rangmahal Caves
rangmahal Caves sakal
सप्तरंग

मध्य प्रदेशातल्या बाघ गुहा

सकाळ वृत्तसेवा

- प्रवीण वाघमारे, pravinwagh727@gmail. com

मध्य प्रदेशातल्या बाघ गुहाचित्रांचा कालखंड निश्चितपणे सांगता येत नसला तरी तो इसवीसन ६२६-६२८ असा मानला जातो. इथली लेणी महायान बौद्ध पंथाची असून ही गुहाचित्रं एकाच वेळी रंगवलेली असावीत. इथल्या नऊपैकी पाच गुहा पाहता येतात. त्यातही मोजकीच चित्रं अस्तित्वात असून तीही अत्यंत खराब अवस्थेत आहेत. मात्र, ही चित्रं अजिंठा शैलीसारखीच असल्याचं दिसतं. हा चित्रसंस्कृतीचं दर्शन घडवणारा अनमोल ठेवा आहे.

मध्य प्रदेशात ग्वाल्हेरजवळील विंध्य पर्वतरांगांमध्ये बाग्मती (बाघिणी) या नदीपासून दोन-तीन मैलांवर ‘बाघ’ नावाच्या गावाजवळ या गुहा आहेत. म्हणूनच त्यांचं नाव ‘बाघ गुहा’ असं पडलं असावं. बाघ लेणी हे गुप्तकाळातलं एक उत्तम उदाहरण आहे. इथले लेखी पुरावे दुर्दैवानं नष्ट झालेले आहेत. इथल्या मिरवणुकीच्या चित्रावर ब्राऊन (तपकिरी) रंगाचं ‘के’ हे अक्षर असल्याचं दिसतं.

मात्र, निश्चित कालखंड सांगता येत नाही. कला-इतिहासकार व्हिन्सेंट स्मिथ यांनी लेण्यांचा काळ इसवीसन ६२६-६२८ असा मानला आहे; कारण, या लेण्या अजिंठ्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या लेण्यांशी समकालीन असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

बाघ लेण्या महायान बौद्ध पंथाच्या आहेत. भिक्षूंच्या निवासासाठी आणि प्रवचनांसाठी त्या बांधली गेल्या असाव्यात. या गुहांचा शोध लेफ्टनंट डेंजरफील्ड यांनी लावला. इथल्या गुहाची एकूण संख्या नऊ असून त्या सर्व ‘विहारगुंफा’ आहेत.

बाघ लेण्या तशा अनेक नावांनी प्रचलित आहेत. त्यातल्या पहिल्या गुहेला ‘गृह गुंफा’, दुसऱ्या लेणीला ‘गुसाई’ किंवा ‘पंच पांडू’ लेणी म्हणतात. तिसरी लेणी ‘हत्तीखाना’, चौथी लेणी ‘रंगमहाल’, पाचवी लेणी ‘पाठशाळा’ म्हणून ओळखली जाते. सहा, सात, आठ आणि नऊ या क्रमांकाच्या गुंफांकडं जाणारे मार्ग बंद आहेत, त्यामुळे या लेण्यांना कोणतंच नामाभिधान नाही.

या लेण्यांमध्ये चित्रमालिका असून ही चित्रं फ्रेस्को पद्धतीनं साकारल्याचं आढळतं. गुंफांची चित्रमालिका प्रत्येक गुहेच्या दरवाजानं एकमेकींपासून वेगळी होते. फ्रेस्को पद्धती म्हणजे, प्रथम रेखांकन रेखाटल्यानंतर त्यामध्ये सपाट रंग भरले जातात, नंतर गडद रंगाच्या साह्यानं बाह्य रेषा ठळक करून ते चित्र पूर्ण केलं जातं. या पद्धतीनं इथली चित्रमालिका उत्कृष्टपणे तयार केलेली आढळते. फ्रेस्को पद्धतीच्या कलाकृती जगभरातल्या वेगवेगळ्या कालखंडात निर्माण केल्या गेल्याचं आढळतं.

बाघ लेण्यांचे खडक मऊ असल्यामुळे इथला गिलावा लवकर नष्ट झाला असावा. इथल्या चित्रांमध्ये वापरलेले रंग बहुधा त्यांच्या भागातून मिळालेले असावेत. या रंगांमध्ये डिंक मिसळून रंगलेपन केलं गेलं आहे. काळा, पांढरा आणि जांभळा या रंगांनी ही रेखाचित्रं तयार केली गेली असून आणि लाल, निळा, पिवळा यांसारखे विरोधाभासी रंगही वापरण्यात आले आहेत. बाघ गुहेतली सर्व चित्रं एकाच वेळी तयार केलेली दिसून येतात. त्यांत जीवनाचे विविध पैलू चित्रित केलेले आहेत. राजेशाही जीवन व उल्हासपूर्ण जीवनशैली या चित्रांत दाखवण्यात आली आहे.

सात गुहांमधली चित्रं जवळपास पूर्णतः नष्ट झाली आहेत. चार आणि पाच या क्रमांकांच्या गुहांमध्ये काही चित्रं उपलब्ध आहेत, तीही खराब अवस्थेत. चौथ्या आणि पाचव्या लेण्यांमध्ये दोनशे फूट छत वीस खांबांवर आधारलेलं होतं. हे छत कोसळल्यामुळं पंधरा फूट चित्रफलक नष्ट झाला आणि चित्रांचं नुकसान झालं.

पहिली गुहा ही बौद्ध भिक्षूंच्या निवासासाठी बांधण्यात आली होती. या गुहेमध्ये कोणत्याही मूर्ती किंवा चित्र आज उपलब्ध नाही. दुसऱ्या गुहेतील भिंती एकेकाळी पूर्णपणे रंगवलेल्या होत्या. त्या भिंतींवर प्राण्यांची-पक्ष्यांची चित्रं होती. बदलत्या हवामानाचा परिणाम होऊन आज त्या ठिकाणी काहीच अस्तित्वात नाही. तिसरी गुहा ‘हत्तीखाना’ या नावानं ओळखली जाते.

ही गुहा गौतम बुद्ध आणि बोधिसत्त्व यांच्या चित्रांनी भरलेली होती; परंतु काळानुसार भिंतींवरचा गिलावा उडाला. आता या गुहांमध्येही चित्र राहिली नाहीत. मात्र, जे काही थोडंफार शिल्लक आहेत त्यात एका हातात कमळ घेतलेल्या उपासकांची मानवाकृती स्पष्ट दिसते, तसंच भूमीला स्पर्श करणाऱ्या स्त्रीचं अस्पष्ट चित्र दिसतं.

‘रंगमहाल’ नावाच्या चौथ्या गुहेबाहेर व्हरांड्यावर ४५ फूट लांब आणि सहा फूट रुंद असा तुकडा शिल्लक आहे. याच्यावर आकर्षक चित्रं आढळतात. या रंगवलेल्या फलकाची व्याप्ती पाचव्या गुहेच्या प्रवेशद्वारापर्यंत आहे. या तुकड्यात सहा चित्रमालिका आहेत. पहिलं चित्र ‘वियोगा’चं आहे. चित्राच्या मध्यभागी एक स्त्री खिडकीजवळ बसलेली असून ती शोक करत आहे.

उजव्या हातानं चेहरा झाकून घेत ती रडत आहे, तर दुसरी स्त्री तिचं सांत्वन करत आहे आणि सहानुभूतीच्या भावनेनं तिच्याकडं पाहत आहे. हे भाव प्रकट करण्यासाठी कबूतरांची जोडी खाली बसलेली आहे. असं हे प्रतीकात्मक चित्र आहे.

या गुहेतलं दुसरं दृश्य ‘मंत्रणा’चं आहे. यात चार गृहस्थ निळ्या आणि पिवळ्या रंगाच्या गोल उशीवर बसून गंभीर संभाषणात गुंतलेले दिसत आहेत. त्यांच्या डावीकडच्या दोन व्यक्तींच्या डोक्यावर मुकुट आहे. यातला पहिला ‘मंत्री’ असून, दुसरा राजेशाही पोशाख घातलेला आहे. एका राजेशाही व्यक्तीनं बौद्ध धर्म स्वीकारण्याशी संबंधित बहुतेक ही प्रसंग असावा.

तिसऱ्या दृश्यात सहा लोकांचा एक गट आहे. त्यांत काही गंधर्व आणि काही भिक्षू असून या सर्व मानवाकृतींचं मुंडण केलेलं आहे. चौथं दृश्य पाच गायिकांचं आहे; परंतु हे चित्र ज्या भिंतीवर आहे त्या भिंतीचा खालचा भाग नष्ट झाल्यामुळे हे दृश्य कमरेपर्यंतच दिसतं. मध्यभागी असलेल्या महिलांच्या हातात वीणेसारखं वाद्य आहे. या चित्रांमध्ये इराणी निळा रंग भरलेला आहे.

पाचवं दृश्य नर्तिकेचं आणि वाद्यवादनाचं आहे. या चित्रात दोन गट आहेत. पहिला गट सात महिला आणि एक पुरुष असा आहे. या महिला पुरुषाभोवती नृत्य करत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. दुसरा गट सहा महिलांचा असून त्या गायनाच्या, नृत्याच्या मुद्रेत उभ्या आहेत. नर्तिकेचे केस खांद्यापर्यंत आहेत.

सहाव्या दृश्यात १७ घोडेस्वार रांगेत उभे असून ते डावीकडं जात असल्याचं दिसतं. आठव्या दृश्यात हत्तीची मिरवणूक आहे. सहा हत्ती आणि तीन घोडेस्वार अशी रचना या चित्रात आहे. याशिवाय बोधिसत्त्वांची वेगवेगळी विशाल चित्रं या गुहेत आहेत. या गुहेच्या खांबांवर सुंदर नक्षीकाम आहे.

पाचव्या गुहेत अनेक चित्र आहेत. त्यापैकी गौतम बुद्ध यांचं सुंदर चित्र शिल्लक आहे. इथं कमळ, फुलं, वेली, प्राणी, पक्षी आणि लहान-मोठी फळंही विविध ठिकाणी चित्रित करण्यात आलेली आहेत.

अजिंठा आणि बाघ या दोन्ही ठिकाणी स्त्रियांचं आध्यात्मिक आणि शारीरिक सौंदर्य अतिशय उत्तम प्रकारे चित्रित करण्यात आलं आहे. या चित्रांच्या रेषा, आकार, रंग, रचना, भिंतीचित्राची प्रक्रिया, शब्दलेख आणि अभिव्यक्ती इत्यादी सर्व काही अजिंठ्यातल्या चित्रांसारखंच आहे.

(लेखक हे कोल्हापूरमधल्या एका खासगी कलाशिक्षण संस्थेत सह अधिव्याख्याता आहेत, तसंच वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची चित्रप्रदर्शनं भरवली जातात.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi High Temperature : आजवरचे सगळे रेकॉर्ड मोडले; दिल्लीत उन्हाचा पारा 52 डिग्रीच्याही वर

Pune Car Crash Case: कल्याणीनगर प्रकरणातील आरोपीला निबंध लिहण्याची शिक्षा देऊन जामीन देणारा कोण? सदस्यांची होणार चौकशी

T20 World Cup: भारत-ऑस्ट्रेलिया संघात होणार फायनल? गावसकर, लारा, हेडनसह दिग्गजांनी काय केली भविष्यवाणी, पाहा Video

Manoj Jarange Patil Biopic : 'आम्ही जरांगे' सिनेमाचा टीझर रिलीज ; 'हा' मराठी अभिनेता साकारतोय मनोज जरांगेंची भूमिका

Thane News: बाबासाहेबांचा अवमान करणार्‍या आव्हाडवर फौजदार गुन्हा दाखल करा, आनंद परांजपे आक्रमक

SCROLL FOR NEXT