jayprad desai 
सप्तरंग

तारुण्याचा सळसळता झरा! (जयप्रद देसाई)

जयप्रद देसाई jayprad.desai@gmail.com

आपल्या उत्तुंग अभिनयानं प्रेक्षकांवर अधिराज्य करणारे आणि त्याचबरोबर बुद्धिप्रामाण्यवादाची कास धरून समाजजागृती करणारे डॉ. श्रीराम लागू म्हणजे नाट्यवादळच. त्यांची या दुनियेच्या रंगमंचावरून एक्‍झिट झाली असली, तरी या तत्त्वचिंतक नटसम्राटाचं युग हे म्हणजे नाट्यसृष्टीचा सुवर्णाक्षरी इतिहास आहे. या वादळाचे हे काही पैलू.

एकदा सहज वयाचा विषय निघाला असताना, दीपामावशीकडून (लागू) नकळत डॉक्टरांच्या वयाचा उल्लेख झाला, तेव्हा डॉक्टर तिला म्हणाले : ‘‘त्यांना माझं वय काय सांगतेस? ही इज माय डायरेक्टर, डॅम इट! आय शूड बी एजलेस टू हिम!’’
डॉक्टर खरंच ‘एजलेस’ होते- चिरतरुण होते. वयाची नव्वदी उलटल्यावरसुद्धा त्यांच्यात एका लहान मुलाचा निरागसपणा होता, कुतूहल होतं. या गोष्टीचा जरा खोलवर विचार केला, तर उमगतं, की कुठलाही अभिजात कलाकार हा चिरतरुणच असतो- आपल्या भोवतालच्या जगाबद्दल प्रचंड कुतूहल आणि त्या भोवतालच्या जगामध्ये आलेल्या प्रत्येक गोष्टीकडे, म्हणजे अगदी आपल्या आतल्या भावभावनांकडेसुद्धा सतत हपापल्यासारखं बघत राहतो. थकतच नाही. He’s an ever-flowing fountain of youth. तारुण्याचा सळसळता झरा!

‘नागरिक’ चित्रपटाची पटकथा लिहीत असताना ‘नाना चिटणीस’ या भूमिकेसाठी डॉक्टरच कायम माझ्या डोळ्यांसमोर होते. निवडणुकीपूर्वी विविध राजकीय पक्षांसाठी दंगली घडवून आणणारे ‘राएट स्पेशालिस्ट’ नाना चिटणीस- यांचा तरुण मुलगा दंगलीत मारला जातो. वैफल्यग्रस्त होऊन नाना राजकारणातून संन्यास घेतात; पण आयुष्याच्या उत्तरार्धात मुंबईपासून दूर बागकामात मग्न असलेल्या नानांना दंगल घडवण्याची एक नवीन ऑफर मिळते आणि त्यांचा भूतकाळ जिवंत होतो. आपल्यामुळे हजारो निरपराध लोकांचा जीव गेला, हे सत्य त्यांना अस्वस्थ करतं. आयुष्याच्या उतारवयात ते पश्चातापानं होरपळत जातात. आत्मक्लेशामुळे आयुष्य असह्य होतं- ते आत्महत्या करतात! आंतरिक वादळाने त्रस्त झालेल्या, हळूहळू मोडत असलेल्या नाना चिटणीसांचं कॅरेक्टर अतिशय कॉंप्लेक्स होतं.

डॉक्टरांना प्रथम भेटलो, तेव्हा त्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे हल्ली फार काम करत नसल्याची कबुली दिली. त्यातही हा ‘स्पेशल ॲपिअरन्स’ नसून एक पूर्ण लांबीची भूमिका होती. ‘‘इतके दिवस शूटिंगची दगदग झेपणार नाही,’’ असं त्यांनी सांगितलं. मी त्यांना म्हणालो : ‘‘काम नका करू- फक्त स्क्रिप्ट वाचा, मला तुमचा अभिप्राय जाणून घ्यायला आवडेल...’’ तिसऱ्या दिवशी मला फोन आला. ‘‘तू हुशार आहेस. स्क्रिप्ट वाचली. नानांच्या पात्रानं माझ्या मनाचा ताबा घेतलाय. The actor inside me has already started working. आता नाही कसं म्हणू?’’ भेटल्यावर त्यांनी एकच विनंती केली :‘‘जमलं तर पुण्याला शूट कर. म्हणजे रात्री झोपायला मी घरी येऊ शकीन. काही इमर्जन्सी आलीच, तर माझे नेहमीचे डॉक्टर्स, हॉस्पिटल इथं आहे.’’
पुढे त्यांच्याशी झालेल्या अनेक भेटीगाठींमध्ये संहितेबद्दलच्या, भूमिकेबद्दलच्या चर्चांमध्ये त्या कलाकाराची उत्तुंग अशी उंची अनुभवायला मिळाली. त्यांनी विचारलेले प्रश्न इतके नेमके आणि मर्मावर बोट ठेवणारे असायचे, की त्यांना उत्तर देताना तुम्हालाच तुमची संहिता, फिल्म अधिक खोलवर कळायची. त्यांची शैली अभ्यासू असूनही ॲकेडमिक नव्हती. Intuitive होती. त्याच्यात एक तिरकस वेडसरपणा होता. चित्रपटाच्या एक सीनमध्ये मुसळधार पावसामुळे त्यांनी फुलवलेली बाग कोसळते. पावसाकडे बघत ते त्यांच्या पत्नीला विचारतात : ‘‘हा पाऊस पडतोय ना, त्याचा धर्म कुठलाय? हिंदू की मुसलमान..?’’ महेश केळुसकर यांच्या संवादात विलक्षण काव्य होतं. कॅमेरा सेट झाल्यावर मी जेव्हा डॉक्टरांना सहज म्हणून म्हणालो : ‘‘तुम्ही हे म्हणताना नानींकडे (सुलभा देशपांडे) बघता.’’ ते अचानक म्हणाले : ‘‘मला तिच्याकडे बघावंसं नाही वाटत. मला या पावसाकडेच बघावंसं वाटतं.’’ हे म्हणत असताना त्यांना एक विचित्र तंद्री लागली होती. त्यांच्यातल्या actor ला intuitively जागा सापडली होती. मला फक्त तिथून बाहेर जायचं होतं.

एका कलाकाराची सर्वांत मोठी ताकद म्हणजे त्याचं intuition. अंतःस्फूर्ती किंवा अंतर्ज्ञान. पारंपरिक, रुढ अर्थानं मानल्या जाणाऱ्या सयुक्तिक विचारांना न जुमानता, आपल्या मनाच्या सखोल गर्तेतून उमटणा-या, स्वतःलाही सहजपणे माहीत नसलेल्या, शुद्ध, खऱ्या भावनांवर ठेवलेला विश्वास म्हणजे म्हणजे intuition/ अंतर्ज्ञान. Intuition is the confidence in one’s innermost thoughts. आणि प्रत्येक अभिजात कलाकार हा intuitive असतो. विशेष म्हणजे भूमिकेसाठी तुम्ही केलेली तयारी या Intuition ला अधिक धार देते. डॉक्टरांच्या भूमिकेबद्दलच्या अंगिक-वाचिक मेथडबद्दल खूप बोललं गेलंय.. पण त्यांच्या या instinct/intuition बद्दल क्वचितच बोललं जातं. त्यांचं हे ‘intuition’ त्यांच्या मेथडला ‘पूरक’ होतं.
पुढे याचा प्रत्यय मला अनेकदा आला. त्यांना संवाद लक्षात राहत नव्हते. एकेकाळी चार-चार पानांचा संवाद बोललेल्या डॉक्टरांचा अशा वेळी अगदी त्रागा त्रागा होई. ते स्वतःवरच वैतागायचे...एकदा तर म्हणाले : ‘‘इट्स नॉट फेअर. आय एम नॉट गिव्हिंग एव्हरीथिंग आय हॅव..’’ मी काय बोलणार? दोन संवादामधलं तुम्ही जिवंत केलेलं वास्तव? त्याचं काय? शब्दांच्या पलीकडलं तुमच्या डोळ्यात गवसलं ते सत्य? हू केअर्स अबाऊट द लाइन्स?

डॉक्टरांबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण हा माझ्यासाठी विलक्षण ठरला. सोप्पा, सरळ नाही; पण अविस्मरणीय. एका गाडीमधल्या दृश्यासाठी आम्हाला फार वेळ लागत होता. जुन्या फियाटला कॅमेरा रिग लावणं. छोटे छोटे, पोर्टेबल लाइट्स लावणं; चालत्या गाडीची वेग, वळणं; बाहेर रेन मशीननं पाडलेला पाऊस, जनरेटर... या सगळ्याच्या नियोजनाला खूप वेळ लागत होता. रात्रीचे ११ वाजले होते. डॉक्टर अस्वस्थ झाले होते. बाहेर जाणाऱ्या लाइट्सच्या केबलसाठी गाडीच्या खिडकीत एक फट ठेवली होती. त्यातून पावसाचं पाणी आत येत होतं. डॉक्टर थोडेसे भिजत होते. ‘‘डॉक्टर आर यू ओके?’’ मी जरा घाबरतच विचारलं. ‘‘नो!’’ ते गरजले. मी गप्पच बसलो. पॅक-अपनंतर काहीही न बोलता निघून गेले. दुसऱ्या दिवशी मी जरा सावध होतो. काल झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करायला म्हणून त्यांच्यासमोर जाणार, तेवढ्यात पाठीवर जोरदार थाप पडली. ‘‘तुला काल रात्री तुझे सगळे शॉट्स मिळाले?’’ असं त्यांनी मलाच विचारलं. कालच्या प्रकार त्यांना जणू आठवतच नव्हता.

असे आणखी तणावपूर्ण प्रसंग सेटवर घडले. वाद झाले, संताप झाला, काही काळ अबोलासुद्धा झाला; पण दुसऱ्याच क्षणाला थट्टा-विनोद आणि पुन्हा नवा वाद. कुठं जरा आकस नाही, की द्वेष नाही- नुसतं भरभरून प्रेम!! शूटिंगच्या शेवटच्या दिवशी त्यांनी युनिटमध्ये किती लोक आहेत, याचा हळूच अंदाज घेत खास बर्फी मागवली...
खरंतर रंगभूमीवरचं त्यांचं फारसं काम बघण्याचं भाग्य आमच्या पिढीला मिळालं नाही; पण ‘सूर्य पाहिलेला माणूस’ बघितल्यानंतर मी दोन दिवस बधिर अवस्थेत होतो. रंगभूमीवर असा अभिनय मी तरी त्या आधी कधीच पहिला नव्हता. मोठ्या कलाकारांची ‘प्रोसेस’ जाणून घ्यायचं कुतूहल नेहमीच असतं. ती प्रत्यक्ष अनुभवायचं भाग्य मला माझ्या पहिल्याच चित्रपटात मिळालं.

त्यांच्याशी झालेल्या चर्चांमध्ये मला नेहमी वाटायचं- मीच त्यांना जास्त शिकवतोय. डॉक्टरांना शेकडो प्रश्न असायचे. ‘रुल्स ऑफ द गेम’, ‘ग्रँड इल्युजन’ बनवणारे जीन रेनॉयर हे विश्वविख्यात दिग्दर्शक भारतामध्ये शूटिंगसाठी आले, तेव्हा ‘सत्यजीत रे’ हा तरुण त्यांच्या सेटवर स्टिल फोटोग्राफर म्हणून होता. रेनॉयर यांच्याशी झालेल्या गप्पांमध्ये आपणच त्यांना शिकवतोय की काय, असा प्रश्न रे यांना पडे. मला कुठल्याही मोठ्या कलाकाराचं सर्वांत मोठं लक्षण हे वाटतं, की ‘He wants to listen.’ डॉक्टर अगदी साऊंड रेकॉर्डिस्टपासून माझ्या असिस्टंटपर्यंत सर्वांना अगदी भाबडे वाटतील असे प्रश्न विचारायचे. त्यांच्या अवतीभवतीच्या जगाविषयी त्यांना विलक्षण कुतूहल असायचं. त्यांच्यामधलं लहान हट्टी मूल कधीच गेलं नाही. वयाची नव्वदी उलटल्यावरसुद्धा!

जेव्हा ‘नागरिक’मधल्या भूमिकेसाठी त्यांनी दाढी वाढवायची असं ठरलं, तेव्हा ते दर दोन दिवसांनी फोन करून मला वाढणाऱ्या दाढीबद्दल अपडेट्स द्यायचे. त्यांचा निरागसपणा पाहून मला अगदी ओशाळल्यासारखं व्हायचं. त्यांच्या निधनानंतर सगळ्या बातम्यांमध्ये त्यांच्या वयाचा उल्लेख बघून मला शूटिंगच्या शेवटच्या दिवशी पॅक-अपनंतरचे डॉक्टर मला आठवले. जेव्हा सर्व क्रूनं टाळ्या वाजवून त्यांना अभिवादन केलं, तेव्हा त्यांनी एका बॅले डान्सरसारखं एक पाय दुमडून दुसऱ्या पायावर वजन देत, मुरडत, चक्क ‘bow down’ केलं.
The fountain of youth had never stopped!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

राजकुमार रावचं झालं प्रमोशन! अभिनेता होणार बाबा; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT