फाळणीदरम्यान कित्येक व्यक्तींच्या ताटातुटीमुळे झालेल्या मानसिक-सामाजिक उलथापालथी दाखवताना हिंसक अथवा रक्तरंजित दृश्यं जाणीवपूर्वक टाळण्याचा दृष्टिकोन ही या चित्रपटाची उल्लेखनीय बाजू.
- सारंगी आंबेकर saarangee2976@yahoo.co.in
फाळणीच्या जखमा झेललेले बहुतेक लोक आता काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत. पाऊणशे वर्षांपूर्वी आपल्या देशबांधवांवर झालेल्या आघातांचे आक्रोश एव्हाना शांत झाले असले तरी युद्धजन्य परिस्थितीत ते व्रणही क्वचित ठसठसतात. भारतीय भावविश्वात खोलवर मुळं धरलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये याचा पहिलावहिला कृष्ण-धवल आविष्कार म्हणून ‘बॉम्बे टॉकीज’निर्मित आणि एम. एल. आनंददिग्दर्शित ‘लाहोर’ या चित्रपटाचा उल्लेख यायला हवा. तो १९४९ मध्ये प्रदर्शित झाला.
नर्गिस आणि गायक-नट करण दिवान ही प्रमुख जोडी...खलनायकी छटेत ओमप्रकाश...संगीतकार श्यामसुंदर यांच्या अजरामर चाली...असा सजलेला हा चित्रपट!
फाळणीदरम्यान कित्येक व्यक्तींच्या ताटातुटीमुळे झालेल्या मानसिक-सामाजिक उलथापालथी दाखवताना हिंसक अथवा रक्तरंजित दृश्यं जाणीवपूर्वक टाळण्याचा दृष्टिकोन ही या चित्रपटाची उल्लेखनीय बाजू. संगीताची बाजू कसदार हे आणखी एक ठळक वैशिष्ट्य. १९४९ हे वर्ष ‘बरसात’ (शंकर-जयकिशन), ‘महल’ (खेमचंद प्रकाश), ‘अंदाज’ (नौशाद), ‘पतंगा’ (सी. रामचंद्र) या चित्रपटांतील गीतानी गाजवलं, तर याच वर्षी ‘बाजार’, ‘चार दिन’, ‘लाहोर’हे श्यामसुंदर यांनी संगीतबद्ध केलेले चित्रपट आले. हे चित्रपट म्हणजे एक से एक बढिया चालींची लयलूट होती.
या लेखात ‘लाहोर’ या चित्रपटातील माझ्या आवडत्या तीन गाण्यांविषयी...
लता मंगेशकर आणि करण दिवान यांनी गायलेलं ‘दुनिया हमारे प्यार की, यूँ ही जवाँ रहे...मैं भी वहीं रहूँ, मेरा साजन जहाँ रहे’ हे हमीर-भूप-यमन या रागांची छाया दाखवणारं दादरा तालातलं गीत. क्लिष्टता टाळून आशय परिणामकारकरीत्या साकारला जाईल अशी ही चाल. गीतातील दोन्ही कडव्यांतील तिसरी ओळ तारसप्तकातील उत्कर्षबिंदूकडे झेपावणारी असून ती आवाजाचा पल्ला लक्षात घेता लता मंगेशकर यांनी गायलेली असणं नैसर्गिक आहे. बोलपटात संगीत अवतरल्याच्या सुरुवातीच्या काळात नट-नट्या स्वत: आपली गीतं गात. त्यांच्या आवाजधर्माशी आणि क्षमतेशी जुळवून घेण्याचं बंधन पार्श्वगायनामुळे हळूहळू शिथिल होत नाहीसं झालं. गायकनटाचे गीतातील हावभाव व न-गात्या कलाकारांनी अवघड चालींवर केलेला मुद्राभिनय यांची भट्टी जमायचे योग एवढे दुर्मिळ का असावेत याचा अंदाज बांधता येतो. शिवाय, पार्श्वगायनामुळे गीतांना स्वतंत्र अस्तित्व कसं प्राप्त होतं याचंही उत्तर सापडतं.
‘बहारें फिर भी आएंगी, मगर हम-तुम जुदा होंगे’ हे सुश्राव्य गीत सुरू होतं एका आर्त शेरानं. कवी-गीतकार राजेंद्रकृष्ण यांचे भावविभोर शब्द, जौनपुरी-किरवानीच्या वळणानं जाणारी चाल आणि डौलदार मटकाठेका! यातल्या दोन्ही कडव्यांची चाल समान असली तरी दुसरा अंतरा ठेक्याशिवाय सुरू होत काळजाचा ठोका चुकवतो. हा तात्पुरता ठेकाविराम व ठेक्याचं वजन गाण्याची आर्तता आणि यातला लता मंगेशकर यांचा किंचित सानुनासिक स्वरलगाव गाण्यातली उदासी गडद करतो.
अज़ीज़ कश्मिरी यांनी लिहिलेलं या सिनेमातील सर्वोत्कृष्ट गीत म्हणजे ‘सुन लो सजन मेरी बात...दिल की बात!’ संपूर्ण गीतात करण दिवान यांच्या दोन कडव्यांतील केवळ एका दीर्घ सुरेल आलापानं गीताचा समतोल साधल्याचं प्रतीत होतं.
दादऱ्याची बऱ्यापैकी चढी लय चैतन्यपूर्ण व झऱ्यासारखी खळाळती आहे. अंतऱ्यातल्या शेवटच्या ओळीतील लता मंगेशकर यांनी घेतलेली ‘गोळीबंद’ तान ऐकून थरारल्यासारखं वाटल्याशिवाय राहत नाही. बिलावलचा पेहराव ल्यालेलं हे गीत कोमल गंधाराच्या नजाकतभऱ्या वापरानं लडिवाळ आग्रही भावपरिपोष करतं. प्रामुख्यानं मध्य सप्तकात विहार करणारा गीताचा मुखडा पंचमाच्या आसपास घोटाळत मध्य षड्जावर स्थिरावतो. गीतात दोन्ही कडव्यांची चाल समान असून तार षड्जावरून वळणावळणानं साद घालत मध्य षड्जाशीच सलगी करू पाहते. शब्दांच्या पलीकडल्या भावनेला अनुमोदन देणारा प्रियकर शब्दांऐवजी केवळ आलापीनं युगुलगीतात सामावून घ्यायची सौंदर्यदृष्टी असणारे श्यामसुंदर गीतातील नांदीचा, अंतरेजोडणीचाच नव्हे तर, ओळींमध्ये वाजणारा वाद्यवृंद-सुरावटींचा ‘समा असा काही बांधतात’ की तो शब्द-नि:शब्दाच्या अनुभवाचा आणि ‘तू तू-मैं मैं’ न करता सुसंवादाचा आदर्श नमुना ठरावा. लता मंगेशकर यांची व्याकरणाच्या आणि तंत्राच्या पलीकडील सहजता आणि संगीतकाराच्या चालीला पूर्णपणे न्याय देऊन सौंदर्यशिल्प चितारायची हुकमत श्रवणाच्या प्रत्येक आवर्तनागणिक श्रोत्यांना नतमस्तक व्हायला लावते.
श्यामसुंदर गाबा या प्रतिभावान संगीतकारानं उण्यापुऱ्या पंधरा वर्षांच्या सांगीतिक कारकीर्दीत चार पंजाबी आणि वीस हिंदी चित्रपटांना संगीत दिलं. स्वत: उत्कृष्ट व्हायोलिनवादक असणारे श्यामसुंदर हे उस्ताद झंडेखाँ यांच्या वाद्यसंचातले प्रमुख वादक होते. ‘गुलबलोच’ या पंजाबी चित्रपटाद्वारे महंमद रफी यांना संधी द्यायचा मानही त्यांचाच. नूरजहाँ, शमशाद बेगम, राजकुमारी, सुरैया, उमादेवी, अमीरबाई कर्नाटकी, लता मंगेशकर, सुलोचना कदम-चव्हाण अशा तत्कालीन सर्वच ख्यातकीर्त गायिकांबरोबर त्यांनी काम केलं.
मास्टर गुलाम हैदर - ज्यांना चित्रपटसंगीताच्या लाहोर घराण्याचं संस्थापक मानलं जातं - यांचे साहाय्यक म्हणून श्यामसुंदर यांनी कामाला सुरुवात केली. ढोलकचा वापर, दादरा-कहरव्याच्या ठेक्यांची नावीन्यपूर्ण बांधणी, सुरावटीतल्या अवकाशाचा अर्थपूर्ण कलात्मक उपयोग, गायकांना आव्हानात्मक असलेल्या संकीर्ण, तरीही सुमधुर व लोकसंगीताची प्रांतीय विशेषता जपणाऱ्या चाली, रागदारीच्या सुप्रमाणित नेमक्या वापराला पाश्चात्य वाद्यमेळाची जोड आणि तरीही गीतांवर शास्त्रीय ढाच्यापलीकडील उन्मुक्त गायकीच्या शक्यता, सुरावटीत दाणेदार ताना, लकेरींचा विपुल प्रयोग करणारे श्यामसुंदर यांना अनिल बिस्वास, हुस्नलाल-भगतराम, मदनमोहन, ओ. पी.नय्यर यांच्यासारख्या तत्कालीन संगीतकारांच्या व रसिकांच्या हृदयांत विशेष प्रेमाचं स्थान होतं. बीथोवन म्हणतो तसं Music is the highest revelation than all wisdom and philosophy. असं असलं तरी मद्याच्या व्यसनाधीनतेमुळे १९५३ मध्ये, वयाच्या अवघ्या सत्तेचाळिसाव्या वर्षी, जगाचा निरोप घेतलेल्या श्यामसुंदर यांच्याबद्दल हळहळ वाटल्याशिवय राहत नाही. अंदाजे सत्तर चित्रपटांमध्ये अभिनय आणि तीसेक दर्जेदार गाणी गाऊन हिंदी चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेल्या हरहुन्नरी करण दिवान यांच्या स्मृतीला अभिवादन. लता मंगेशकर यांनी गायलेल्या गीतांचाच नव्हे तर, हिंदी चित्रपटसंगीताच्या वैविध्याचा आणि वैभवाचा अभ्यास करताना श्यामसुंदर यांच्या अवीट चाली दुर्लक्षित कशा करणार?
(सदराच्या लेखिका अर्थशास्त्र व संगीत या विषयांतील पदव्युत्तर स्नातक असून लेखन, गायन व अध्यापनक्षेत्रात वीस वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.