पालकांचं आणि मुलांच नातं वेगवेगळ्या भूमिकांनी समृद्ध असावं. परीक्षेच्या वेळी आई-बाबा शक्ती बनून मुलांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजेत. मूल जिंकलं किंवा हारलं तर पालक मित्र म्हणून त्याच्या शेजारी उभे राहिले पाहिजेत. मूल संकटात असेल, तर पालक कवच बनून समोर उभे राहिले पाहिजेत, म्हणजे मुलांना अज्ञातात उडी मारायची भीती वाटणार नाही. नैराश्य येणार नाही आणि अॕस्पिरेशन आणि अचिव्हमेंटमध्ये अंतर उरणार नाही. चूक आणि बरोबर आपल्याला जे वाटतं ते मुलांना फक्त सुचवावं, लादू नये. कारण निवडायची शक्ती तुमच्या संस्कारातून तुम्हीच दिलेली असते. पालक आणि मुलांमध्ये स्वच्छ मैत्री असावी.
‘जात ही जन्मानं सिद्ध होत नाही, तर जगण्यानं सिद्ध होते,’ ही अतिशय महत्त्वाची गोष्ट माझ्या आई-वडिलांकडून मी शिकले. माझी आई हाडाची शिक्षिका आहे, तर वडील सर्जन आहेत; पण ते कमिशन घेऊन युद्ध काळात आर्मीमध्ये गेले होते. घरात मी अतिशय लाडात वाढले- कारण आजी आणि आईच्या बरोबरच शांताक्का आणि मीराबाई या दोघीजणी घरात कामाला होत्या. त्यामुळे भाजी कशी करतात, सिलिंडरला रेग्युलेटर लागतं यासारख्या साध्या गोष्टीदेखील संसाराला सुरुवात करेपर्यंत मला माहीत नव्हत्या. घरातला एक संस्कार असा होता, की कुणाच्याही जातीचा किंवा इतर गोष्टींचा कधीही उच्चारसुद्धा व्हायचा नाही. कोणालाही हाक मारताना तारतम्य बाळगणं आवश्यक असतं हे आम्हाला घरातून नकळतपणे शिकायला मिळालं. कचरा गोळा करणाऱ्या व्यक्तीलासुद्धा आदरानं संबोधित करायची घरात शिकवण होती. जातीच्या कॉलममध्ये ‘भारतीय’ या व्यतिरिक्त इतर काही लिहिल्याचं मला आठवत नाही. माणूस म्हणून इतकं समृद्ध होण्याचं भाग्य माझ्या पालकांनी केलेल्या संस्कारामुळे मला लाभलं. आमच्या घरात शिक्षणाला अतिशय महत्त्व होतं; पण तरीही मुखवट्यांच्या जगात मी खूप लवकर आले. शाळेत असताना नाटकात काम करायचे. शिवाय आई स्वतःच नाटकं लिहायची, त्यामुळे तिची नाटकंही बसवायचे. सहावीत असताना मला अभिनयाची ‘नॕशनल कल्चरल टॕलेंट सर्च’ ही राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली होती. मी आविष्कार चंद्र शाळेत गेले. नववीत असताना मी रंगभूमीवर आले आणि नाटकात काम करू लागले; पण असं असलं, तरी घरात शिक्षणाचं महत्त्व खूप होतं. सुट्या लागल्यावर आपण आपले सगळे छंद जोपासायचे असा नियम होता. त्यामुळे अभ्यास हा जगण्याचा आमूलाग्र घटक होता.
आम्ही सगळ्या सुखसोयींनी युक्त असलो, तरी एकूण जगण्यात अतिशय साधेपणा होता. तो काळच खूप वेगळा होता. पूर्वी घरातल्या शिदोरीचं गाठोड घेऊन मुलं बाहेर पडायची, त्याप्रमाणे लोकांशी तोलून मापून वागायची. मात्र, आता बाहेरचं जग घरातली नाती ठरवतं. नात्यांचा स्पर्श हरवला आहे. आजची तरुणाई स्वतःच्या भावनांना स्वतःच स्पर्श नाही करत. त्यामुळे झालंय असं, की एखादा सुंदर सूर्योदय वा समुद्रकिनारा पाहिला, की त्याच्याकडे पाठ करून त्याचा फोटो घेऊन तो कुठल्यातरी सोशल मीडियायावरच्या साइटवर टाकल्याशिवाय त्यांना ती गोष्ट घडल्यासारखीच वाटत नाही. हे दुर्दैवी आहे. आमच्या काळी अशी गरज वाटत नव्हती. मी अजूनही भाबडेपणानं शिकते, त्यामुळे प्रत्येक नात्याची निरागसता आमच्या पिढीनं अनुभवली आहे. नव्याची नवलाई खूप टवटवीतपणे आम्ही अनुभवली आहे. मी अजूनही कोणत्याही सोशल मीडियावर नाही. मी आजही ‘फेस अ बुक’ जनरेशनची आहे. आता मी तिसरी पीएचडी करत आहे शांताबाई शेळके यांच्या स्वतंत्र कवितांवर. ते करत असताना अमुक पुस्तकात शांताबाईंनी या कवितेमागे काय विचार केला असेल, हा शब्द का वापरला असेल, याचा विचार करणं, त्याचं आकलन करणं या गोष्टी आजच्या पिढीला रुचतीलच असं नाही. आता सगळंच तयार मिळतं गुगलवर! या सर्व बदलांची खंत मनात नक्कीच जाणवते; पण आपण यापेक्षा खूप छान वातावरण अनुभवलंय याचा मनापासून आनंदही होतोय. माझी आई काही वर्षांपूर्वी माझ्या बहिणीकडे परदेशात गेली होती. बहिणीला दुसरं बाळ झालं होतं. तिचा पहिला मुलगा किंडर गार्डनमध्ये होता. तो एकदा शाळेतून रडत घरी आला. आईनं त्याला रडण्याचं कारण विचारलं तर तो म्हणाला : ‘आय अॕम डिफरंट.’ आईला खूप आश्चर्य वाटलं. तिनं विचारलं : ‘म्हणजे काय?’ त्यावर तो म्हणाला, की ‘टीचरनं विचारलं, किती मुलं आपल्या बायोलाॕजिकल पालकांबरोबर राहतात? तेव्हा मी एकट्यानंच हात वर केला. बाकी सगळ्यांचे पेरेंट्स वेगवेगळे होते.’ आता ही परिस्थिती आपल्याकडेही मोठ्या शहरांमध्ये दिसू लागली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारे आणि समलिंगीही मोठ्या प्रमाणात आहेत. मला खूपदा असं वाटतं, की यांच्या मुलांना नैसर्गिक भावभावनांसहित वाढण्याचा अधिकार नाही का? का म्हणून त्यांनी सतत मनात न्यूनगंड, अपराधी भावना घेऊन जगायचं? त्यांच्या ह्युमन राइटसचा विचार का होत नाही? काही प्रश्नांची उत्तरं समाजानं अजून शोधली नाहीत- ती शोधली पाहिजेत.
संस्कारांचं किती महत्त्व असतं याचं उदाहण सांगते. माझी मोठी बहीण प्राजक्ता कॕलिफोर्नियामध्ये निष्णात डॉक्टर आहे. ती मुंबईतल्या जे. जे. हॉस्पिटलमध्ये जेव्हा सर्जरी करत होती, तेव्हा सन १९९३ चे दंगे उसळले होते. सगळीकडे कर्फ्यू होता. ही मुलं अँब्युलन्समधूनच जायची आणि यायची. सर्जरीसाठी हात, बोट तुटलेले असे पेशंट येत होते. अशा परिस्थितीत आई-बाबा तिच्यासाठी काळजीनं जेवणाचा पोळी भाजी, कोशिंबीर असा डबा घेऊन गेले. तो डबा उघडल्यावर प्राजक्ता लगेच म्हणाली : ‘‘एवढाच आणला? आम्ही इथं २८ जण आहोत.’’ सांगायचा मुद्दा एवढाच, की संस्कार बोलतात. आपल्यासोबत इतरांचाही विचार करावा हे कोणी हात धरून शिकवलं नव्हतं . घरातून ते संस्कारात उतरलं होतं.
मी साडेतीन वर्षाची होते तेव्हाची घटना आहे.आमच्याकडे नेहमी एक डबे बाटलीवाले आजोबा यायचे. आम्ही तिसऱ्या मजल्यावर राहायचो. मला वाटायचं, की हे आजोबा एवढे म्हातारे झाले तरी इतक्या वर कशासाठी जिने चढून येतात? आजी सांगायची ते वारकरी आहेत. वारीला जाण्याआधी ते स्वतःचे पैसे कमावतात आणि मग जातात. दिवाळीला आई-बाबा दान देतात हे मी बघितलं होतं. एकदा ते आजोबा आले. कोणी घरात नव्हतं, मी त्यांना पाणी दिलं आणि त्यांना आईच्या हिऱ्याच्या कुड्या देऊन टाकल्या. दिवाळी आली म्हणून धुवून स्वच्छ करण्यासाठी आईनं त्या बाहेर काढल्या होत्या. त्याचं मोल काय आहे हे मला काहीच माहीत नव्हतं त्यावेळी. नंतर आईची सगळी दिवाळी रडून पार पडली. बाबा म्हणाले : ‘आपण दुसऱ्या कुड्या घेऊ.’ पण त्या आईला लग्नात तिच्या आईनं दिल्या होत्या. त्यामुळे तिच्या भावना त्यात अडकल्या होत्या. मी ओठ शिवून गप्प बसले होते. कारण मी प्रचंड घाबरले होते. माझ्या बहिणीनं ते ओळखलं. तिनं मला बखोट धरून गच्चीवर नेलं आणि म्हणाली : ‘‘सांग काय केलंस त्या कुड्यांचं? तूच काहीतरी केलंयस- कारण तू खूप घाबरलेली आहेस.’’ मग मी तिला सांगितलं, की ‘डबे बाटलीवाल्या आजोबांना त्या कुड्या देऊन टाकल्या; पण तू आईला सांगू नकोस, ती मला खूप मारेल.‘
ते आजोबा कधी येतात याची आम्ही वाट बघत बसलो. ते आजोबा आठ दिवसांनी आले. आजी-आजोबा, आई-बाबा घरात सर्वजण होते. त्यांना आलेले बघून मी रडायलाच लागले. त्यांनी त्या कुड्या माझ्या हातात ठेवल्या आणि म्हणाले : ‘‘जा मायला बोलव तुझ्या!’’ मी आईला सांगू नका म्हणून विनवत होते; पण त्यांनी आईला बोलावलं. ते म्हणाले : ‘‘लेकराला कळत नाही; पण मी वारकरी माणूस आहे. असं परक्याचं धन घेऊन मी एक पाऊल नाही टाकू शकणार.’’ त्यांनी त्या कुड्या परत केल्या. ते गेल्यावर आई मला एवढंच म्हणाली : ‘‘हात देता असावा; पण स्वतः कमावून मग द्यावे. दुसऱ्याचं उचलून देण्यात गंमत नसते.’’ तिनं मला मारलं असतं, तर माझ्या मनात रागाची, द्वेषाची भावना निर्माण झाली असती. या प्रसंगामध्ये माझे घरातले संस्कार होतेच; पण त्या आजोबांचेही मोठे संस्कार होते. त्यामुळे वयाच्या या टप्यावरसुध्दा मला वाटतं, की स्वांतसुखायदेखील शिक्षण, आनुभव घ्यावा. तुम्ही डिगऱ्यांची किती टिंबं लावलीत त्यानं फरक पडत नाही. आयुष्याच्या विद्यापीठात आपण किती माणसं वाचायला शिकलो, यश, अपयश आणि अपमान कसे पचवायला शिकलो याला खरं महत्त्व असतं. या आकलनाचं बळ वाचनातून येतं, साहित्यातून येतं. त्यामुळे ते करायला पाहिजे.
माझी मुलगी ईश्वरी माझी सख्खी मैत्रीण आहे. अगदी लहानपणी तिनं मराठीतून पहिली कविता केली. घरात मी, बाबा, आजी तिला वेगवेगळी पुस्तकं आणून देत होतो. त्याचा संस्कार तिच्यावर झाला असावा. तिची पालक म्हणून मी तिच्याच वयाची आहे. कारण माझं मूल म्हणून ती जन्माला आली तेव्हाच मी पण पालक अर्थात आई म्हणून जन्मले. त्यामुळे या नात्यात आम्ही दोघी एकत्रच वाढलो. हे नातं खूपच सुंदर आणि पारदर्शक आहे. आम्ही कुठल्याही विषयावर सहज बोलू शकतो. पालकत्वामध्ये संवाद हा खूप महत्त्वाचा असतो. मुलाला कोणत्याही क्षणी आपल्याशी कोणत्याही विषयावर बोलावसं वाटणं यातून त्या नात्यात किती घट्ट बंध आहे हे समजतं. मी तिच्या लहानसहान प्रत्येक गोष्टी जाणून घेण्यास उत्सुक असते आणि त्यात मला काही गैर वाटत नाही. मी या गोष्टी जाणून घेते- जेणेकरून ईश्वरीला वाटतं, की मी तिच्या आयुष्याचा भाग आहे. कारण तिच्या स्वप्नांमध्ये मी जर सहभागी नसले, तर उद्या ती जो निर्णय घेईल तो योग्य की अयोग्य आहे किंवा होता हे सांगण्याचा अधिकार मला राहणार नाही. मला नेहमी वाटतं, की आई आणि लेकीचं नातं हे नेहमी श्वास आणि उच्छ्वासासारखं असावं. माझं आणि ईश्वरीरीचं नातं तसच आहे. ईश्वरी उत्तम लिहिते आणि अभ्यासातही उत्तम आहे. सध्या ती पॉलिटिकल सायन्समध्ये पदवी घेत आहे; पण तिचा कल आमच्याकडे म्हणजे लिहिण्याकडे, साहित्याकडे जास्त आहे. मी आणि माझ्या नवऱ्यानं- देवदत्त देऊलकरनं तिला जे आवडेल ते करू द्यायचं असा निर्णय घेतला होता. त्यामुळे ईश्वरीला ते स्वातंत्र्य आहे. कारण पालकत्वाचा मला वाटणारा एक मूलभूत मुद्दा असा आहे, की आई-वडील आयुष्यभर पुरत नाहीत; पण त्यांनी दिलेला आत्मविश्वास आणि आपण निवडलेलं करिअर आयुष्यभर पुरतं. त्यामुळे ईश्वरी आता जे काही करत आहे ते ती उत्तम करेल याची मला खात्री आहे. कारण हातातलं काम उत्तम प्रकारे करण्याची तिला सवय आहे.
ईश्वरीकडून मी बऱ्याच गोष्टी शिकते. तिच्यामुळे मी आजच्या काळातल्या मुख्य रस्त्यावर चालायला शिकले. नाहीतर एव्हाना मी फूटपाथवर असते. ईश्वरीचं मनही खूप सहृदय आहे. ती कारमधून कॉलेजला जाते. त्या मार्गात दोन तृतीयपंथी व्यक्ती तिला बरेचदा सिग्नलला भेटतात आणि आशीर्वाद देतात. ती त्यांना नेहमी सांगते, की पैसा मत मांगो. ती त्यांना बिस्कीट वगैरे खायच्या वस्तू देत असते. मी दरवर्षी दिवाळीच्या आधी काही वस्तू आणून वेगवेगळ्या लोकांना देत असते. तेव्हा ईश्वरी मला म्हणाली- ‘आई, मला दोन साड्या दे.’ मी विचारलं, ‘कशासाठी पाहिजे?’ त्यावर ती म्हणाली, ‘दोन बायका आहेत. लोक त्यांच्याकडे नेहमी घृणेच्या नजरेनं बघतात किंवा घाबरून दूर राहतात; पण त्याही माणूसच आहेत ना! मला दिवाळीसाठी त्यांना या साड्या द्यायच्या आहेत.’ मी म्हणाले, ‘मलाही घेऊन चल.’ आम्ही दोघी जणी गेलो. ईश्वरीनं त्यांना ती भेट दिली. त्यावर त्या म्हणाल्या, ‘बेटी तू अलग है.’ हा विचारांचा जो सेतू आहे, तो संस्कारांमुळेच तयार होतो. अर्थात या प्रसंगात श्रेय ईश्वरीचंच आहे. ही कृती करण्यामागे तिचाच विचार आहे; पण विचारांचं बीज रोवायला पालकत्व जबाबदार असतं.
आता लॉकडाऊनमधला किस्सा सांगते. आम्ही अंधेरीला राहतो, तर माझे आई-बाबा पवईला राहतात. सासूबाई आमच्याबरोबरच असतात. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर आईचे मदतनीस अचानकपणे येणं बंद झाले. तेव्हा ईश्वरी म्हणाली, की ‘आई, नाना-नानीला इकडे घेऊन ये. आजीला सांग तू तुझ्या माहेरी यायचंय आणि आजोबांना सांग तुम्हाला तुमच्या आजोळी यायचंय, म्हणजे ते नाही म्हणणार नाहीत.’ मला खूप समाधान वाटलं तिचं हे वाक्य ऐकून. आई-बाबा घरी आले आणि या संपूर्ण काळात आम्ही धमाल केली. ते खूप आनंदात आमच्याकडे राहिले आणि आम्ही पण सगळे त्यांच्या प्रेमळ छायेत राहिलो. किती वेळा त्या पांडुरंगाचे आभार मानावेत, की त्यानं ओंजळ नेहमी भरलेली ठेवली. त्यामुळे कधी तृष्णा वाटली नाही. नाहीतर टीव्हीवरील बातम्या बघून मन विषण्ण होतं. लग्नानंतर माझे आई-बाबा कधी दोन रात्रींपेक्षा जास्त वेळ राहिले नव्हते. ते या काळात दोन महिने राहिले. ही खूपच आनंदाची गोष्ट ठरली आमच्यासाठी. दर वर्षी आम्ही सर्व जण चार दिवस सुट्टी घेऊन बाहेर फिरायला जायचो; पण हा आनंद वेगळाच होता.
पालकांचं आणि मुलांच नातं वेगवेगळ्या भूमिकांनी समृद्ध असावं. परीक्षेच्या वेळी आई-बाबा शक्ती बनून मुलांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजेत. मूल जिंकलं किंवा हारलं तर पालक मित्र म्हणून त्याच्या शेजारी उभे राहिले पाहिजेत. मूल संकटात असेल, तर पालक कवच बनून समोर उभे राहिले पाहिजेत, म्हणजे मुलांना अज्ञातात उडी मारायची भीती वाटणार नाही. नैराश्य येणार नाही आणि अॕस्पिरेशन आणि अचिव्हमेंटमध्ये अंतर उरणार नाही. मुलांना आपण माहिती आणि प्रगतीपासून रोखू शकत नाही. त्यामुळे काळानुसार येणाऱ्या गॕजेट्सपासून आपण मुलांना दूर नाही ठेवू शकत. ‘हे वापरायचं नाही’ असं ओरडून सांगण्यापेक्षा त्याची मर्यादा ठरवणं आपल्या हातात असतं. इतर आवडीनिवडी ओळखून त्यासाठी पर्याय कोणते आहेत हे आपणच बघितले पाहिजेत आणि ते मुलांना उपलब्ध करून दिले पाहिजेत. ईश्वरी अभ्यासाच्या, परीक्षेच्यावेळी सोशल मीडिया, मोबाईल सर्व बंद करून ठेवते. ‘तू हे आता बंद कर,’ असं मला सांगावं लागत नाही. चूक आणि बरोबर आपल्याला जे वाटतं ते मुलांना फक्त सुचवावं, लादू नये. कारण निवडायची शक्ती तुमच्या संस्कारातून तुम्हीच दिलेली असते. तुम्हाला बघूनच मुलं या गोष्टी करतात. पालक आणि मुलांमध्ये स्वच्छ मैत्री असावी. त्यांच्यात आरसपानी नातं असावं. ते खरं आणि सच्चं असावं. कारण हे रक्ताचे बंध असतात, नाळ तोडली म्हणून तुटत नाही. ती कायमस्वरूपी राहते.
(शब्दांकन : मोना भावसार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.