साठी पार केल्यानंतरच्या दुसऱ्या इनिंगमध्ये अमिताभ आव्हानात्मक भूमिका अंगावर घेत गेला आणि मग सुरू झाले हिंदी चित्रपटसृष्टीने तोपर्यंत मनातही न आणलेले प्रयोग. खाकी, देव, एकलव्य, द लास्ट लिअर, ब्लॅक, पा, पिंक, बदला, १०२ नॉट आउट आणि पिकू. ‘पिकू’ चित्रपटातली एक हेकेखोर, आग्रही, विक्षिप्त, जुन्या संस्कृतीशी नाळ सांगणारा बंगाली ज्येष्ठ नागरिक ‘भास्कोर बॅनर्जी’ अमिताभला त्याच्या कारकीर्दीतील चौथा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गेला. एकविसाव्या शतकातील तरुण प्रतिभावान दिग्दर्शकांनी नवनवीन विषयांवर नव्या युगाच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साथीने चित्रपट बनविण्यास सुरुवात केली. गरिबी, डाकूपट, लॉस्ट अँड फाउंड फॉर्म्युला आता मागे पडला होता; पण हाताशी अजूनही साठीच्या पुढं गेलेला अमिताभ होता. ह्या नवीन पिढीसोबत अमिताभने ट्युनिंग जमवलं आणि लाजवाब मल्टिप्लेक्स सिनेमे चित्रपट रसिकांना बघायला मिळाले. याच शृंखलेत २०१५ मध्ये चित्रपटगृहांत झळकलेला दिग्दर्शक शुजीत सरकार यांचा ‘पिकू’ हा त्या सर्वोत्तम सिनेमांतील एक ठरला.
‘इन्सान का इमोशन उसके मोशन के साथ जुडा हुवा है’ असं ठामपणे सांगणाऱ्या एका विक्षिप्त बंगाली म्हाताऱ्याच्या भूमिकेत अमिताभने प्रतिभेच्या गर्भगृहातील आतलं दालन उघडून दाखवलं होतं. ‘बद्धकोष्ठता’ असा विषय घेऊन एक संपूर्ण सिनेमा जीवनाचं तत्त्वज्ञान समजावून सांगू शकतो, हेच एक आश्चर्य होतं. अत्यंत हेकेखोर, स्वतःपलीकडं काहीच बघू न शकणारा, सतत आपल्याच विनाकामाच्या दिनचर्येच्या तोऱ्यात जगणारा आणि संपर्कात येणाऱ्या तरुण पिढीने केवळ त्याचीच सोय बघावी, अशी ठाम धारणा घेऊन जगणारा सत्तर वर्षांचा सुखवस्तू बंगाली म्हातारा साकारताना अमिताभने तोंडात बोट घालायला लावलं होतं. बद्धकोष्ठतेची त्याची चोवीस तासांची तक्रार ही वास्तवापेक्षा अधिक मानसिक असते, तरी प्रत्येक गोष्टीचा संबंध बद्धकोष्ठतेशी जोडणारे त्याचे तर्क अफलातून असतात. प्रत्येक वाक्याला गालातल्या गालात हसायला लावणारं असं बंगाली म्हाताऱ्याचं पात्र मिश्कील वाटत असलं, तरी करायला अवघड होतं.
तरुण, सुंदर, प्रतिभावान दीपिका पदुकोण अमिताभची आधुनिक मुलगी ‘पिकू’ बनली होती.
चित्रपटातल्या या दोन ठळक भूमिकांशिवाय एक तिसरी भूमिका होती ‘राणा चौधरी’ या खासगी ट्रॅव्हल एजन्सीच्या मालकाची, जो पिकू आणि तिच्या विक्षिप्त म्हाताऱ्याला दिल्ली ते कोलकता असा लांब पल्ल्याचा प्रवास गाडीचा चालक बनून घडवतो. १९७१ ते १९८७ अशा सतरा वर्षांच्या कसोटी कारकीर्दीत सुनील गावसकरला सलामीला साथ देणारे एकूण तेवीस फलंदाज होते. त्यांतील चार-दोन सोडल्यास बाकीचे खेळाडू गुणी असूनही आता सहजपणे आठवत नाहीत. आपल्या पन्नास वर्षांच्या कारकीर्दीत अमिताभ बच्चनच्या पुरुष सहनायकांची यादी अशीच लांबलचक आहे. शुजीत सरकारच्या ‘पिकू’ चित्रपटात अमिताभ बच्चनचा सहकलाकार म्हणून चमकलेला इरफान खान मात्र लक्षात राहिला.
वरवर पाहता कथेच्या दृष्टीने साधारण वाटणारी ही भूमिका इरफान खानच्या वाट्याला आली आणि महत्त्वाची होऊन बसली. अमिताभशी स्पर्धेचा प्रश्नच नव्हता; फक्त त्याच्यासमोर ताठ उभं राहणं महत्त्वाचं होतं आणि तो तसा राहिला. अमिताभसोबत तणावाचे प्रसंग असो, हलकंफुलकं दृश्य असो, वैतागाचं प्रदर्शन असो, की दीपिकाच्या मनाला ठेच न पोहोचवता तिच्या म्हाताऱ्याला हाताळणं असो; इरफान केवळ टिच्चून उभाच नव्हता, तर त्याच्या अस्तित्वामुळे हा मजेदार ड्रामा एक अविस्मरणीय कलाकृती होऊन बसला. एक तर समोर खुद्द अमिताभ आणि त्याच्यात भर म्हणजे, त्याने राष्ट्रीय पुरस्कार विजेत्याच्या दर्जाचा केलेला अभिनय. इतकं असूनही इरफानचं नाव घेतल्याशिवाय ‘पिकू’च्या यशाची कथा पूर्ण होत नाही. ‘पिकू’ सिनेमात आधुनिक जीवनशैलीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नायिकेला आपली सांस्कृतिक पाळंमुळं यांचं महत्त्व ध्यानात आणून देणारा आणि अमिताभला बद्धकोष्ठतेच्या भासातून सहज मुक्ती देणारा इरफान खऱ्या आयुष्यात अजून जगायला हवा होता.
सिनेमाची सुरुवातच दिल्लीतील उच्चभ्रू वस्तीतील एका उच्चमध्यमवर्गीय घरातील पहाटेच्या वातावरणात होते. या घरात हेकेखोर म्हातारा अमिताभ, त्याची अविवाहित पण तीसच्या पुढं गेलेली मुलगी पिकू, जुन्या जमान्यातील प्रथेप्रमाणे गावाकडून आणला गेलेला निष्ठावान गडी बुधन हे तिघं असतात. अमिताभने साकारलेल्या हेकेखोर म्हाताऱ्याच्या भूमिकेला वास्तवतेची फोडणी द्यायला ह्या सहकलाकारांचा मिश्कील आणि अनौपचारिक वावर कामी पडतो. बुधन तर आपल्या मालकाच्या सेवेत असा काही गुरफटलेला असतो की, मालक लघवीला जातेवेळी मागून लहान मुलांना देतात तसा ‘सु...सु’ असा बॅकग्राउंड स्कोर देणं यासारखं कर्तव्यसुद्धा तो निष्ठेने पार पाडत असतो. म्हाताऱ्याची मेहुणी झालेली, म्हातार वयातही गोड दिसणारी मौशुमी चटर्जीसुद्धा तिच्या मजेदार शैलीत अमिताभच्या भूमिकेला उठाव देते. या चित्रपटातले गमतीशीर संवाद जागोजागी प्रेक्षकांच्या मनाला गुदगुल्या करून जातात, त्याची मजा केवळ बघण्यातच आहे. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी अमिताभला केवळ बद्धकोष्ठताच दिसत असते. हे मजेदार बाप-लेक पाहुण्यांसोबत डायनिंग टेबलवर समोर चमचमीत जेवणाचे पदार्थ मांडलेले असतानासुद्धा सकाळच्या प्रहरी क्रमाने बदलत गेलेल्या विष्ठेच्या रंगाची गंभीर चर्चा करत असतात.
मुळात या चित्रपटात सुरुवातीपासून शेवटपर्यंत बद्धकोष्ठतेचा जो माहौल तयार केला गेला आहे, त्यातून आपण नसल्या चिंतेत स्वत:ला कसं अडकवून घेत असतो, त्याविषयीचा संदेश दिला गेला आहे. हजार वाणांची औषधं, डॉक्टर, पॅथॉलॉजी रिपोर्ट आणि म्हाताऱ्याची तगमग पाहून वातावरण बद्धकोष्ठतामय होऊन जातं. पण, तितक्याच सहजपणे इरफान खानद्वारे सिनेमाच्या शेवटी भास्कोर बॅनर्जीला सहज जीवनाचा दिला गेलेला सल्ला जीवनाचं गम्य सांगून जातो. इरफानच्या सल्ल्यानुसार आपल्या आवडत्या कोलकता शहरातून भास्कोर बॅनर्जी सायकलवर मनमोकळी रपेट मारतात, सगळी पथ्यं धाब्यावर बसवून पाहिजे ते बंगाली स्ट्रीट फूड खातात, मिठाईचं मोठं पुडकं घेऊन घरी येतात आणि सर्वांच्या संतापाकडं दुर्लक्ष करत संडासात जाऊन आयुष्यात पहिल्यांदा मनमोकळ्या ‘मोशन’चा आनंद घेतात. त्यादिवशी सामाधानाने जे भास्कोर बॅनर्जी झोपी जातात, ते थेट सकाळी न उठण्यासाठीच.
वयाच्या साठीनंतरची सुमारे वीस वर्षं वेगळाच अमिताभ चित्रपटरसिकांना अनुभवण्यास मिळाला. ‘पिकू’सारख्या सर्वांगसुंदर चित्रपटात इरफान आणि दीपिकासारख्या दोन ते चार पिढ्या कनिष्ठ असलेल्या कलाकारांच्या सहवासातील अमिताभचा सहज अभिनय बघून स्तिमित व्हायला होतं. ऐंशी वर्षांच्या वयात अजूनही त्याच्यातील सर्वोत्तम बाहेर येणं बाकी आहे की काय?
(सदराचे लेखक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचे जाणकार अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.