Veer Savarkar & Poet Manmohan
Veer Savarkar & Poet Manmohan esakal
सप्तरंग

अमृतातेही पैजा जिंके : लोककवी मनमोहनांचा सावरकर योग!

- डॉ. नीरज देव

रसिका ! गोपाळ नरहर नातू अर्थात लोककवी मनमोहन (१९११ ते १९९१) यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील माणगावचा होता. कवीचे वेगळेपण अनेक दृष्टीने आणि अनेक ठायी दिसून येते आपल्या कवितेचे प्रयोजन सांगताना जेंव्हा कवी

तोंडे फोडाया शतकांची

सरकवली मी वरती बाही

असे सांगतो. तेंव्हा भल्याभल्यांच्या भुवया उंचावतात. त्याचवेळी चंद्रशेखरांपासून, तांबे, यशवंत असे एकाहून एक सरस कवी स्वतःस अभिमानाने राजकवी म्हणून मिरवित असण्याच्या काळात हा स्वतःला लोककवि म्हणवित रांगड्या सुरात सांगतो,

‘राजकवीं’ना थोबाडाया । लोककवी मी पहिला झालो ।।

याचे कारण सांगताना इंग्रजी अंमलातील परतंत्र भारतातील राजे नागडे असून राजकवी त्यांचे भाट आहेत, असे सांगत कवितेची ही अशी विटंबना मला जाळते असे स्पष्टपणे सांगतो.

(saptarang marathi article by Dr neeraj deo on marathi poetry by poet manmohan nashik news)

आपण केवळ निरुपायाने उध्दट नव्हतो तो मी झालो - आणि मोहरा टाकित भिडलो, असे स्पष्टीकरण देतो. तेंव्हा सुजाण नि स्वातंत्र्याचा भोक्ता असलेला रसिकवर्ग कवीचे लोककवीपण खुषीने मान्य करतो. आपली कविता कशी जन्मते ते कविलाही कळत नाही, याची प्रांजळ कबुली देत मराठीची मर्यादा दाखवित -

श्रेष्ठ कवी जन्माला याया । मराठिचे गर्भाशय कोते ।।

अशी खंत व्यक्त करतो. तेंव्हा त्याच्या चित्तचक्षुंपुढे अभंग, ओव्या, श्लोक अशात बध्द झालेली, विधूर संस्कृतशी बळेबळे नाते जोडणारी, राजाश्रयावर जगणारी नि राजकीय बंडाचा विचार येताच जीभ हासडून शांत बसणा-या कवीची मराठी येते.

यासोबतच साहित्यबाह्य कारणांनी कवीच्या वाटेला आलेली वारंवारची उपेक्षा अन् अवहेलना याने त्रासून तो ‘माझ्या कच्च्याबच्चांनो! ‘ कवितेत सांगतो,

सदुसष्ट जन्माचे पाप माझे फेडले मी ‘कवी’ इथे होऊन

ना मान! ना धन ! ना लौकीक ! मुलांनो कवी नका होऊ

याचा अर्थ असा नाही की कविला धनादिचा लोभ होता. उलट कवी धनादि बाबतीत नको तितका विरक्त होता. १९४८ सालचा गांधी हत्येनंतरचा काळ होता. कवीपत्नीने कवीला किराणा आणायला पाठवले.

त्यासाठी कवीला साडेसात रुपयांची गरज होती पण तेही कवीकडे नव्हते. मग स्वारी कवितेचे बाड घेऊन या नि त्या संपादकाकडे पोहोचली ‘माझ्या प्रेम कविता घ्या नि साडेसात रु द्या.’ कोणीही कविता घ्यायला तयार नव्हते.

अचानक मनमोहनांच्या ध्यानात आले, कोणी कविता घेऊ किंवा न घेऊ तत्कालीन प्रसिध्द गायक गजानन वाटवे आपल्या कविता नक्कीच घेतील. ते त्यांच्या घरी पोहोचले व कविताचे बाड पुढे केले वाटवे म्हणाले, ‘या राहू द्या तुमच्याकडेच ! गांधीजींवर एखादी छानशी कविता लिहून आणून द्या मी पंधरा रु देतो.’

मनमोहन उत्तरले, ‘उद्या, परवा कशाला आत्ताच लिहून देतो.’  आणि वाटवेंच्या मुलीची रफ वही नि पेन्सिल घेत केवळ अर्ध्या तासात ‘बापूजींची प्राणज्योती’ ही सुंदर कविता लिहून दिली. वाटव्यांनी पहिल्याच दिवशी त्या कवितेवर १७,००० रु कमावले. पण मनमोहनांनी १५ रु च्या वर एक छदामही मागितला नाही. 

एवढेच कशाला असे सांगतात, की त्यांच्या अखेरच्या दिवसात सुशीलकुमार शिंदे त्यांना भेटायला गेले. ‘मी बाजारा-बाजारात तुमच्या कविता गाऊन पैसे कमवत शिक्षण घेतले. आता माझ्याकडे सर्वकाही आहे. तुम्हाला काय हवं असेल ते मागा.’ असे म्हणाले.

मनमोहनांच्या जागी कोणीही लंपट कवी असता तर आनंदाने नाचला असता. पण तेंव्हा शब्दही बोलता न येणाऱ्या या विपन्न अवस्थेतील विकलांग झालेल्या कवीने कागदावर लिहून मंत्रीवराला दाखवले,

मी तर नृपती खाटेवरचा

मला कुणाचे दान नको

तुम्हास जर का काही घेणे

देऊन टाकीन मी त्रिभुवने !

हा माज नव्हता तर विरक्त अस्मिता होती. तीच त्यांच्या काव्यातून, जीवनातून झळकत राहिली. खरे सांगायचे तर कविता म्हणजे मनमोहनांच्या शब्दात ‘श्वासच अससी तू गे माझा’ होती. श्वास हौसेसाठी नसतो तर जीवनाचा अविभाज्य भाग असतो. त्यामुळे त्याच डौलात हा कवी सांगून गेला -

शव हे कवीचे

जाळु नका हो

जन्मभरी तो

जळतच होता

फुले त्यावरि

उधळू नका हो

जन्मभरी तो

फुलतच होता

याच कारणाने असेल, मनमोहनांच्या कवितांची समीक्षा करत त्यातील वैगुण्ये दाखविताना शंकर वैद्यांसारखा दर्दी कवी व कठोर समीक्षक मराठी काव्यमंडळात मनमोहनांचे स्थान अधोरेखित करताना, ‘’ केशवसूत ते मर्ढेकर या मधल्या काळात त्या औचित्याच्या तालाचा एक ठेका मोजायचा राहूनच जात होता. तो ठेका म्हणजेच मनमोहनांची कविता आहे.’’ असे गौरवोद्गार काढतात. 

मनमोहनांच्या संग्रामशील झुंजार कवीस्वभावाला स्वातंत्र्याचा जयघोष करणाऱ्या वीरवर सावरकरांच्या युयुत्सू व झुंजार चरित्राचे आकर्षण वाटले नसते तरच नवल. रसिका ! गंमत पहा वीरगीते नि संग्रामगीते गाणाऱ्या दु आ तिवारी, विनायक, माधव किंवा कुंजविहारींना सावरकरांवर काव्य करण्याची उर्मी झाली नाही.

पण प्रीतीगीते लिहिणाऱ्या लोककवी मनमोहनांचा काव्यविषय सावरकर अनेकवेळा झाले. इतकेच कशाला सुभाषचंद्र आझाद हिंद सेनेचे नेताजी झाले तेंव्हा मनमोहनांना त्यांच्यावरही दोन काव्ये स्फुरली. सुभाषचंद्रांवरील ‘फील्ड मार्शलची सलामी’ या सुमारे २२ कडव्यांच्या नि ३५२ ओळींच्या सर्वांगसुंदर काव्यात सुभाषचंद्र भारतेमातेला आपले मनोगत मांडताना - 

जी अंदमानमध्ये --- होती विनायकांची

ती रंगदार केली --- स्वप्ने तुझी उद्याची

असा वीर सावरकरांचा उल्लेख करुन जातात. ज्यावेळी सावरकर सुभाष भेटीचे कोणतेही जाहीर संकेत उल्लेखिले गेले नव्हते. त्याकाळातील नेताजींच्या मुखातील स्वातंत्र्यवीरांचा हा उल्लेख कवीचे जाणतेपण दाखवून जातो. 

वीर सावरकरांचे जीवन अनेक चमत्कृतीपूर्ण नाट्यमय प्रसंगांनी भरलेले आहे. मार्सेल्सला घेतलेली त्रिखंडात दुमदुमलेली उडी व अंदमानांत काट्याखिळ्यांनी काव्यलेणी कोरणारा काव्ययोग हे दोन वानगीदाखल प्रसंग होत.

हे प्रसंग दृष्टीसमोर घडताना मनमोहनांसारखा बंडखोर कवी शांत बसणे शक्यच नव्हते. सावरकरांनी कवीच्या जन्मापूर्वी एक वर्षे आधी ब्रिटिशांच्या विश्वविख्यात पोलीस यंत्रणेला चकमा देत, बोटीच्या पोर्टहोलमधून उडी मारत फ्रांसचा किनारा गाठला होता.

त्याने इंग्रजांची पूर्ण जगांत छिः थू झाली होती. जनतेच्या दबावात फ्रांस सरकारला ब्रिटिश राजसत्तेविरुध्द हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागावी लागली होती. भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न जगाच्या दरबारात पोहोचला होता.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

या ऐतिहासिक घटनेवर काव्य करताना, मनमोहन ‘अस्मान कडाडून गेले’ ही कविता  लिहितात. सावरकरांच्या उडीने इंग्रजांना अस्मान दाखविले होते. त्यामुळे कवितेचे शीर्षक बोलके वाटते 

ही अशी उडी बघताना,

कर्तव्य मृत्यु विस्मरला

बुरुजावर फडफडलेला,

झाशितील घोडा हसला

वासुदेव बळवंताच्या,

कंठात हर्ष गदगदला

दामोदर डोले वरला,

मदनलाल गाली फुलला

कान्हेरे खुदकन हसला

क्रांतीच्या केतुवरला - ‘अस्मान कडाडून गेला’

रसिका, किती अप्रतिम नि अप्रतिहत रचना आहे ही ! जगांत सारे आपापले कर्तव्य विसरत असताना, एकटा मृत्युच ते वक्तशीरपणे पार पाडत असतो. प्रत्येक ठिकाणी नि प्रत्येक वेळी तो कर्तव्यकठोर होऊन आपले कर्तव्य पार पाडीत असतो.

पण आज आक्रीतच घडले. युवा सावरकरांची ती अदम्य साहसाने मारलेली उडी बघताना मृत्यु किंकर्तव्यमूढ झाला. तो केवळ पाहतच राहीला. तितकयात कवीला आठवते झाशीच्या तटावरुन उड्डाण करणारा तो घोडा तो सुध्दा ही अद्भूत साहसाने भरलेली उडी पाहून हसला.

तिकडे एडनला ‘भारतमाता, भारतमाता’ तळमळत मरणाऱ्या वासुदेव बळवंताचे ध्यान या युवकाच्या उडीकडे जाताच त्याच्या कंठांत हर्ष दाटून आला. आपल्या हौतात्म्यातून स्फूर्ती घेत ज्याने क्रांतीचे रणशिंग फुंकले त्या आपल्या शिष्याचा, इंग्रजी सत्तेला जिवंत मरण देताना केलेला हा पराक्रम पाहून दामोदर चापेकराने कौतुकाने मान डोलावली.

तर आपल्या गुरुचे अचाट नि अकल्पनीय साहस पाहून मदनलाल खुष झाला व कान्हेरेला इंग्रजी सत्तेची होणारी फटफजिती पाहून खुदकन हसू आले. सशस्त्र क्रांतीचा केतू उभारताना सावरकरांनी अथांग सागरात हा पराक्रम केला होता. पण त्याच्या तडाख्याने अस्मान कडाडून उठले. सागर, अस्मान नि सावरकर तिघेही अथांग नि गहनगंभीर होत, हे सूचवित कवी सिध्दांत मांडतो कि,

दुनियेत फक्त आहेत

विख्यात बहाद्दर दोन

जे गेले आईकरिता,

सागरास पालांडून

हनुमानानंतर आहे  ‘’ ह्या विनायकाचा मान’’

किती कमी शब्दात सूचक अर्थभेद घेत मनमोहनांची कविता थांबते. ही कविता वाचताना वाटते सावरकरांची उडी जशी क्षणार्धात चमकून गेली तशीच मनमोहनांची ही कविता क्षणार्धात लखलखून जाते. जणु ती त्या उडीशी स्पर्धा करीत तिला लिलया चित्रित करते. या प्रयत्नात मनमोहन बरेचसे यशस्वी ठरलेत अशीच मराठी रसिकांची साक्ष असेल.

कारागृहात होणाऱ्या राजबंद्यांच्या ग्रंथरचना जगाला नव्या नाहीत. पण त्या कैद्यांना लेखन - वाचन साहित्य मिळे, आराम असे पण सावरकरांचे तसे नव्हते अंदमानच्या यमपुरीत त्यांना पशुतुल्य कष्ट करावे लागत. शारीरिक छळ सहन करावा लागे.

लेखन वाचन साहित्य तर दूर पण त्यांच्याजवळ कागदाचा कपटा मिळाला तरी तो दंडनीय अपराध मानला जाई. त्यासाठी हातबेड्या, दंडबेड्यांची शिक्षा मिळे. अशा विषम वातावरणात सावरकरांची काव्यप्रतिभा उचंबळून येऊ लागली.

पण काव्य लिहीणार कशाने नि कशावर ? कवि कल्पना करतो कि सावरकरांनी उषःकालच्या प्रसन्न आकाशाला पुसले, ‘माझा कागद होतोस काय?’ कवीची चमत्कृती पहा काळोखात घुसमटणारा विनायक भविष्याचा; उषःकालचा वेध घेत आकाशाला पुसतो. त्यावर गर्वोन्नत आकाश बोलले,

मी मुक्तामधले मुक्त    -   तू कैद्यांमधला कैदी ।

माझे नि तुझे व्हायाचे     -   ते सूर कसे संवादी ?

मी जगात सर्वात मुक्त आहे नि तू कैद्यांमधला कैदी आहेस. काय खोटे होते त्यात? अंदमानातील कराल कारावासात सावरकरांच्या हातापायात, गळ्याला वेढून टाकणाऱ्या बेड्या होत्या. इतर कैद्यांना असलेले आपसात मिसळण्याचे स्वातंत्र्य ही सावरकरांना नव्हते.

अशा कैद्यातील कैद्यासोबत आपले सूर कसे जुळणार? आकाशाचे हे उत्तर बरोबरच होते. पण या वीराची अशी बोळवण करणे योग्य होणारे नाही हे ओळखून ते सांगू लागते, ‘विनायका, माझ्यावर वाऱ्याच्या लहरी गीते लिहितात, गरुडाची गर्द भरारी माझ्यावर चित्रित होते.

तुझ्या पायात तर जड बेड्या आहेत तू पीस होऊन माझ्यावर काव्य कसे काय लिहीणार ? त्यापेक्षा भूमीला विचारुन पहा.’ कवी येथे आकाश विनायकाविषयी आदर दाखवतेय असे नकळत चित्रित करुन जातो. कारण त्याने नुसते ‘नाही ‘म्हटले असते तर अनमान होता.

पण ते कारणं देत तू माझ्यावर कसे काय लिहू शकणार? विचारते आहे. हा बहाणा आहे. मग विनायकाने भूमीला विचारले ती तर इंग्रजांची अंकीत झालेली ती चटकन ‘नाही’ म्हणत संवाद टाळते. हे पाहिल्यावर मानी विनायकाने त्यांना पुन्हा विचारले नाही.

आकाश व जमीनीचा नकार ऐकून महाकवी सावरकरांची मनोवस्था कशी झाली असेल याचे तंतोतंत वर्णन करताना कवी लिहितो,

पापण्यात जळली लंका  -  लाह्यांपरि आसू झाले ।

उच्वारण होण्याआधी  -   उच्वाटण ‘शब्दा’ आले ।।

जमीन ब्रिटिशांकीत आहे हे सावरकरांना ज्ञात होते. पण आकाशही मिंधे असावे याची कल्पना नव्हती. त्यामुळे त्या नकाराने त्यांच्या डोळ्यांत अंगार पेटले त्या आगीत भाजल्याने आसवांच्या लाह्या झाल्या. यापूर्वी सुध्दा त्यांची साहित्यसंपदा ब्रिटिश साम्राज्याने जप्त करुन उच्चाटन करण्याचा प्रयास केला होता.

आणि आता तर उच्चारणही होणार नाही, उच्चारणापूर्वीच त्याचे उच्चाटन होणार की काय? या शंकेने ते ग्रासले. येथे कवीने योजलेले उच्चारण नि उच्चाटण हे शब्दप्रयोग विलक्षण रोचक नि अर्थवाही वाटतात. त्यांना एकदम आठवते भगीरथाने लोकोध्दारासाठी ब्रह्मदेवाच्या कमंडलूतील गंगा पृथ्वीवर आणण्याचा चंग बांधला.

पण तिचा प्रपात सरळ पृथ्वीवर येता तर पृथ्वीच नष्ट झाली असती म्हणून तिला आधी शंकराच्या मस्तकावर अन् तिथून हिमालयाच्या शिखरात जन्मून पृथ्वीवर आणली. माझ्या वाङ्गंगेला जन्म घ्यायला कोणीच हिमालय नाही का? येथे कवी सावरकरांच्या काव्याची तुलना गंगेशी करीत ती केवळ नि केवळ पतितोध्दारासाठीच असल्याची ग्वाही देतो.

आणि सहजपणे सावरकर निष्काम कष्ट उचलणारे भगीरथ आहेत हे सांगून जातो. तेंव्हा त्याच्या प्रतिभेने सुजाण रसिक भारावून जातात. तोच पुढील ओळीत कवी ‘माझ्या शब्दांना अजून शाई पण स्पर्शली नाही तरी हे अभंग नदीच्या पाण्यात टाकले जात असल्याची’ भावना  सावरकरांच्या मुखात पेरतो.

येथे सावरकरांचे काव्य इंद्रायणीच्या पाण्यात बुडविल्या जाणाऱ्या तुकोबाच्या जातीचे आहे असे तो अलगद सूचवितो कवीला समर्थ रामदास स्मरत नाहीत, नामदेव ज्ञानदेव आठवत नाहीत फक्त तुकोबा आठवतात. त्यामागे दोन कारणे आहेत.

पहिले तुकोबाचे न भंगणारे अभंग इंद्रायणीच्या पाण्यात बुडविले होते तसेच आता सावरकरांचे अभंग कागदावर उतरण्या आधीच - शाईने स्पर्श करण्याआधीच, काळ्यापाण्याच्या डोहात बुडविले जात होते.

येथे कवीने केलेला ‘शाई न स्पर्शली असुनी’ ची कल्पना हृदय हेलावून टाकते नि दूसरे कारण तुकोबा गर्जून सांगत होते, ‘तुका झाला पांडुरंग’!  तुकोबा जसे विठ्ठल भक्ती करता करता पांडुरंग स्वरुप झाले तसाच हा विनायकही राष्ट्रभक्ती करता करता राष्ट्ररुप झाला असे कवीला सुचवायचे आहे. नीट बघितले तर पहिल्या ओळीत कवीने सावरकरांचा कर्मयोग चितारला तर दुसऱ्यात ज्ञानयोग साकारला असेच म्हणावे लागेल.

तितक्यात आश्चर्य घडले; ती लालीमा असणारी पहाट अचानक काळी झाली. चकीत होऊन सावरकर पाहतात तो बाजूची भिंतच अकल्पितपणे समोर आल्याने काळीमा आली होती. ती चटकन सावरकरांना म्हणाली,

‘मी कागद झाले आहे - चल लिही ‘ असे ती वदली ।।

खरेतर आपण सारेच लहानपणी भिंतीचा उपयोग लिहिण्यासाठी करीत असतो. पण भिंतीवर डोके आपटून मरावे अशा भयाण व भीषण अवस्थेत सावरकरांनी भिंतीवर काट्याखिळ्यांनी उत्कट नि भव्य काव्यलेणी कोरली.

ती पाहून कवीची पतिभा जागृत होते नि त्यातून हे काव्य जन्मते. कवीने काव्याला दिलेले शीर्षक ‘ज्ञानेश्वरानंतर भिंत पुन्हा एकासाठी चालली’ असे काहीसे गद्यात्मक असले तरी कोणाचेही लक्ष चटकून वेधून घेणारे आहे. 

वीर सावरकरांचे विचार नि हिंदुत्व कवीला मान्य नव्हते. पण त्यांचा असीम नि निःस्वार्थ त्याग, उत्कट नि निःष्कलंक देशभक्ती कवीला मोहवित होती. तिला वंदन करण्याचे धाडस त्याकाळातील मोठमोठे कवी नि लेखक दाखवित नव्हते ते लोककवी मनमोहनांनी वारंवार दाखविले. सावरकरांच्या आत्मार्पणानंतर हळहळत हा कवी म्हणाला,

ते आता दिसणार नाही

की जे निशाणातच नव्हे, तर प्राणातही भगवे होते

ते आता स्पंदणार नाही

की जे वेरुळचे शिल्प अंदमानात घडवीत होते

ते आता बोलणार नाही

की जे सत्तावन नंतरचे खरे अठ्ठावन्न होते

ते आता हसणार नाही

की जे अवसेची प्रसन्न पुनव करीत होते

रसिका ! लाखों शब्दांची उधळण करुन जे सांगता येणार नाही ते कवीने किती मोजक्या शब्दांत सांगितले. यातील सगळ्याच कल्पना उत्तम नि चपखल आहेत. पण ‘सत्तावन नंतरचे खरे अठ्ठावन्न’ अत्यंत सरस आहे. सुजाण रसिका! गांधी हत्येनंतर केलेल्या कवितेसाठी कवीला बिदागी नि प्रसिध्दी तरी मिळाली होती.

पण सावरकरांवरील काव्याने कवीला छदामही मिळणार नव्हता. उलट सरकारी अवकृपेचीच शक्यता होती. तरी लोककवी मनमोहनांनी ती गायली म्हणूनच मी या भागाला ‘लोककवी मनमोहनांचा सावरकर योग! ‘ म्हटले.

जाता जाता एक बाब सांगितल्याशिवाय रहावत नाही ‘हे अंगा भिडलेले वारे’ कवितेत कवी म्हणतो कालौघात माझ्या कवितांतील कोणत्यातरी चार ओळी कदाचित सलामत राहतील. पण आज हे निश्चितीने सांगता येते की मनमोहनांच्या चार ओळीच नाहीत तर सावरकरांवरील उपरोक्त दोन कविता सलामत राहिल्या, कवीचे नांव टिकवित्या झाल्या. कविचा निःष्काम सावरकर योग फळाला आला.

(लेखक हे प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT