cannes film festival
cannes film festival sakal
सप्तरंग

कान्सची कोरडी वारी!

ऋषिराज तायडे

जगभरातील चित्रपटसृष्टीसाठी आणि त्याच्याशी संबंधितांसाठी पर्वणी असलेला ७५ वा ‘कान्स फिल्म फेस्टिवल’चा आज समारोप होत आहे.

जगभरातील चित्रपटसृष्टीसाठी आणि त्याच्याशी संबंधितांसाठी पर्वणी असलेला ७५ वा ‘कान्स फिल्म फेस्टिवल’चा आज समारोप होत आहे. यंदा भारत-फ्रान्स राजनैतिक संबंधाचे आणि ‘कान्स फिल्म फेस्टिवल’चेही अमृत महोत्सवी वर्ष असल्याने भारताला ‘कान्स’कडून सन्माननीय देशाचा मान देण्यात आला. त्यानिमित्त केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडूनही भारतीय चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘कान्स’मध्ये जोरदार प्रयत्न करण्यात आले; मात्र दरवर्षी लाखो रुपये खर्च करून ‘कान्स’ला जाणाऱ्यांकडून भारतीय चित्रपटसृष्टीच्या समृद्धीसाठी तथा आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेता येईल अशी कामगिरी केल्याचे ऐकिवात नाही.

जागतिक चित्रपटसृष्टीची पंढरी किंबहुना जन्मस्थान म्हणून फ्रान्सची ओळख आहे. जगातील पहिले चलतचित्र फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे १८९५ मध्ये दाखवण्यात आले. त्यामुळे जगभरातील चित्रपटसृष्टीत फ्रान्सला मानाचे स्थान आहे. तिथे चित्रपटाकडे एक कला, अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून पाहिले जाते. देशातील कलावंतांची अभिव्यक्ती केवळ देशातच नव्हे तर जगभरात पोहोचावी, यासाठी फ्रान्समध्ये पूर्वीपासून चित्रपटांना प्रोत्साहन दिले जाते. पुढे केवळ देशच नव्हे, तर जगभरातील चित्रपटसृष्टी समृद्ध व्हावी, अभिव्यक्तीची देवाणघेवाण व्हावी, वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट पाहता यावे, या उद्देशाने १९४६ मध्ये ‘कान्स फिल्म फेस्टिवल’ची सुरुवात झाली. कान्स, बर्लिन आणि व्हेनिस येथील तिन्ही फिल्म फेस्टिवलमध्ये आपली कलाकृती सादर व्हावी, तिथे स्क्रीनिंग व्हावी, असे प्रत्येक कलाकाराला वाटत असते. त्याचे कारणही तसेच आहे.

‘कान्स फिल्म फेस्टिवल’ने मूळात पूर्वीपासून आपली एक आगळीवेगळी प्रतिमा जपली आहे. फेस्टिवलमधील मूळ स्पर्धेसाठी जगभरातील हजारो चित्रपटांमधून निवडक आणि दर्जेदार चित्रपटांची निःपक्षपणे होणारी निवड, त्यांचा आंतरराष्ट्रीय ज्युरींकडून केला जाणारा सन्मान, तसेच फेस्टिवलला जगभरातून येणारा प्रेक्षक, या सर्व गोष्टी कान्सने टिकवून ठेवल्या आहेत. ७५ वर्षे होऊनही कान्सचे हे महत्त्व अबाधित आहे. त्यामुळेच जगभरातील अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, गीतकार, संगीतकार आदींना नेहमीच या फेस्टिवलबाबत आकर्षण राहिले आहे. कान्समध्ये हॉलिवूडच नव्हे तर जगभरातील दर्जेदार चित्रपट कलाकृतींचा सन्मान केला जातो. चित्रपटाच्या माध्यमातून लेखक-दिग्दर्शकांकडून त्यांची अभिव्यक्ती या महोत्सवाच्या माध्यमातून जगभरातील प्रथितयश कलाकारांपुढे मांडली जाते. वेगवेगळ्या धाटणीच्या कलाकृतींबाबत संबंधित लेखक-दिग्दर्शकाची नेमकी विचारसरणी काय होती, ती कलाकृती हाताळताना त्यांचा दृष्टिकोन काय होता, ती प्रत्यक्षात पडद्यावर उतरवताना अभिनेता-अभिनेत्रींचा अभिव्यक्ती-विचार काय होता, यांसारख्या अनेक विषयांची देवाण-घेवाण केली जाते. कलाकृतीकडे व्यवसायाच्या पलिकडे संबंधित देशाची संस्कृती, अभिव्यक्ती, विचारसरणी म्हणून पाहिले जाते.

‘कान्स फिल्म फेस्टिवल’चं हे महत्त्व लक्षात घेता भारतातूनही दरवर्षी अनेक चित्रपट या फेस्टिवलमध्ये दाखल होतात.

खरेतर कान्समध्ये आपला चित्रपट जावा, हे देशातील सर्वच कलाकारांना वाटत असते आणि ते साहजिकही आहे; मात्र ‘कान्स फिल्म फेस्टिवल’मध्ये जाणाऱ्या चित्रपटांच्या निवड पद्धतीबाबत आपल्याकडे फारसे कुणी बोलत नाही. त्यामुळे कान्सला जाऊन आलेल्या कलाकृतींबाबत संबंधित दिग्दर्शक, निर्मात्यांकडून आमच्या चित्रपटाची कान्समध्ये निवड झाल्याचे सांगत देशात प्रमोशन केले जाते. ‘कान्स फिल्म फेस्टिवल’कडून आतापर्यंत अधिकृतरीत्या निवड झालेल्या भारतीय चित्रपटांची संख्या ही बोटावर मोजण्याइतकीच आहे. यंदा केवळ शौनक सेन यांची दिल्लीतील प्रदूषणावर आधारित असलेल्या ‘ऑल दॅट ब्रीद्स’ या डॉक्युमेंट्रीला विशेष स्क्रीनिंगचा मान मिळाला. दीपिका पदुकोनला इंटरनॅशनल ज्युरी म्हणून यंदा निमंत्रित करण्यात आले होते. मुळात कान्सला जाणाऱ्या भारतीय चित्रपटांची निवड ही केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय आणि राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून केली जाते. दरवर्षी देशभरात तयार होणाऱ्या हजारो चित्रपटांपैकी केवळ सहा ते सात चित्रपटांची सरकारकडून निवड केली जाते, ती कशी केली जाते हा मुद्दा वेगळाच.

यंदा सहा चित्रपट केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून कान्सला पाठवण्यात आले. त्यात निखिल महाजन यांचा ‘गोदावरी’, आर. माधवनचा ‘रॉकेट्री दि नंबी इफेक्ट’, जयराज यांचा ‘ट्री फूल ऑफ पॅरोट्स’, आचल मिश्रा यांचा ‘धुईन’, बिश्वजीत बोरा यांचा ‘बुंबा राईड’ आणि शंकर श्रीकुमार यांचा ‘अल्फा-बिटा-गामा’ या चित्रपटांचा समावेश होता. त्याशिवाय महाराष्ट्र सरकारकडून ‘कारखानीसांची वारी’, ‘पोटरा’ आणि ‘तीचं शहर होणं’ हे तीन मराठी चित्रपट कान्ससाठी निवडण्यात आले होते. निवड झालेले हे चित्रपट, त्याचे दिग्दर्शक, कलाकार असे प्रत्येकी एक-दोन जण, माहिती व प्रसारण मंत्री, सांस्कृतिक मंत्री, संबंधित विभागाचे अधिकारी आणि त्यांचे सहकारी हे सर्वजण खास सरकारी खर्चातून कान्सची वारी करतात. भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय ग्राहक मिळवून देणे, देशातील चित्रिकरण व पर्यटन स्थळांचे महत्त्व वाढवणे, हा कान्सला जाण्याचा हेतू असल्याचे सांगितले जाते; मात्र आश्चर्याची बाब म्हणजे अशा पद्धतीने कान्सला जाणाऱ्या चित्रपटांचे स्क्रीनिंग हे फेस्टिवलच्या मूळ दालनात नव्हे, तर संबंधित देशाच्या किंवा राज्याच्या एका छोटेखानी दालनातील टीव्ही स्क्रीनवर केले जाते. त्यानंतर भारतात परतल्यावर संबंधित चित्रपटांचे दिग्दर्शक-कलाकार आमचा चित्रपट कान्सला फेस्टिवलमध्ये जाऊन आल्याचे सांगतात. एवढंच नव्हे, तर प्रमोशनवेळी चित्रपटाच्या पोस्टरवरही तशी प्रसिद्धीही केली जाते. थोडक्यात काय तर, आपणच आपल्या चित्रपटांची निवड करून आपलीच पाठ थोपटण्याचा हा प्रकार आहे.

अशाप्रकारे भारतीय चित्रपटांनी ‘कान्स फिल्म फेस्टिवल’मध्ये जावे की जाऊ नये, याबाबत कुणालाही विरोध नाही; मात्र तिथून परतल्यावर केले जाणारे प्रमोशन चुकीचे आहे. चित्रपटांच्या स्क्रीनिंगपलिकडे कान्समध्ये अनेक चांगल्या संधी उपलब्ध असतात; मात्र रेडकार्पेटवर फोटोशूट करण्यापलिकडे भारतीय कलाकारांची मजल गेली नाही. कोरोनामुळे दोन वर्षांनतर ‘कान्स फिल्म फेस्टिवल’ होत असल्याने भारतानेही यंदा जोरदार तयारी केली होती. दस्तुरखुद्द माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, केंद्रीय चित्रपट सेन्सॉर बोर्डचे प्रतिनिधी यांच्यासह अनेक भारतीय कलाकारांनी तिथे हजेरी लावली. पत्रकार परिषद आणि रेडकार्पेटवर फोटो काढण्यापलिकडे त्यांनी काही विशेष केल्याचे ऐकिवात नाही. मुळात जगभरातील चित्रपटसृष्टीशी निगडित केवळ कलाकार-दिग्दर्शकच नव्हे, तर अनेक नामवंत चित्रपट लेखक, चित्रपट व्यावसायिक, प्रमोटर्स, प्रतिनिधी कान्सला हजेरी लावतात. किमान त्यांच्याशी चर्चा करून भारतीय चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी प्रयत्न नक्कीच करता येतात. विविध देशांतील सांस्कृतिक विभागाशी द्विपक्षीय कराराच्या माध्यमातून संबंध प्रस्थापित करता आले असते. त्याद्वारे भारतीय चित्रपटांचा दर्जा कसा वाढवता येईल, यासाठीही प्रयत्न करता आले असते; मात्र त्यासाठी ना आपल्या मंत्रिमहोदयांनी पुढाकार घेतला, ना भारतीय कलाकारांनी तसे प्रयत्न केले, अशी खंत कान्स महोत्सवाला हजेरी लावलेले चित्रपट अभ्यासक गिरीश वानखेडे यांनी व्यक्त केली.

स्पॉन्सरशिपचा बाजारू खेळ

खरंतर ‘कान्स फिल्म फेस्टिवल’ हा जगभरातील चित्रपट कलाकारांसाठी पर्वणी असते. कान्सला जाण्याची संधी मिळण्यासाठी अनेक बॉलीवूड कलाकार उत्सुक असतात. काही कलाकार निवड झालेल्या चित्रपटांच्या माध्यमातून, तर काही कलाकार विविध कंपन्यांच्या स्पॉन्सरशिपच्या भरवशावर कान्सची चकटफू वारी करतात. मूळात कुणाच्या कान्सला जाण्याला विरोध नाही; मात्र त्याऐवजी देशातील दर्जेदार मात्र प्रसिद्धीपासून किंवा प्रायोजकत्वापासून वंचित राहिलेल्या कलाकृतीला मदत मिळाल्यास संयुक्तिक ठरेल. गेल्या काही वर्षांत एकही आशयघन चित्रपट न करणाऱ्या अनेक अभिनेत्री दरवर्षी स्पॉन्सरशिपच्या भरवशावर कान्सच्या रेडकार्पेटवर फोटोशूट करण्यापलिकडे काय साध्य करतात, असा सवालही चित्रपटसृष्टीतील काही मान्यवरांनी उपस्थित केला.

कान्स दौऱ्याचं फलित काय?

‘कान्स फेस्टिवल’ हा एकप्रकारे भारतीय चित्रपटाच्या प्रमोशनसाठी उत्तम ठिकाण झाले आहे. आपल्याच लोकांकडून विशेष पद्धतीने निवड होऊन कान्सला गेल्यानंतर रेडकार्पेटच्या पलिकडे जाऊन काय करतात, हा मोठा प्रश्न आहे. तिथे संधी असताना आपल्या चित्रपटांच्या समृद्धीसाठी विविध आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्सशी करार का केले जात नाही, विविध देशांच्या कलाकारांशी चर्चा करून कन्टेन्ट एक्स्चेंजसाठी प्रयत्न का केले जात नाहीत, तेथील माध्यमांपुढे आपले कलाकार संवाद का साधत नाहीत, कान्सला गेलेल्या कलाकार प्रमोशनच्या पलिकडे जाऊन काय साध्य करतात, असे सवाल गिरीश वानखेडे यांनी उपस्थित केले.

rushirajtayde@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Virat Kohli RCB vs CSK : मी एप्रिलमध्येच बॅग पॅक केली होती.... विराटला स्वतःच्या संघावर विश्वास नव्हता?

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : पुणे-मुंबई हायवेवर वाहतूक कोंडी, वाहतूक संथ गतीने

SCROLL FOR NEXT