School Class
School Class sakal
सप्तरंग

ध्रुवने क्लासला दांड्या का मारल्या?

संजीव लाटकर

ध्रुवच्या क्लासचे संचालक अचानक त्याच्या घरी पोहचले. ध्रुवच्या आई-वडिलांकडून ध्रुव खेळायला बाहेर गेला असल्याचे कळले. अभ्यासाविषयी विचारले तर उत्तम सुरू असल्याचे सांगितले.

ध्रुवच्या क्लासचे संचालक अचानक त्याच्या घरी पोहचले. ध्रुवच्या आई-वडिलांकडून ध्रुव खेळायला बाहेर गेला असल्याचे कळले. अभ्यासाविषयी विचारले तर उत्तम सुरू असल्याचे सांगितले. ‘तो रोज क्लासला जातो. तिथूनच परस्पर शाळेला जातो. दोन्हीकडे दिलेला अभ्यास घरी आल्यावर संध्याकाळी करतो. अभ्यास झाला की खेळायला जातो.’ हे ऐकून क्लासच्या संचालकांना धक्काच बसला, कारण गेले दोन महिने तो क्लासला आलेलाच नव्हता...

माझ्या माहितीतल्या एका क्लासच्या संचालकांचा फोन आला... त्यानिमित्ताने ध्रुव आणि ध्रुवच्या आई-बाबांची भेट झाली. त्यामुळेच मला ध्रुवची गोष्ट समजली आणि त्याच्या कुटुंबातल्या समस्याही कळल्या. ध्रुव (नाव बदलले आहे) हा अनेक दिवस क्लासला आलाच नाही, म्हणून या संचालकांनी त्याच्या क्लासमधल्या मित्रांकडे त्याच्याविषयी चौकशी केली. मित्र अनभिज्ञ होते किंवा काही सांगायला तयार नव्हते. जे क्लासमधले मित्र होते, ते शाळेतही मित्र होते. चौकशी केल्याच्या दोन-तीन दिवसानंतर ध्रुवच्या पालकांची चिठ्ठी आली. ध्रुवच्या आईचे ते पत्र होते आणि ध्रुव तब्येतीच्या कारणामुळे अजून काही दिवस क्लासला येऊ शकणार नाही, असे त्यात लिहिले होते. क्लासच्या संचालकांचे समाधान झाले. ध्रुवला काय झाले, तब्येतीचा कोणता प्रॉब्लेम आहे वगैरे चौकशी त्यांनी मित्रांकडे केली; पण मित्रांपैकी कोणीच काही प्रतिसाद दिला नाही.

दरम्यान बरेच दिवस गेले. ध्रुव अजूनही गैरहजरच होता. परीक्षा जवळ आल्यामुळे क्लासच्या संचालकांना आता चिंता वाटू लागली. ध्रुव शाळेतही असाच गैरहजर असल्यास त्याचे वर्ष वाया जाण्याचा धोका होता. ध्रुवला नेमका कोणता आजार झाला आहे, तो कशाने आजारी आहे, गंभीर स्वरूपाचा आजार असेल, तर तो कधी बरा होईल, त्याला परीक्षा कशी देता येईल, त्याच्या परीक्षेची तयारी थोडक्या वेळेमध्ये कशी करता येईल, असा विचार करून त्यांनी उपलब्ध फोन नंबरवर फोन केला. क्लासच्या रेकॉर्डमध्ये ध्रुवच्या आईचा म्हणून नमूद केलेला तो नंबर होता. तो फोन ध्रुवने उचलला. संचालकांनी ध्रुवकडे चौकशी केली.

ध्रुवचा आवाज व्यवस्थित होता. शिवाय पार्श्वभूमीला ऐकू येणाऱ्या आवाजामुळे तो घरात नव्हता, एवढे त्या संचालकांनी ताडले. त्याला विचारले, की तू गेल्या अनेक दिवसांपासून क्लासला का येत नाहीस? तर तो म्हणाला मी आजारी आहे, म्हणून क्लासला येत नाही! संचालकांनी ताबडतोब त्याला विचारले, मग तू आता कुठे आहेस? त्यावर ध्रुव गडबडला. त्याला लगेच उत्तर देता आले नाही. औषध आणायला बाहेर आलो आहे, असे उत्तर त्याने आठवल्यासारखे दिले; पण संचालकांना ते पटले नाही. आजारी माणसाला औषध आणायला कोणी बाहेर पाठवत नाही. औषध घरपोचही मिळू लागली आहेत. त्यामुळे त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी मनोमन ठरवले की, या रविवारी सकाळी ध्रुवच्या घरी अचानक जायचे आणि वस्तुस्थिती काय आहे, ती स्वतःच्या डोळ्यांनी बघायची.

रविवारी सकाळी अचानकपणे संचालक ध्रुवच्या आलिशान आणि उच्चभ्रू सोसायटीतल्या घरी पोहोचले. तेव्हा ध्रुव घरात नव्हता. ध्रुवची आई तिच्या लॅपटॉपवर बसून कसलेसे काम करत होती आणि बाबा मोबाईलवर मग्न होते. क्लासच्या संचालकांनी स्वतःची ओळख करून दिल्यावर दोघांनी आपापली कामे बाजूला सारली आणि संचालकांचे स्वागत केले. क्लासचे संचालक अचानक घरी आलेले पाहून दोघांनाही आश्चर्य वाटले. संचालकांनी विचारले, ध्रुव कुठे आहे? त्याची आई म्हणाली, की तो आत्ताच खेळायला बाहेर पडला आहे. संचालकांनी विचारले, त्याचा अभ्यास कसा सुरू आहे? त्यावर बाबांनी उत्तर दिले, उत्तम सुरू आहे. तो रोज क्लासला जातो. तिथूनच परस्पर शाळेला जातो. दोन्हीकडे दिलेला अभ्यास घरी आल्यावर संध्याकाळी करतो. अभ्यास झाला की खेळायला जातो.

संचालकांच्या घशाला कोरड पडली. त्यांनी प्यायला पाणी मागितले. ध्रुवची आई तत्परतेने उठून पाणी घेऊन आली. आणि थोड्या वेळाने तिने चहाही आणला. तोपर्यंत संचालक आणि ध्रुवचे बाबा यांच्यात इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू होत्या. संचालकांच्या लक्षात असे आले की ध्रुवची आई एका खासगी बँकेत खूप मोठ्या हुद्द्यावर आहे. ध्रुवचे बाबा हे एका आंतरराष्ट्रीय कंपनीत अतिशय वरिष्ठ पदावर काम करतात. दोघेही आपापल्या कामानिमित्त जास्त वेळ बिझी असतात. शिवाय ऑफिसच्या कामानिमित्त त्यांचे बाहेरगावचे आणि परदेशचे दौरेही सुरू असतात. ध्रुव हा त्यांचा एकुलता एक मुलगा, जो सध्या इयत्ता आठवीमध्ये होता. ध्रुवशी त्यांचा प्रत्यक्ष संपर्क होत नसला तरी ते दिवसातून दोन ते तीन वेळा ध्रुवला जमेल तसा फोन करीत आणि ध्रुव त्यांना त्याचा शाळेतला आणि क्लासमधला अभ्यास कसा सुरू आहे, ते नियमितपणे सांगे. त्यामुळे ध्रुवाच्या प्रगतीबद्दल ते समाधानी होते.

‘आम्ही पालक सभा घेतो, त्यापैकी एकाही पालक सभेला तुम्ही आला नाहीत. म्हणून मी तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण क्लासच्या फॉर्ममध्ये तुमचा म्हणून जो नंबर आहे तो ध्रुवच उचलतो. त्यामुळे तुमच्याशी आम्हाला बोलता आले नाही. शेवटी मी फॉर्ममधला पत्ता पाहून आज तुमच्याकडे आलो...’

काहीतरी गंभीर प्रकरण आहे, असे वाटून दोघांच्याही चेहऱ्यावर चिंता उमटली. बाबांनी काळजीने विचारले, ‘‘काही सिरीयस प्रॉब्लेम आहे का? ध्रुवने काही सिरीयस चूक केली आहे का? मारामारी वगैरे? त्याची प्रगती तर व्यवस्थित सुरू आहे ना?’’

संचालकांच्या चेहऱ्यावर आठ्या उमटल्या. ते म्हणाले, ‘‘अहो, चूक करायला तो क्लासला आला तर पाहिजे! गेले दोन महिने तो क्लासला आलेला नाही. त्याने क्लास बुडवला. क्लासच्या परीक्षा बुडवल्या. अभ्यासात तर तो मागे पडला आहेच, पण माझी अशी शंका आहे की, शाळेतही तो जात नसावा. हे कळवण्यासाठी तुम्हाला फोन केला, तर फोन त्याने उचलला. म्हणजे त्याने तुमचा नंबर आमच्या फॉर्ममध्ये भरलेलाच नाही. हुशारीने स्वतःचाच नंबर दिला आहे. ॲडमिशनचे पैसे घेऊन तो स्वतः आलेला होता. त्यामुळे आमचा आणि तुमचा कधी संपर्क झाला नाही. तुम्ही घरून फॉर्मवर सही करून तो आमच्याकडे पाठवला होता! त्याला कधी विचारले, तर सांगायचा की, आई आणि बाबा दोघेही खूप बिझी असतात. अगदी परवाच मी त्याला फोनवर विचारले, तर तो म्हणाला की तो आजारी आहे. औषध आणायला बाहेर पडला आहे. इतकेच काय, तो आजारी असल्याची तुमच्या सहीची चिठ्ठीही त्याने क्लासमध्ये पाठवली...’’

हे सर्व ऐकून ध्रुवचे आई आणि बाबा दोघेही धक्का बसल्यामुळे खचून गेले. दोघांचाही चेहरा पूर्णपणे उतरला होता. क्लासचे संचालक म्हणाले, ‘‘ध्रुव आल्यावर त्याच्याशी हे सर्व बोला; पण कृपा करून त्याला जास्त ओरडू नका आणि मारू तर अजिबात नका. तो असे का वागला, हे आपल्याला नीट समजून घ्यावे लागेल. तुमचे आणि त्याचे बोलणे झाले की त्याला घेऊन तुम्ही स्वतः क्लासमध्ये या. मग मी त्याच्याशी स्वतंत्रपणे बोलेनच.’

क्लासचे संचालक निघायला उठले... ते दरवाजापर्यंत आले तोच दरवाज्याची बेल वाजली... बाहेर ध्रुव उभा होता! संचालकांना घरात पाहून ध्रुवच्या चेहऱ्यावर आश्चर्य होते, भीती होती... त्यांची नजर टाळून ध्रुव आत शिरला. संचालक बाहेर पडले...

ध्रुव आणि त्याच्या आई-बाबांमध्ये काय बोलणे झाले? ध्रुव शाळेत आणि क्लासला का जात नव्हता? या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढल्या भागात...

(पूर्वार्ध)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: पीयूष चावलाच्या फिरकीची जादू चालली, हेडपाठोपाठ क्लासेनलाही केलं क्लिन-बोल्ड; हैदराबादचा निम्मा संघ गारद

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT