रसिका, आज आपण सावरकरांच्या ‘शत जन्म शोधिताना’ या अजरामर नाट्यगीताचे रसग्रहण करणार आहोत. सावरकरांनी चार नाटके लिहिली त्यापैकी तीन रंगमंचावर आली. ‘संन्यस्त खङ्ग’ हे त्यातील सर्वात गाजलेले नाटक होय. त्यात सेनापती विक्रम भगवान बुध्दांच्या इच्छेला मान देऊन संन्यास घेतो. पण जेंव्हा शाकयांवर; भगवान बुध्दांच्या देशावर कोसल देशाचा राजा विद्युतगर्भ आक्रमण करतो, तेव्हा विक्रम दुबळ्या शाकयराष्ट्राला वाचविण्यासाठी संन्यास धर्माचा संन्यास घेत युध्दात उतरतो, म्हणून ‘संन्यस्त खङ्ग’ होय. सावरकर या नाटकातून संदेश देतात कि, एखादा साधू जेवढा नि जितका विरक्त असतो तेवढा नि तितकाच देश, धर्मासाठी मरणारा हुतात्माही असतो, शिवाय तो साधूपेक्षाही अधिक उपयुक्त असतो. (Saptarang Marathi Article on Veer Savarkar Marathi Poetry Nashik News)
या नाटकात विक्रमाचा मुलगा वल्लभ सुलोचनेसोबत विवाह करतो. त्यांच्या विवाहाला नुकतेच वर्ष उलटलेले असते. लग्नाच्या प्रथम प्रीतिसंगमाला दोघे एकांतात मधुर स्वप्नांत हास्यविनोदांत दंग असतात. सुलोचनेला कामेच्छा होते, पण तितक्यात देशावर संकट आल्याचे ऐकताच वल्लभ सुलोचनेला सोडून त्वरेने निघून जातो. त्यानंतर लगेचच कोसलांचा बंदी बनतो. कोसल नरेश अट घालतो, की शाकयांनी शरण यावे, नसता वल्लभास मारले जाईल. सर्व राष्ट्र कोसलांना शरण जाण्याच्या सिध्दतेत असताना; पुरुषवेषधारी सुलोचना आपल्या राष्ट्राचा अवमान होऊ नये यासाठी पतीच्या जीविताचा विचार न करता आवेशाने सांगते कि, ‘शरण नाही रण ! शरण नाही रण !! मारित मारित मरण!!!’
'शेकडो निरपराधांचे मारेकरी, क्रूर, राष्ट्र शत्रू अतिरेकी सोडा; पण आमच्या लोकांना वाचवा’चा गलबला करणा-या आजच्या काळात, देशासाठी प्राणप्रिय पतीला मरणाच्या दाढेत ढकलणारी सुलोचना भव्य, दिव्यच नव्हे तर युगायुगातून क्वचितच जन्मणारी वाटते. ती याच नव्हे ब्रम्हांडाच्या कोणत्याही सूर्यमालिकेत अभावाने सुध्दा आढळेल की नाही शंकाच वाटते. ती सावरकरांना त्यांच्या मानस विश्वात सापडली. या अशा एकमेव सुलोचनेच्या मनात आपणच आपल्या वल्लभाला मृत्यूच्या मुखात दिले, ही भावना एकट्यात असताना मनात येते. त्यावेळी तिच्या विराट विरहाला शब्दबध्द करताना सावरकरांचे हे गीत जन्मते.
शत जन्म शोधिताना । शत आर्ति व्यर्थ झाल्या ।
शत सूर्य मालिकांच्या । दिपावली विझाल्या ।
ती म्हणते वल्लभासारखा प्रियकर लाभावा म्हणून शेकडो जन्म शोधित राहिले. त्याच्या प्राप्तिसाठी केलेल्या शेकडो आर्ति वाया गेल्या. येथे कवि कामना, इच्छा असा शब्दप्रयोग न करता 'आर्ति ' असा शब्दप्रयोग करतो आर्ति म्हणजे अशी तीव्रतीर इच्छा, जी संपूर्ण जीवनात एकदाच जन्मते नि जीवनभर पुरते. ती तडजोड स्वीकारीत नाही, 'हा ' नाही मिळाला तर 'तो 'ची बात तिथे चालत नाही. अशी ती आर्ति शेकडो जन्मात बाळगली नि तितक्याच जन्मात अधुरी राहिल्याने वाया गेली. हा काळ किती मोठा होता हे दाखविण्यासाठी सावरकर सूर्य मालिकांचे परिमाण वापरतात. सावरकरांना नेहमीच विराटतेची ओढ होती, जगन्नाथाचा रथोत्सवामध्ये ते युगक्रोश दुरी अर्थात युग रुपी मैलाच्या पाट्या असा विलक्षण शब्दप्रयोग करताना दिसतात. पण त्यात जगन्नाथाचे भव्य स्वरुप असल्याने त्या सहजी पटतात, पण इथे तर त्यावरही ताण करीत ते शत सूर्यमालिकांरुपी दीपावली विझाल्या म्हणतात.
एका सूर्य मालेचा विज्ञानाला अंत गवसत नाही अन् वैनायक प्रतिभा येथे शत सूर्य मालिकांची विराट कल्पना करते. यामागे दोन कारणं आहेत पहिले सुलोचनेला जाणवणारा तीव्र विरह हुबेहुब दाखवायचाय नि त्यात तिच्याविषयी कारुण्य उत्पन्न होणार नाही याची काळजी ही घ्यायचीय. विरह नि मिलनाची कल्पना केली तर मिलनाचा काळ कितीही मोठा असला तरी चटकन जातो, 'वर्षे पाहता पाहता सरली ' असे आपण सहजी बोलून जातो नि विरहाचा क्षण जाता जात नाही, युगा युगासारखा भासतो. सुलोचनेच्या याच विरहाची कल्पना सावरकर तंतोतंत साकारतात आणि दूसरे सुलोचनेसारखी पतीचे मरण स्वीकारुन रण गाजवणारी पुरंध्री शत सूर्य मालिकात कोठेही अभावानेच गवसणारी आहे हे ही दाखवायचे आहे, या दोन्हीं बाबी सावरकर साधतात.
तेंव्हा पडे प्रियासी । क्षण एक आज गांठी
सुख साधना युगांची । सिध्दिस अंती गाठी
'शत शत जन्मात व्यर्थ होत जाणा-या तीव्र इच्छांचे हे दुःख मी भोगल्यावर'असे उव्देगाने न म्हणता सुलोचना त्या काळाला तप समजते. कारण हे निव्वळ मिलना आधीचे विरहगीत नाही, तर मिलनानंतर आलेल्या विरहाचे गीत आहे. त्यामुळेच ती त्या तपाला सुख साधना म्हणते. खरोखर ! प्रियकराची आंस धरत क्षण क्षण जळत जेंव्हा तो वा ती भेटते तेंव्हा त्या भोगलेल्या यातना, व्यर्थ गेलेल्या त्या तीव्रतर इच्छा; काहीच नव्हेत असं प्रेमी मनाला वाटून जाते. ते सावरकर अचूक निर्देशितात. यावरील ओळींकडे नीट पाहिले तर त्यात 'गाठी' या शब्दावर साधलेला यमक ही दिसेल नि श्लेषही दिसेल. पहिला गांठी भेटणे दर्शवतो तर दूसरा प्राप्ती दाखवतो. ही किमया एखादा वामन, मोरोपंतच करू जाणे.
हा हाय जो न जाई । मिठि घालु मी उठोनी ।
क्षण तो क्षणात गेला । सखि हातचा सुटोनी
सुलोचना नलिनीला सांगते, 'युगांच्या साधनेनंतर तो सुखाचा क्षण जो आला होता. तो साधण्यासाठी मी लगबगीने माझ्या प्रियकराला मिठी घालते न घालते, तोच तो क्षण क्षणात सुटोन गेला.'रसिका ! काय मंत्रमुग्ध करणारे शब्द आहेत हे ! सुलोचनेचे विराट दुःख; पती आता पुन्हा कधीच भेटणार नाही, केवळ मी एकटीने त्याला मरण्यासाठी शत्रूच्या तावडीत ठेवले या क्षणिक अपराधभावामुळे त्यात येणारी आतल्या आत सलणारी, ठसठसणारी तीव्र वेदना अन् आता इतिहासजमा झालेले एकांतातील ते हास्यविनोद, होता होता राहून गेलेली ती शेवटची रतिक्रिडा तिला आठवू लागते, जणू काही मिलनाचे सारे क्षण क्षणात नाहीसे झाल्यासारखे वाटतात. हे सारे व्यक्तविताना सावरकर वरील रचना करतात. रसिका ! यातील ‘क्षण तो क्षणात गेला’ हा शब्दप्रयोग जितका मनोहर नि मधूर वाटतो ना तितकाच तो बुध्दीनिष्ठ नि कठोर वास्तवाचे दर्शन घडविणारा ही आहे. एका ठिकाणी पु. ल. देशपांडे म्हणतात,‘ केवळ एवढ्या एका शब्द समुहासाठी सावरकरांना साहित्याचे नोबेल द्यावयाला हवे होते. एका भाषाप्रभुने दिलेली ही प्रतिक्रिया अत्यंत सूचक आहे.
या विरहाने ती कोलमडून न पडता, कर्तव्यभावनेने युध्दावर निघते. पुढे वल्लभ सुटून येतो. दोहोंचे क्षणिक मिलन होते न होते, तोच सुलोचना मरते. तितकयात रणशिंग वाजते नि मृत सुलोचनेला सोडून वल्लभ रणांगणावर जातो. त्या रणभेरीने मृत सुलोचना युध्द गर्जना करीत उठते, नि रणांगणावर पराक्रम गाजवते. शेवटी वल्लभ नि सुलोचना शत्रूस मारता मारता घायाळ होऊन रणशय्या करीत मरण पत्करतात. हे विस्ताराने देण्याचे कारण हेच कि कथानक न पाहता निव्वळ हे नाट्यगीत यथार्थ अर्थबोध घडविणार नाही.
थोडकयात सावरकरांची मानसकन्या सुलोचना राष्ट्रीय स्वार्थ प्रधान मानून स्वतःच्या उत्कट पतिप्रेमाची आहुति देत हौतात्म्याचे सर्वोच्च दर्शन घडविते. या दिव्य कथानकाच्या कोंदणात हे मिलनोत्तर विरहगीत उत्कट, भव्यतेचा साक्षात्कार देत अक्षय तेजाने तळपत रहाते असेच म्हणावे लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.