Marathi Poet Vaman Ramrao Kant
Marathi Poet Vaman Ramrao Kant esakal
सप्तरंग

बगळ्याची माळ फुले अजुनि अंबरात!

- डॉ. नीरज देव

जणू काही ती सोनेरी सांज आपल्याला व आपली प्रीती त्या सांजेला गुंफून उभी असायची. प्रीतीच्या धुंदीत ते दिवस कसे सरले कळलेच नाही. येथे सांज, संध्याकाळची वेळ वारंवार दाखवीत कवी कुठेतरी त्याच्या प्रीतीची ढळणारी प्रतिमाच उभी करून जातो.

जिथे प्रीत असते, सुख असते, तेथे सरणाऱ्या दिवसांची मोजदादच नसते. पण आता तो बगळ्यांच्या शुष्क रांगा मोजत कित्येक दिवस घालवत आहे.

ती नसल्याने तो दिवसही त्याला मोठा वाटतो. मोठे वाटणारे असे दिवसावर दिवस तो घालवत आहे. हरविलेल्या प्रेमाची अतिउत्कटताही कवी ‘बगळ्यांची माळ’ या काव्यसंग्रहात सहजपणे मांडतात. (saptarang latest marathi article by dr neeraj deo on marathi poet vaman ramrao kant nashik news)

वामन रामराव कांत (१९१३ ते १९९१) अर्थात, वा. रा. कांत यांचा जन्म नांदेडचा. त्याकाळी तेथे निजामशाही असल्यामुळे मराठी, कानडी नि तेलगू तीनही भाषांवर अघोषित बंदीच होती. इतकेच नव्हे, तर या भाषांत लिहिणे, वृत्तपत्र काढणे हा राजद्रोहच मानला जाई. परिणामी शिक्षाही दिली जात.

सर्व कारभार ऊर्दूतूनच व्हावा, ही बादशाहाची आज्ञाच होती. अशा बिकट परिस्थितीत कांतांनी पहिला काव्यसंग्रह ‘पहाट-तारा’ प्रकाशित केला. त्यात कांतासह त्यांचे दोन मित्र श्री. के. गोळेगावकर नि ह. का. कुळकर्णी यांच्याही कविता होत्या.

सर्वथा विपरित परिस्थितीत प्रकाशित या कवितासंग्रहाचे कौतुक, तर दूरच; पण त्यावर समीक्षक, वृत्तपत्रांनी टीकेची झोड उठवली. राजसत्ताविरोधी, मराठी वृत्तपत्र व समीक्षकही उदास अशा विपरित परिस्थितीतही कांतांचा काव्यप्रवास थांबला नाही. त्याचे कारण स्वतःच्या काव्याविषयी त्यांचे ठायी असलेला आत्मविश्वास. तो व्यक्तविताना एका ठिकाणी कवी लिहितो,

म्हणतात नभातुनि
शब्द येई जन्मास
मी शब्दामधूनी
निर्मिन नव आकाश

तर दुसऱ्या एका ठिकाणी कवी ईश्वरास ठणकावून सांगतो,

ईश्वरा तुझी ही सृष्टी अस्ताव्यस्त
संदर्भरहित, अर्थहिन
सौंदर्याचे अर्थ आम्ही तिला दिले
जोडिले आगळे परिमाण

आपली कलासृष्टी देवाच्या सृष्टीहून भव्य आहे, असा कवीचा दावा आहे. त्यामुळेच शंभर वर्षांनंतरही आपली कविता वाचली जाईल, असा त्याला विश्वास आहे. त्यामुळेच तो लिहितो,

दिव्याचे तेज डोळ्यांचे वेज कोण तिथे जाळीत आहे
शंभर वर्षांनंतर कोण माझी कविता वाचीत आहे?

अशा पद्यपंक्ती जन्माला घालत असताना रोजनिशीच्या १ जानेवारी १९८८ च्या पानावर वयाच्या ७५ च्या वाटेवर असलेला हा कवी हळवा होऊन लिहितो, ‘‘शतकाच्या अश्वत्थ वृक्षाची पाने दर वर्षी नव्याने पालवतात आणि प्रत्येक वाऱ्याच्या झोक्याने सळसळतात। ‘‘काय अर्थ आहे या सळसळीला?’’ तेवढा अर्थ जरी माझ्या कवितांना उरला तरी पुष्कळ आहे तेवढीच धन्यता’’

कांतांच्या या लिखाणात चुकीचे काय आहे? मोठमोठ्या साहित्यिकांच्या साहित्यकृती काळाच्या कुसरीने विस्मरणाच्या खोल गर्तेत गायब होतात. एखादा कालिदास, शेक्सपियरच त्याला अपवाद असतो.

कांतांची कविता फुलवायला नांदेडमधील एक कवी महाजन यांचा सहवास अप्रत्यक्षपणे उपयोगी ठरला. माधव ज्युलियनांची ‘कवितेचा खरा समीक्षक कवी स्वतःच असतो’ ही टिपणी प्रेरक ठरली उपेक्षित नि दुर्लक्षित काळात माधव ज्युलियनांची रसिकता कविला मोहून राहाते म्हणूनच त्यांच्या मृत्यूनंतर कवी हळुवारपणे व्यक्त होतो,

तुजविण आज ही दीन मराठी वाणी
मधुचषक भंगला, खिन्न उभी मधुराणी

या दोन ओळी माधवरावांचे यथार्थ वर्णन करायला परिपूर्ण आहेत. बगळ्यांची माळ, दोनुली, मावळते शब्द, वेलांटी असे सुमारे १४ काव्यसंग्रह, ११ खंडकाव्ये, दोन नाटकं, मिर्झा गालिब, एक चादर मैलिसीसारखे दहा अनुवादीत ग्रंथ तसेच समीक्षणात्मक व ललित लेख असा मोठा कांतांचा साहित्यसंभार आहे.

Also read:ठेच

इतका मोठा, सकस साहित्य संसार असतानाही त्यांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाने सन्मानिले जाऊ नये, हे खरोखरच दुर्दैव आहे. पण कांतांना त्याचे वैषम्य नव्हते. कारण त्यांच्या काव्याने, आपले हृद्यसिंहासन मराठी रसिकांनी त्यांना केव्हाच बहाल केले होते

कांतांची ‘त्या तरुतळी विसरले गीत’, ‘आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको’ , ‘राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे’ सारखी उत्कट भावगीते आजही रसिकांना भुरळ पाडतात. त्याच मालिकेतील एक गीत म्हणजे ‘बगळ्याची माळ फुले अजुनि अंबरात’. हे विरहगीत आहे. तो

एकटाच फिरत असताना त्याला स्मरते,
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात
भेट आपुली स्मरशी काय तू मनांत?

तो नि ती जेव्हा फिरायला बाहेर पडत, तेव्हा आकाशात बगळ्यांचे थवे विहरत. त्यांनाच तो बगळ्यांची माळ म्हणतो. ते त्याला अजून स्मरतात, पण हे तुला आठवतात का? असा प्रश्न तो तिला विचारताना या गीताचा जन्म होतो.

येथे ती त्याच्या मनात आहे. त्यामुळे त्याने विचारलेला हा प्रश्न नकळत तिला ते आठवत असेल का? असा स्वतःलाच विचारलेला आहे. त्याच्या मनांत तिच्याविषयी तीच पवित्र प्रीत जागती आहे. तिच्या बंधनांत कायमचे अडकण्याची त्याची सिद्धता आहे.

हे धवल प्रीतीचे प्रतीक बगळ्यांच्या माळेतून कवी व्यक्तवितो. येथे अंबर म्हणजे नकळत त्याचे मनोविश्व आहे, हे सांगण्याची गरज नाही. आपल्या मनोविश्वात ती आहे. तिच्या मनाकाशात अशीच धवल प्रीती शिल्लक आहे ना? या नैसर्गिक व्याकुळतेला या पंक्ती आकार देतात.

आपण फिरताना शामल मेघ दाटून यायचे. त्यातून झिरपणारा पाऊस झाडांच्या पानावर बीन वाजवायचा. त्या तालावर ती पानेसुद्धा डुलायची. या पावसात ओली तांबडी उन्हे मध्येच डोकावायची.

मात्र त्याचवेळी तो ढग तुला शोधत दरीकपाऱ्यात भटकत राहायचा, या प्रतीकातून कविला सांगायचे आहे, की तिच्यासोबत फिरताना मन भरून आल्याने तरल धुंद व्हायचे. त्या धुंदीत सारेकाही संगीतासारखे वाटायचे. भावी जीवनाची सुंदर स्वप्ने, तांबडी कोवळी उन्हासारखी मध्येच प्रकटायची.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

पण जेव्हा मी एकटाच तुझ्याविना बाहेर पडायचो, तेव्हा खरोखरीच आलेले ते शामल मेघ, पाऊस नि तांबूस कोवळी उन्हे मनाला तू सोबत नसल्याची यातना द्यायची. मग मनकवड्या मेघातून मी तुला शोधत भटकायचो. मेघ मनकवडा होण्याचे कारण तोही माझ्यासारखा चिंब भिजलेला असायचा,

त्या गाठी, त्या गोष्टी, नारळिच्या खाली,
पौर्णिमाच तव नयनी भर दिवसा झाली !
रिमझिमते अमृत तव विकल अंतरात ?

तुला स्मरते नारळीच्या झाडाखाली आपण घेतलेल्या त्या गाठीभेटी, गुजगोष्टी, बोलताना भरभरून येणारे नि चकाकणारे तुझे डोळे त्या आठवणीच्या अमृतावर मी जगतोय; पण तुझ्या मनात या आठवणी येतात का? रसिका! येथे वापरलेले नारळाचे झाड ओसाडपणाच सूचित करते किंवा त्या भेटीतील अधुरेपणच अधोरेखित करते.

दिवसा तिच्या डोळ्यातील ती पौर्णिमा एकीकडे आशा जागवते नि दुसरीकडे पौर्णिमेला भरती येते, तशी मनाची भरून आलेली अवस्था दाखवत ‘ती भेट आता इतिहास झाली’ची व्यथा व्यक्त करते.

तिसऱ्या पंक्तीतील ‘रिमझिमते’ हा शब्द तिच्यात ती आठवण शिल्लक आहे की नाही? ची शंका उत्पन्न करतो, तर येथे वर्णित केलेले विकल अंतःकरण तिचे नसून त्याचे झाले आहे. मात्र तिचेही अंतःकरण आपल्यासारखेच विकल झाले असावे, असा आरोप करूनही त्याविषयी तो स्वतःच शंकाकूल असल्याचा भाव दाखवून जाते.

हातांसह सोन्याची सांज गुंफताना
बगळ्यांचे शुभ्र कळे मिळुनि मोजताना
कमळापरि मिटती दिवस उमलुनी तळ्यात

त्या सांजवेळेचे वर्णन करताना तो सांगतो, तुला आठवते आपले केवळ हातच उभयतांच्या हातात गुंफलेले नसायचे. जणू काही ती सोनेरी सांज आपल्याला व आपली प्रीती त्या सांजेला गुंफून उभी असायची.

प्रीतीच्या धुंदीत ते दिवस कसे सरले कळलेच नाही. येथे सांज, संध्याकाळची वेळ वारंवार दाखवीत कवी कुठेतरी त्याच्या प्रीतीची ढळणारी प्रतिमाच उभी करतो. जिथे प्रीत असते, सुख असते तेथे सरणाऱ्या दिवसांची मोजदादच नसते.

पण आता तो बगळ्यांच्या शुष्क रांगा मोजत दिवस घालवत आहे. ती नसल्याने तो दिवसही त्याला मोठा वाटतो. असे दिवसावर दिवस तो घालवत आहे. जणू काही कमळ उमलून मिटतात तसेच हे झाले की काय नकळे, येथे कवी त्याच्या मनात येणारा प्रीति नि विरहाचा अन्योन्य संबंध दाखवितो.

मिटलेली कमळे पुन्हा उमलतील, ही आशाही कुठेतरी जागी दिसते. शेवटच्या कडव्यात त्याचे प्रेम हरवले आहे हे तो स्वीकारताना दिसतो,

तू गेलिस तोडून ती माळ, सर्व धागे,
फडफडणे पंखांचे शुभ्र उरे मागे,
सलते ती तडफड का कधि तुझ्या उरात?

तू माझी प्रीत तोडून गेलीस, सर्व रस्ते बंद करून गेलीस. इकडे मागे फक्त माझे फडफडणे उरले माझी प्रीत आजही तितकीच प्रामाणिक असल्याने पवित्र आहे म्हणून ते फडफडणे शुभ्र आहे. आता तिचे येणे नाही.

बहुधा तिचे लग्न ठरले असावे; पण तिच्या मनांत प्रीत तुटल्याची सल आहे का? असा प्रश्न स्वतःलाच करत तोच तडफडतो. त्याला पडणारा हा प्रश्न कुठेतरी तडफडण्यात आपल्यासोबत ‘ती’ आहेचा, भाव दाखवणारा आहे.

दोघेही जेव्हा प्रीती विरहाने, समान दुःखाने तडफडतात, तेव्हा ते तडफडणे एकट्यात भोगावे लागले तरी एकाकी नसते, वांझोटे नसते. वियोगातही कुठेतरी अहंला सुखावणारे असते. तोच भाव कवी उलगडून थांबतो म्हणजे चिरविरहातही तिची साथ तो शोधताना दिसतो-

नीट पाहिले तर ध्यानांत येईल की प्रस्तुत कवितेत तिचे स्मरण करताना, प्रेमातला नवखेपणा, अधुरे मिलन नि शेवटी तिच्या प्रतारणेतून आलेला कायमचा विरह, अशा क्रमाने वर्णन आहे. हे सारे वर्णन कवीने अत्यंत नाजूकपणाने केले आहे. संपूर्ण कवितेत कोठेही तिच्याविषयी वा प्रेमाविषयी द्वेष, तिरस्कार नाही. परीणामी राग नि क्रोध ही नाही इतकेच कशाला गोविंदाग्रज करतात तसा-

दिली तिलांजली अश्रूंची ही त्या प्रेमाच्या नावा
परतायाचे नाही आता त्या प्रेमाचा गावा

असा त्रागा ही नाही उलट स्वतःसारखीच तिची प्रीत ही प्रामाणिक असावी, असा आशावाद झरताना दिसतो. तो खरा की खोटा ठाऊक नाही. पण त्याची हळहळ मात्रं खरीच आहे. त्यामुळेच प्रस्तुत गीत केवळ विरहगीत न होता सच्च्या प्रियकराची आर्त विराणी ठरले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT