grow up
grow up sakal
सप्तरंग

मोठेपणी तू कोण होणार?

संजीव लाटकर

तुम्ही आजच तुमच्या मुलांना अवश्य प्रश्न करा, की तू मोठेपणी कोण होणार? कदाचित त्यांच्याकडे उत्तर असेल. ते तुम्हाला सांगतील. त्यांनी त्यांचं स्वप्न शेअर केलं तर त्यांचं कौतुक करा.

तुम्ही आजच तुमच्या मुलांना अवश्य प्रश्न करा, की तू मोठेपणी कोण होणार? कदाचित त्यांच्याकडे उत्तर असेल. ते तुम्हाला सांगतील. त्यांनी त्यांचं स्वप्न शेअर केलं तर त्यांचं कौतुक करा. त्यांच्या स्वप्नांना साथ द्या. त्यांच्या स्वप्नांची जोपासना करा. त्याला खतपाणी द्या. त्यांच्यापाशी काहीच स्वप्न नसेल, तर मोठेपणी आपण कोण होणार, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्यांना प्रेरणा द्या...

मुलं भेटली की त्यांना एक प्रश्न आवर्जून विचारला जातो, तो म्हणजे, ‘मोठेपणी तू कोण होणार?’ मग मुलं आपापल्या परीने त्याची उत्तरं देतात. ही उत्तरं अर्थातच दर महिन्याला बदलू शकतात किंवा वर्षागणिक त्यांना नवी उत्तरं सापडू शकतात. कारण आपल्याला कोण व्हायचंय, हे मुलांना ठरवायला अवकाश असतो. फारच अपवादात्मक परिस्थितीत काही मुलं एकच उत्तर सातत्याने देत असतात की मला अमूकच बनायचं आहे. पण सर्वसाधारणपणे मुलांच्या मनामध्ये गोल्स किंवा उद्दिष्ट ही बदलत राहू शकतात...

मुलांची उत्तरं बदलती राहणार आहेत, याची कल्पना असूनदेखील मुलांना हा प्रश्न पुन: पुन्हा विचारावा लागतो, की मोठेपणी तू कोण होणार? याचं कारण म्हणजे मुलांच्या डोळ्यापुढे एक ध्येय सतत असावं लागतं आणि ते ध्येय आपल्याला पालक म्हणून, शिक्षक म्हणून जागवावं लागतं. आपल्याला कोणीतरी बनायचं आहे, आपण कोणीतरी मोठं झालेलं आपल्या पालकांना, शिक्षकांना आणि समाजाला पाहायचंय, आपल्याला स्वतःला त्यात समाधान शोधायचं आहे, ही मुलांमधली अंत:प्रेरणा जागती ठेवण्यासाठी मुलांना हा प्रश्न नक्की विचारावा, की मोठेपणी तू कोण होणार? वर म्हटल्याप्रमाणे त्याची उत्तरं बदलती राहू शकतात. म्हणजे या महिन्यात एखादं मूल म्हणेल, की मला सैन्यात जायचंय. पुढल्या महिन्यात तेच मूल म्हणेल, की मला डॉक्टर व्हायचं आहे! त्याने फरक पडत नाही.

आपण असा आग्रह अजिबात धरू नये, की तुला सैन्यात जायचं होतं ना? मग आता डॉक्टर होण्याचं कसं काय ठरवलं? आपल्याला काहीतरी करायचं आहे, आपण कोणीतरी होणार आहोत, आपण कुणीतरी आहोत हीच भारलेपणाची भावना त्यांचा आत्मविश्वास मजबूत करण्यासाठी फार आवश्यक असते. एखादं ध्येय पुन्हा पुन्हा उच्चारून मुलं ते दृढ करत असतात. मनातल्या मनात त्यांची आत्मप्रतिमा ही सतत उंचावत राहते. त्यांना अभ्यास करण्यात, काम करण्यात उत्साह येतो. मोठं होण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागणार, हेही त्यांना कळत असतं. त्या दृष्टीने त्यांचा फोकस हा उत्तम पद्धतीने काम करू शकतो. दुर्दैवाने काही शालेय आणि क्लासच्या वर्गात मी अशीही खूप मुलं पाहिली आहेत, ज्यांच्याकडे ते कोण होणार आहेत, याचं उत्तर नव्हतं. याचा अर्थ ते कुणीच होणार नाहीत, असा होत नाही. ते नक्कीच कोणीतरी होतीलही; परंतु आपल्यामधला आत्मविश्वास जागवण्यासाठी, आपली अंत:प्रेरणा जागवण्यासाठी आवश्यक पोषक घटक त्यांना मिळू शकत नाहीत. खूपदा हा प्रश्न पालकही त्यांना करत नाहीत...

शालेय आणि महाविद्यालयीन वर्गांमध्ये मी जेव्हा हा प्रश्न विचारला, तेव्हा जेमतेम १५ ते २० टक्के मुलं आपलं ध्येय सांगू शकली. बाकीची मुलं बसून होती. कदाचित त्यांना संकोच वाटला असेल किंवा खरोखरच त्यांनी काही ठरवलेलं नसेल. किंवा आज आपण काहीतरी बोलून बसू आणि उद्या ते जमलं नाही तर? लोकं आपल्याला नाव तर नाही ना ठेवणार? अशा भावनेने मुलं मौन बाळगून असतील. कदाचित, काही मुलांचा हिरमोड घरातूनच होत असेल. ‘‘आला मोठा डॉक्टर! मार्क किती मिळतात बघितलं ना!’’ अशासारखी वाक्य पालकांकडून सर्रास बोलली जातात. त्याचा परिणाम असा होतो की मुलांच्या मनातली स्वप्न ही मनातच विझून जातात... त्यामुळेही ही मुलं मौन बाळगून असतात. त्यांच्यातील सुप्त अंतःप्रेरणा जागृत असेल तर ठीकच; अन्यथा ही मुलं न्यूनगंडामुळे सतत मागे राहतात. आपण मोठेपणी कोण होणार? हा प्रश्न त्यांच्यासाठी अनुत्तरितच असतो...

पालकांनी आयुष्यात काही अचिव्ह केलं असेल, तर स्वाभाविकच मुलांमध्ये आपणही काहीतरी अचिव्ह करावं, ही प्रेरणा जागी असण्याची शक्यता जास्त असते. (मात्र त्याची हमी नाही!) मी अनेक पालक असे बघितले आहेत, की त्यांनी परिस्थितीमुळे स्वतःच्या आयुष्यात फारसं काही साध्य केलेलं नाही किंबहुना ते क्षमता असूनही फारसं काही साध्य करू शकलेले नाहीत; पण त्यांनी महत्प्रयासाने मुलांमधील अंत:प्रेरणा जागी केली आणि आपण मोठेपणी कुठेतरी मोठं बनायला पाहिजे, यासाठी त्यांना मोटिवेट केलं; पण पालकांचीच महत्त्वाकांक्षा जेव्हा विझलेली असते... आला दिवस ते कसाबसा ढकलत असतात... मुलांच्या उत्तम संगोपनाबद्दल, उत्तम करिअरबद्दल ते जेव्हा फारसे जागरूक नसतात, तेव्हा मुलं कदाचित दिशाहीन प्रवास करत असतात. त्यांच्यासाठी कुठलाच आशेचा किरण नसतो की अंतःप्रेरणा नसते. अशी मुलंही मौन बाळगून असतात!

मुलं समाजात वावरतात. स्वतःच्या पालकांना बघतात. प्रसारमाध्यमं पाहतात. खूपदा आजूबाजूचं निरीक्षण करतात. पाठ्यपुस्तकातले धडे वाचतात. गोष्टीची पुस्तकं वाचतात. अनेक गोष्टी ऐकतात. चित्रपट बघतात. वर्गातल्या शिक्षकांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकतात. अशा असंख्य संस्कारांमधून त्यांना आपलं स्वप्न सापडू शकतं. स्वप्न हे बीज आहे. त्या बीजाची जोपासना पालकांनाच करायची असते; पण बीजच नसेल, तर जोपासना कशाची करणार? म्हणून स्वप्न बघायला शिकणं हे जास्त महत्त्वाचं आहे, स्वप्न बदलत राहिली तरी फारसा फरक पडत नाही!

अनेकदा मुलांचा कल हा अशा स्वप्नांमधूनच आकाराला येतो. जो विषय आपल्याला आवडतो, रुचतो, कळतो, भावतो अशाच विषयांमध्ये आपण कोणीतरी व्हावं असं मुलांना पुढच्या टप्प्यात वाटू लागतं. प्राथमिक टप्प्यात स्वतःच्या क्षमतेचा, आवडीचा आणि आपल्याला काय व्हायचंय, याचा फारसा संबंध नसतो! पण हळूहळू कळायला लागल्यानंतर मुलांना रुची निर्माण होते. एखाद्या विषयात, एखाद्या करिअरमध्ये रुची निर्माण होणे, ही अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे. मी अनेक विद्यार्थ्यांशी सातत्याने बोलत असतो. अगदी कॉलेजच्या मुलांशीसुद्धा. कॉलेजमधली

मुलंसुद्धा अनेकदा आपल्याला कशातच रुची नसल्याचं फायनल इयरला असताना सांगतात! अनेक पदवीधर आज बेकार आहेत. त्यांनाही कशातच रुची नसते. रुची नसणं म्हणजेच कल नसणं. कल नसणं म्हणजेच करियरची दिशा स्पष्ट नसणं... अशा मुलांना स्वप्न तरी कशाची दिसणार? आपण मोठेपणी कोण होणार, हे त्यांना वयानुसार मोठं झाल्यावरसुद्धा ठाऊक नसतं, हे खरोखरच दुर्दैव आहे...

तुम्ही आजच तुमच्या मुलांना अवश्य प्रश्न करा, की तू मोठेपणी कोण होणार? कदाचित त्यांच्याकडे उत्तर असेल. ते तुम्हाला सांगतील. त्यांनी त्यांचं स्वप्न शेअर केलं तर त्यांचं कौतुक करा. त्यांच्या स्वप्नांना साथ द्या. त्यांच्या स्वप्नांची जोपासना करा. त्याला खतपाणी द्या. त्यांच्यापाशी काहीच स्वप्न नसेल, तर मोठेपणी आपण कोण होणार? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्यांना प्रेरणा द्या.... आज ना उद्या ते तुम्हाला ‘मी मोठेपणी कोण होणार’ या प्रश्नाचं उत्तर शोधून सांगतील. त्यांनी उत्तर दिल्यावर त्यांचं कौतुक करा. त्यांच्या स्वप्नांची सोबत करा... त्यांना खऱ्या अर्थाने मोठे होऊ द्या!

groomandgrow@hotmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

SCROLL FOR NEXT