Calculate
Calculate Sakal
सप्तरंग

कॅल्क्युलेटेड रिस्क

प्रफुल्ल वानखेडे

हल्ली प्रत्येक जण सांगत असतो, धोके पत्करा. बरी नोकरी असेल तर चांगली शोधा. जास्तीत जास्त पगारवाढ घ्या. जास्तीत जास्त फॅसिलिटीज घ्या.

हल्ली प्रत्येक जण सांगत असतो, धोके पत्करा. बरी नोकरी असेल तर चांगली शोधा. जास्तीत जास्त पगारवाढ घ्या. जास्तीत जास्त फॅसिलिटीज घ्या. हे करताना रिस्क घ्या, काहीही करून ते अचिव्ह करा. कोणी म्हणते मग उद्योग-धंदा करा. एक कोटीचा टर्नओव्हर असेल तर दहा कोटी करा. दहा कोटी असेल तर १०० कोटी करा, तेही एक-दोन वर्षांत. मोठं घर, मोठी गाडी, प्रसिद्धी किंवा समाजात नाव मोठं ठेवण्यासाठी अजून मोठे धोके पत्करले जातात, त्याबद्दल...

उद्योगातली काही माणसं फार मोठमोठी कर्ज भरमसाठ व्याजानं उचलताना मी नेहमी पाहतो. अगदी क्षणात त्यांना जग जिंकायचं असतं. बर कोणी काही सांगावं तर समजावण्याचा किंवा मार्गदर्शन घेण्याचा काळ बराच मागे पडलाय. मला मात्र वैयक्तिकरीत्या हे ‘सतत धोके पत्करण्याचं’ तत्वज्ञान पटत नाही. नोकरी असो की व्यवसाय, वारंवार असे धोके पत्करणं म्हणजे हमखास अपयशाची खात्री. त्यातही रागारागात, भावनिक होऊन किंवा एखाद्यासोबत तुलना करत घेतलेले निर्णय बऱ्याचदा घात करतात. बरं हे काही फक्त आपल्या मराठी लोकांतच होत नाही. जगभर चालतं आणि चालत आलेलं आहे. यात शिक्षण, संस्कार किंवा तुमचे बॅकग्राऊंड याचा काहीही संबंध नसतो. आपली सद्सदविवेकबुद्धी, वेळ, आपण करत असलेल्या कामाबद्दलची आर्थिक तसेच तांत्रिक बाजू पूर्ण माहिती आणि नशीब सोबत असणे अत्यंत गरजेचं असतं.

याबद्दलचीच ही एक गोष्ट -

निकोला टेस्ला, थॅामस एडिसन आणि हेन्री फोर्ड ही तीन समकालीन सार्वकालिन महान माणसं. आज आपण जे विज्ञान, तंत्रज्ञान, वीज, वाहतूक, गाड्या आणि इतर अनेक सोयीसुविधा वापरतो, त्यात जवळपास प्रत्येक गोष्टीत या युगपुरुषांचं अत्यंत महत्त्वाचं योगदान आहे.

या तिघांच्याही जीवनचरित्रामधून बरेच काही शिकण्यासारखे आहे. (त्यांच्याबद्दल बरीच पुस्तकं, लेख, शॅार्ट फिल्म्स उपलब्ध आहेत. त्यांचा नक्की सर्वांनी अभ्यास करावा.) मजेशीर गोष्ट म्हणजे सुरुवातीच्या काळात हेन्री फोर्ड आणि निकोला टेस्ला हे दोघेही एडिसनकडे कामाला होते. यातील निकोला टेस्ला म्हणजे अत्युच्च बुद्धिमत्तेची खाण. त्यांच्या नावावर ७०० पेक्षा जास्त पेटंटस् आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याच संकल्पनेचे एसी करंटचे ग्रीड आजही जगभर वापरले जाते. रेडीओ, रोबोटिक्स, कंम्प्युटर सायन्स यामधेही त्यांचे फार मोठे योगदान आहे. आज संपूर्ण जग ज्यामुळे एकत्र आलंय, अशा मोबाईलबद्दल १९२६ साली सविस्तर लिहून ठेवलं होतं. इतका महान शास्त्रज्ञ; पण त्याची शोकांतिक अशी की, निकोला टेस्लाच्या मृत्यूवेळी त्याच्याकडे पैशांची प्रचंड चणचण होती. एवढी बुद्धिमत्ता असूनही त्याने कायमच विचित्र धोके पत्करले. वेळ, काळ याचा कोणताही विचार न करता तो सतत काम करायचा, पण आर्थिक बाबतीत मात्र तो तितकासा यशस्वी होऊ शकला नाही.

याउलट एडिसनकडेच कामाला असलेला हेन्री फोर्ड- त्याने तिथे कामाला असतानाच कॉर्बोरेटरचे पेटंट घेतले. इतर अनेक गोष्टींवरही तो मनापासून काम करत असे. त्यामुळेच एडिसनने त्यांना चिफ इंजिनियरही बनविलं होतं. एडिसनला सुरुवातीपासून इलेक्ट्रिक कारमध्ये जास्त रस होता आणि फोर्डची आवड वेगळी होती. फोर्डने कारचं पूर्ण डिझाईन तयार असतानाही एडिसनकडे दोन वर्ष काम केलं, अगदी पेटंट मिळाल्यावरही जवळपास वर्षभर. या काळात नक्कीच ते बऱ्याच गोष्टी तिथं शिकले.

हेन्री फोर्ड यांनी वाहन व्यवसायात पुढे अत्यंत विचारपूर्वक आणि ठामपणे निर्णय घेतले. ते इतके परफेक्ट होते की, ते या क्षेत्रात अनभिषिक्त सम्राट बनले. त्यांची तांत्रिक, व्यावसायिक आणि व्यवस्थापन क्षेत्रातील कौशल्ये आजही अभ्यासली जातात. बुद्धिमत्तेच्या बाबतीत तिघेही एकावर एक वरचढ असूनही एडिसन आणि फोर्डच्या तुलनेत निकोला टेस्ला कुठेच स्पर्धा करू शकला नाही आणि याचे कारण म्हणजे त्याने सतत पत्करलेले मोठे धोके आणि त्यातून सोबत आलेली कठीण परिस्थिती आणि आर्थिक दुर्बलता.

भारतातही आजमितीस असे काही उद्योग आहेत, जे खूप मोठे धोके पत्करत नाहीत; पण अत्यंत नियोजनपूर्वक आणि अचूक वेळेस निर्णय घेऊन शतकाहून अधिक काळ टिकून आहेत. यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा येत तो ‘लवचिकता’ आणि कॅल्क्युलेटेड रिस्कचा. या बाबतीत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखे प्रेरणादायी आणि उत्तुंग व्यक्तिमत्त्व या जगात दुसरीकडे कुठेच सापडणार नाही. कठीण प्रसंगात अगदी निर्णायक वेळी ‘निर्णयक्षमता’ कशी असावी, लवचिकता, तह आणि विजयाची भरारी घेण्याची वेळ, ती समजण्याची हातोटी याचे अत्युच्च दर्जाचे शास्त्र त्यांनी आपल्यापुढे ठेवलेय. (या विषयावर लवकरच एक दीर्घ लेख पुढील काही दिवसांत येईलच.)

खरे पाहता सारासार विचार, मानसिक कौटुंबिक आधार, तसेच प्रसंगानुरूप लवचिकता आणि नियोजनपूर्वक काम करून निर्णय घेतले तर हमखास यश मिळतेच. नोकरी उद्योग-व्यवसाय किंवा कोणतीही आर्थिक गुंतवणूक करताना आपल्याला त्यातून नक्कीच फायदा होईल, या अपेक्षेने आपण ती करतो, पण अपेक्षित फायदा नाही झाला तर?

अपेक्षित रिझल्ट्स मिळाले नाहीत तर? फायदा सोडा जे पैसे, वेळ आणि ऊर्जा आपण गुंतवली तेही सर्व बुडाले तर? आपण तो धोका पचवू शकतो का? या अशा गुंतवणुकीमुळे किंवा आर्थिक निर्णयामुळे आपण आपले भविष्य तर अंधारात ढकलत नाही ना? एकंदर मानसिक आणि आर्थिक परिस्थितीवर काय परिणाम होतील? या सर्व प्रश्नांची सारासार उत्तरं सकारात्मक असतील तर पुढे जायचं.

आपली वेळ आणि पैसा मौल्यवान आहे, तो गुंतवतानाही तसाच नीट विचार व्हायला हवा. भावनिक गुंतवणूक टाळून कॅलक्युलेटेड रिस्क घ्यायला हवी.

बेंजामिन ग्रॅहम म्हणतात -

Successful investing is about managing RISK, not avoiding it.

त्याप्रमाणे आर्थिक गुंतवणूक करताना थोडेफार धोके हे घ्यावेच लागतात; पण स्वतःची आर्थिक ताकद समजून घेऊनच. स्वतःला तो व्यवहार नीट समजत नसेल, कळत नसेल आणि तरीही आपण त्यात पुढे जात असू तर मात्र १००% तीन पत्ती ब्लाईंड गेम सारखाच आपला गेम होणार. आयुष्यात नेहमी आर्थिक तोटा होईल असं वर्तन आणि कृती टाळायची, यासाठी मार्जिन आॅफ सेफ्टी आणि कॅल्क्युलेटेड रिस्क या टर्म्स कधीही विसरू नयेत.

wankhedeprafulla@gmail.com

(लेखक प्रख्यात केल्विन आणि लिक्विगॅस या औष्णिक ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून; नेमकं काय घडलं? मृतदेह स्वीकारण्यास पत्नीचा का नकार?

SCROLL FOR NEXT