Santosh Mahadik and Swati Mahadik sakal
सप्तरंग

माझं अस्सल सोनं

परस्परांशी संवादाचं आणि हृदयाला भिडणारं असं माध्यम म्हणजे पत्र, हे समीकरण आजही आहे. पत्रातून साधल्या गेलेल्या संवादाला एक वेगळाच जिव्हाळा असतो. तोच जिव्हाळा वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न.

सकाळ वृत्तसेवा

- कालिंदी घोरपडे, saptrang@esakal.com

परस्परांशी संवादाचं आणि हृदयाला भिडणारं असं माध्यम म्हणजे पत्र, हे समीकरण आजही आहे. पत्रातून साधल्या गेलेल्या संवादाला एक वेगळाच जिव्हाळा असतो. तोच जिव्हाळा वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न. देशासाठी बलिदान करणाऱ्यांच्या कुटुंबातल्या व्यक्ती किंवा देशाच्या प्रगतीत आणि विकासात योगदान देणाऱ्या मान्यवर व्यक्ती या साप्ताहिक सदरातून पत्ररूपानं देशवासीयांशी संवाद साधतील.

कर्नल संतोष महाडिक या शूरवीराची आई म्हणून तुमच्याशी संवाद साधताना आज माझ्या भावना संमिश्र आहेत. एका बाजूला संतोषसारख्या असंख्य कर्तृत्ववान, कर्तबगार तरुणांच्या बळावर आपल्या देशाची आशादायक वाटचाल सुरू आहे. थक्क करणारी प्रगती देश साधतोय. वेगवेगळ्या क्षेत्रांत तरुण आपलं अस्तित्व सिद्ध करत आहेत.

प्रत्येक भारतीयाला अभिमानास्पद वाटाव्यात अशाच या साऱ्या गोष्टी आहेत. त्याच वेळी दुसऱ्या बाजूला भरकटलेल्या तरुणाईचं चित्रही मनाला अत्यंत वेदना देणारं आहे. पुढं काय होईल, ही चिंता मनाला ग्रासून टाकणारी आहे. मोबाईलचा अतिरेकी वापर, व्यसनाधीनता, वाढती गुन्हेगारी अशा घटना सामाजिक स्वास्थ्य हरवू पाहताना दिसतात.

खरं तर तरुण म्हणजे देशाचं आशास्थान. देशाचं भवितव्य याच पिढीच्या हातात आहे. तरुण जर क्रियाशील, कृतिशील असतील तरच समाजाला योग्य दिशा लाभेल. त्यासाठी त्यांच्यासमोर काही आदर्श असायला हवेत. हे आदर्श तरुणांनी स्वतःत रुजवले तर कितीतरी चांगल्या बाबी घडायला फारसा वेळ लागणार नाही.

याच अनुषंगानं विचार करताना मला नेहमीच माझ्या संतोषची आठवण येते. त्याचा चेहरा नजरेसमोर येतो. संतोषची आई म्हणून आनंदाचे अन् दु:खाचे क्षण माझ्या वाट्याला आलेले आहेत. एका बाजूला ‘वीरमाता’ म्हणून होणारा उल्लेख अन् त्याच वेळी पोटच्या मुलाच्या जाण्यानं निर्माण झालेली कायमची पोकळी...या दोन्ही गोष्टी अनुभवण्याची वेळ माझ्यावर आली आहे.

भारतीय लष्करातला एक अत्यंत धाडसी, हरहुन्नरी अधिकारी म्हणून संतोषनं मिळवलेला लौकिक हा माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. त्याच वेळी एक अतिशय सर्वगुणसंपन्न मुलगा आता परत कधीच दिसणार नाही, ही जाणीव काळीज सदैव कुरतडत राहते.

संतोषविषयी काय सांगावं, किती सांगावं अन् कसं सांगावं? त्याच्या आठवणी कधीही न संपणाऱ्या आहेत. आयुष्यभर पुरून उरतील अशाच आहेत त्याच्या आठवणी. त्या आठवताना मन विदीर्ण होतं. मात्र तरीही त्या सांगायलाच हव्यात असं मनोमन वाटत राहतं. संतोषसारखं आगळंवेगळं व्यक्तिमत्त्व हे नव्या पिढीला कळायलाच हवं. त्याच्याकडून प्रेरणा घेऊन आणखी असेच ‘संतोष’ देशासाठी तयार व्हायला हवेत. पराक्रम गाजवायला ते पुढं यायलाच हवेत, अशी माझी प्रामाणिक तळमळ आहे. त्यासाठीच संतोषच्या अखंड जिद्दीचा, अविरत मेहनतीचा अन् दुर्दम्य इच्छाशक्तीचा प्रवास हा मांडायलाच हवा.

सातारा तालुक्यातलं पोगरवाडी हे आमचं गाव. सातारा शहरातून सज्जनगडकडं जाताना वाटेत लागणारी ही छोटीशी वाडी. पती मधुकर हे साताऱ्यात टेलरिंगचं दुकान चालवत. विजया, जयवंत, अजित अन् संतोष ही माझी मुलं. आरंभीच्या काळात आम्ही सारेच पोगरवाडीत वास्तव्याला होतो. मात्र, पुढं काही दिवसांतच मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही साताऱ्याची वाट धरली. संतोष तीन वर्षांचा असतानाच त्याला इंग्लिश माध्यमाच्या बालवर्गात दाखल केलं. मात्र, त्याचा पहिलीचा प्रवेश मराठी माध्यमाच्या ‘जिजामाता प्रॅक्टिसिंग स्कूल’मध्ये घेतला.

संतोषच्या अंगी अगदी बालपणापासूनच इतर मुलांहून काहीसे वेगळे गुण दडलेले होते. त्या वेळी घडलेला एक किस्सा माझ्या अजूनही स्मरणात आहे. आम्ही साताऱ्यात राहायचो. तिथं एक उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्याचं कुटुंब होतं. त्यांच्याकडं चारचाकी गाडी होती. त्यांची मुलं नेहमीच टापटीप असायची. आम्ही एका छोट्या खेड्यातून आलेलो. स्वाभाविकच दोन्ही कुटुंबांतल्या राहणीमानात खूप मोठं अंतर होतं.

मात्र, संतोषचं अगदी तेव्हापासूनच बारकाईनं निरीक्षण असायचं. त्याचे विचारही वेगळेच असायचे. त्याच दिवसांत त्याला कुणीतरी ‘तू मोठेपणी कोण होणार?’ असं विचारलं, तेव्हा संतोषनं ‘मी मोठा झाल्यावर अधिकारी होणार’ असं उत्तर दिलं. कारण, शेजारच्या त्या कुटुंबाचा त्याच्यावर प्रभाव होता! मात्र, आपलं स्वप्न पूर्ण करण्याची धमकही त्याच्या अंगी बालपणापासूनच होती.

चौथीपर्यंतचं शिक्षण ‘जिजामाता प्रॅक्टिसिंग स्कूल’मध्ये पूर्ण केल्यानंतर त्यानं ‘अण्णासाहेब कल्याणी विद्यालया’त प्रवेश घेतला. त्याच दरम्यान तो सैनिक स्कूलची परीक्षाही उत्तीर्ण झाला. त्याच्या अधिकारीपदाच्या स्वप्नाची ती पायाभरणी होती. त्यानिमित्तानं एका अनोख्या संधीचं दार त्याच्यासाठी उघडलं गेलं होतं. उल्लेखनीय म्हणजे, त्याचा साताऱ्याच्याच सैनिक स्कूलमध्ये प्रवेश निश्चित झाला होता.

सैनिक स्कूलचं वातावरण कडक शिस्तीचं होतं. राज्याच्या, देशाच्या विविध भागांतून आलेले विद्यार्थी तिथं होतं. मात्र, या साऱ्यांत मागं राहील तो संतोष कसला? तिथंही त्यानं आपली चुणूक दाखवली. बॉक्सिंग असो, घोडेस्वारी असो वा अन्य कुठलाही खेळ असो, प्रत्येक ठिकाणी त्यानं ठसा उमटवला.

याच काळातल्या त्याच्या मनातल्या भावभावनांचं आणखी एक बोलकं उदाहरण नेहमीच आठवत राहतं. नववीच्या वर्गात असताना त्यानं लिहिलेली एक कविता हस्तलिखितात प्रसिद्ध झाली होती. ‘माणसानं मरावं’ असं त्या कवितेचं शीर्षक होतं. या कवितेतली पहिलीच ओळ अशी होती :

माणसानं मरावं, देशासाठी माणसानं मरावं, एकात्मतेसाठी

अर्थात्, संतोष हा केवळ कविता करून स्वस्थ बसणाऱ्यांपैकी नव्हता. कवितेतला शब्द न् शब्द त्यानं पुढच्या आयुष्यात अक्षरशः सार्थ करून दाखवला. सैनिक स्कूलमधलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यानं साताऱ्यातल्या ‘यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज’मधून पदवी मिळवली.

त्याच दरम्यान सैनिकी सेवेसाठीची परीक्षा उत्तीर्ण होऊन तो लष्करी सेवेत रुजू झाला. अगदी बालपणापासूनचं त्याचं स्वप्न साकार झालं. डेहराडूनमधलं अत्यंत खडतर असं प्रशिक्षण पूर्ण करून तो ‘कर्नल’ झाला. आमच्या कुटुंबासाठी तो आनंदाचा अन् अभिमानाचा क्षण होता.

त्याच काळात संतोषनं आम्हां कुटुंबीयांना आग्रा, दिल्ली, हृषीकेश, हरिद्वार, फत्तेपूर सिक्री आदी ठिकाणची सैर घडवून आणली. कुटुंबाविषयीची जशी त्याची भावना आपुलकीची, आत्मीयतेची होती, तशीच ती आपल्या मित्रमंडळींविषयीही होती आणि पोगरवाडी गावाविषयीही होती.

त्यामुळे तो सामाजिक कार्यातही नेहमीच अग्रेसर असायचा. दरम्यानच्या काळात, तो माझ्या वडिलांकडं आरे (ता. सातारा) या गावात दत्तक गेला. त्यामुळे कागदोपत्री तो ‘संतोष महाडिक’ या नावानं ओळखला जाऊ लागला.

हे सारं सुरळीत असतानाच २०१५ या वर्षातला १७ नोव्हेंबरचा दिवस आमच्यासाठी काळाकुट्ट ठरला. नियतीनं अनर्थ घडवला. होत्याचं नव्हतं झालं. दुःखाचा डोंगरच कोसळला आमच्यावर.

जम्मू-काश्मीरमधल्या कूपवाडा इथल्या त्या दुर्दैवी घटनेनं संतोषला आमच्यापासून कायमचं हिरावून नेलं. त्याच्या अंत्यविधीला हजारोंची गर्दी होती. देशाचे तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर हेदेखील सांत्वनासाठी पोगरवाडीत आले होते. पुढं काही दिवसांतच संतोषला मरणोत्तर शौर्यचक्र पदक मिळालं.

संतोषच्या पराक्रमाचीही कथा आता अमर झाली आहे. त्याची पत्नी स्वाती हीदेखील लष्करी सेवेत उच्च अधिकारी आहे. मुलगा स्वराज अन् मुलगी कार्तिकी हे सध्या उच्च शिक्षण घेत आहेत. संतोषच्या आठवणी जागवणारं अन् युवा पिढीला प्रेरणा देणारं यथोचित स्मारक व्हावं, हीच आता माझी एकमेव इच्छा आहे. त्यासाठी सरकारी पातळीवरून या कामाला गती मिळणं गरजेचं आहे.

त्याच्या स्मारकासाठी मी माझ्याजवळ असणारा सोन्याचा दागिनाही मोडायला मागं-पुढं पाहणार नाही. मुळात, संतोष हेच माझं खरंखुरं सोनं होतं. तेच आज या जगात नाही. त्यामुळे सोन्याच्या या दागिन्याचं अप्रूप मला आता उरलेलं नाही. संतोषचं कर्तृत्व, त्यानं प्रतिकूल परिस्थितीत घेतलेली भरारी जगासमोर येणं आवश्यक आहे; खासकरून त्याच्या या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा पाठ शालेय अभ्यासक्रमात असावा अशी माझी तीव्र मनोकामना आहे. सरकारी पातळीवर याबाबत प्रयत्न व्हायला हवेत.

(शब्दांकन : सुनील शेडगे, सातारा)

(लेखिका ह्या, देशासाठी हुतात्मा झालेल्या संतोष महाडिक या लष्करी अधिकाऱ्याच्या मातुःश्री असून, त्यांची स्नुषाही लष्करात उच्च अधिकारी आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vanraj Andekar vs Govind Komkar: नाना पेठेत थरार! वर्षभरानंतर बदला घेतला, नेमकं काय होतं वनराज आंदेकर प्रकरण?

Bhagwant Mann health Update: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती खालावली ; मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल!

Pro Kabaddi: बेंगळुरू बुल्सची बत्तीगुल! यू मुंबाचा ४८-२८ ने एकतर्फी विजय; अजित चौहान ठरला सामन्याचा हिरो

Mira Bhayandar: पाच हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, मीरा भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई

Pune Crime: वनराज आंदेकरांच्या खुनाचा बदला! गोविंदा कोमकरची तीन गोळ्या झाडून हत्या; पुणं हादरलं

SCROLL FOR NEXT