virendra madhura
virendra madhura 
सप्तरंग

खिडकी... (वीरेंद्र मधुरा)

वीरेंद्र मधुरा virendrabhagawat7@gmail.com

एकदा असाच खूप पाऊस पडत होता. माझा रात्रीच्या जेवणाचा डबा आला आणि मी त्याच खिडकीत बसून जेवत होतो. खिडकीतून छान मुसळधार पाऊस पडत होता. समोरच्या रस्त्यावरच्या कचराकुंडीत एका बाईनं कसलीतरी पिशवी फेकली आणि ती तिथून निघून गेली. पाच-एक मिनिटांनी त्या कचराकुंडीजवळ एक भिकारी आला. काहीतरी शोधत होता बिचारा. थंडीनं तो कापत होता. संपूर्ण भिजला होता. त्याला ती पिशवी मिळाली आणि त्या पिशवीतून कचऱ्यात फेकलेला शिळा भात त्याला मिळाला आणि तो खाऊ लागला. खूप वाईट वाटलं. माझ्या हातातला घास तसाच डब्यात ठेवून डबा बंद केला आणि हात धुतले. त्या रात्री जेवणच गेलं नाही. अशी ही खिडकी मला कायम काहीतरी शिकवून गेली.

कळायला लागल्यानंतर जाणवलेली एक गोष्ट ती म्हणजे मला खिडकी कायम आवडते. खिडक्यांचं हे माझं वेड खूप जुनं. आमचं मुरूडच घर खूप जुनं आणि पारंपरिक कोकणी पद्धतीचं. त्या घराला कोनाडे, खुंट्या, अडसर आणि तशाच जुन्या पद्धतीच्या ‘खिडक्या.’ माझ्या खिडक्यांच्या या प्रवासातलं पहिलं ठिकाण म्हणजे त्या घरातल्या खिडक्या. त्यातल्या एका खिडकीतून मी वाडीतल्या नारळ, सुपारीच्या बागा खूप पहिल्यात. मुळात दुपारी मी कधी झोपतच नाही आणि शाळेतल्या परीक्षा जवळ आल्या, की आई दुपारी अभ्यासाला बसवायची. त्यावेळी मी असाच खिडकीजवळ बसून अभ्यास करत असे. म्हणजे खिडकीतून बाहेर बघण्याचा अभ्यास चालू असे. अगदी साधे लाकडी गज असलेली ती खिडकी मला आजही आठवते. त्या खिडकीतून किती भिन्न प्रकारचं जग दिसायचं. सकाळची तुपाळ उन्हं, अंगणातलं तुळशी वृंदावन, अंगणात वाळायला म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं, तर ‘सनबाथ’ घेत बसलेली कोकम सालं, सुपाऱ्या, खूप उंच जाऊन आकाशाला हात लावायला निघालेले ते माड. त्या खिडकीतून प्रकाशाचा एक झरोका आमच्या घरात यायचा- शेणानं सारवलेली जमीन वळवायला. दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात आई पापड, बटाट्याचा कीस, फेण्या हा सगळा पावसाळ्याचा स्टॉक उन्हात घालायची आणि अर्थातच घरातल्या सगळ्यांची राखण करण्याची ड्युटी लागायची. माझी ही ड्युटी मी मोठ्या आवडीनं त्याच खिडकीत बसून करायचो, नंतर काही वर्षांनी आम्ही चिपळूणला राहायला आलो. या घरालासुद्धा खूप खिडक्या होत्या. या खिडक्यांना मी त्यांची कामं वाटून दिली होती किंवा अजूनही त्या त्यांची काम न चुकता करत असतात. पाऊस पडायला लागला, की मी आजही आमच्या माळ्यावरच्या खिडकीपाशी जाऊन थांबतो. तासन्‌तास त्या खिडकीतून मी पाऊस पाहिलाय. माझ्या खोलीची खिडकी म्हणजे माझ्या स्वर्गातल्या कल्पनेचा अविभाज्य भाग आहे. स्वर्गाची कल्पना म्हणजे काय तर खिडकी सताड उघडी ठेवून तिच्यासमोर एक खुर्ची मांडायची. आपले दोन्ही पाय खिडकीवर ठेवायचे आणि खुर्चीत बसून पुस्तक वाचत बसायचं. अगदीच गरज पडली, तर कॉफी, कधी अगदीच कंटाळा आला, तर छान गाणीसुद्धा लावायची. अशा वातावरणात मला साहिर, गुलजार, सौमित्र, प्रभा अत्रे, निराली कार्तिक किती जवळून भेटतात म्हणून सांगू.

पुढं पुण्याला शिकायला गेलो आणि त्या रूमलासुद्धा एक छान खिडकी होती. खिडकीला लागून माझी कॉट होती. तिथं राहायला सुरवात केली; पण माझ्या आधीच्या मुलानं त्या खिडकीला पडदे लावून घेतले होते. मला मुळात खिडकीला पडदे लावलेले मुळीच आवडत नाहीत. पडदे असावेत; पण ते कायम सताड उघडे असावेत. चांगल्या भाषेत त्याला नावं काहीही द्या- पदर म्हणा, घुंघट म्हणा; पण तो किमान खिडकीवर असला, की नाही म्हटलं तरी माझा मूड जातो. असो! तर पुण्याची खिडकी. सगळ्यात आधी मी ते पडदे काढून टाकले. ती खिडकी माझ्या पुण्यातल्या आयुष्याची साथीदार होती. खूप काही शिकवलं त्या खिडकीनं. त्या खिडकीतून समोरचा रस्ता दिसायचा, त्या रस्तावरून संध्याकाळच्या वेळी फिरणारे अनेक लोक पाहिले आहेत. प्रेमी युगुलापासून मित्र-मैत्रिणींपर्यंत अनेक जण. जवळजवळ अख्खं जग त्या खिडकीच्या पलीकडून मला भेटायचं. त्या निमित्तानं अनेक प्रश्न पडले, अनेक उत्तरंही मिळाली. एकदा असाच खूप पाऊस पडत होता. माझा रात्रीच्या जेवणाचा डबा आला आणि मी त्याच खिडकीत बसून जेवत होतो. खिडकीतून छान मुसळधार पाऊस पडत होता. समोरच्या रस्त्यावरच्या कचराकुंडीत एका बाईनं कसलीतरी पिशवी फेकली आणि ती तिथून निघून गेली. पाच-एक मिनिटांनी त्या कचराकुंडीजवळ एक भिकारी आला. काहीतरी शोधत होता बिचारा. थंडीनं तो कापत होता. संपूर्ण भिजला होता. त्याला ती पिशवी मिळाली आणि त्या पिशवीतून कचऱ्यात फेकलेला शिळा भात त्याला मिळाला आणि तो खाऊ लागला. खूप वाईट वाटलं. माझ्या हातातला घास तसाच डब्यात ठेवून डबा बंद केला आणि हात धुतले. त्या रात्री जेवणच गेलं नाही. अशी ही खिडकी मला कायम काहीतरी शिकवून गेली. आयुष्यात कायम ज्या खिडक्या लक्षात राहतील त्यातलीच ही एक खिडकी. तिच्यातून पाहिलेल्या माणसांच्या आयुष्यातले छोटे, छोटे प्रवेश माझ्या आयुष्याचं ‘नाटकं’ खूप मोठं करून गेले.

पुढं उनाडक्या सुरू झाल्या आणि खोलीतल्या खिडक्यांची जागा प्रवासातल्या खिडक्यांनी घेतली. कुठल्याही प्रवासात मला कायम खिडकी हवीहवीशी वाटते- कारण मला माझं बालपण तिथं सापडतं. एसटीचा प्रवास असेल, तर मुद्दाम लवकर घुसून खिडकी मिळवायची आणि बाजूच्या माणसाला मनातल्या मनात टुकटुक करायचं, याचा लहानपणी किती आनंद व्हायचा, हे शब्दांत नाही सांगता येत. रेल्वेचा प्रवाससुद्धा आता एसी नसला तरी चालतो; पण खिडकी हवीच. आजकाल विमानाचा प्रवाससुद्धा खूप होतो आणि ती खिडकी तर वेगळंच जग दाखवते. मला आठवतंय, लहानपणी अंगणातून विमान दिसलं, की मी उगाच हात उंचावून त्यांना टाटा करायचो आणि मग दोन्ही हात लांब करून संपूर्ण अंगणात धावत सुटायचो. तेव्हा खरंच प्रश्न पडायचा, की विमानातल्या खिडकीत बसलेल्या माणसांना मी दिसत असेन का? पहिल्यांदा जेव्हा मी विमानात बसलो तेव्हा चेक-इन करायच्या आधीच एअरपोर्टच्या गार्डला ‘विंडो सीट’बद्दल विचारलं होतं.

आज विमानाची खिडकी खूप काही दाखवते. बर्फाचा मेकअप करून घेणारा हिमालय दाखवते, अथांग पसरलेला समुद्र दाखवते. कधीकधी बाजूला येणारे ढग दिसतात आणि मग मनातल्या मनात माजात त्या ढगांना मी म्हणतो : ‘बघा, आता तुम्ही आणि मी एकाच उंचीवर आलोय. गाठली की नाही तुमची उंची?’ आणि हसत बसतो आणि प्रवास सुरू राहतो. खिडकीला पाहून असं म्हणावंसं वाटतं, की ‘तेरे मेरे बीच में कैसा है बंधन अंजाना. मैने भी है जाना तुने भी है जाना...’ खरंच मला कायम वाटतं, की ‘खिडकी’ ही माणसाच्या मनातलं कुतूहल जिवंत ठेवते. खूप उथळ वाटणाऱ्या या जगाचं खरं प्रतिबिंब ही दाखवते. खिडकीच्या पलीकडचं जग कधी हवंसं असतं, कधी नकोसं असतं. ते कधी आवाक्यात येतं, कधी नाही. पण खिडकी ते दाखवते. एका बंदिस्त जगाच्या पलीकडचं जग उलगडून दाखवणारी ही ‘विंडो सीट’ मला हवीहवीशी वाटते ते त्यामुळंच!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT