सप्तरंग

सईचे बाबा का रडले?

संजीव लाटकर

बोलता-बोलता बाबांचा आवाज घोगरा झाला. डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. बाबांनी शर्टाच्या बाहीने डोळे पुसले.

बोलता-बोलता बाबांचा आवाज घोगरा झाला. डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. बाबांनी शर्टाच्या बाहीने डोळे पुसले. आई समजूत घातल्यासारखी बाबांच्या पाठीवरून हात फिरवत होती; मग मात्र बाबांना राहावलं नाही, ते धाय मोकलून रडू लागले. भावनावश होतील हे अपेक्षित होतं; पण त्यांच्या भावनांचा बांध अशा रीतीने फुटेल, याची मला कल्पना नव्हती...

ए ठरल्याप्रमाणे माझा सईच्या आई-बाबांबरोबर व्हिडीओ कॉल झाला. त्यात तिच्या बाबांनी सईबद्दलच्या तक्रारींचा पाढाच वाचला. त्यांना सईच्या वागण्याचा खूप संताप येत होता. त्यांचा राग अनावर होत असल्याचं स्पष्ट दिसत होतं. आपल्या भावना या बरोबरच आहेत आणि त्या अत्यंत योग्य पद्धतीने आपण व्यक्त करत आहोत, अशी सईच्या बाबांची ठाम धारणा होती.

मी त्यांना एकच प्रश्न विचारला, आपण आपल्या व्यक्तिगत अपेक्षांनुसार सईकडे बघणार आहोत की सईकडे आपण एक व्यक्ती म्हणून बघणार आहोत? सईला वाटतंय की, ती एक व्यक्ती आहे, जिला स्वतःचं व्यक्तिमत्त्व आहे, स्वभाव आहे, त्या स्वभावातले चढ-उतार आहेत... तिला तिच्या आयुष्याबद्दल विचार करायला थोडी-फार तरी मोकळीक आहे. तिला काही बंधनांच्या चौकटी जरूर आहेत; पण तिला स्वतःचा म्हणून विचार करण्याचं स्वातंत्र्यही आहे. आपल्या अपेक्षेनुसार मुलं वागत नाहीत म्हणजे ती वाईट वागतात, असा निष्कर्ष आपण काढतो आणि आपल्या अपेक्षाभंगामुळे आपण संतापतो... पौगंडावस्थेतली मुलं-मुली नेमकं काय शोधतात, हे आपल्याला एकदा कळलं की पौगंडावस्थेतल्या मुलांचं पालकत्व हाताळणं हे सोपं होऊन जातं!

माझं म्हणणं त्यांना बहुधा पचनी पडलेले नसावे. ‘सई खूप उद्धट बोलते! प्रत्येक गोष्टीत तिचं आर्ग्युमेंट असतं. मी इतके कष्ट करतो. बारा-बारा तास काम करतो. नोकरीनिमित्त बाहेरगावी फिरतो. मिळेल ते खातो. मिळेल तिथे झोपतो. कुणासाठी? सईच्या भल्यासाठीच ना? तिला चांगलं शिक्षण मिळावं, तिला आयुष्यात सुख-सोयी मिळाव्यात, तिचं भवितव्य उज्ज्वल व्हावं, यासाठीच मी कष्ट करतो ना? पण याची तिला जराही फिकीर नाही. तिला बाबा म्हणजे फक्त पॉकेटमनी देणारं एटीएम मशीन वाटतं. सईला जरा काही सूचना केल्या, की ती लगेच अंगावर येते. तिला सांगायचं काहीच नाही. तिला काहीही बोललं, की ती प्रचंड वाद घालते. बेसिक शिष्टाचार, वागण्याची पद्धत हे तर सोडाच, पण साधं अभ्यासावरून बोललेलंही तिला खपत नाही. आईला थोडीफार कामात मदत करेल, तर तेही नाही. मी तिला म्हटलं एकदा, की तुला मोलकरीण म्हणूनसुद्धा कोणी घरात ठेवणार नाही नोकरीला! आमच्या घरात राहते... आमचं खाते-पिते... आम्ही तिच्या संगोपनासाठी कष्ट करतो. खर्च करतो आणि ती आम्हालाच दुरुत्तरे करणार, हे कसं चालेल? बरं, आम्ही तिचे शत्रू आहोत का? जे सांगतोय, ते तिच्याच भल्याचं आहे ना? एवढंही कळायला नको का तिला?’

सईच्या बाबांना काय बोलू आणि काय नको, असं झालं होतं. त्यांची सईबद्दल गंभीर तक्रार होती आणि त्यांच्या मनातला राग नुसता उफाळून येत होता. सईची आईमध्ये एकदा म्हणालीसुद्धा, ‘तुम्ही आधी शांत व्हा बरं! नाहीतर तुमचं बीपी वाढेल...’

तेव्हा ते एखाद मिनीट शांत झाले; पण पुन्हा त्यांचा मूळ स्वभाव उफाळून आला आणि त्यांच्या रागाचा पारा पुन्हा चढला.

क्रोध हा माणसाचा शत्रू आहेच; पण क्रोध हा पालकांचा तर कट्टर शत्रू आहे! सईच्या बाबांना क्रोध आवरत नव्हता. त्यांच्यात आणि सईमध्ये कोणत्या प्रकारच्या चकमकी उडत असतील, याची मी कल्पना करू शकत होतो.

मी सईच्या बाबांना म्हटलं, ‘तुम्ही तिला मोलकरणीचीही नोकरी मिळणार नाही, असं सांगून सईचा जो अपमान केला आहे, त्याबद्दल तिची माफी मागितली पाहिजे... शिवाय तुम्ही तुमच्याच घरात राब-राब राबणाऱ्या मोलकरणीबद्दल अनादर व्यक्त केला आहे. हा सईवर होणारा चुकीचा संस्कार आहे. आपण मुलांना इतरांबद्दल आदर राखायला शिकवतो, त्यांचा अनादर करायला नव्हे!’

‘मी तुमच्याकडून सईची तुमच्या दृष्टीने वाईट किंवा तुम्हाला नापसंत असणारी बाजू ऐकली. आता मला सईचे थोडे चांगले गुण सांगाल का? की सई सर्वस्वी दोषपूर्णच आहे? तिच्यात फक्त दोषच दोष आहेत?’

माझ्या या प्रश्नावर ते एकदम शांत झाले. त्यांची बॉडी लँग्वेज बदलली आणि ते सईच्या आईकडे पाहू लागले. मी बाबांना म्हटलं, ‘त्या मला सांगतीलच; पण सईमधले चांगले गुण तुम्हीच आधी मला सांगा...’

सईचे बाबा वाक्यांची जुळवाजुळव करू लागले. थोडसं आठवल्यासारखं करू लागले, मग थोडे स्वतःशीच हसले. आता त्यांच्या आवाजाचा पोतही बदलला होता. त्यांचा आवाज एकदम मृदू आणि मऊ झाला होता. प्रेमळ पित्यासारखा!

‘सई खूप हुशार आहे. प्रामाणिक आहे. ती आमची एकुलती एक मुलगी आहे. ती आमच्यावर खूप प्रेम करते. तिला अन्याय बिलकूल सहन होत नाही. खूप कनवाळू आहे ती. घासातला घास काढून द्यायची तिची तयारी असते. ती नेहमी खूप खरं बोलते. खोटं बोलणं तिला माहीत नाही. ती अलीकडे आळशी झाली असली, तरी मूळची हुशार आहे. ती चित्र छान काढते. कधीतरी कविताही करते. त्या छान असतात. ती खूप उत्साही आहे. सतत हसायला आणि इतरांना हसवायला तिला आवडतं. ती बिलकूल हट्टी नाही. एकदाच हट्ट करते. नंतर सोडून देते. लहान असताना सायकलसुद्धा तिने एकदाच मागितली होती. मी म्हटलं मला शक्य नाही, नंतर तिने पुन्हा कधीच विचारलं नाही; पण मग तिच्या वाढदिवसाला मी जेव्हा सायकल घेतली, तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिला खर्च करायला आवडत नाही. मला कधीकधी वाटतं, की ती लहान मुलांच्या गोष्टीतली परी किंवा राजकुमारी आहे. ती खूप लाघवी आहे. तिला घालून-पाडून बोलल्यावर मला वाईटच वाटतं. ती माझं ऐकत नाही, याचंही मला खूप वाईट वाटतं. एखादी गोष्ट ठरवली, तर ती गोष्ट सईकडून पूर्ण होतेच होते. ती खूप चांगली आहे, गुणी आहे, म्हणून...’बोलता-बोलता बाबांचा आवाज घोगरा झाला. डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. बाबांनी शर्टाच्या बाहीने डोळे पुसले. आई समजूत घातल्यासारखी बाबांच्या पाठीवरून हात फिरवत होती; मग मात्र बाबांना राहावलं नाही. ते धाय मोकलून रडू लागले. मी स्तब्ध झालो. ते भावनावश होतील हे अपेक्षित होतं. पण त्यांच्या भावनेचा बांध अशा रीतीने फुटेल याची मला कल्पना नव्हती...

सईचे बाबा शांत झाले. मी बोलू लागलो... मी त्या दोघांशी काय बोललो, ते आपण पुढल्या आणि अखेरच्या भागात वाचूया!

(दुसरा भाग)

sanjeevlatkar@hotmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT