prof dr mrudula bele
prof dr mrudula bele 
सप्तरंग

एका थेंबाची ‘जीवन’गाथा (प्रा. डॉ. मृदुला बेळे)

प्रा. डॉ. मृदुला बेळे mrudulabele@gmail.com

सध्या भारतच नव्हे, तर जगभरातलं जनमानस ‘लस’ या घटकाभोवती एकवटलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी कोरोनाशी संबंधित लशींबाबत संशोधन, चाचण्या सुरू आहेत, बातम्या येत आहेत. या सगळ्याकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून कसं बघायचं, या लशींबाबतची वस्तुस्थिती काय आहे, लशी नेमक्या आहेत कशा प्रकारच्या, त्या प्रत्यक्ष यायला वेळ का लागतो आदी विविध गोष्टींबाबत विवेचन.

सलमान खानसारख्या ‘मास अपील’ असलेल्या नायकाच्या नव्या चित्रपटाची घोषणा झाली, की जनमानसात चैतन्याची एक लहर पसरते. सल्लूभाई या सिनेमात आता कसा दिसणार आहे, त्याची नायिका कोण असणार आहे, याबद्दल एक ‘हवा’ तयार व्हायला लागते. मग चित्रपटाचं ट्रेलर रिलीज होतं. ‘एक बार मैने कमिटमेंट कर दी, तो मै खुदकीभी नही सुनता’ यासारखे छ्प्परफाड संवाद मग लहानथोरांच्या ओठावर असतात. एक नवीच उत्सुकता दाटून येऊ लागते. एक उत्कंठायुक्त आनंद् असतो. कधी येईल चित्रपट? कसा असेल? चालेल ना?
सध्या आपल्या देशातच नाही तर जगभरात एक अशीच अधीरता दाटून आलेली आहे. मात्र, या वेळी असलेली उत्सुकता कुठ्ल्या चित्रपटाच्या आगमनाची नाहीये, तर ती आहे एका लशीच्या आगमनाची. आणि सध्याचे हिरो हे कुणी सलमान किंवा शाहरुख खान नाहीयेत, तर ते आहेत प्रोफेसर एड्रियन हिल, प्रोफेसर सारा गिल्बर्ट, प्रोफेसर सर अ‍ॅन्ड्र्यू पोलार्ड यांच्या सारखे ऑक्सफर्ड विद्यापीठातले आणि तिथल्या जेन्नर इन्स्टिट्यूटमधले शास्त्रज्ञ किंवा अदर पूनावालांसारखे लस बनवणारे कारखानदार. आज गल्ली गल्लीत, नाक्या नाक्यावर या लशीची चर्चा आहे. सलमान खानच्या ‘कमिटमेंट’च्या ‘डायलॉग’पेक्षा या मंडळींच्या त्यांच्या कामाप्रती असलेल्या कमिटमेंटनं सगळं जग भारावून गेलेलं आहे. ऑक्स्फर्ड लशीच्या पहिल्या दोन टप्प्यातल्या चाचण्यांचे निकाल हाती येताच सेन्सेक्सनं उसळी मारली आहे; पण त्याबरोबरच अफवांचं, ‘फेक न्यूज’चंही पेव फुटलं आहे. अफवांना बळी न पड्ता या बाबतीतली विज्ञानाच्या कसोटीवर तावून सुलाखून घेतलेली माहिती प्रत्येकानं करून घ्यावी म्हणून हा लेख प्रपंच.

आठ जानेवारीला वुहानमधल्या शास्त्रज्ञांनी सार्स कोव्ही-२ या विषाणूचा जिनोम सिक्वेन्स शोधून काढला, आणि दुसर्‍या दिवशी जगभरातल्या शास्त्रज्ञांनी या विषाणूविरोधी लस बनवण्याच्या कामात स्वत:ला अहोरात्र जुंपून घेतलं. आजवर ज्या ज्या विषाणूजन्य रोगांवर लशी बाजारात आल्या, त्यातली सगळ्यात जलदगतीनं आलेली लस होती गोवरावरची- आणि ही बाजारात यायला लागली होती तब्बल चार वर्षं. मात्र, कोव्हिडची साथ एखाद्या वणव्यासारखी जगभर पसरली, आणि तिनं कोट्यवधी माणसांना घरात डांबून ठेवलं. लोकांच्या मनातली साशंकता घालवण्यासाठी लस येणं अत्यंत निकडीचं होऊन बसलं. आणि म्हणूनच ‘न भूतो न भविष्यति’ अशा वेगानं शास्त्रज्ञ कामाला लागले. आज जगभरात तब्बल शंभरच्यावर लशींवर काम सुरू झालेलं आहे. त्यातल्या २४ लशींनी प्राण्यांमधल्या चाचणीचा टप्पा पार करून माणसातल्या चाचण्यांच्या महत्वाच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. माणसांमधल्या चाचण्या ज्या चोवीस लशींवर सुरू होत आहेत, त्यात दोन भारतीय लशींचाही समावेश आहे. तर या चोवीसमधल्या तीन लशींनी केवळ सात महिन्यांत माणसातल्या चाचणीच्या तिसर्‍या टप्प्यात प्रवेश केला आहे, आणि इतक्या गतीने हे काम पूर्ण करणं केवळ ऐतिहासिक आहे.

या तीन लशींपैकी एक आहे ब्रिटनमध्ये संशोधन चालू असलेली ऑक्स्फर्ड विद्यापीठाची लस, दुसरी आहे अमेरिकेतली मॉडर्ना कंपनीची लस, आणि तिसरी चीनची कॅनसीनो ही लस. ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या संशोधकांनी या लसनिर्मितीसाठी अ‍ॅस्ट्रा झेनेका या ब्रिटीश औषध कंपनीशी करार केला आहे. काही दिवसापूर्वी ऑक्स्फर्ड विद्यापीठाच्या लशीचे माणसातल्या पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातल्या चाचण्यांचे अत्यंत आशादायी निकाल हातात आले, आणि सगळ्या जगात आनंदाची एक लाट पसरली. मात्र, तरीही या निकालांकडे अत्यंत सावधपणे पाहण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी ही लस काय आहे, आणि ती आता नक्की कुठल्या टप्प्यात पोचली आहे हे जाणून घ्यायला हवं.
ता. २३ एप्रिलला ऑक्स्फर्ड लशीवर माणसातल्या पहिल्या टप्प्यामधल्या चाचण्या सुरू झाल्या, त्या विषाणू सापडल्यानंतर अवघ्या चार महिन्यात! एखादी लस बनवणं ही एक मॅरॅथॉन धावण्यासारखी लांबलचक प्रक्रिया असते आणि ही प्रक्रिया या शास्त्रज्ञांनी जणू शंभर मीटर शर्यत धावल्यासारखी वाऱ्याच्या वेगानं संपवली होती. कसं जमवलं होतं त्यांनी हे?..तर याचं कारण असं होतं, की ही लस त्यांनी पूर्णपणे नव्यानं बनवली नव्हती. चिपांझीमधे सापडलेल्या सार्स कोव्ही-२ च्याच जातीच्या एका कोरोना विषाणूवर गेली वीस वर्ष ही शास्त्रज्ञ मंडळी काम करत होती. या विषाणूमधल्या जेनेटिक मटेरीयलमधे असे बदल घडवून आणायचे, की तो विषाणू माणसाला काहीही इजा पोचवू शकणार नाही. मग आपल्याला हव्या त्या विषाणूचं जेनेटिक मटेरियल या विषाणूवर लादायचं, आणि हा विषाणू मग लस म्हणून वापरायचा, असं संशोधन ते गेली कित्येक वर्षं करत आले होते. ट्रॉयची लढाई आणि त्यातल्या ट्रोजन हॉर्सची गोष्ट सगळ्यांनी वाचली आहे. ऑक्स्फर्डचे शास्त्रज्ञ जे तंत्रज्ञान वापरतायत, ते या ट्रॉयच्या घोड्यासारखं आहे. वरवर निरुपद्रवी दिसणार्‍या चिपांझीतल्या कोरोना विषाणूच्या पोटात सार्स कोव्ही-२ चं जेनेटिक मटेरियल, म्हणजे त्याचा एमआरएनए सैन्यासारखा दडवून ठेवलेला आहे.
सार्स, मर्स आणि इबोला या विषाणूजन्य आजारांवरच्या लशी अशा प्रकारानं त्यांनी या आधी बनवल्या होत्या. या लशींची सुरक्षितता माणसात सिद्ध करून चाचण्यांचा पहिला टप्पा पूर्ण केलेला होता आणि आता याच विषाणूवर याच प्रकारानं त्यांनी सार्स कोव्ही-२ चं जेनेटिक मटेरियल प्रक्षेपित केलं आहे. त्यांची प्राण्यातली सुरक्षितता आणि उपयुक्तता चिपांझीमधे ( प्रिक्लिनकल चाचणी) सिद्ध केली आहे.

माणसातली पहिल्या टप्प्यातली चाचणी, जिला फेज -१ क्लिनिकल चाचणी म्हणतात, त्यात लशीची सुरक्षितता सिद्ध केली जाते. या लशीचे काय दुष्परिणाम होतायत, ते गंभीर आहेत का हे पहिल्या टप्प्यात तपासलं जातं. कारण कुठल्याही औषधाच्या किंवा लसीच्या बाबतीत सर्वात महत्त्वाची असते ती त्याची सुरक्षितता. ‘फस्ट डू नो हार्म’ हा औषधनिर्मितीमधला पहिला मंत्र आहे. क्लिनिकल चाचणीच्या फेज-२ मधे लशीची अधिक मोठ्या स्वयंसेवकांच्या गटावर सुरक्षितता आणि उपयुक्तता, आणि फेज-३ मधे मग फार मोठ्या प्रमाणात जगभरातल्या माणसातली उपयुक्तता सिद्ध केली जाते. लशीचे कुठलेही दुष्परिणाम दिसले नाहीत, की सुरक्षितता सिद्ध होते, आणि आजूबाजूला अनेक जणांना संसर्ग झालेला असतानाही ही लस टोचलेल्या माणसांना संसर्ग झाला नाही की उपयुक्तता सिद्ध होते.

सध्याची आणिबाणीची परिस्थिती पाहता ब्रिटनच्या औषध नियामक कार्यालयानं या लशीची फेज-१ आणि फेज-२ चाचणी एकत्रितरित्या घ्यायला परवानगी दिली होती. आणि याच चाचणीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. १८-५५ या वयोगटातल्या एकूण १,०७७ लोकांवर ही चाचणी केली गेली. त्यातल्या ५४३ जणाना कोविड लस दिली गेली, तर ५३४ लोकांना एक दुसरीच कोव्हिडशी संबंध नसलेली लस दिली गेली. नवी लस दिलेल्या रुग्णांत थोडा तापताप, हुडहुडी भरणं, स्नायूदुखी, डोकेदुखी असे दुष्परिणाम आढळले; पण पॅरासिटामॉल दिल्यावर या रुग्णांना आराम पडला. एकाही रुग्णात कुठलेही गंभीर दुष्परिणाम दिसून आले नाहीत. आपल्या शरीरात टी सेल्समुळे आलेली आणि प्रतिपिंडांमुळे आलेली अशी दुपेडी प्रतिकारशक्ती असते. आनंदाची गोष्ट म्हणजे ऑक्सफर्ड लस दिलेल्या स्वयंसेवकांत या दोन्ही प्रकारची प्रतिकारशक्ती निर्माण झालेली आढळली. ९१ टक्के रुग्णांत एकाच डोसमधे आणि १०० टक्के रुग्णात दोन डोस दिल्यावर प्रतिपिंडं निर्माण झालेली आढळली. म्हणजेच ही लस पुरेशी सुरक्षित आहे हे तर सिद्ध झालंच; पण ती कोव्हिड-१९ पासून बचाव करण्यात उपयुक्त ठरू शकेल असंही आढळलं. त्यामुळे आता शेवटच्या टप्प्यात जाण्याचा लसीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

ज्या वेगवेगळ्या वंशाच्या आणि वयोगटातल्या रुग्णांना ही लस भविष्यात दिली जाणार आहे, त्या सगळ्यांचा समावेश चाचणीत असणं अत्यंत गरजेचं असतं. कारण वेगवेगळ्या वयाच्या आणि वंशाच्या लोकांत लागणारा डोस वेगळा असू शकतो, आणि दिसून येणारे दुष्परिणाम ही निराळे असू शकतात. त्यासाठी तिसर्‍या टप्प्यात ब्राझिल आणि दक्षिण आफ्रिकेतही चाचण्या सुरू झाल्या आहेत. शिवाय तिसर्‍या टप्प्यात आता लहान मुलांवर आणि जवळपास तेवढ्याच रुग्णांवरही लसीची चाचणी सुरू होणार आहे.
चाचणीचे आतापर्यंतचे निष्कर्ष उत्तम असले, तरी तिसर्‍या टप्प्यातले निकाल येईपर्यंत हुरळून जाण्यात अर्थ नाही. कारण ही लस खरोखर विषाणूचा दीर्घ काळापर्यंत प्रतिकार करण्याची शक्ती मानवी शरीराला देते आहे का, हे हा टप्पा पार पडल्यावरच समजणार आहे. विज्ञानाला आपल्या गतीनं काम करू देणं अत्यंत गरजेचं आहे. तिसर्‍या टप्प्यातली चाचणी यशस्वी ठरली तरी सगळ्या जगाला पुरी पडेल इतक्या प्रमाणात लशीची निर्मिती करणं आणि जगातल्या प्रत्येकाला ती पुरवणं हे दुसरं मोठं आव्हान असणार आहे. यासाठी ऑक्स्फर्ड संशोधकांनी आणि अ‍ॅस्ट्रा झेनेकाने एप्रिल महिन्यातच सहा मोठ्या लस उत्पादकांशी भागीदारी केली आहे. त्यातली एक आहे सायरस आणि अदर पूनावालांची पुण्यातली सिरम इन्स्टिट्यूट ही भारतीय कंपनी.

सिरम इन्स्टिट्यूट हे डॉ. सायरस पूनावाला यांना सन १९६६ मध्ये पडलेलं एक स्वप्न होतं. आज त्यांची ही कंपनी जगातली सगळ्यात मोठी लस बनवणारी आणि निर्यात करणारी कंपनी आहे . जगातल्या १६७ देशांत आज सिरमच्या लशी निर्यात केल्या जातात. लसीकरण केल्या गेलेल्या जगातल्या दर तीन मुलांमधल्या दोघांना सिरमनं बनवलेल्या लशी दिलेल्या असतात.

सध्या जगभरात काम चालू असलेल्या पाच लशींच्या निर्मितीत सिरम इन्स्टिट्यूटची भागीदारी आहे. या पाचमधल्या दोन लशींवरचं संशोधन खुद्द सिरम इन्स्टिट्यूटच करत आहे. मात्र, ऑक्सफर्ड संशोधकांवर असलेल्या भरवसा, आणि ऑक्स्फर्ड लशीच्या प्राण्यात मिळालेल्या निकालांची विश्वासार्हता पाहून सिरमनं सगळ्या चाचण्या पूर्ण होण्याआधीच ऑक्स्फर्ड लशीच्या निर्मितीची तयारी सुरू केलेली आहे. ही लस भारतात उपलब्ध होण्यासाठी भारतीय लोकांवर लशीच्या तिसर्‍या टप्प्यातल्या चाचण्या होणं अत्यावश्यक आहे. त्या सुरू करण्यासाठीची परवानगी सिरम इन्स्टिट्यूटनं भारतीय औषध नियामक संस्थेकडे ( ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया -डीसीजीआय) यांच्याकडे मागितली आहे. ही मिळाली, की लगेचच या चाचण्या सुरू होतील. आणि या चाचण्यांचे निकाल समाधानकारक आहेत असं डीसीजीआयला वाटलं, तर मग लशीला भारतात विक्री परवाना मिळेल.

‘कोव्हीशिल्ड’ असं या अ‍ॅस्ट्रा झेनेका- ऑक्सफर्ड लशीचं नामकरण करण्यात आलं आहे. या लशीचे प्रत्येकाला दोन डोस द्यावे लागणार आहेत. डिसेंबरपर्यंत सिरम इन्स्टिट्यूटमधे कोव्हिशिल्डचे साधारण तीस कोटी डोसेस बनवून तयार असतील. या उत्पादनासाठी भारत सरकारनंही सिरमला मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. उत्पादन झालेल्या लशीतल्या अर्ध्या भारतीय बाजारपेठेसाठी असतील आणि अर्ध्या जगातल्या उरलेल्या जगासाठी. सर्वसामान्य भारतीय माणसाला आपल्या खिशातले पैसे खर्च करून ही लस विकत घेण्याची वेळ बहुतेक तरी येणारच नाही. भारत सरकारच ही लस सिरमकडून खरेदी करेल आणि आपल्या लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत भारतीयांना विनामूल्य देईल. तरीही अशा पद्धतीनं सगळ्या भारतीयांचं लसीकरण पार पाडायला एक वर्ष तरी उलटून जाणार आहे. त्यामुळे आपण सगळ्यानी हुरळून न जाता, अफवांना बळी न पडता हे सगळं शांतपणे समजून घ्यायला हवं. तन मन धन खर्च करूनही हे संशोधक इतक्या शांतपणे काम करू शकतात, तर आपल्यालाही शांत राहायला काय हरकत आहे?
शिवाय ही इंग्लिश बनावटीची लस, ही अमेरिकन, ही भारतीय असा फुकाचा ‘लसराष्ट्रवाद’ही अंगी बाणवून घेता कामा नये. या एका लशीच्या संशोधनात, उत्पादनात आणि चाचण्यात किती देशातल्या किती माणसांचे हात लागले आहेत, हे आपण पाहिलं आहे. त्यांच्या हातभाराशिवाय यात इथवर पोचणं केवळ अशक्य होतं. कोव्हिड लशीवर काम करणारे इटालियन संशोधक डॉ. फ्रांसेस्को पेर्रोने एका मुलाखतीत म्हणाले, ‘‘मी कधीही खऱ्या शास्त्रज्ञाला राष्ट्रवाद जोपासताना पाहिलेलं नाही. माझा देश-तुझा देश, माझी भाषा-तुझी भाषा, माझा प्रदेश- तुझा प्रदेश ही भाषा खरा शास्त्रज्ञ कधी बोलणारच नाही.’’ या महासाथीपासून वाचण्यासाठी सगळ्या देशांनी आपापल्या सीमा बंद केल्या आहेत . देशादेशात ठरवून राष्ट्रवादाला खतपाणी घातलं जातंय. देशात बनवलेल्याच वस्तू विकत घ्या, इथल्या लोकांनाच नोकर्‍या द्या, अशा मतांचा पूर आला आहे. मात्र, असं असताना जगभरातला एक समुदाय मात्र एकत्र आला आहे. काहीही आवाज न करता शांतपणे एकदिलानं आपापलं काम करतो आहे. जगाला या रोगापासून वाचण्यासाठी अहोरात्र झटतो आहे. तो समुदाय आहे जगभरातल्या संशोधकांचा आणि शास्त्रज्ञांचा. या संकटात शास्त्रज्ञानी जो एकोपा दाखवला आहे तो अभूतपूर्व आहे. विज्ञानातल्या या अशा ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार ठरत असलेले आपण सारे खरोखर भाग्यवान आहोत!

प्रयत्नांची शर्यत
लसनिर्मितीत ऑक्स्फर्ड विद्यापीठ-अ‍ॅस्ट्रा झेनेकाच्या पाठोपाठ आहे ती अमेरिकेतली मॉडर्ना ही कंपनी. यांची लसही ऑक्स्फर्डप्रमाणेच सार्स कोव्ही-2 विषाणूमधलं एमआरएनए प्रतिजन (अ‍ॅन्टीजेन) म्हणून वापरते. या लशीच्या पहिल्या टप्प्यातल्या मानवी चाचण्यांचे निष्कर्ष नुकतेच जाहीर झाले. तीन वेगवेगळ्या डोसमधे ही लस प्रत्येकी तीन माणसांना दिली गेली. पहिला डोस अपुरा पडला; पण दुसर्‍या डोसनंतर मात्र ज्यांना लस दिली त्यांच्या रक्तात भरपूर प्रमाणात प्रतिपिंडं आढळली, शिवाय टी-सेल्समुळे निर्माण होणार्‍या प्रतिकारशक्तीची शक्यताही दिसून आली. शिवाय फारसे गंभीर दुष्परिणामही आढळून आलेले नाहीत. त्यामुळे दुसरा टप्प्यातल्या चाचण्या सुरू करायला अमेरिकन एफडीएकडून हिरवा झेंडा मिळालेला आहे.

कॅनसिनो ही चिनी बनावटीची लसही अगदी ऑक्स्फर्डसारखंच तंत्रज्ञान वापरते. या लशीच्या दुसर्‍या टप्प्यातल्या मानवी चाचण्यांचे निष्कर्ष आशादायक आहेत. लशीच्या पुढच्या टप्प्यातल्या चाचण्या सुरू आहेतच; पण पुरेशी सुरक्षितता आणि समाधानकारक परिणामकारकता आढळल्यानं चिनी औषध नियामक संस्थेनं लष्करात वापरण्यासाठी या लशीला मर्यादित परवाना दिला आहे. रशियानिर्मित एक लसदेखील दुसर्‍या टप्प्याता पोचली आहे, असं या देशानं जाहीर केलं आहे.

भारतात ज्या लशींवर संशोधनं सुरू आहेत, त्यातल्या दोन लशींना डीसीजीआयकडून पहिल्या टप्प्यातल्या मानवी चाचण्या सुरू करण्याची परवानगी आहे. यातली एक आहे झायडस कॅडिला या अहमदाबादधल्या कंपनीनं संशोधन केलेली झीड कोव्ही-डी ही लस. हिच्या चाचण्या हजार स्वयंसेवकांवर सुरू होत आहेत. हैदराबादच्या भारत बायोटेकनं आयसीएमआर आणि राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्थेच्या सहकार्यानं बनवलेली कोव्हॅक्सीन ही लस नुकतीच चर्चेत आली ती ‘15 ऑगस्टला लस मिळू लागेल’ या वादग्रस्त दाव्यामुळे. हा दावा नंतर अर्थातच भारत बायोटेकनं स्वत:च नाकारला आहे. भारत बायोटेकने बनवलेली लस ही ‘निष्क्रिय विषाणू’पासून बनलेली आहे. यात विषाणूला निष्क्रिय करून माणसाच्या शरीरात टोचलं जातं. विषाणू निष्क्रिय असल्यानं संसर्ग घडवू शकत नाही; पण आपली प्रतिकारसंस्था मात्र प्रतिकार करायला सज्ज होते. या प्रकारे लस बनवण्याची पद्धत ही जुनी आहे, म्हणजे जनुकीय अभियांत्रिकीचा उदय होण्यापूर्वी ज्या पद्धतीनं लशी बनवल्या जात त्यातली एक. या लशीच्याही पहिल्या टप्प्यातल्या मानवी चाचण्या सुरू झालेल्या आहेत. मात्र, भारतीय बनावटीच्या दोन्ही लशींना अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. कारण मानवी चाचण्या सुरू झाल्या, तरी त्यातल्या तिन्ही टप्प्यातून तावून सुलाखून लस बाजारात येण्याचं प्रमाण केवळ दहा टक्के असतं, हे ज्ञात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT