file photo sakal
सप्तरंग

विज्ञानप्रसाराचा मराठीतील नंदादीप!

‘सृष्टिज्ञान’ने मराठीतून विज्ञानप्रसाराचे अविरत कार्य गेली नऊ दशके केले.

सकाळ वृत्तसेवा

-प्रा. जयंत खेडकर

‘सृष्टिज्ञान’ने मराठीतून विज्ञानप्रसाराचे अविरत कार्य गेली नऊ दशके केले. या मासिकाचा ९३वा वर्धापन दिन नुकताच झाला. त्यानिमित्त या उपक्रमाचा परिचय.

भारत स्वतंत्र झाल्यावर विज्ञाननिष्ठ समाज हा देशाच्या प्रगतीत महत्त्वाचा असा घटक असेल, हे जाणून त्यादृष्टीने स्वातंत्र्यपूर्व काळापासून मराठी भाषेतून विज्ञान प्रसाराचे कार्य गेली ९३ वर्षे अखंडपणे करीत असलेल्या ‘सृष्टिज्ञान’ मासिकाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. एक जानेवारी १९२८ रोजी सृष्टिज्ञान मासिकाचा पहिला अंक प्रकशित झाला. कै. प्रा. गोपाळ रामचंद्र परांजपे, कै .डॉ. दि. धों. कर्वे व कै स. बा. हुदलीकर हे या मासिकाचे संस्थापक सदस्य. या मासिकातून सोप्या व सुबोध मराठी भाषेतून साधार व सचित्र वैज्ञानिक माहिती देण्याचे ध्येय संपादकांनी ठेवले. यामुळे विज्ञान हा विषय लोकांना क्लिष्ट अन् निरस न वाटता आवडता अन् कुतूहलाचा वाटू लागला.

शास्त्रीय शोध , दैनंदिन जीवनातील विज्ञान, शात्रज्ञांची चरित्रे, वैज्ञानिक प्रयोग आदि विषयांच्या अंतर्भावाने हे मासिक अल्पकाळातच त्यावेळेपासून लोकप्रिय झाले. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात या मासिकाने विज्ञानाची मराठीतील परिभाषा घडवली. पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र आणि वनस्पतिशास्त्र या तीन विषयांतील पारिभाषिक शब्दसंग्रह सृष्टिज्ञान मासिकाने त्याकाळी सर्वप्रथम प्रसिद्ध केले. नामवंत परिसरविज्ञान शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी ‘आपल्या शास्त्रीय विषयांच्या आवडीचे मूळ शाळेत असताना वाचलेल्या सृष्टिज्ञान मासिकात असल्याचे’ अभिमानाने म्हटले आहे. १९४८च्या पहिल्या अंकात ‘स्वतंत्र भारतात आता आपण व्यावहारिक संशोधनावर अधिक भर दिला पाहिजे ...’ असे प्रतिपादन केलेले आढळते. सृष्टिज्ञान मासिकाच्या संस्थापकांची केवढी ही दूरदृष्टी! वैज्ञानिक मासिक अन् तेही मराठी भाषेतून नऊ दशकांहून अधिक काळ अखंडपणे चालविणे, किती अवघड आहे याविषयी सुज्ञांस सांगणे न लगे.

अगदी कोरोनाच्या भीषण अन कठीण कालावधीतही ई अंक प्रकाशित करून ‘सृष्टिज्ञान’ने प्रकाशनाची परंपरा चालू ठेवली आहे. या वाटचालीत आर्यभूषण प्रेस व महात्मा फुले संग्रहालय, पुणे या संस्थांचे पाठबळ मोलाचे आहे. मानधनाची अपेक्षा न ठेवता केवळ मराठीप्रेम आणि विज्ञानप्रेम यामुळे आजही अनेक नामवंत शास्त्रज्ञ, संशोधक, शिक्षक, प्राध्यापक, कवी, विद्यार्थी स्वतःहून आपापले वैज्ञानिक साहित्य ‘सृष्टिज्ञान’ मासिकासाठी पाठवीत असतात हेदेखील या मासिकाच्या लोकप्रियतेचे निदर्शक आहे. ‘सृष्टिज्ञान’ आता पुणे शहर, जिल्हा व परिसर या व्यतिरिक्त मुंबई, ठाणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, नरसोबाचीवाडी इत्यादी दूरच्या ठिकाणी जाऊन पोहोचले आहे. मातृभाषेतून शिक्षण घेणे अनेक दृष्टीने उपयुक्त ठरते यात संशय नाही. वैज्ञानिक संकल्पनांचे यथायोग्यआकलन होणे ही विज्ञान विषयातील स्वयंअध्ययनातील महत्त्वाची पायरी आहे. यातूनच विज्ञान संशोधक घडण्यास मदत होते. विज्ञानातील अनेक संकल्पना विद्यार्थ्यांना मराठी भाषेतून समजून घेण्यासाठी या मासिकातील माहितीचा उपयोग होतो. सृष्टिज्ञान मासिकातर्फे असे साहित्य मराठी भाषेतून वाचकांपुढे ठेवण्याचे कार्य गेले नव्वद वर्षांहून अधिक काळ सुरू आहे. एखाद्या शांत नंदादीपाप्रमाणे!

अगदी सुरुवातीच्या काळातील मासिकात अंतर्भूत असलेल्या मूलभूत अन् पारंपरिक विषयांमध्ये आता इलेक्ट्रॉनिकस, संगणकशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, उपग्रह, संरक्षण, यंत्रमानव, कृषी आदी नवनवीन विषयांची भर पडत आहे. यामुळे ‘सृष्टिज्ञान’ मासिकाचे स्वरूप अधिक आकर्षक व वैविध्यपूर्ण माहितीने नटलेले दिसते. वैज्ञानिक लेखांच्या विषयातील विविधता हे ‘सृष्टिज्ञान’च्या साहित्य सौंदर्याचे विशेष रूप आहे. अगदी अलीकडच्या सृष्टिज्ञान मासिकातील लेखांच्या शीर्षकांवरून नजर टाकल्यास आपणास या मासिकाच्या अंतरंगाची कल्पना येऊ शकेल.

विज्ञानातील हास्यरंग, आनुवंशिकतेच्या धाग्यांनी विणलेला जिराफाचा कोट, एक असामान्य स्त्री वैज्ञानिक, गणिती फराळ, आठवणीपाठीमागचे विज्ञान, तुळस आणि पर्यावरण, थ्री डी प्रिंटिंग, विष हे अमृत झाले, विषारी वनस्पतींची अद्भुत दुनिया, आई मला चंद्र दे आणून, वैद्यकीय तंत्रज्ञान : काल आणि आज, कृत्रिम बुद्धिमत्ता हे अाणि असेच कितीतरी लेख ‘सृष्टिज्ञान’ने प्रसिद्ध केले आहेत. याशिवाय स्त्री वैज्ञानिक विशेषांक, मधुमक्षिका विशेषांक, श्रीनिवास रामानुजन यांच्या १२५व्या जयंतीनिमित्तचा गणित विशेषांक किंवा वैद्यकीय उपकरणविषयक ‘कुतूहल’ विशेषांक अशी अनेक उदाहरणे याबाबतीत देता येतील. या प्रकारच्याविशेषांकांमधून अनेक मान्यवर लेखकांनी लिहिलेले अभ्यासपूर्ण लेख सर्वसामान्य व्यक्ती, शालेय विद्यार्थी, शिक्षक, वैज्ञानिक, संशोधक यांना उपयुक्त ठरले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT