sunandan lele
sunandan lele 
सप्तरंग

कसोटीचा काळ (सुनंदन लेले)

सुनंदन लेले

कोरोना विषाणूचा संसर्ग जगभर वाढत आहे आणि त्याचा फटका क्रीडाक्षेत्रालाही बसला आहे. एकीकडे काही टेनिस स्पर्धा रद्द झाल्या आहेत, तर दुसरीकडे ऑलिंपिक्स आणि आयपीएल स्पर्धा या दोन्हींवरती संकटाची टांगती तलवार कायम आहे. अर्थकारणापासून व्यवस्थापर्यंत अनेक गोष्टींची गुंतागुंत वाढली आहे. या सगळ्या गोष्टींबाबत चर्चा.

नैसर्गिक आपत्ती मानवाला नवीन नाहीत. संकटांवर मात करण्यात मानवाला धन्यता वाटते. जगात कुठं काही दुर्घटना घडली, तरी बरेच देश पुढे येतात आणि आपापल्या परीनं मदत करतात. मदत करण्यात खेळाडू पुढं यायला मागं हटत नाहीत. श्रीलंकेला सुनामीनं हादरवलं, तेव्हा मुथय्या मुरलीधरननं दिलेल्या हाकेला बऱ्याच खेळाडूंनी साथ दिली होती. नुकतंच ऑस्ट्रेलियाला वणव्यांनी पछाडलं होतं. त्यातून सावरायलाही जगातले क्रिकेटपटू एकत्र आले. म्हणजेच संकटांवर मात करायला किंवा दु:खावर फुंकर घालायला लोक तयार असतात. एका अर्थानं निसर्गानं दिलेलं आव्हान लोक एकत्र येऊन पेलतात.

निसर्गाला याचाच राग आला, की काय कोणास ठाऊक. कारण या वेळचं संकट एका देशापुरतं किंवा एका प्रांतापुरतं मर्यादित नाहीये. करोना विषाणूंची समस्या जास्तच गंभीर आहे- कारण त्याची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. संपूर्ण जगावर त्याचा भयानक परिणाम होतो आहे. मग खेळाचं क्षेत्र त्यातून वेगळं कसं राहील? जागतिक अर्थव्यवस्थेला जबरदस्त धक्का या समस्येनं बसला आहे ज्याचे हादरे खेळाच्या जगालाही सहन करावे लागणार आहेत. या भयानक संकटानं टांगती तलवार खेळ संयोजकांच्या डोक्यावर लटकू लागली आहे- ज्यात टोकियोत होणाऱ्या ऑलिंपिंक स्पर्धांपासून ते भारतात होणाऱ्या आयपीएल स्पर्धेचा समावेश असायची शक्यता नाकारता येत नाही. खरंच सांगतो रात्र वैऱ्यांची आहे.

कोरोनाचा वणवा
जग २०१९ या वर्षाचा निरोप घेत असताना एक नको असलेला पाहुणा चोरपावलांनी चीनच्या वुहान प्रांतात राहायला आला होता. त्या नको असलेल्या पाहुण्याचं नाव होतं- ‘कोरोना विषाणू’. अगदी ३१ डिसेंबरलाच पहिल्यांदा चीन सरकारनं वुहान प्रांतात साथीचा रोग पसरल्याची कबुली जगाला दिली. सन २००२ मध्ये अशाच प्रकारची साथ चीनमधे येऊन गेली होती- ज्यात ७७० लोकांना जीव गमवावा लागला होता. खरं तर कोरोना विषाणू हे नेहमीच्या सर्दी-खोकला-ताप-कणकण कुटुंबातले असले, तरी यंदाच्या साथीत त्यांची आघात करायची ताकद अचाट वाढली असल्याचं निदर्शनास आलं. चीन सरकारनं ११ जानेवारी २०२० रोजी करोना विषाणूंच्या बाधेनं पहिला रुग्ण दगावल्याची कडू बातमी जगाला दिली. पुढच्याच आठवड्यात थायलंड आणि जपान या देशांत करोना विषाणूंची बाधा झालेले रुग्ण आढळले. हे रुग्ण वुहान प्रांतात काम करून आले होते हे सिद्ध झालं. तीन आठवड्यांत या साथीनं आपले पाय असे काही पसरले, की साडेपाच कोटी लोकांना त्याची बाधा झाली. रुग्ण दगावण्याचं प्रमाण खूप मोठं नसलं, तरी बाधा होण्याचं प्रमाण थरकाप उडवणारं आहे.
बघता बघता इराण आणि दक्षिण कोरियात कोरोना विषाणूच्या रोगानं थैमान घातलं. खंड ओलांडून हा रोग जगभर पसरला. ज्या देशात मुळातच स्वच्छता जास्त आहे, तिथल्या लोकांची प्रतिकारशक्ती त्यामानानं कमकुवत असल्यानं कोरोनाची भीती त्यांना जास्त वाटू लागली. इटली देशात याचा प्रादुर्भाव सर्वांत जास्त झाला, तेव्हा तिथं मृत्यूचं प्रमाण जास्त होतं-त्यामुळे सगळ्यांनाच चिंतेनं ग्रासलं. इटलीतले महत्त्वाचे फुटबॉल सामने रिकाम्या प्रेक्षागृहासमोर खेळण्यावाचून पर्याय उरला नाही. अमेरिकेत जेव्हा एनबीएचे सामनेसुद्धा प्रेक्षकांविना खेळवायचे विचार व्हायला लागले, तेव्हा महान खेळाडू लेब्रॉन जेम्सनं सांगून टाकलं, की प्रेक्षक नसले तर मी सामना खेळायला उत्सुक नाही. इतकंच काय, अमेरिकेतल्या टेनिस स्पर्धा संयोजकांनी अचानक सरळ रद्द करून टाकल्या. व्यवसाय म्हणून टेनिस खेळणारे खेळाडू चक्क बेरोजगार झाले.

ऑलिंपिक स्पर्धेवरही सावट
जुलै महिन्यात सर्वांत मोठा खेळ सोहळा म्हणजे ऑलिंपिक्स स्पर्धा जपानमधल्या टोकियो शहरात भरवल्या जाणार आहेत. जपान देश शिस्त आणि नियोजनाकरता नावाजलेला असल्यानं त्यांनी अगदी काटेकोरपणे स्पर्धांची तयारी वेळेवर केली आहे. उद्‍घाटन आणि सांगता समारंभाबरोबर मुख्य अ‍ॅथलॅटिक्सच्या स्पर्धा ज्या मैदानावर होणार आहेत, ते मैदान एकदम सज्ज करून ठेवलं गेलं आहे. बाकी खेळांची मैदानंही स्पर्धेकरता तयार आहेत. जपान सरकारनं असं नियोजन केलं होतं, की ज्यात स्पर्धेदरम्यान एक कणही प्रदूषण होणार नव्हतं. कार्बन वायूचा विसर्ग न होणारं हे पहिलं ऑलिंपिक होणार आहे. मात्र, कोरोना रोगाच्या साथीमुळे संयोजक धास्तावले आहेत. जपान सरकार आणि आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीनं अजून स्पर्धा पुढे ढकलण्याचा कोणताही निर्णय घेतला नसला, तरी अनिश्चिततेची टांगती तलवार संयोजकांना भीती दाखवत आहे.
आत्ताच्या घडीला तारखांमधे कोणताही बदल केला गेला नसला, तरी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीला संभाव्य सहा लाख प्रेक्षकांचा विचार करून निर्णय घ्यायचा आहे. प्रायोजकांनी मिळून तीन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे- म्हणजे अंदाजे २२ हजार कोटी रुपयांची. एकूण टोकियो ऑलिंपिक्सवर बारा अब्ज डॉलर्सची गुंतवणूक जपान सरकारनं केली आहे. समिती आणि जपान सरकारला मिळून जास्तीत जास्त मे महिन्याच्या अखेरपर्यंत निर्णय घ्यायला अवधी असेल. ऑलिंपिक स्पर्धा भरवताना स्थानिक यजमान सरकार मोठ्या स्तरावर गुंतवणूक करतं- ते गुंतवणुकीचा योग्य मोबदला मिळेल हा विचार मनात साठवून. करोना विषाणूच्या साथीच्या रोगाचं भय कायम राहिलं, तर पर्यटक स्पर्धेकडे पाठ फिरवतील आणि मग केल्या गुंतवणुकीचा परतावा मिळवणं कठीण झाल्यास प्रचंड मोठं नुकसान होईल- जे सहन करण्यापलीकडचं असेल.

आयपीएलचं काय होणार?
जपानला जे महत्त्व ऑलिंपिक स्पर्धांचं आहे- तेच मोल भारताला काहीशा छोट्या प्रमाणावर इंडियन प्रीमिअर लीगचं आहे. कारण एकदम सरळ आहे ते म्हणजे आयपीएल स्पर्धेचं व्हॅल्युएशन पन्नास हजार कोटी रुपयांवर गेलं आहे. आठ संघमालकांनी मोठ्या प्रमाणात संघबांधणीकरता पैसे गुंतवले आहेत. श्रीमंतांची गोष्ट सोडा हो, दोन महिने चालणारी आयपीएलची स्पर्धा हजारो लोकांना रोजीरोटी देते हे विसरून कसं चालेल? ऑलिंपिक स्पर्धा सुरू व्हायला निदान साडेतीन महिने तरी वेळ आहे. उलटपक्षी आयपीएल स्पर्धा फक्त १५ दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे सगळ्यांचे धाबे दणाणले आहेत.
आयपीएल स्पर्धेचं काय होणार या चिंतेला बऱ्याच किनारी आहेत. नुकतंच भारत सरकारनं १५ एप्रिलपर्यंत कोणाही भारतीय माणसाला परदेशात किंवा परदेशी माणसांना भारता येण्यापासून रोखायला पावलं उचलली आहेत. नवीन व्हिसा देण्याची प्रक्रिया थांबली गेली असताना अगदीच गरज असल्यास व्हिसा दिला जाईल, असं सांगण्यात आलं आहे. परदेशातून भारतात दाखल होणाऱ्या व्यक्तीला १४ दिवस एकांतवासात ठेवलं जाईल. प्रत्येक आयपीएल संघात सहा-आठ परदेशी खेळाडू असतातच. मग त्याचा विचार करता ज्या परदेशी खेळाडूंना भारतात आयपीएलकरता यायचं असाल, त्यांना आत्ताच येऊन १४ दिवस एकांतवासात काढावे लागतील.
न्यूझीलंड आणि इंग्लंडचे खेळाडू इतक्या शुद्ध हवेत राहतात, की त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते आणि त्यांना कोणत्याही रोगाची बाधा होण्याची शक्यता अधिक असते. भारतात पुढच्या दोन आठवड्यांत करोना विषाणूची साथ आटोक्यात आली नाही, तर खेळाडू ‘सर सलामत तो पगडी पचास’ असा विचार करून २०२०ची आयपीएल स्पर्धा चुकवायलाही मागंपुढं बघणार नाहीत.

एकंदर परिस्थिती बघता भारत सरकार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला आयपीएल भरवायला परवानगी देईल. फक्त प्रेक्षकांना मैदानात येऊन सामन्याचा आनंद घेण्यापासून मज्जाव करेल. म्हणजेच युरोपमधल्या फुटबॉल स्पर्धांप्रमाणेच मोकळ्या प्रेक्षागृहासमोर सामने खेळणं हा एकमेव उपाय असेल. तिकीटविक्रीतून संघमालकांना मोठं उत्पन्न मिळतं, हा विचार करता प्रेक्षकांना मज्जाव केल्यास मोठा फटका संघमालकांना बसेल.

स्टार स्पोर्टस् कंपनीनं पाच वर्षांकरता आयपीएलचे हक्क विकत घेताना सहा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम अदा केली आहे. म्हणजे एका वर्षाकरता बाराशे कोटी रुपये स्टार स्पोर्टस् कंपनी मोजणार आहे. अर्थव्यवस्थेला लागणारा धक्का विचार करता गुंतवलेली मोठी रक्कम जाहिरातीतून वसूल करायचा मार्ग २०२० आयपीएल दरम्यान किती खडतर असेल, याचा विचार केलेला बरा. रोगाच्या भीतीनं लोकांचं बाहेर फिरणं मर्यादित होणार असल्यानं कदाचित जास्त लोक टीव्हीवर सामना बघण्याचा आनंद घेतील- ज्याचा काहीसा फायदा स्टार स्पोर्टस् कंपनीला होईल. तरीही जाहिरातींतून गुंतवलेली रक्कम वसूल करणं मोठं आव्हान असेल.

एकंदरीत पुढचे चार महिने कोरोना विषाणूच्या रोगाचा काय काय परिणाम जगावर होतो आणि परिणामी क्रीडा जगतावर होतो हे भयभीत होऊन बघण्यावाचून कोणताही उपाय नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT