१९७५ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशावर लादलेली आणीबाणी आणि वृत्तपत्रांवरील सेन्सॉरशिप हा सर्वच वृत्तपत्रांच्या दृष्टीने अत्यंत खडतर कालखंड होता.
रानडे इन्स्टिट्यूटमधील पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागात मी प्रवेश घेतला तेव्हा प्रथमच श्री. ग. मुणगेकर सरांना पाहिलं. ‘सकाळ’चे संपादक हे त्यावेळी पुण्याच्या सार्वजनिक जीवनातील फार मोठं आदराचं आणि सन्मानाचं पद होतं. त्यामुळे, प्रारंभी मुणगेकर सरांशी बोलायलाही संकोच वाटत असे. पण, त्यांच्या वागण्या-बोलण्यात अत्यंत साधेपणा होता. संपादकीय कामांचा विषय ते सोप्या शब्दांत आणि ताज्या उदाहरणांसहित शिकवीत. वृत्तपत्रसृष्टीची व्यापकता आणि विविधता ही त्यांच्यामुळे समजून आली. पुढे प्रत्यक्ष पत्रकारिता करताना त्यांची बातमीदारी आणि संपादनातील सूत्रं वारंवार स्मरणात येत असत. रानडे इन्स्टिट्यूटमध्ये शिकत असताना मी सरांमुळेच ‘सकाळ’च्या सेवेत रुजू झालो आणि त्यांनी केलेले संस्कार आणि दाखवलेले मार्ग यावर तब्बल ३४ वर्षे वाटचाल केली. प्रारंभीच्या काही दिवसांतच त्यांच्यातील विद्वान आणि व्यासंगी संपादक, कुशल प्रशासक आणि क्रमिक अभ्यासक्रमापलीकडे प्रत्यक्षातील पत्रकार घडविणारा गुरू तसेच व्यक्तिगत जीवनातील मित्र या त्यांच्या गुणांचा परिचय झाला.
खरेखुरे परिपूर्ण संपादक
त्याकाळच्या इतर अनेक मान्यवरांप्रमाणे मुणगेकर सर केवळ अभ्यासपूर्ण अग्रलेख लिहिण्याची क्षमता एवढ्या एकाच गुणाचे संपादक नव्हते. ‘सकाळ’चे संस्थापक - संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या मुशीत पत्रकारितेच्या सर्व अंगांत काम केलेले ते खरेखुरे परिपूर्ण संपादक पत्रकार होते. तेच संस्कार त्यांनी माझ्यासह ‘सकाळ’मध्ये काम केलेल्या प्रत्येक पत्रकारांवर केले. अग्रलेख आणि इतर विविध विषयांवरील लेख महत्त्वाचे असतात. पण, बातमी हाच वृत्तपत्राचा प्राण असतो. हे त्यांनी आमच्या मनावर बिंबवलं. बातमी कधीही एकांगी असू नये आणि ती परिपूर्ण असली पाहिजे, याविषयी ते अत्यंत आग्रही असायचे. एखाद्या दिवशी एकही बातमी देऊ शकला नाहीत तरी हरकत नाही. पण, तो वेळ उपयुक्त ‘कॉन्टॅक्ट’ जोडण्यासाठी वापरला पाहिजे. वार्तांकनासाठी गेलेल्या प्रत्येक घटनेत अनेक अनुभव येत असतात. ते बातमीत आले नाहीत तरी भावी काळात उपयोगी पडू शकणारे संदर्भ असतात. यासारख्या त्यांच्या सूचना म्हणजे यशस्वी पत्रकार होण्यातील मार्गदर्शक तत्त्वेच आहेत. डॉ. परुळेकरांनी त्यांच्यातील गुण हेरून सरांना देशभरातील अनेक महत्त्वाच्या प्रसंगी जाऊन वार्तापत्रं लिहिण्याची संधी दिली होती. त्या अनुभवांचं प्रतिबिंब सरांनी नंतर वेळोवेळी लिहिलेले अग्रलेख, लेख, मुलाखती आणि विश्लेषण यात दिसून येतं.
१९७५ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशावर लादलेली आणीबाणी आणि वृत्तपत्रांवरील सेन्सॉरशिप हा सर्वच वृत्तपत्रांच्या दृष्टीने अत्यंत खडतर कालखंड होता. सरकारविरोधात कुठलाही मजकूर छापला जाऊ नये हा सरकारी निर्बंध होता. पोलिस सब-इन्स्पेक्टरही वृत्तपत्र कार्यालयात शिरून काय देऊ नये यासाठी दमदाटी करीत असत. जी वृत्तपत्रं सरकारविरोधात आहेत असं वाटलं की, त्यांच्या सरकारी जाहिराती बंद केल्या जात. त्या काळात सरकारी जाहिराती हा वृत्तपत्रांच्या उत्पन्नाचा मोठा आधार होता. अनेक वृत्तपत्रांनी त्या दबावाखाली शरणागती पत्करली. पण, मुणगेकर सरांच्या नेतृत्वाखाली ‘सकाळ’ने आपल्या विशिष्ट चौकटीत अभिव्यक्तिस्वातंत्र्यासाठीचा लढा चालू ठेवला. त्याची किंमतही ‘सकाळ’ला मोजावी लागली. सरकारी जाहिराती बंद झाल्या, सेन्सॉरकडून नोटिसा आल्या आणि एके दिवशी डॉ. बानूबाई कोयाजींनी संपादकीय सहकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावली. मुणगेकर सरांना ‘मिसा’खाली अटक होणार असल्याचं त्यांना सरकारी सूत्रांनी कळवलं होतं. त्याची माहिती त्यांनी आम्हाला दिली आणि ‘‘मुणगेकरांच्या अनुपस्थितीतही ‘सकाळ’ नेहमीसारखा निघत राहील, याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे,’’ असं आवाहनही केलं. सुदैवानं तसं काही घडलं नाही. पण, त्या काळातही मुणगेकर सर कधी विचलित झालेले दिसले नाहीत. आणीबाणी मागे घेऊन इंदिरा गांधींनी लोकसभेच्या निवडणुका जाहीर केल्या आणि ‘सकाळ’ने कधी नाही एवढ्या आक्रमकपणे जनता पक्षाला पाठिंबा देऊन सत्ता परिवर्तनात महत्त्वाचा वाटा उचलला.
समाचार विषयीच्या समितीत स्थान
आणीबाणीत केंद्र सरकारने पीटीआय, यूएनआय, हिंदुस्थान समाचार आणि समाचार भारती या चारही वृत्तसंस्था विसर्जित करून त्यांची ‘समाचार’ ही एकच वृत्तसंस्था निर्माण केली होती. सरकारला नियंत्रण करण्यास सोयीचं म्हणून तो केलेला प्रयोग होता. आणीबाणीनंतर केंद्रात जनता पक्षाचं सरकार आल्यावर ‘समाचार’बाबतीत निर्णय घेण्यासाठी सरकारने ज्येष्ठ संपादक कुलदीप नय्यर यांच्या अध्यक्षतेखाली देशातील चार वरिष्ठ संपादकांची समिती नियुक्त केली. तीमध्ये मुणगेकर सरांचा समावेश होता. त्या काळात समितीच्या बैठकीसाठी त्यांना वारंवार दिल्लीला जाण्याची संधी मिळाली. त्या प्रत्येक भेटीत त्यांनी राजधानीत एकेका राजकीय नेत्याला भेटून त्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यात पंतप्रधान मोरारजी देसाई, चौधरी चरणसिंग, चंद्रशेखर, सुब्रह्मण्यम स्वामी यांच्यासह अनेकांचा समावेश होता. ती प्रत्येक मुलाखत सरांचा त्या-त्या विषयातील अभ्यास, प्रश्न मांडण्याची हातोटी आणि लेखनशैलीचा उत्कृष्ट नमुना होता.
मुलाखती घेण्याचा आदर्श वस्तुपाठ
पंजाबमध्ये दहशतवादाचा धुमाकूळ सुरू झाला त्या काळात मुणगेकर सरांनी अमृतसरला जाऊन दहशतवाद्यांचा म्होरक्या जर्नेलसिंग भिंद्रावाले आणि अकाली दलाचे नेते प्रकाशसिंग बादल यांच्या मुलाखती घेतल्या. त्या काळात पंजाबमध्ये भिंद्रावालेची एवढी दहशत होती, की दिल्लीतील पत्रकारही तिथे वार्तांकनासाठी जायला घाबरत असत. पण, सरांनी धाडसीपणे थेट त्यांच्या अड्ड्यावर जाऊन मुलाखती घेतल्या आणि ‘रविवार सकाळ’मध्ये प्रसिद्ध केल्या. त्यावेळी त्या मुलाखतींवर आधारित बातम्या वृत्तसंस्थांनी दिल्या. त्या देशभरातील अनेक भाषिक वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाल्या. त्या सर्व मुलाखतींचं वैशिष्ट्य म्हणजे ती केवळ प्रश्नोत्तरं नव्हती. प्रत्येक प्रश्नामागे दिलेले संदर्भ त्यात असत, मुलाखत देणाऱ्याची देहबोली आणि व्यक्त होणारे हावभाव याचं वर्णन होतं आणि शेवटी विश्लेषणही होतं. मुलाखती कशा घ्याव्यात आणि लिहाव्यात याचा तो आदर्श वस्तुपाठ आहे.
विश्वासार्हतेबद्दल निग्रह कायम
विश्वासार्हता हे पत्रकारितेतील मूल्य मुणगेकर सरांनी ‘सकाळ’मध्ये घट्ट रुजवलं होतं. ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध होणारी प्रत्येक बातमी शंभर टक्के खरी असली पाहिजे, तिच्यात एखादा शब्दही चुकीचा येऊ नये याविषयी ते अत्यंत आग्रही असत. थोडं जरी काही चुकीचं आलं तर तसा खुलासा दुसऱ्याच दिवशी येईल, याबद्दल ते काटेकोर असत. सत्तरच्या दशकात पुण्याला हादरवणाऱ्या जोशी-अभ्यंकर हत्याकांडातील आरोपींना ऑक्टोबर १९८३ मध्ये फाशी देण्यात येणार होती. फाशीची कार्यवाही मध्यरात्रीनंतर होणार होती. पद्धतीप्रमाणे आम्ही त्याची बातमी फाशीची वेळ मोकळी ठेवून पूर्ण तयार ठेवली होती. मी आणि सतीश कामत रात्रीपासून येरवडा तुरुंगाबाहेर थांबलो होतो. फाशीची कार्यवाही झाली की, आम्ही फोन करून बातमी छापण्यास सांगणार होतो. ती घटना मोठी असल्यामुळे अंकाची ‘डेडलाईन’ वाढवून ठेवण्यात आली होती. पण, मुणगेकर सरांनी आम्हा सर्वांना सांगून ठेवलं होतं, की डेडलाईनपूर्वी फाशीची कार्यवाही झाली तरच ती बातमी छापा, नाही तर अंक छपाईला जाईपर्यंत फाशी झाली नव्हती असंच छापा. डेडलाईनपूर्वी कार्यवाही झाल्यानं तो पेचप्रसंग टळला. पण, विश्वासार्हतेबद्दल सरांचा निग्रह कायम स्मरणात राहणारा होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.