आनंद अंतरकर sakal
सप्तरंग

मराठी मासिकसृष्टीचे एक शिल्पकार

आनंद अंतरकर यांचे निधन ही सगळ्या साहित्यप्रेमींसाठी अतिशय दुःखद घटना आहे

भानू काळे

संपादक, लेखक आनंद अंतरकर यांचे शनिवारी निधन झाले. त्यांना वाहिलेली आदरांजली.

आनंद अंतरकर यांचे निधन ही सगळ्या साहित्यप्रेमींसाठी अतिशय दुःखद घटना आहे. मासिके चालवण्याचा वारसा त्यांना वडिलांकडून मिळाला. वडील अनंतराव यांनी १९३८ ते १९४२ ‘सत्यकथा’ मासिकाचे कार्यकारी संपादक म्हणून व १९४३ ते १९४६ ‘वसंत’ मासिकांचे संपादक म्हणून उत्तम कामगिरी बजावली होती. पुढे १९४६मध्ये ‘हंस’, ‘मोहिनी’ आणि ‘नवल’ अशी स्वतःची तीन वैशिष्ट्यपूर्ण मासिके त्यांनी सुरू केली आणि नावारूपाला आणली. १९५९मध्ये अवघ्या सतराव्या वर्षीच वडिलांच्या हाताखाली आनंद यांनी उमेदवारीला सुरुवात केली. अनुभवांची ती शिदोरी पुढे आयुष्यभर उपयोगी पडली. १९६६मध्ये वडिलांचे अकाली निधन झाल्याने सगळीच जबाबदारी अवघ्या चोविसाव्या वर्षीच आनंद यांच्यावर पडली. ‘विश्वमोहिनी’ ही १९७० मध्ये सुरू केलेली प्रकाशनसंस्था आणि शिवाय छापखानाही होताच.

तो काळ म्हणजे मराठी मासिकांच्या बहराचा कालखंड. नवी-नवी मासिके सुरू होत होती. पु. भा. भावे, गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले आणि व्यंकटेश माडगूळकर या चार नवकथाकारांचा प्रभाव होताच, पण शिवाय जीए, मोकाशी, वसुंधरा पटवर्धन, राजेंद्र बनहट्टी वगैरे अनेक कथाकार जिद्दीने लेखन करत होते. आपल्या मासिकांचे वेगळेपण पुढची तेवीस वर्षे अंतरकरांनी कसोशीने राखले. ‘हंस’ कथांकरिता प्रसिद्ध होते. विद्याधर म्हैसकर, विजय पाडळकर, पंकज कुरुलकर यांच्यासारखे नवे कथाकारही अंतरकरांनी जोडले. ‘मोहिनी’ विनोदासाठी प्रख्यात होते. शि. द. फडणीस यांचे व्यंगचित्र मुखपृष्ठावर मिरवणारे. द. पां. खांबेटे हेही तिथे विपुल लिहीत. त्यातील शिरीष कणेकर यांचे क्रिकेटविषयक लेखनही खूप वाचकप्रिय होते.

‘नवल’मध्ये भयकथा, गूढकथा, विज्ञानकथा, अनुवाद असे दुर्लक्षित साहित्यप्रकार हाताळले जात. यशवंत रांजणकर, रत्नाकर मतकरी, नारायण धारप, श्रीराम शिधये, सुबोध जावडेकर ‘नवल’मध्ये भेटत. तीन भिन्न प्रवृत्तींच्या मासिकांचे संपादन करताना अंतरकर यांची अभिरुची समृद्ध आणि विशाल झाली. लेखनाप्रमाणे मासिकांची मांडणी, मुखपृष्ठे व आतील रेखाटणे यांच्यावरही त्यांनी विशेष लक्ष दिले. अभिनव कला विद्यालयात शिकल्यामुळे ती विशिष्ट नजर तयार झाली होती. दुर्दैवाने पुढे मराठी मासिकांची पडझड सुरू झाली. त्याची कारणे अनेक आहेत. शेवटी १९८९ मध्ये अंतरकरांना तिन्ही मासिके बंद करावी लागली. झालेले कर्ज फेडण्यासाठी आपला ‘हंस’ बंगलाही विकावा लागला. तिन्ही दिवाळी अंकांचे प्रकाशन मात्र त्यांनी चालू ठेवले. जाहिरातीसाठी न थांबता लवकरात लवकर अंक बाजारात आणणे हे सूत्र त्यांनी यशस्वीपणे राबवले. चारशे रुपये किंमत असूनही खपाचा आकडा घसरू न देणे, हे त्यांचे यश होते.

ललित लेखन

एकाच व्यवसायात असूनही आमचे कायम मित्रत्वाचे संबंध राहिले. ‘अंतर्नाद’मधील मे २००२ पासून पुढची दोन वर्षे चाललेले ‘अक्षरछाया’ हे छायाचित्र व मजकूर यांची सांगड घालणारे त्यांचे सदर वाचकप्रिय होते. स्वतःची हक्काची मासिके असतानाही त्यांनी आमच्याकडे विपुल लेखन केले. कथामंथन या जून २००७ मध्ये ‘अंतर्नाद’ने आयोजित केलेल्या कथालेखन शिबिराला ते हजर होते. त्या वेळी नवोदित लेखकांना मौलिक मार्गदर्शन करताना ते म्हणाले होते,‘‘कथालेखनाची तीव्र ऊर्मी अंतरात उसळत असेल, आणि लिहिल्याशिवाय मेंदूतील अस्वस्थता नि तगमग संपत नसेल, अशा क्षणीच लेखणी होती घ्या. लेखनाविषयी पुरेसं चिंतन होईपर्यंत पेन आणि कागद यांच्यापासून दूर राहा.’’

आमची शेवटची भेट झाली तेव्हा आपल्या मासिकांतील निवडक साहित्याचे काही खंड प्रसिद्ध करायच्या योजनेविषयी ते विस्ताराने बोलले होते. ती साकार होईल तेव्हा एक मोठाच खजिना साहित्यप्रेमींसाठी उपलब्ध होईल.उत्तम साहित्यिक जाण असूनही त्यांचे स्वतःचे लेखन तुलनेने उशिरा सुरू झाले. झुंजुरवेळ, रत्नकीळ, छायानट, घूमर व सेपिया ही पाच ललितलेखनाची पुस्तकेआणि एक धारवाडी कहाणी हे जी. ए. कुलकर्णी यांच्याशी झालेल्या पत्रव्यवहारावर आधारित पुस्तक अशी त्यांची सहा पुस्तके प्रसिद्ध आहेत.

त्यांच्या पत्नी प्रियदर्शिनी म्हणजे महाराष्ट्राचे वाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांच्या कन्या. अरुणा अंतरकर, अनुराधा औरंगाबादकर आणि हेमलता अंतरकर या तीन बहिणी, मुलगा अभिराम व मुलगी मानसी या कुटुंबातील सर्वांनाच साहित्याचे प्रेम आहे. दोन महिन्यांपूर्वी अंतरकरांचे दोन वेळा पोटाचे ऑपरेशन झाले होते. पण त्यापूर्वीच मोठ्या जिद्दीने तिन्ही दिवाळी अंकांचे काम त्यांनी जवळपास पूर्ण केले होते. त्यांचे कुटुंबीय हे तिन्ही अंक वेळेत बाजारात आणून पंचाहत्तर वर्षांचा बहुमोल वारसा चालूच ठेवणार आहेत. अंतरकरांनी आपल्या मासिकांद्वारे अनेक लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आणि वाचकांची अभिरुची समृद्ध करण्याचेही काम केले. हे योगदान खूप महत्त्वाचे आहे. व्यक्तिशः मी एक समव्यावसायिक, उमदा, दिलदार मित्र गमावला आहे आणि एकेकाळी समृद्ध असलेली मराठी मासिकांची सृष्टी त्यांच्या जाण्याने आता अधिकच गरीब झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घ्या, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Latest Marathi News Updates : ३१ जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या – सर्वोच्च न्यायालय

Smriti Mandhana: शाब्बास पोरी! स्मृती मानधनाचा जगभरात दबदबा, वन डे वर्ल्ड कपपूर्वी ICC ने दिली आनंदाची बातमी

Gemini Retro Saree Trend होतोय खूप व्हायरल; पण फोटो बनवताना अजिबात करू नका 'या' 5 चुका, नाहीतर इमेज खराब होणारच

Hidden Story: समुद्राखाली दडलेलं सोनं-चांदीपेक्षा मौल्यवान काय आहे? भारत उलगडणार रहस्य, चावी मिळाली

SCROLL FOR NEXT