Congress
Congress esakal
सप्तरंग

सह्याद्रीचा माथा : काँग्रेस कोमातून व्हेंटिलेटरवर, तरीही ढिम्मपणा जैसे थे

लेखक : डॉ. राहुल रनाळकर

काँग्रेसला चांगल्या वैद्याची किंवा डॉक्टरची गरज आहे. गरज भासल्यास मनोविकार तज्ज्ञही उपयोगी पडू शकतील. काँग्रेस नेमकं काय करतेय, हे त्यांनाही समजेनासे आहे. शांत, थंड, ढिम्म आणि दिशाहिन असे सगळेच शब्द काँग्रेसला तंतोतंत लागू पडतात.

ज्या पक्षात एक से एक धुरंधर होते, तो पक्ष आज नेतृत्वहिन आणि निस्तेज झाला आहे. सत्ता नसली म्हणजे तेज संपते, हे खरं असलं तरी कोणत्याही प्रकारची ऊर्मी या पक्षात उरलेली नाही. कदाचित रायपूरमधून थोड फार उत्साह मिळेल, अशी आशा राजकीय क्षेत्रातील निरीक्षक व्यक्त करत आहेत.... (Saptarang Marathi Article on Congress party politics by dr rahul ranalkar nashik news)

कोण्या एकेकाळचा अत्यंत बलाढ्य मानला गेलेल्या काँग्रेसची पक्षाची दुरावस्था आता पाहिली जात नाही. अनेक शहरांतील काँग्रेस भवन सध्या ओस पडलेले दिसून येतात. या काँग्रेस भवनातील लाईट बिल कोणी भरावं यावरुन वादंग झडतात.

काँग्रेस पक्ष एकच असला तरी बहुतांश मोठ्या शहरांमध्ये काँग्रेसच्या सध्याच्या कार्यकारिणीशिवाय समांतर काँग्रेस सुरु असल्याचे दिसते. शिवाजी महाराजांची जयंती दोन नेते वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करतात.

आगीतून फुफाट्यात ही म्हण काँग्रेसला आता लागू पडत नाही. काँग्रेस गेल्या काही वर्षांपासून कोमात गेलेली होती, आता ती व्हेंटिलेटरवर गेल्याचं दारुण चित्र दिसून येतं.

काँग्रेसला अजूनही एक खात्री वाटतेय. जी अजिबात रास्त नाही. भाजपाच्या सरकारला लोक कंटाळतील आणि लोक काँग्रेसकडे आर्जव करतील, की तुम्ही या आणि आता सत्ता सांभाळा. या भ्रमातून काँग्रेस गेल्या आठ वर्षांपासून सावरलेली नाही.

लोकांच्या मनात भाजपाबद्दल खदखद आहे, आणि एक ना एक दिवस ती बाहेर येईल, अशा सोज्वळ आशेवर तमाम काँग्रेसची मंडळी आहेत. मुळात भाजपाबद्दल रोष आहे किंवा नाही, हे पडताळून पाहण्याची कोणतीही यंत्रणा काँग्रेसकडे नाही.

भाजपाबद्दल नाराजीचं वातावरण पसरत असल्याचं काँग्रेसच्या कैकपट आधी भाजपालाच समजत. त्यानंतर ती नाराजी कशी दूर करता येईल, याची विस्तृत योजना भाजपाकडे तयार होते, त्यावर काम करुन भाजपानं पुढच्या विषयात हात घातलेला असतो.

काँग्रेसला जनतेतून एखाद्या विषयाची नाराजी समजेपर्यंत पुलाखालून अनेक क्युसेक्स पाणी निघून गेलेलं असतं. काँग्रेसची दखल आता कोणीही घेईनासं झालंय, ही बाब आत्तापर्यंत काँग्रेसजनांना कळायला हवी होती. अजूनही गटतटाचं राजकारण सोडविण्यासाठी स्थानिक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पक्षश्रेष्ठींकडे धाव घ्यावी लागते.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

लोकांमध्ये थेट जाण्याशिवाय अन्य कोणताही मार्ग काँग्रेसकडे उपलब्ध नाही. लोकांचे शिव्याशाप नेमके काय आहेत, हे जाणून घ्यावं लागेल. त्यासाठी कार्यकर्त्यांची फळी काँग्रेसकडे उपलब्ध नाही. राज्यस्तरीय नेते शहरांमध्ये आले की उपस्थित कार्यकर्त्यांपेक्षा स्टेजवर नेत्यांची गर्दी अधिक असते.

लोक कितीही वैतागले तरी ते राजकीय पक्षांच्या किंवा नेत्यांच्या दारात जात नाहीत. लोकांना सक्षम पर्याय हवा असतो. सामान्य जनांच्या म्हणून ज्या काही समस्या आहेत, त्या जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी थेट संवाद साधावा लागेल.

आश्वासक चेहरा लोकांना जोवर दिसत नाही, तोवर राजकीय पक्षांना कोणताही थारा जनता देत नसते. सध्याच्या घडीला काँग्रेसकडे एकही आश्वासक चेहरा नाही. तिसरी-चौथी तर सोडाच दुसरी फळी नाही. पहिल्या फळीतील नेत्यांना पक्षाबद्दल काहीही देणं घेणं नाही.

कुठल्याही दिवशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यासाठीची शून्य तयारी काँग्रेस पक्षाची आहे. वरपासून ते अगदी तळातील पदाधिकाऱ्यांपर्यंत पदांसाठीची रस्सीखेच दिसून येते.

वास्तविक ही रस्सीखेच अनाकलनीय आहे. अनेक वर्ष जे पदाधिकारी पदांवर आहेत, ते असताना कोणताही फरक पक्षाच्या प्रतिमेत पडलेला नाही, तरीही पद भूषवण्याची तळमळ काही केल्या जात नाही. एक ना एक दिवस आपल्या पक्षाची सत्ता येईल, तेव्हा आपलं हे पद कामी येईल, अशी समजूत बहुदा या पदाधिकाऱ्यांची असावी.

अगदी संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचा विचार केला असता, कुठेही काँग्रेसबाबत आश्वासक स्थिती नाही. या उलट असलेले किल्ले ढासळवण्याची रणनीती आखताना काही काँग्रेस नेते दिसून येतात.

लोक जागृत होतील आणि काँग्रेसकडे येतील, या पेक्षा काँग्रेसने जागृत होऊन लोकांपर्यंत जायला हवं. सध्याच्या परिस्थितीत काँग्रेसकडे लोकांमध्ये जाण्यासाठी कोणतेही मुद्दे नाहीत. जे मुद्दे आहेत, ते मुद्दे तापवण्याची धमक त्यांच्यात उरलेली नाही.

विचित्र अशा कोषात काँग्रेस सध्या अडकून पडली आहे. अजूनही जुन्या फळीतील काँग्रेसचे नेते स्वतः फोन उचलत नाहीत. त्यांच्या स्वीय सचिवांनी आणखी दुसरे स्वीय सचिव नेमलेले आहेत. म्हणजे एखाद्या नेत्याला फोन केल्यानंतर त्यांच्या पीएचा पीए फोन उचलतो, अशी नाजूक परिस्थिती आहे.

सत्ता मिळवणं, टिकवणं हे आता सोप काम राहिलेलं नाही. सध्याचा जमाना मार्केटिंगचा आहे. भाजपा हे अचूक जाणून आहे. सरकारच्या प्रत्येक निर्णयाचा उत्सव साजरा केला जातो. अर्थसंकल्प लोकांमध्ये जावून त्यांना समजावून सांगितला जातो.

एखादा मुद्दा चुकला तरी त्यावर असंतोष माजण्यापूर्वीच पुढच्या मुद्द्याला हात घातला जातो. या वेगवान परिस्थितीमुळे काँग्रेसच्या डोक्याला मुंग्या आल्याची स्थिती आहे. लोकांपुढे स्थानिक पातळीपासून राज्य स्तरावर आणि केंद्रीय स्तरावर अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

त्यामुळे पुढच्या काळात हिंग लावूनही काँग्रेसला कुणी विचारेल, अशी परिस्थिती नसेल. सध्या तरी काँग्रेसला सावरण्यासाठी शुभेच्छा देण्यावाचून अन्य काही पर्याय दिसत नाही....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT