Sambhaji Bhide
Sambhaji Bhide Sakal
सप्तरंग

भिडेंची ॲटॉमिक टिकली

राहुल गडपाले

टिकली लावावी की लाऊ नये, असल्या गोष्टींना काही लोक परंपरांचे कोंदणं लावतात. त्याचा संबंध थेट धर्माशी जोडण्याचा प्रयत्न करतात.

टिकली लावावी की लाऊ नये, असल्या गोष्टींना काही लोक परंपरांचे कोंदणं लावतात. त्याचा संबंध थेट धर्माशी जोडण्याचा प्रयत्न करतात. जर टिकलीचा किंवा कुंकवाचा संबंध धर्माशी असेल, तर त्याची सक्ती फक्त स्त्रियांवरच का, पुरुषांना का नाही? मुस्लिमांमध्ये महिलांना हिजाब घालण्यासाठी सक्ती केली जाते. काही लोक महिलांनी कसे कपडे वापरावेत यावरून बोलतात, कुणी टिकलीपुराण सुरू करतं. हिजाबची सक्ती करणारे आणि कपाळावर टिकली मारण्याचा प्रयत्न करणारे असे दोनही प्रकारचे लोक एकाच माळेचे मणी असतात, म्हणून सामाजिक सलोख्यासाठी ते धोक्याचे असतात. मनोहर भिडे नावाचा माणूस ज्या महाविद्यालयात अॅटॉमिक फिजिक्स हा विषयच नाही तेथे सुवर्णपदक मिळवण्याबाबत, नासाचा सल्लागार असण्याबाबत, १०० पेक्षा अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांबाबत काहीच बोलत नाही. महिलेला टिकली लावण्याचा मात्र सल्ला देतो.

निसर्गाने आपल्याला मेंदू दिलाय म्हणून माणसाकडे इतर कुठल्याही प्राण्याकडे नाही अशी वेगळी शक्ती आणि क्षमता आहे. माणूस विचार करू शकतो. आपल्या वागण्या-बोलण्याच्या प्रत्येक कृतीला नियंत्रित करणारा आपला मेंदूच असतो. मेंदूचे एका भागातून दुसऱ्या भागाला माहिती, संदेश पोचवण्याचे काम एक प्रकारे विद्युत प्रवाहासारखे असते. त्यात काही रासायनिक द्रव्यांचाही सहभाग असतो. जेव्हा मेंदूचा एक भाग दुसऱ्या एखाद्या भागाला संदेश पाठवू इच्छितो, तेव्हा मेंदू त्या भागात एक छोटासा विद्युत प्रवाह पाठवतो. अशा प्रकारचे अनेक प्रवाह आपल्या मेंदूत सतत प्रवाहित होत असतात. जेव्हा तुमची इच्छा होते, तेव्हाच तुमचा मेंदू हात हलवण्याचा संदेश पाठवतो. जेव्हा तुमची इच्छा असते, तेव्हाच तुमचा मेंदू तोंडातून आवाज काढण्याचा संदेश पाठवतो. कधी-कधी त्यात बिघाड झाला की माणूस वाट्टेल ते बरळतो, त्याचे त्याच्या बोलण्यावरील नियंत्रणही जायला लागते. अलिकडच्या तरुणांच्या भाषेत त्याला ‘केमिकल लोच्या’ असे म्हणतात; तर शास्त्रीय भाषेत त्याला छोटा झटका (फोकल सीझर - Focal Seizure) म्हटले जाते. काही लोक अपस्माराचा झटका असेही म्हणतात.

अलिकडे हे असले रुग्ण दिसण्याचे प्रमाण वाढत चालले आहेत. हे लोक काय बोलतात, कसे वागतात, त्याला कुठलाही ताळमेळ नसतो. आवाज बसलेल्या तबल्यासारखे ते आपले तोंड वाजवत राहतात. त्यातून त्यांना कुठला तरी संदेश द्यायचा असतो म्हणे. म्हणून त्याचा संबंध ते देश, धर्माशी जोडायचा प्रयत्न करतात. प्रत्यक्षात मात्र असे लोक एका भ्रमात जगत असतात. स्वतःभोवती ते तशाच लोकांचे कोंडाळे करून राहतात आणि सातत्याने समाजाला आपण कसे आदर्श व्हावे आणि कसे जगावे, याचे धडे देण्यात ते आपली शक्ती खर्च करीत असतात. अलिकडच्या काळात अशा लोकांची संख्या वाढतेय. समाज म्हटला की त्यात सर्वच प्रकारचे, विचारप्रवाहांचे लोक असणार यात शंका नाही. प्रवाह असायलाच हवेत. निकोप समाजव्यवस्थेसाठी ते गरजेचे आहे. प्रत्येकाने आपल्या विचारांच्या बाजू मांडाव्यात, चर्चा कराव्यात, प्रसंगी कुटुंबात होतात तशी भांडणेही करावीत; मात्र आपले विचार कुणावर लादण्याचा प्रयत्न करू नये. कितीही साधी गोष्ट असली, तरी ती मनापासून करण्यात सुख असते. कुणी आपल्यावर ती लादली आहे म्हटले की त्यात एक प्रकारची बळजबरीची भावना येते. ही बळजबरी जर मानसिकतेवरील असेल, तर ती अधिकच खटकते, बोचते. परिणामी त्याला होणारा विरोध हा अटळच असतो. गेल्या दोन दिवसांपासून होत असलेला टिकलीचा विरोध हादेखील त्यातलाच एक प्रकार आहे.

काही दिवसांपूर्वी कुणी एका जाहिरातीवरील नटीच्या छायाचित्रावर आक्षेप घेतला. त्या नटीने भारतीय पेहराव केला होता; मात्र तिने तिच्या कपाळावर टिकली लावलेली नव्हती. म्हणून त्या कंपनीकडून काहीही खरेदी करू नये, असे आवाहन करीत काही लोकांनी #NoBindiNobusiness असा ट्विटरवर हॅशटॅग चालवला. त्या कंपनीकडून खरेदी करू नये, असे आवाहन केले. अनेक ट्विटरार्थींनी त्याला सकारात्मक प्रतिसादही दिला. काही दिवस त्यावर चर्चा झाली. दरम्यान त्या जाहिरातीतल्या नटीच्या कपाळावर टिकली दिसायलाही लागली. आता कुणी, कुठून काय खरेदी करावे किंवा करू नये, हा ज्याचा-त्याचा खासगी मामला आहे. प्रत्येक जण तो निर्णय घ्यायला समर्थ आहे. कंपनीला एक टिकली लावल्याने जर आर्थिक फायदा होणार असेल, तर त्यांनीही तो निर्णय घ्यायला हरकत नाही; पण उद्या जर तुम्ही येता-जाता दिसणाऱ्या प्रत्येक स्त्रियांना असेच सल्ले द्यायला लागतात, तर ‘बॉस... धीस इज नॉट युवर बिझनेस...’

काही लोक असल्या गोष्टींना परंपरांचे कोंदण लावायचा प्रयत्न करतात. त्याचा संबंध थेट धर्माशी जोडण्याचा प्रयत्न करतात; पण मुळात याचा आणि धर्माचा काही संबंध आहे, असे मुळीच वाटत नाही. जर टिकलीचा किंवा कुंकवाचा संबंध धर्माशी असेल, तर त्याची सक्ती फक्त स्त्रियांवरच का, पुरुषांना का नाही, असाही प्रश्न उपस्थित होतो. अशा प्रवृत्तीची लोक प्रत्येकच धर्मात असतात. ही अडचण व्यक्तिपरत्वे बदलत जाते. यातूनच मुस्लिमांमध्ये महिलांना हिजाब घालण्यासाठी सक्ती केली जाते. काही लोक महिलांनी कसे कपडे वापरावेत, यावरून बोलतात, कुणी टिकलीपुराण सुरू करतं. हिजाबची सक्ती करणारे आणि कपाळावर टिकली मारण्याचा प्रयत्न करणारे असे दोनही प्रकारचे लोक एकाच माळेचे मणी असतात. म्हणूनच सामाजिक सलोख्यासाठी ते धोक्याचे असतात; तरीही सरकारी लोकांना ते का जवळचे वाटतात, हा मूळ सवाल आहे.

लोकांमध्ये दरी निर्माण करणे, सातत्याने प्रक्षोभक भाषणे करणे, तरुणांची माथी भडकवणे, दंगली पेटवण्यासारखे प्रकार करण्याचे आरोप असलेल्या व्यक्तींना सरकारी राजाश्रय मिळतो. त्यांच्या फौजा समाजमाध्यमांवर थयथयाट करतात. पातळी सोडून भाषा वापरतात. कुठल्याही मुद्द्यांवर तात्त्विक चर्चेची तयारी नसलेल्या या झुंडी अलिकडे लोकांमध्ये एकप्रकारे सांस्कृतिक दहशत पसरविण्याचा प्रयत्न करताना दिसतात. ही दहशत कितपत सहन करायची आणि त्याचा समाजमनावर किती परिणाम होतो, हा भाग निराळा; मात्र त्यामुळे सलोख्याचे वातावरण राहत नाही, मने कलुषित होतात. परिणामी कुठल्या ना कुठल्या कारणाने माणसा-माणसांतली दरी वाढतच जाते. या झुंडी पूर्वी नव्हत्या असे नाही. त्या होत्याच; मात्र त्याला तंत्रज्ञानाची जोड नव्हती. आता ज्या आधुनिकीकरणाने आपल्याला जगाची कवाडे खुली करून दिली आहेत, त्या तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करून समाजमन पोखरण्याचे काम या झुंडी करतात. जेव्हा त्यांना विषयांची कारणमीमांसा करता येत नाही, तेव्हा ते आपल्या धर्मांमधील गोष्टींची तुलना इतरांशी करायला लागतात. कुठल्या ना कुठल्या कारणावरून का होईना, वाद उकरता येईल; एवढाच त्यांचा हेतू असतो.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे, लोकांच्या मनात इतरांबद्दल शंकांचे जाळे निर्माण करणे आणि आपला राजकीय अजेंडा रेटून नेणे, एवढेच या लोकांना माहीत असते. त्या हॉलीवूडपटांमधल्या झोंबींसारखे हे गट समाजमनाचे लचके तोडत त्याला अधू करण्याचा प्रयत्न करताहेत. तुम्हालाही तुमच्या समाजमाध्यमांच्या भिंतींवर या लचक्यांचे शिंतोडे उडालेले दिसत असतील. त्यापासून दूर राहिलेलेच बरे; नाहीतर तुम्ही त्यांच्या शिंतोड्यांवर बाण न्यायची खोटी की ते तुम्हालाही आपल्या कोंडाळ्याचा एक भाग करून घेतात. त्यासाठी त्यांनी देश नावाची एक प्रत्येकाची अत्यंत हळवी नस हाती धरली आहे. ज्यांना ही मात्रा लागू पडत नाही, त्यांना देशद्रोहाची मात्रा वापरण्यात येते. काहीही करून आपले ऐकतील, अशीच माणसे त्यांना हवी असतात.

हे मनोहर भिडे पूर्वी कधीकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम करीत असत; मात्र त्यांचा संघासोबत काहीतरी वाद झाला आणि त्यानंतर त्यांनी स्वतःची संघटना स्थापन केली. त्यांना म्हणे सर्व देशवासीयांचा रक्तगट बदलून छत्रपती शिवाजी, संभाजी करायचा आहे. हेच उद्दिष्ट घेऊन त्यांची संघटना काम करते. त्याचे लाखो अनुयायी आहेत आणि ते भिडे सांगतील त्या मार्गावर चालायला तयार असतात. आता भिडेंना गुरुजी का म्हणतात, तर म्हणे हे भिडे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात विज्ञानाचे प्राध्यापक होते आणि त्यांना शेकडो राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ते नासाच्या सल्लागार मंडळावर असल्याचाही दावा अनेक समाजमाध्यमांवरील पोस्टमध्ये करण्यात आला आहे. ॲटॉमिक फिजिक्स हा त्यांच्या अभ्यासाचा विषय असून त्यात त्यांना सुवर्णपदक मिळाल्याचाही दावा करण्यात आला आहे; मात्र त्याचा कुठलाही पुरावा नाही. ते ज्या महाविद्यालयात प्राध्यापक असल्याचा किंवा त्यांनी ज्या क्षेत्रात अभ्यास केल्याचा दावा केला जातो, तसा कुठलाही पुरावा नसल्याचे लक्षात आले आहे.

मुळात या महाविद्यालयाला ॲटॉमिक फिजिक्सचा कुठला अभ्यासक्रमच नसताना त्यांनी हे शिक्षण कुठून घेतले, हे कदाचित तेच सांगू शकतील. एकंदरीतच काय तर त्यांच्या अभ्यासाच्या विषयासंदर्भात भिडेंनी कधीही कुठेही काहीही वक्तव्य केलेले दिसत नाही. देशाला गरज असताना हे रत्न त्यांच्या अभ्यासाच्या विषयात एक शब्दही बोलत नाही. त्यावर काही टीका-टिप्पणीदेखील करीत नाहीत; पण त्यांची प्रतिक्रिया घ्यायला गेलेल्या महिलेला टिकली लावण्यावरून मात्र ते दोन शब्द सुनावतात. ते स्वतः जरी आपण कोण होतो आणि काय आपली कार्यकुशलता होती, याविषयी बोलत नसले, तरी आपल्याविषयी पसरविले जात असलेले समज खोटे आहेत, असेही कधी समोरून सांगत नाहीत. स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून असा सगळा हा भिडस्त मामला आहे. मुळात कुणी काय करावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे; मग तो पुरुष असो अथवा स्त्री. जर कुणी त्यासाठी जबरदस्ती करण्याचा, ते लादण्याचा प्रयत्न करणार असेल, तर त्याचा समाचार मात्र घ्यायलाच हवा.

rahulgadpale@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

Latest Marathi News Update : नाशिकमध्ये कपालेश्वर हॉटेलच्या मागच्या बाजूला आग

World Athletics Relays : भारतीय महिला अन् पुरुष संघाची रिलेमध्ये दमदार कामगिरी, आता ऑलिम्पिक पदकासाठी पॅरिसमध्ये धावणार

SCROLL FOR NEXT