. फार प्राचीन काळी ‘ईल’ नावाच्या एका हिंदू राजाची अचलपूर राजधानी होती. त्यामुळे प्रथम अचलपूरचे नाव इलीचपूर, त्यानंतर पुढे एलीचपूर, अळजपूर आणि कालांतराने अचलपूर असे झाले. ऐतिहासिक पार्श्वभूमी, सुसंपन्न जमीन, प्रसिद्ध हातमाग, समृद्ध ऐतिहासिक वास्तू अशा अनेक अर्थाने समृद्ध असलेलं हे गाव मागील दोन दशकांपासून चर्चेत आहे ते दंगलीमुळे.

दोन दिवसांपूर्वी ऐतिहासिक दुल्हा गेटवरील झेंडा काढल्याने येथे दोन गटांत दगडफेक झाली आणि सर्वसामान्य लोक झोपेत असताना दंगल पेटली. रामनवमी, हनुमान जयंती व भीम जयंती उत्साह व शांततापूर्ण वातावरणात पार पडल्यानंतर या दंगलीची माहिती अनेकांना पहाटे संचारबंदीची माहिती सांगणारे वाहन फिरल्यानंतरच मिळाली.

अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरांना संचारबंदीची आता सवयच झाली असावी. २००७ मध्ये नवरात्रोत्सवात अशाच प्रकारे मिरवणुकींवर अचानक दगडफेक झाल्याने गावात दंगल पेटली होती. नव्याने उभे राहिलेले अनेकांचे व्यवसाय, स्वप्न व आयुष्य कायमचेच प्रभावित झाले. त्यानंतर बटाऊवाले हत्याकांड, शामा पहेलवाल प्रकरण, कोरोना संचारबंदी, अमरावती दंगलीच्या पडसादाने संचारबंदी व आता झेंडा काढण्याच्या वादावरून निर्माण झालेल्या तणावाने सर्वसामान्यांचे जगणे मुश्‍कील केले.

जातीय द्वेष आणि धार्मिक दंगलीने अचलपूरचे वातावरण कलुषित झालेले असले, तरी या अचलपूरला खरा आणि समृद्ध इतिहास आहे तो लेखक, कवी, साहित्यिक आणि संतांचा. अचलपूर ही महाकवी भारवी या संस्कृत पंडिताची कर्मभूमी आणि उत्तर रामचरित नाटकाचा कर्ता भवभूतिची संचारभूमी व प्रचारभूमी. श्री संत कल्याण स्वामींचे (संत रामदास स्वामींचे शिष्य) सत्शिष्य पू. भोलाराम महाराजांनी स्थापित केलेली शेणापासून घडविलेली श्रीमारुतीची मूर्ती आजही श्री राममठात (माळवेशपुरा) विराजमान आहे. अशीच श्री कार्तिक स्वामींची नखशिखांत पाषाण मूर्ती तसेच अनेक प्राचीन हेमाडपंथी मंदिरे/देवस्थाने येथे आहेत. धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेली अचलपूर ही प्राचीन भूमी आहे.

अचलपूर म्हणजे जुनी वस्ती- ज्यात एकूण ५२ मोहल्ले (पुरे) अजूनही आहेत. नोकरी व्यवसाय आणि शिक्षणासाठी खेड्यातून अचलपुरात येणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे आता अचलपुराचा विस्तार प्रचंड वेगाने झाला. येथील कष्टकरी समाजाचा मुख्य व्यवसाय म्हणजे हातमाग आणि शेती. गरीब पण अत्यंत धार्मिक वृत्तीचा हा समाज आहे. ७५-८० वर्षांपूर्वी वसलेले मिलिटरी कॅम्प आणि न्यायालय इत्यादी कार्यालये इथे आहेत. त्यामुळे वकिलांची वस्ती, त्यानंतर वाहतुकीची सोय म्हणून बहुतेक सर्वच सरकारी कार्यालये तसेच बँका इत्यादीमुळे वस्ती वाढत गेली.

समृद्ध इतिहासाची पाने चाळत असताना अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरांत गायन, कला, नाट्यकला इत्यादींचा आविष्कार येथे नांदत होता. बाविशी, बावनएक्का, छत्तिशी ही नाट्यगृहे आजही भग्नावस्थेत, परंतु बालगंधर्वांच्या आणि स्थानिक रंगकर्मींच्या स्मृतींची साक्ष ठेवून आहेत. बालगंधर्व, शिलेदार इ. नाट्य मंडळी इथे दोन-तीन महिने मुक्कामाला असत. त्यांची बडदास्त ठेवणारी श्रीमंत, उदार आणि रसिक पिढी त्या वेळी होती. लाऊडस्पीकरची व्यवस्था त्या वेळी नसायची. त्यामुळे नाट्य मंदिरातील व्यासपीठावरून बोललेली साधारण आवाजातील वाक्येही शेवटच्या व सर्व प्रेक्षकांना ऐकू जावीत अशी रचना (High fidelity Sound System) असलेली नाट्यगृहे बांधलेली होती. अर्धवर्तुळाकार आणि दोन-तीन मजले असलेली प्रेक्षक गॅलरी; संपूर्ण मजबूत सागवानी लाकूड वापरून बनविलेली अशी होती. आमच्या वडील व आजोबांनी हे कलावैभव डोळ्यांनी पाहिले आणि अनुभवले आहे. सद्यस्थितीत मात्र तेथील जमिनीचे प्लॉट पाडून तेथे बांधकाम केलेले असल्यामुळे ते वैभव आता स्वप्नवत वाटते.

परतवाडा नगराचे आयुर्मान हे जरी ७५-८० वर्षांचे असले, तरी इथेही पूजनीय श्री संत गुलाब बाबा, सुप्रसिद्ध साहित्यिक पु. भा. भावे, गो. नि. दांडेकर अशा दिग्गजांची ही जन्मभूमी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आजोळ परतवाडा शहरात असल्याची नोंद सापडते. या ठिकाणी प्रबोधनकार ठाकरे यांनीसुद्धा काही काळ वास्तव्य केले असल्याची माहिती तेथील नागरिक देतात.

महानुभाव पंथाचे उद्गाते श्री चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत अष्टमासिद्धी या मंदिराचे महत्त्व आजही कायम आहे. श्री दत्तमंदिर (भूलभुलय्या) सारखी इतरही मंदिरे आहेत. कै. तात्यासाहेब देशपांडे यांच्या वाड्यात आजही श्रीनृसिंह जयंतीला नृसिंह अवताराचे प्रकटीकरण होत असते. पूजनीय परमहंस बाबासाहेब गढीकर, वेदशास्त्रसंपन्न कीर्तनकेसरी पूजनीय भाऊसाहेब शेवाळकर यांची ही कर्मभूमी. मराठी वाङ्मयाचे सुप्रसिद्ध साहित्यिक विद्यावाचस्पती राम शेवाळकर हे भाऊसाहेबांचे कनिष्ठ चिरंजीव. ते म्हणायचे ‘मला पुनर्जन्म मिळालाच तर अचलपुरलाच मिळावा.’

अशी ही अचलपूर नगरीची कहाणी व इतिहास मात्र मागील दोन दशकांपासून या जुळ्या शहराला लागलेले धार्मिक द्वेष आणि जातीय दंगलीचे ग्रहण व त्यामुळे कलुषित झालेली मने समाजस्वास्थ्य बिघडवणारे आहे.

- जयंत सोनोने

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मतदानात महाराष्ट्र तळाला, आतापर्यंत झालेल्या मतदानात 'हा' मतदारसंघ आघाडीवर

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT