japanese literature
japanese literature sakal
सप्तरंग

सांकेतिकता जपणारं जपानी साहित्य

सकाळ वृत्तसेवा

सध्याच्या जपानी साहित्यविश्वात डोकावून बघण्याआधी जपानी साहित्याच्या काही खास वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेणं उपयुक्त ठरेल.

- निसीम बेडेकर nissimb2014@gmail.com

जपानी साहित्य या विषयाबद्दल सर्वसामान्य भारतीय किंवा मराठी वाचक अनभिज्ञच आहे असं म्हणणं अतिशयोक्तीचं होणार नाही. मराठी साहित्यप्रेमींना डिकन्स, बाल्झाक, मोपासाँ, तोलस्तोय, चेकव्ह वगैरे नावं परिचित असतात; पण ‘कावाबाता’ किंवा ‘मिशिमा’ वगैरे नावं कुणाच्याच ऐकिवात नसतात. जपान म्हटलं की फुजी पर्वत, हिरोशिमा नागासाकी, त्या विध्वंसातून पुन्हा उभं राहून केलेला आर्थिक विकास...सोनी, यामाहा, तोयोता, तोशिबा इत्यादी जगप्रसिद्ध ब्रँड आणि अलीकडे छोट्यांसाठी कार्टून्स अशा गोष्टी मराठी वाचकांच्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात. मात्र, त्याचबरोबर जपानलाही सुमारे बाराशे वर्षांची समृद्ध साहित्यपरंपरा आहे याची फारशी जाणीव त्यांना नसते. ‘हायकू’ हा काव्यप्रकार गेल्या काही वर्षांमध्ये मराठी वाचकांच्या परिचयाचा झालेला आहे आणि काही हायकूंचे मराठीत अनुवादही झालेले आहेत; पण अशी उदाहरणं अपवादात्मकच.

सध्याच्या जपानी साहित्यविश्वात डोकावून बघण्याआधी जपानी साहित्याच्या काही खास वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेणं उपयुक्त ठरेल. साहित्य आणि संस्कृती यांचा घनिष्ठ संबंध असतो हे वेगळं सांगण्याची गरज नाही.

जपानच्या संस्कृतीकडे आणि इतिहासाकडे नजर टाकल्यास असं दिसतं की, गेल्या सुमारे दीडशे वर्षांचा कालखंड सोडल्यास जपानचा चीन आणि कोरिया यांच्याव्यतिरिक्त जगातल्या इतर कोणत्याही देशाशी किंवा संस्कृतीशी कधीही संबंध आलेला नाही! चीन आणि कोरिया यांच्याशी असलेले संबंधही निरनिराळ्या कालखंडांत कमी-जास्त होत राहिले. त्यामुळे जपानी साहित्य आणि सौंदर्यशास्त्र यांच्यावर प्रदीर्घ काळ कोणताही बाह्य प्रभाव पडलेला नाही.

त्यांचं आगळंवेगळं जपानीपण आजही बऱ्याच अंशी टिकून आहे. अनेकदा इतर देशांतील साहित्यप्रेमींना जपानी साहित्य फारसं रुचत नाही याचं हे एक प्रमुख कारण आहे.

दुसरं म्हणजे, मानव आणि निसर्ग यांच्या परस्परसंबंधांना जपानी संस्कृतीत अत्यंत महत्त्व दिलं गेलेलं आहे आणि निसर्गातील विविध बदलांबाबत आणि प्रक्रियांबाबत जपानी मानसिकता अत्यंत संवेदनशील आहे. प्रत्येक ऋतूत निसर्गात होणारे बदल आणि त्यांचा मानवी संवेदनांवर होणारा परिणाम जपानी साहित्यात विस्तृतपणे रेखाटलेला दिसतो. त्याचबरोबर भूकंप, त्सुनामी आणि वादळं या नित्याच्याच गोष्टी असलेल्या या देशात ‘मोनो नो आवारे’ (सर्व काही क्षणभंगुर असल्याची खोल जाणीव आणि त्या जाणिवेतून आलेली मानवी जीवनाबद्दलची नाजूक, हलकीशी उदासीनता) या संकल्पनेचा सखोल प्रभाव जपानी साहित्यावर पडलेला आहे. निरनिराळ्या वेळी पडणाऱ्या निरनिराळ्या प्रकारच्या पावसासाठी निरनिराळे शब्द, एकाच रंगाच्या अनेक छटा दर्शवण्यासाठी वेगवेगळे शब्द आणि मानवी भावनांची कमी-जास्त तीव्रता व्यक्त करण्यासाठी नानाविध शब्द यांतूनही अशी संवेदनशील प्रवृत्ती जपानी साहित्यात दिसते.

तिसरं वैशिष्ट्य म्हणजे, जपानी साहित्यात दिसून येणारी अस्पष्टता, संदिग्धता आणि सांकेतिकता. अती स्पष्टपणा किंवा रोखठोकपणा जपानी मनाला फारसा रुचत नाही. ‘अथ’पासून ‘इति’पर्यंत सारं काही सांगून टाकणं यापेक्षा जरासं सांगणं आणि उरलेलं वाचकाच्या आकलनक्षमतेवर आणि कल्पनाशक्तीवर सोडणं जपानी साहित्यिक पसंत करतो.

‘न सांगणं हे फुलासारखं’ किंवा ‘उत्तम वक्तृत्व हे चांदीसारखं; पण गप्प राहणं हे सोन्यासारखं’ या जपानी म्हणीही अर्थातच साहित्यातसुद्धा प्रतिबिंबित झालेल्या दिसतात. ‘यूगेन’ (सखोलता, प्रगाढता, रहस्यमयता, अथांगपणा) या सौंदर्यशास्त्रीय संकल्पनेला जपानी साहित्यातही असाधारण महत्त्व आहे. कोणतीही अती स्पष्ट किंवा अती तार्किक गोष्ट ‘यूगेन’ असूच शकत नाही. शब्दांपलीकडे विचार करायला लावणं आणि शब्दांत व्यक्त करता न येण्यासारख्या अनुभवाची अनुभूती देणं म्हणजेच यूगेन. मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या दोन तरुणांच्या शिरच्छेदाचं वर्णन जपानी लेखक करणार नाही. ‘चेरीच्या झाडावरून दोन फुलं हलकेच गळून पडली’ असे तो म्हणेल आणि उरलेलं वाचकावर सोपवेल. जपानी साहित्यातल्या या अस्पष्टतेचं आणि सांकेतिकतेचं सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे हायकू.

या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणूनच की काय, जपानी साहित्याचं चौथं वैशिष्ट्य म्हणजे, कथेत किंवा कादंबरीत कथानकाला असलेलं दुय्यम आणि गौण स्थान. कथानकाची मांडणी, त्याचा आरंभ, मध्य आणि शेवट, कथानकातील पात्रांच्या व्यक्तिरेखा आणि त्यांची स्वभाववैशिष्ट्यं, कथानकाची सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक वा अन्य पार्श्वभूमी या गोष्टींपेक्षाही निरनिराळ्या वेळची त्यांची मनःस्थिती आणि प्रसंगानुसार तीत होणारे बदल, मनात येणारे विचार किंवा भावनिक आंदोलनं या गोष्टींना जपानी कथा-कादंबऱ्यांमध्ये प्राधान्य दिलं जातं.गेल्या वीस वर्षांतील जपानी साहित्यक्षेत्रातील प्रवाहांचा विचार करताना या काळातल्या जपानी समाजावरही एक दृष्टिक्षेप टाकणं आवश्यक आहे. सन १९६० पासून १९९० पर्यंत तीस वर्षं हा जपानच्या आर्थिक बहराचा काळ होता.

मात्र, १९९० नंतर आलेल्या आर्थिक मंदीमुळे जपानी समाजमनावरही परिणाम झाल्यावाचून राहिला नाही. धकाधकीच्या आणि व्यग्र जीवनशैलीमुळे अगोदरच मानवी संबंधांमध्ये कोरडेपणा आणि यांत्रिकपणे आलेला होता. कौटुंबिक संबंध विरळ झालेले होते. त्यात आता नव्यानं आर्थिक असुरक्षिततेची भर पडली. व्यग्र जीवनातील ताण-तणाव अधिक वाढले, वैफल्यग्रस्त मनःस्थितीतून होणाऱ्या आत्महत्यांचं प्रमाणही वाढलं. गुन्ह्यांमध्येही लक्षणीय स्वरूपात वाढ झाली. ‘उद्या’ची शाश्वती नाही आणि कुणीच कुणाचा नाही अशा सामाजिक स्थितीचा प्रभाव समकालीन जपानी साहित्यातही दिसतो. आजच्या जपानी साहित्यात रेखाटलेलं जग हे अव्यवस्थित, संभ्रमित आणि गोंधळलेलं (Chaotic) आहे. कुणासमोरही कसलेच आदर्श नाहीत, कसलीच मूल्यं नाहीत आणि कोणतीही ‘रोल मॉडेल्स’ नाहीत.

रयू मुराकामी या प्रसिद्ध समकालीन लेखकाच्या ‘कॉईन लॉकरमधील बाळं’ या कादंबरीचं नावही लक्षवेधक आहे. थोड्या वेळेपुरतं सामान ठेवण्यासाठी जपानमध्ये ‘कॉईन लॉकर्स’ असतात. पैशाची नाणी टाकून काही ठराविक वेळ ही वापरता येतात. अशा या कॉईन लॉकरमध्ये कुणीतरी सोडून दिलेली दोन बाळं आहेत किकू आणि हाशी. दोघं लहानपणापासून ऑटिस्टिक आहेत. त्यांच्या प्रतिक्रिया रोखण्यासाठी एक मानसशास्त्रज्ञ आईच्या गर्भातील आवाजांचा वापर करतो. पुढं त्या दोघांना एका अज्ञात बेटावर नेलं जातं आणि ‘जग नष्ट करण्याची तुमची पात्रता आहे’ असं त्यांना सांगितलं जातं. पुढं एका बालसुधारगृहातून सुटलेला किकू एक विषारी वायू हस्तगत करतो आणि तो टोकिओत पसरवतो. हलकल्लोळ माजलेल्या टोकिओत तो हिंडतो -साधे, ‘अविकसित’ आवाज शोधत. समीक्षकांच्या मते, ‘विनाशाचे प्रयोग आणि समाजाला दिलेला ‘नकार’- द्वेष आणि भेदभावाच्या ऊर्जेवर आधारलेलं’ हे रयू मुराकामींच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे. त्यांचं साहित्य हे ‘दुष्टतेचं साहित्य’ (Literature of Evil) आहे.

हारुकी मुराकामी हे समकालीन लेखक आंतरराष्ट्रीय पातळीवरही विख्यात आहेत. नोबेल पारितोषिकासाठीही त्यांच्या नावाचा विचार झालेला आहे आणि त्यांच्या साहित्यकृतींचे अनेक भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत. मुराकामींच्या साहित्यातलं जग हे एखाद्या स्वप्नासारखे, ‘सर्रिअल’ आहे आणि कथानक हे वास्तवता आणि स्वप्नसृष्टीच्या अजब मिश्रणात पुढं जात राहतं. एकाकीपणा आणि तुटलेपणा हे मुराकामींच्या पात्रांचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. ‘अंधार पडल्यावर’ या त्यांच्या कादंबरीत मारी आणि एरी या दोन बहिणी मुख्य पात्रं आहेत. एका फॅमिली रेस्टॉरंटमध्ये एकटी बसून वाचन करणाऱ्या मारीच्या जीवनात अचानक आगळेवेगळे लोक येतात...एक तरुण ट्रॉम्बोनवादक, एक ‘लव्ह हॉटेल’ चालवणारी महिला-पहिलवान आणि एका बिझनेसमनकडून अनन्वित छळ होत असलेली एक चिनी वेश्या. मारीची बहीण एरी ही टीव्हीशेजारी गाढ निद्रेत आहे. केवळ रात्रीच घडणाऱ्या या कथानकातील प्रत्येक पात्राच्या काही गरजा आहेत आणि स्वतःचं गुपित आहे. एकमेकांशी कसलाही संबंध नसलेली ही रात्रीची पात्रं एकत्र येतात आणि कथानकामध्ये गुंफली जातात.

समकालीन लेखिकांमध्ये काओरी एकूनी या अग्रगण्य आहेत. जपानमधील स्त्रीजीवनाचं चित्रण त्यांच्या कथांमध्ये आढळतं. ‘दुःखानं रडायला आधीच तयार होते मी’ या त्यांच्या कथेची नायिका अयानो ही एक लेखिका आहे. प्रवास करताना तिला ताकाशी हा तरुण भेटतो आणि दोघं एकत्र राहू लागतात; पण लवकरच ताकाशी नोकरी सोडतो आणि अयानोला सोडून दुसऱ्या बाईबरोबर निघून जातो. निराशेच्या गर्तेत जगणाऱ्या अयानोला एकाच गोष्टीचं दुःख आहे - दुसऱ्या स्त्रीशी संबंध ठेवल्याबद्दल जेव्हा ताकाशीनं आपली माफी मागितली, तेव्हा आपण रडायला हवं होतं. फावल्या वेळात फेरफटका मारताना ती एका स्मशानापाशी येते. तिथल्या कबरी बघून तिच्या मनात विचार येतो- आपण गेल्यानंतर आपल्या कबरीवर काय लिहिलेलं असेल?

समकालीन जपानी साहित्यातील प्रवाह हा विषय अतिशय व्यापक असल्यामुळे प्रस्तुत लेखात केवळ तीन प्रातिनिधिक साहित्यिकांचा परिचय आपण करून घेतला. मार्च २०११ मध्ये जपानमध्ये झालेला विनाशकारी भूकंप आणि त्यानंतरची प्रलयकारी त्सुनामी ही जपानी साहित्यविश्वातही अत्यंत महत्त्वाची घटना समजली गेली. फुकुशिमाच्या अणुभट्टीतून झालेला किरणोत्सर्ग, त्याच्या पर्यावरणावरील परिणामांची भीती, जनतेपासून सत्य दडवून ठेवण्याचे सरकारने केलेले प्रयत्न, ‘फुकुशिमा ही मानवनिर्मित आपत्ती आहे’ असा समोर आलेला अहवाल...जपानी लेखकांना कितीतरी विषय या दुर्घटनेनं पुरवले आहेत. अलीकडे जपानी साहित्यवर्तुळात ‘फुकुशिमापूर्वीचं साहित्य’ आणि ‘फुकुशिमानंतरचं साहित्य’ हे दोन शब्दप्रयोग नव्यानं रूढ होऊ पाहत आहेत. अशा परिस्थितीत साकारणारं समकालीन जपानी साहित्य कशा स्वरूपाचं असेल? जपानी साहित्याच्या अभ्यासकांनी ‘पुढील दहा वर्षांत जपानमध्ये नवं ‘पर्यावरणवादी साहित्य’ किंवा ‘अणुऊर्जा-साहित्य’ निर्माण होईल,’ असं भाकीत केलेलं आहे. ते कसं असेल याचं उत्तर काळच देऊ शकेल.

(सदराचे लेखक हे हैदराबाद येथील ‘इंग्लिश व परकीय भाषा विद्यापीठा’त जपानी भाषेचे अध्यापक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT