Sayli-Panase
Sayli-Panase 
सप्तरंग

नवनिर्मिती (सायली पानसे-शेल्लीकेरी)

सायली पानसे-शेल्लीकेरी sailyshellikeri@gmail.com

नवनिर्मिती करण्यासाठी कलाकार बुद्धिमान तर असावा लागतोच; पण त्याव्यतिरिक्त तो प्रतिभावान, सर्जनशील आणि सौंदर्यदृष्टी असणाराही असावा लागतो, त्याचबरोबर तो प्रयोगशीलही असावा लागतो. पारंपरिक विचारांचा अभ्यास करत नवीन विचार प्रस्तुत करण्याची जिद्द, चिकाटी व धाडस त्याच्या अंगी असावं लागतं. 

संगीतातल्या निवडक सौंदर्यस्थळांचा आढावा गेल्या काही भागांतून आपण घेतला असला तरी प्रत्यक्ष मैफलीत आणखीही अनेक नवीन सौंदर्यस्थळं आनंद देऊन जात असतात. या अनुभूतीला अंत नाही आणि म्हणून सर्वच सौंदर्यस्थळांचा उल्लेख लेखांमधून शक्य नाही. प्रतिभावंत कलाकाराला सतत नवनवीन सौंदर्यांचा अनुभव येत असतो आणि त्यातून नवनिर्मिती होत राहते. कलेसह प्रत्येक क्षेत्रात सतत नवनिर्मिती सुरू असते. नवनवीन प्रयोग केले जातात. काही यशस्वी होतात, तर काही सपशेल फसतात. आहे त्या परिस्थितीतला तोच तोचपणा घालवणं व जाणवत असलेल्या अपुरेपणात आणि ठरावीक पद्धतीनं बदल घडवून आणणं हा या नवनिर्मितीचा उद्देश असतो; पण हा बदल घडवणं हे सर्वसामान्य माणसाचं काम नव्हे. जुन्याला सोनं मानून, आहे त्यालाच चिकटून बसणं अशी काही जणांची प्रवृत्ती असते. नवीन गोष्टी त्यांना फारशा रुचत नाहीत, कुणी केल्या तर पटतही नाहीत आणि त्यांचा स्वीकारही पटकन केला जात नाही. बदल घडवून आणण्यासाठी असामान्य बुद्धी आणि प्रतिभा गरजेची असते. संगीतकलेतही तसंच दिसून येतं. थोडक्यात, कलेच्या आहे त्या स्वरूपात बदल करावासा वाटला की, आहे ते स्वरूप अपूर्ण वाटलं की, त्यात नावीन्याची गरज भासली की मग नवनिर्मिती होते.

मानवी मन मुळातच नावीन्याच्या शोधात असतं, गतिशील असतं. संगीतातही काळानुरूप असे अनेक बदल झालेले आहेत. अगदी सामगायनापासून ते आजच्या शास्त्रीय संगीताच्या स्वरूपापर्यंत अनेक बदलांचे अनेक टप्पे दिसतात. जे बदल पटतात, रुचतात ते काळाच्या ओघात टिकून राहतात; पण काही बदलांना विरोध पत्करावा लागतो, त्यांच्यावर टीका होते आणि परिणामी ते रुजत नाहीत. बहुतांश प्रत्येक नवनिर्मितीला शंका, विरोध, टीका या सर्व गोष्टींना सामोरं जावं लागतं. त्यातून जे तग धरतं तेच टिकतं व पुढं येतं. Survival of the fittest  हा डार्विन चा सिद्धान्त इथंही तंतोतंत लागू पडतो. असे बदल केवळ नवीन म्हणून तग धरत नाहीत, तर ते जुन्यापेक्षा जास्त चांगले असतात. तथापि, कोणतीही नवीन गोष्ट प्रस्थापित होण्यासाठी ठरावीक कालावधी जावा लागतो.

गेल्या अनेक शतकांमध्ये ख्यालगायन लोकप्रिय होत गेलं. त्या त्या काळातल्या प्रवर्तकांनी अनेक प्रयोग केले, नवनवीन सौंदर्याची भर टाकली. कुणी बंदिशी रचल्या, तर कुणी वैचित्र्यपूर्ण आलापींची भर घातली, कुणी गुंजनात्मक आवाज घडवला, तर कुणी अतिजलद आणि अवघड सरगमची जोड दिली. कुणी मधुर मिंडयुक्त गोलाकार गायकीनं सौंदर्य वाढवलं, तर कुणी नवीन रागांची भर घातली. नवनवीन भर घातल्यानं ख्यालगायकीत नवचैतन्य निर्माण होण्यास मदतच झाली. प्रवाहीपणा हा कोणत्याही कलेच्या जिवंतपणाचं लक्षण आहे.

असे बदल जेव्हा रुजले तेव्हा गुरूंनी घराण्याच्या परंपरेनुसार ते आपल्या शिष्यांकडं सुपूर्द केले; परंतु प्रत्येक पिढीगणिक नावीन्याचा ध्यास वाढतच जातो. आपलं वेगळेपण सिद्ध करण्यात, घराण्यांच्या बंधनात अडकून न राहता अन्य घराण्यांचीही गायकी आत्मसात केली गेली. नावीन्याच्या आणि वैचित्र्याच्या शोधात गाणं बदलत गेलं. अशी विद्या आत्मसात करण्यामागं आपलं गाणं एकाच ढंगाचं न राहता ते विविध पैलूंचं असावं, चतुरस्र व बहुढंगी असावं हा उद्देश होता. या परिवर्तनामुळेच संगीत अधिकाधिक समृद्ध बनत गेलं. या नव्या विचारांबरोबर पारंपरिक विचारांचा आणि परंपरांचाही योग्य तो आदरसन्मान केला गेला. अर्थात हा बदल आमूलाग्र असा नव्हता. कारण, कुठलीही गोष्ट मूलतत्त्वापासून दूर गेली की तीमधला अस्सलपणा नाहीसा होतो, तसा तो झाला नाही. उदाहरणार्थ : एक प्रयोग म्हणून मधल्या काळात इंग्लिश भाषेत एक बंदिश रचली गेली. नावीन्यपूर्ण आणि वैचित्र्यपूर्ण म्हणून तिचं कौतुकही झालं; पण तो बदल ‘आमूलाग्र’ होता, बंदिश या संकल्पनेच्या मूलतत्त्वापासून खूप लांब नेणारा होता म्हणून तो बदल रुजला नाही.

नवनिर्मिती करण्यासाठी कलाकार बुद्धिमान तर असावा लागतोच; पण त्याव्यतिरिक्त तो प्रतिभावान, सर्जनशील आणि सौंदर्यदृष्टी असणाराही असावा लागतो, त्याचबरोबर तो प्रयोगशीलही असावा लागतो. पारंपरिक विचारांचा अभ्यास करत नवीन विचार प्रस्तुत करण्याची जिद्द, चिकाटी व धाडस त्याच्या अंगी असावं लागतं. घराणेदार किंवा पारंपरिक अशा ज्या काही बंदिशींची निर्मिती बुजुर्ग कलाकारांकडून आजवर झाली, त्या सर्व बंदिशी परिपूर्ण आहेतच, तरीसुद्धा बंदिशींची नवनिर्मिती होत आलेली आहे. पूर्वीच्या बंदिशकारांनी इतक्या परिपूर्ण बंदिशी रचलेल्या असताना, नवीन बंदिशींची गरज काय, असा प्रश्न अनेक संगीततज्ज्ञांना पडलेला दिसून येतो. याचं एक उत्तर असं की कलाकाराची प्रतिभा किंवा ऊर्मी त्याला शांत बसू देत नाही. अनेक वर्षांचा संगीतातला अभ्यास, चिंतन, रियाजामुळे त्याच्या विचारांमध्ये प्रगल्भता आलेली असते, जी नवनिर्मितीतून प्रकट होते. शिवाय, काळानुरूप गायनात जे बदल होत आले आहेत त्यांना साजेशा बंदिशी आणि गायकी असणं हीसुद्धा काळाची गरज आहे.

अलीकडच्या काळात अनेक गायक, कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वरचित बंदिशी गातात व शिष्यांनाही शिकवताना दिसतात. त्यामुळे नवीन रचनांना लोकप्रियता मिळू लागली आहे. अनेक कलाकारांच्या बंदिशी पुस्तकरूपात प्रकाशित होताना दिसतात. सोबतच्या ध्वनिफितीतून त्या बंदिशी ऐकताही येतात. विद्यार्थी व गायककलाकारांना नवीन बंदिशींचा संग्रह करता येतो व नवनिर्मिती अनेक रसिकांपर्यंत पोहोचते. एकूणच, या नवरचित बंदिशींना चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो.

संगीत ही प्रयोगशील कला आहे. जेव्हा अनेक कलाकारांकडून सातत्यानं भर पडत राहते तेव्हाच कोणतीही कला वृद्धिंगत होते. या योगदानामुळे आपल्या शास्त्रीय संगीताच्या समृद्धीत नक्कीच भर पडली आहे व पुढंही पडत राहील.
पुढच्या लेखात आपण ‘संगीतात नवीन काही’बद्दल जाणून घेऊ या.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT